माघस्नान : महत्त्व, कालावधी आणि या काळात दान देण्यायोग्य वस्तू

 

१. माघस्नान

माघस्नान म्हणजे माघ मासात पवित्र तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी असलेल्या जलस्त्रोतांत केलेले स्नान. ब्रह्मा, विष्णु, महेश, आदित्य आणि अन्य सर्व देवता माघ मासात विविध तीर्थक्षेत्री येऊन तेथे स्नान करतात. त्यामुळे या काळात माघस्नान करण्यास सांगितले आहे.

 

२. माघस्नानाचा कालावधी

पद्मपुराण आणि ब्रह्मपुराण यांनुसार माघस्नानाचा आरंभ भारतीय कालगणनेच्या शालिवाहन शक संवत्सरानुसार पौष शुक्ल पक्ष एकादशीला होतो आणि माघ शुक्ल पक्ष द्वादशीला त्याची समाप्ती होते.

सध्याच्या प्रथेनुसार माघस्नानाचा आरंभ पौष पौर्णिमेला केला जातो आणि माघ पौर्णिमेला त्याची समाप्ती होते. यानुसार इंग्रजी कालगणनेनुसार माघस्नान सामान्यपणे जानेवारी-फेब्रुवारी या मासांमध्ये असते.

 

३. माघस्नानाचे महत्त्व

३ अ. माघस्नानामुळे आध्यात्मिक शक्ती मिळते आणि शरीर निरोगी होते !

माघ मासात जो पवित्र जलास्त्रोतांमध्ये स्नान करतो, त्याला एक विशेष आध्यात्मिक शक्ती प्राप्त होते. माघस्नान करणार्‍या भाविकांची श्रद्धा असते की, ‘माघस्नान मनुष्याची रोगप्रतिकार क्षमता वाढवते आणि रोग निर्माण करणार्‍या जंतूंना नष्ट करते. त्यामुळे शरीर निरोगी होते.’

३ आ. माघस्नानामुळे सर्व पापांपासून मुक्ती मिळते !

उत्तरप्रदेशातील प्रयाग येथे भौगोलिकदृष्ट्या गंगा आणि यमुना अन् गुप्तरूपाने सरस्वती या पवित्र नद्यांचा संगम आहे. ‘माघ मासात जे कोणी प्रयाग येथील संगमाच्या ठिकाणी किंवा गोदावरी, कावेरी अशा अन्य पवित्र नद्यांमध्ये भक्तीभावाने स्नान करतात, ते सर्व जण पापांतून मुक्त होतात’, असे महाभारताच्या अनुशासन पर्वात सांगितले आहे.

३ इ. माघस्नानामुळे सांसारिक इच्छांची पूर्ती आणि मोक्षप्राप्ती होते !

पद्म पुराणात सांगितले आहे की, भगवान श्रीहरि व्रत, दान आणि तप यांनी जेवढा प्रसन्न होत नाही, तेवढा तो माघ मासात केलेल्या केवळ स्नानाने होतो. माघस्नान करणार्‍यांवर भगवान श्रीविष्णु प्रसन्न रहातो. श्रीविष्णु त्यांना सुख, सौभाग्य, धन, संतती आणि मोक्ष प्रदान करतो. शास्त्रात सांगितले आहे की, सकाम भावाने, म्हणजे सांसारिक इच्छांच्या पूर्तीसाठी माघस्नान केले, तर त्या व्यक्तीच्या इच्छेनुसार त्याला फलप्राप्ती होते आणि निष्काम भावाने, म्हणजे केवळ भगवंताच्या प्राप्तीसाठी स्नानादी कृत्ये केल्यास मोक्षप्राप्ती होते.

 

४. माघस्नानासाठी पवित्र जलस्त्रोत

माघ मासात प्रयाग, वाराणसी, नैमिषारण्य, हरिद्वार, नाशिक इत्यादी पवित्र तीर्थक्षेत्रांमधील जलस्त्रोतांंमध्ये स्नान करतात. कन्याकुमारी आणि रामेश्‍वरम् या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी केलेले स्नानसुद्धा धर्मशास्त्रानुसार उच्चकोटीचे मानले जाते. तसेच राजस्थान येथील पुष्कर सरोवरात केलेले स्नानसुद्धा पवित्र आहे.

यांव्यतिरिक्त भारतातील विविध राज्यांमध्ये अनेक पवित्र तीर्थक्षेत्रे आहेत. तेथेही लोक माघ मासात स्नान करण्यासाठी येतात.

 

५. माघस्नानासाठी उपयुक्त दिवस

‘संपूर्ण माघ मासात पवित्र जलस्त्रोतांमध्ये स्नान करावे’, असे सांगितले आहे; परंतु असे करणे शक्य नसेल, तर माघ मासातील कोणतेही ३ दिवस स्नान करावे. प्रयाग तीर्थक्षेत्रात तीन वेळा स्नान करण्याचे फळ हे दहा सहस्र अश्‍वमेध यज्ञ केल्याने मिळणार्‍या फळापेक्षाही अधिक असते. तीन दिवस स्नान करणे शक्य नसल्यास माघ मासातील कोणत्याही एका दिवशी तरी माघस्नान अवश्य करावे. काही विशिष्ट तिथींना केलेले माघस्नान विशेष फलदायी असते. या तिथी (आणि या वर्षी त्यांचे असलेले दिनांक) पुढीलप्रमाणे आहेत : मकरसंक्रांत, पौष पौर्णिमा, पौष अमावास्या म्हणजेच मौनी अमावास्या, माघ शुक्ल पक्ष पंचमी म्हणजेच वसंत पंचमी, माघ पौर्णिमा आणि महाशिवरात्र.

येथे एक महत्त्वाचे सूत्र म्हणजे, मकरसंक्रांत हा सण प्रत्येकच वर्षी माघस्नानाच्या कालावधीत येईल, असे नाही. तसेच महाशिवरात्रही माघ पौर्णिमेनंतर येते; परंतु या दोन्ही दिवशी केलेले स्नान माघस्नानामध्येच अंतर्भूत केले जाते आणि तितकेच उपयुक्त अन् पवित्रही मानले जाते.

 

६. माघस्नानाची योग्य वेळ

सूर्योदयापूर्वी स्नान करणे उत्तम मानले जाते. नारदपुराणानुसार माघ मासात ब्राह्ममुहूर्तावर, म्हणजे पहाटे साडे तीन ते चार वाजेपर्यंत स्नान केल्याने सर्व महापातके दूर होतात आणि प्राजापत्य यज्ञ केल्याचे फळ मिळते. सूर्योदयानंतर केलेले स्नान आध्यात्मिक दृष्टीने अल्प लाभदायी अथवा कनिष्ठ मानले जाते.

 

७. माघ स्नानानंतर सूर्याला अर्घ्य देण्याचे महत्त्व

शास्त्रात माघ स्नानानंतर सूर्याला अर्घ्य द्यायला सांगितले आहे. अर्घ्य देणे, म्हणजे आपल्या ओंजळीत पाणी घेऊन ते सूर्यदेवाला अर्पण करणे. पद्मपुराणानुसार माघ मासात प्रातःकाळी स्नान करून संपूर्ण विश्‍वाला प्रकाश देणार्‍या भगवान सूर्याला अर्घ्य देण्याचे अनन्य महत्त्व आहे. म्हणूनच सर्व पापांपासून मुक्ती मिळण्यासाठी आणि परमकृपाळू जगदीश्‍वराची कृपा संपादन करण्यासाठी प्रत्येक मनुष्याने माघस्नान केल्यानंतर सूर्यमंत्राचे उच्चारण करत सूर्याला अर्घ्य द्यावे. हा सूर्यमंत्र आहे,

भास्कराय विद्महे । महद्द्युतिकराय धीमहि ।
तन्नो आदित्य प्रचोदयात ॥

अर्थ : तेजाचे आगर असलेल्या सूर्याला आम्ही जाणतो. अत्यंत तेजस्वी आणि सर्वांना प्रकाशमान करणार्‍या सूर्याचे आम्ही ध्यान करतो. हा आदित्य आमच्या बुद्धीला सत्प्रेरणा देवो.

 

८. माघ मासात दानाचे महत्त्व आणि दान देण्यायोग्य वस्तू

महाभारताच्या अनुशासन पर्वात सांगितले आहे की, जो माघ मासात ब्राह्मणांना तिळाचे दान करील, त्याला जंतूंनी भरलेल्या नरकाचे दर्शन करावे लागत नाही.

– महाभारत, अनुशासन पर्व

माघ मासात यथाशक्ती गूळ, लोकरी वस्त्र, रजई, पादत्राणे यांसारख्या थंडीपासून रक्षण करणार्‍या अन्य वस्तूंचे दान करून ‘माधवः प्रीयताम् ।’ असे म्हणावे. ‘माधवः प्रीयताम् ।’ म्हणजे ‘भगवान श्रीविष्णूची प्रीती आणि कृपा प्राप्त व्हावी, यासाठी दान करत आहे.’

 

९. तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी जाऊन माघस्नान करणे शक्य नसल्यास काय करावे ?

माघ मासाचे असे वैशिष्ट्य आहे की, या काळात प्रत्येक नैसर्गिक जलस्त्रोत गंगेप्रमाणे पवित्र होतो. माघस्नानासाठी प्रयाग, वाराणसी इत्यादी स्थाने पवित्र मानली गेली आहेत; परंतु अशा ठिकाणी जाऊन स्नान करणे शक्य नसेल, तर आपल्याजवळ असलेली नदी, तळे, विहीर अशा कोणत्याही नैसर्गिक जलस्त्रोतात स्नान करावे.

 

१०. घरी माघस्नान कसे करावे ?

पवित्र जलाशयात माघस्नान करणे शक्य नसेल, तर माघस्नानासाठी रात्री घराच्या छतावर मातीच्या घागरीत भरून ठेवलेल्या किंवा दिवसभर सूर्यकिरणांनी तापलेल्या पाण्याने स्नान करावे.

घरी माघस्नान करण्यासाठी सकाळी लवकर उठून गंगा, यमुना, सरस्वती… इत्यादी पवित्र नद्यांचे स्मरण करून स्नानाच्या पाण्यात त्यांचे आवाहन करावे. त्यानंतर त्या जलाने स्नान करावे. त्यानंतर भगवान श्रीविष्णूचे स्मरण करून त्याचे पंचोपचार पूजन करावे. यानंतर ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप अधिकाधिक करावा. शक्य असल्यास त्या दिवशी उपवास करावा. तसेच आपल्या क्षमतेप्रमाणे पूर्वी सांगितलेल्या वस्तूंचे दान करावे.

 

११. माघ मासात कल्पवासाचे महत्त्व

‘कल्प’ म्हणजे वेदाध्ययन, मंत्रपठण आणि यज्ञादी कर्मे. पुराणांमध्ये सांगितल्याप्रमाणे माघ मासात पवित्र नद्यांच्या संगमाच्या तटावर निवास करून ही धार्मिक कर्मे करण्याला ‘कल्पवास’ म्हणतात. शास्त्रात सांगितले आहे की, भक्तीभावाने कल्पवास करणार्‍याला सद्गती प्राप्त होते.

एक मास चालणारा पवित्र माघस्नान मेळा उत्तरप्रदेशातील प्रयाग येथे प्रतिवर्षी आयोजित केला जातो. या मेळ्याला ‘कल्पवास’ असेही म्हणतात.

कल्पवासात प्रत्येक दिवशी प्रातःकाळी स्नान, अर्घ्य, यज्ञ इत्यादी केल्यानंतर ब्राह्मणांना भोजन देतात. विविध धार्मिक कथा-प्रवचने ऐकून पूर्ण दिवस सत्संगात व्यतीत करतात. या कालावधीत स्वतःला सर्व भौतिक सुखांपासून दूर ठेवले जाते. या कालावधीत झोपडीत रहातात. भूमीवर गव्हाचे कुस म्हणजे टरफले पसरून त्यावर एक चटई अंथरून झोपतात.

संदर्भ : सनातन-निर्मित ‘माघस्नान (माघस्नानाचे महत्त्व, कालावधी आणि दान देण्यायोग्य वस्तू)’ हा दृकश्राव्य लघुपट (व्हिडिओ)

 

माघस्नानाचे महत्त्व विशद करणारे सनातन-निर्मित आणि हिंदु
जनजागृती समिती प्रस्तूत दृकश्राव्य लघुपट (व्हिडिओ) पहाण्यासाठी मार्गिका (लिंक)

मराठी लघुपट

हिंदी लघुपट

Leave a Comment