संस्कृती आणि धर्म यांची मनुष्यामध्ये जागृती होण्यासाठी सनातनचे ग्रंथप्रदर्शन उत्कृष्ट आहे ! – डॉ. आशिष गौतम, अध्यक्ष, दिव्य प्रेमा सेवा मिशन

कुंभमेळा प्रयागराज २०१९

उजवीकडून आचार्य शंतनु आणि डॉ. आशिष गौतम यांच्याशी संवाद साधतांना सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे अन् पू. नीलेश सिंगबाळ

प्रयागराज (कुंभनगरी), ३१ जानेवारी (वार्ता.) – राष्ट्राच्या प्रगतीसाठी जल, भूमी आणि संस्कृती या तीन तत्त्वांची आवश्यकता असते. एक भूभाग असतो, ज्यामध्ये तीर्थक्षेत्र, नदी, पहाड, कृषी अशा ठिकाणी रहाणारा समरस समाज असतो. जाती, क्षेत्र, भाषा, शिक्षण, लिंग अशा भूमीला तो ‘आई’ म्हणत असतो. त्या भूमीत रहाणार्‍यांना जोडणारी संस्कृती असते. त्याला आपण सनातन संस्कृती म्हणजेच धर्म म्हणतो. सनातन संस्कृती आणि धर्म यांचा परिचय कसा होऊ शकतो, त्यांच्याप्रती श्रद्धा, विश्‍वास, समर्पण कसे जागृत होईल, आजच्या वैज्ञानिक दृष्टीने आपण याला कसे समजू शकतो, या दृष्टीने सनातनचे ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले आहे. सनातन संस्थेने या प्रदर्शनाच्या माध्यमातून भारतीय तरुण, नागरिक, आपली भूमी, जीवनमूल्ये, साहित्य, रहाण्या-खाण्याच्या पद्धती, औषधे, भाषा, संस्कृती यांना जोडण्यासाठी अनोखा आणि अद्भूत प्रयत्न केलेला आहे. तुमचे कार्य अतिशय चांगले आहे, असे मी समजतो. मी देशात फिरून माहिती घेत असतो. त्यात सनातनचे प्रदर्शन सर्वांत चांगले आहे. हे उत्कृष्ट प्रदर्शन असून मला ते आवडले. ‘दिव्य प्रेम सेवा मिशन’च्या अध्यक्षाच्या नात्याने मी सनातनप्रती समर्पित विश्‍वास व्यक्त करतो की, माझी केव्हाही आवश्यकता भासल्यास मी निश्‍चितच सनातनला माझ्या परीने सहकार्य करीन, असे प्रतिपादन ‘दिव्य प्रेमा सेवा मिशन’चे अध्यक्ष डॉ. आशिष गौतम (गाझियाबाद) यांनी येथे केले.

कुंभमेळ्यातील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला त्यांनी नुकतीच भेट दिली. त्यांच्यासमवेत मिशनचे आचार्य शंतनु हेही उपस्थित होते. या वेळी सनातनचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांनी त्यांना प्रदर्शनाची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर हिंदु जनजागृती समितीचे उत्तर-पूर्व भारताचे मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ यांनी डॉ. आशिष गौतम आणि आचार्य शंतनु यांचा सन्मान केला. या दोघांशी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे आणि पू. सिंगबाळ यांनी ‘राष्ट्र आणि धर्म’ यांच्या कार्याविषयी चर्चा केली.

प्रदर्शनाच्या माध्यमातून सनातन संस्था हिंदु राष्ट्राची
स्थापना करण्याचे सार्थक प्रयत्न करत आहे ! – आचार्य शंतनु, दिव्य प्रेमा सेवा मिशन

‘वर्तमान पिढी आणि येणार्‍या पिढीचे विचार जुळत नाहीत. या दृष्टीने या पिढ्यांचे हित साधण्यासाठी आणि या पिढ्यांना एकत्र करण्यासाठी सनातन संस्था सार्थकपणे प्रयत्न करत आहे, अशी प्रदर्शन पाहिल्यानंतर जाणीव होते. या प्रदर्शनातील साहित्य पाहून भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी ही संस्था निश्‍चित आणि सार्थकपणे प्रयत्न करत आहे, हे लक्षात येते. या प्रयत्नाला यश मिळून भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना लवकर होऊन विश्‍वात भारताचा ध्वज फडकू दे, अशी मी ईश्‍वराच्या चरणी प्रार्थना करतो.’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात