सनातनचे जनजागृतीचे कार्य भविष्यात प्रखर सूर्याप्रमाणे प्रकाशमान होईल ! – महामंडलेश्‍वर १००८ श्री स्वामी शांती स्वरूपानंद गिरी महाराज

कुंभमेळा प्रयागराज २०१९

श्री स्वामी शांती स्वरूपानंद गिरी महाराज (उजवीकडे) यांना ग्रंथप्रदर्शनाची माहिती देतांना श्री. सुनील घनवट

प्रयागराज (कुंभनगरी), ३१ जानेवारी (वार्ता.) – सनातन संस्थेच्या वतीने समाजाला जागृत करण्याचे उत्तम कार्य चालू असून हे कार्य भविष्यात प्रखर सूर्याप्रमाणे प्रकाशमान होईल, असे प्रतिपादन मध्यप्रदेशच्या उज्जैन येथील ‘पंचायती आखाडा श्री निरंजनी’चे पीठाधिश्‍वर आणि श्री चारधाम मंदिराचे महामंडलेश्‍वर १००८ श्री स्वामी शांती स्वरूपानंद गिरी महाराज यांनी येथे केले.

श्री स्वामी शांती स्वरूपानंद गिरी महाराज यांनी ३० जानेवारी या दिवशी सनातनच्या प्रयागराज येथे आयोजित धर्मशिक्षण प्रदर्शनाला भेट दिली. या वेळी ते बोलत होते. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट यांनी त्यांना ग्रंथप्रदर्शनाची माहिती दिली. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी महामंडलेश्‍वर १००८ श्री स्वामी शांती स्वरूपानंद गिरी महाराज यांना ‘श्री गंगाजी की महिमा’ हा हिंदु जनजागृती समिती पुरस्कृत ग्रंथ देऊन त्यांचा सन्मान केला.

या प्रसंगी श्री स्वामी शांती स्वरूपानंद गिरी महाराज म्हणाले की, समाजातील युवकांना अशा प्रदर्शनांच्या माध्यमातून जागृत करण्याची आवश्यकता आहे. आजची युवा पिढी पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या आहारी जाऊ लागली आहे. पाश्‍चात्त्य संस्कृतीत कोणतेही सुख किंवा शांती नाही. तेथे केवळ भोग आहेत. भारतीय पुरातन संस्कृती सनातन संस्थेच्या माध्यमातून लोकांनी समजून घेतली पाहिजे. पूजा, ध्यान, योग आदी आपल्या भारतीय पुरातन संस्कृतीच्या आचरणातूनच समाजाला शांती मिळणार आहे. याविषयी सनातन संस्था जनजागृतीचे कार्य करत आहे. आज जागृतीचा सुर्योदय झाला आहे. हीच जागृती पुढे प्रखर सूर्याप्रमाणे प्रचंड प्रकाशमान होऊन समाजाला मार्गदर्शन करील, अशी आमची शुभकामना आहे.

श्री स्वामी शांती स्वरूपानंद गिरी महाराज यांनी सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार !

‘सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांना भेटून त्यांच्यातील विनम्रता आणि साधेपणा यांचा अनुभव येतो. समाजाप्रती त्यांच्या मनात असलेली राष्ट्रभक्ती आणि भारताच्या पुरातन सनातन संस्कृतीला जागृत करण्याचे त्यांचे प्रयत्न कौतुकास्पद (साधुवाद योग्य) आहेत’, असे गौरवोद्गार श्री स्वामी शांती स्वरूपानंद गिरी महाराज यांनी या वेळी काढले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात