१९ जानेवारीला कुंभमेळ्यात प्रथमच काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अत्याचारांसंबंधीचे चित्रप्रदर्शन !

कुंभमेळा प्रयागराज २०१९

प्रयागराज येथील कुंभक्षेत्रात सेक्टर १५ मध्ये मोरी-
मुक्ती मार्गातील चौकात सनातन संस्थेच्या कक्षात पत्रकार परिषद

२९ वर्षांमध्ये हिंदूंचे काश्मीरमध्ये पुनर्वसन न होणे,
हा भारतीय लोकशाहीचा पराभव ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

प्रयागराज (कुंभनगरी), १८ जानेवारी (वार्ता.) – काश्मिरी हिंदूंना जिहादी आतंकवादामुळे १९ जानेवारी १९९० या दिवशी काश्मीर सोडावे लागले. या घटनेला यंदा २९ वर्षे होत आहेत. केंद्र सरकार, सर्वोच्च न्यायालय, सैन्य, संसद असूनसुद्धा गेल्या २९ वर्षांत हिंदूंचे काश्मीरमध्ये पुनर्वसन न होणे हा भारतीय लोकशाहीचा पराभव आहे. मोदी सरकारने निवडणूक घोषणापत्रात वचन दिले होते की, काश्मीरमध्ये हिंदूंचे पुनर्वसन केले जाईल. साडेचार वर्षांचा सत्ताकाळ उपभोगल्यानंतर आमचा मोदी सरकारला प्रश्‍न आहे की, हिंदूंचे काश्मीरमध्ये पुनर्वसन करण्याचे धैर्य ते केव्हा दाखवणार ? जम्मू-काश्मीर राज्यात आजपर्यंत लक्षावधी हिंदूंना विस्थापित म्हणून रहावे लागले. काश्मीरमधील हिंदूंच्या स्थितीची जाणीव होण्यासाठी आणि हिंदूंना जागृत करून येणार्‍या संकटांची जाणीव करून देण्यासाठी १९ जानेवारीला कुंभमेळ्याच्या इतिहासात प्रथमच सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने काश्मीर अन् बांगलादेश येथील हिंदूंवर जिहादी कट्टरतावादी, तसेच आतंकवादी यांनी केलेल्या भीषण अत्याचारासंबंधीच्या भव्य चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी १८ जानेवारीला येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

प्रयागराज येथील कुंभक्षेत्रात सेक्टर १५ मध्ये मोरी-मुक्ती मार्गातील चौकात सनातन संस्थेच्या कक्षात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे उत्तर-पूर्व भारताचे मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ आणि सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस उपस्थित होते. या वेळी विविध प्रसारमाध्यमांचे ६० पत्रकार उपस्थित होते.

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे पुढे म्हणाले की…

१. काश्मीर आणि बांगलादेश येथील हिंदूंवर जिहादी कट्टरवादी आणि आतंकवादी यांनी केलेल्या भीषण अत्याचारासंबंधीचे भव्य प्रदर्शन कुंभनगरीतील ‘भूमानिकेतन पीठाधिश्‍वर मंडप’, संगम लोअर मार्ग, सेक्टर १५ येथे लावण्यात येणार आहे.

२. काश्मिरी हिंदू विस्थापन दिनानिमित्त १९ जानेवारी या दिवशी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

३. आपल्या देशात हिंदूंना विस्थापित म्हणून रहावे लागणारा विश्‍वातील भारत हा पहिला देश आहे. काश्मीरमधील हिंदूंना जलनिःस्सारण, पाणी, वीज अशा सुविधा दिलेल्या नाहीत. तेथील स्त्रिया प्रचंड मानसिक तणावात आहेत.

४. मानवाधिकारवाले याकडे लक्ष देत नाहीत. देशात संसद, घटना आहे; मात्र त्याचा लाभ केवळ अल्पसंख्यांकांना मिळतो, बहुसंख्य हिंदूंना या दोन्हींचा लाभ होत नाही. शरणार्थी म्हणून रहात असलेल्या काश्मीरमधील हिंदूंना कोणतीही सुरक्षा दिलेली नाही. या अनुषंगाने या प्रदर्शनातील माहिती हिंदूंना दिशादर्शक ठरणार आहे.

५. कुंभमेळ्यातील सर्व श्रद्धाळू, संत,हिंदु संघटनांचे प्रतिनिधी, पत्रकार आणि विद्यार्थी यांनी हे चित्रप्रदर्शन पाहून, तसेच १९ जानेवारीला आयोजित चर्चासत्रात सहभागी होऊन ‘आतंकवादाचे भीषण सत्य’ समजून घ्यावे.

हिंदु जनजागृती समितीकडून कुंभक्षेत्रात
‘स्वच्छ कुंभ, सात्त्विक कुंभ’ अभियान ! – पू. नीलेश सिंगबाळ

पू. नीलेश सिंगबाळ म्हणाले की, हिंदु जनजागृती समिती संचलित ‘स्वच्छ कुंभ, सात्त्विक कुंभ’ अभियानात तीर्थ, मंदिरे, गंगा आणि कुंभक्षेत्र यांची स्वच्छता अन् पावित्र्य राखण्यासाठी श्रद्धाळूंचे प्रबोधन करण्यात येत आहे, तसेच मंदिरांचे पावित्र्य जपण्यासाठी हस्तपत्रकांचे वितरण करण्यात येत आहे. देवतांची चित्रे असलेले टी-शर्ट परिधान केल्यामुळे देवतांचा अनादर होतो. त्याचप्रकारे मिठाईचे डबे, उदबत्ती इत्यादींच्या वेष्टनांवर देवतांचे चित्र असते. या वस्तूंचा उपयोग करून झाल्यावर ते रिकामे डबे आणि वेष्टने कचर्‍यात फेकली जाऊन देवतांचा अनादर होतो. हे होऊ नये, हे समजावून सांगण्यासाठी ‘स्वच्छ कुंभ, सात्त्विक कुंभ’ या उपक्रमाचा आरंभ केला आहे. हिंदु धर्माप्रती श्रद्धा नसल्याने हिंदूंचा धर्माविषयी भ्रम निर्माण झाला आहे. कुंभक्षेत्रात हिंदूंना धर्मशिक्षण आणि हिंदु धर्म यांची माहिती देण्यासाठी ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. समाजातील भोंदू साधू-बाबांपासून हिंदूंनी सतर्क रहाण्याविषयी ग्रंथ प्रदर्शनातून हिंदूंना माहिती मिळणार आहे.

श्री. चेतन राजहंस म्हणाले की, भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी या कुंभमेळ्याच्या वेळी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती ‘३ संत चर्चासत्रे’ आणि ‘२ हिंदू संघटन मेळावे’ यांचे आयोजन करणार आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात