प्रस्थापित आखाड्यांचे आडाखे चुकले ! – श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था.

श्री. चेतन राजहंस

प्रस्थापित आखाड्यांचे आडाखे चुकले !

उत्तरप्रदेशमध्ये प्रयागराज येथे चालू असलेल्या महाकुंभमेळ्यात अखेर किन्नर आखाड्याचे नागा संन्यासी साधूंच्या जुना आखाड्यात विलिनीकरण झाले. त्यानंतर जुना आखाड्याच्या संत-महंतांच्या जत्थ्यासह किन्नर आखाड्यातील किन्नरांनी अमृतकुंभ स्नान केले. उज्जैन येथे झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये किन्नर आखाड्याची स्थापना करण्यात आली होती. आखाडा म्हणजे ठिकठिकाणचे साधू, संत, संन्यासी, आचार्य यांचे वर्गीकरण आणि सुसूत्रीकरण यांची व्यवस्था आहे. सनातन हिंदु धर्माचे आचरण, उपासना, प्रसार आणि रक्षण हे मुख्यतः आखाड्यातील साधूंचे जीवनकार्य असते. नुकत्याच स्थापन झालेल्या किन्नर आखाड्यात हे प्रमुख कार्य किती होते, हा एक संशोधनाचा विषय आहे. आखाड्यामध्ये सहभागी होण्यासाठी ‘सनातन हिंदु धर्माप्रती नि जीवनपद्धतीविषयी निष्ठा’ हा एक प्रमुख निकष असतो; मात्र आखाड्यात स्थान मिळाले नाही, तर आम्ही इस्लाम स्वीकारू’ या किन्नरांनी दिलेल्या चेतावणीची अनाठायी भीती बाळगून सनातन धर्मनिष्ठेची कसोटी न लावता किन्नरांना जुन्या आखाड्यामध्ये सहभागी करून घेणे हे एक भरकटलेले पाऊल म्हणावे लागेल.

 

एकनिष्ठ नसलेल्यांचा आखाडा कसा ?

हिंदु धर्माने कधीही एक व्यक्ती म्हणून किन्नर समाजाची उपेक्षा केली नाही. उलट किन्नरांचे आशीर्वाद फलदायी मानले आहेत; मात्र या समाजातील लोकांच्या अयोग्य वर्तनामुळे, तसेच अन्य समाजाच्या अशिक्षितपणामुळे सध्या किन्नरांकडे पाहण्याची दृष्टी वेगळी आहे, ही वस्तूस्थिती आहे. हिंदु धर्माने मनुष्यजीवनाचे अंतिम ध्येय असलेल्या मोक्षपदाचा अधिकार कधीही कुणालाही नाकारला नाही. अगदी अनादि काळापासून किन्नरांचे सामाजिक अस्तित्व आहे. ‘किन्नरता’ ही देहाशी संबंधित आहे, तर ‘संतपद’ अध्यात्मातील  अधिकाराशी संबंधित आहे. ‘आपण किन्नर आहोत’, ही ओळख विसरल्यावर व्यक्ती संत बनते. त्यामुळे किन्नर समाजातील एखादी आध्यात्मिक अधिकारी व्यक्ती एखाद्या आखाड्यामध्ये सहभागी झाली, तर त्यात कुणाला आक्षेप असण्याचे कारण नाही; पण मुळात सध्याच्या किन्नर आखाड्याचा आराखडाच लोकेषणा आणि प्रसिद्धीलोलुपता यांवर आधारित आहे. अशा किन्नर आखाड्याला शेकडो वर्षांची धर्मपालनाची परंपरा असलेल्या प्रचलित जुना आखाड्यात सहभागी करून घेणे दुर्दैवी आहे. याने साध्य काय होणार, हा प्रश्‍न आहे. या विलिनीकरणामुळे किन्नर समाज कट्टर हिंदू होणार कि आखाड्यांचेच अवमूल्यन होणार ? आखाड्यात समावेश व्हायचा असेल, तर तुम्ही साधू-संत, वैरागी किंवा आचार्य असे असणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत बहुतांश किन्नर या गटात मोडत नाहीत. मग त्यांचा वेगळा आखाडा कशासाठी ? ज्या लोकांना धर्मापेक्षाही पद, प्रसिद्धी मोठी वाटते, त्यासाठी ते धर्म सोडण्याचीही चेतावणी देतात, त्यांना धर्मनिष्ठ हिंदु कसे म्हणावे ?

जन्माने हिंदु असलेल्या अनेक किन्नरांवर आज इस्लामचा पगडा आहे. अनेक जण नमाजही पढतात. ‘त्यांनी इस्लामच्या वाटेवर जाऊ नये’, अशी जुना आखाड्यातील साधू-संतांची प्रामाणिक इच्छा आहे, तर स्वतंत्र किन्नर आखाड्याला मान्यता, महामंडलेश्‍वर, महंत आदी उपाध्या असे भौतिक किंवा धार्मिक आमीष न दाखवता साधू-संतांनी या समाजातील लोकांमध्ये धर्मनिष्ठा जागवण्याचे काम करावे. पात्रता अन् आखाड्यांचे नियम यांनुसार आखाड्यांमध्ये सहभागी करून घ्यावे. सध्याच्या किन्नरांकडून सनातन धर्माच्या रक्षणाचे कार्य प्रामाणिकपणे होऊ शकते का, याची चाचणी न घेताच प्रवेश दिला, तर ज्या गतीने किन्नर आखाडा जुना आखाड्यामध्ये सहभागी झाला, त्याच गतीने तो बाहेर पडणार नाही किंवा आखाडा व्यवस्थेला सुरुंग लावणार नाही कशावरून ?

 

हे मान्य आहे का ?

किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्‍वर तृतीयपंथी लक्ष्मीनारायण त्रिपाठी या समलैंगिक संबंधांच्या कट्टर समर्थक आहेत. ‘प्रत्येक महिलेला रावणासारख्या भावाची आवश्यकता आहे’, असे विधान त्यांनी केले होते. स्त्री-पुरुष समानतेच्या नावाखाली भारतीय संस्कृतीवर त्यांनी अनेकदा टीका केली आहे. त्यांचे वैयक्तिक जीवनही हिंदु धर्माला अपेक्षित असे संयमित नाही, तर उच्छृंखल आहे. सामाजिक संकेतस्थळांवरील त्यांच्या छायाचित्रांमधूनही ते दिसून येते. टॅटू, पाश्‍चात्त्य वेशभूषा यांना गौरव मानणार्‍या त्रिपाठी हिंदु धर्माचे काय कार्य करणार ? या आखाड्याचे संस्थापक अजय दास यांनी ‘विवाह : एक नैतिक बलात्कार’ नावाचे वादग्रस्त पुस्तक लिहिले आहे. अशा व्यक्ती ज्या आखाड्याच्या प्रमुख आहेत, त्या आखाड्याकडून सनातन हिंदु धर्माच्या उत्थानाचे कार्य होणार कि अधःपतनाचे हे सांगायला कुणी तज्ञाची आवश्यकता नाही. एकंदरितच किन्नर आखाड्याचे दिग्दर्शनच सनातन हिंदु धर्माला अमान्य असणार्‍या तत्त्वांवर होत आहे. किन्नरांना धार्मिक साधू म्हणून सामावून घेणार्‍या जुना आखाड्याच्या संत-महंतांना, तसेच आखाडा परिषदेला किन्नर आखाड्याच्या प्रमुखांचे विचार मान्य आहेत का ? केवळ अन्य पंथात जाऊ नयेत; म्हणून हिंदु धर्मात बाजारबुणग्यांची संख्या वाढवून घेतल्याने हिंदु धर्माची शक्ती वाढणार आहे का ? याचे उत्तर महाभारतात मिळते. धर्मयुद्धात संख्याबळाचा नाही, तर आध्यात्मिक बळाचा अन् ईश्‍वरभक्तीचाच विजय होतो. किन्नर प्रकरणात प्रस्थापित आखाड्यांचे आडाखे चुकले, असेच म्हणावे लागेल.

– श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात