हिंदु राष्ट्राची शीघ्रातीशीघ्र स्थापना व्हावी, यासाठी सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात ‘राजमातंगी यज्ञ’ संपन्न !

पूर्णाहुती देतांना पू. मुकुल गाडगीळ. त्यांच्या उजव्या बाजूला सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ, बसलेले डावीकडून दुसरे साधक-पुरोहित श्री. दामोदर वझे गुरुजी, तसेच अन्य पुरोहित

रामनाथी (गोवा) – हिंदु राष्ट्र स्थापनेतील अडथळे दूर होऊन हिंदु राष्ट्राची शीघ्रातीशीघ्र स्थापना व्हावी, असा संकल्प करून सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात ११ जानेवारी २०१९ या दिवशी ‘राजमातंगी यज्ञ’ संतांच्या वंदनीय उपस्थितीत अन् भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. ‘राजमातंगीदेवी’चे स्वरूप असलेल्या श्री मिनाक्षी देवीच्या मदुराई, तमिळनाडू येथील मंदिरात याच दिवशी सद्गुरु सौ. अंजली गाडगीळ यांनी नवार्चना केली.

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या हस्ते संकल्प करून यज्ञाचा प्रारंभ झाला. त्यानंतर देवता आवाहन, देवतांचे पूजन, हवन आदी विधी झाल्यावर पूर्णाहुतीने यज्ञाची सांगता झाली. यज्ञाचे पौरोहित्य साधक-पुरोहित श्री. दामोदर वझेगुरुजी यांच्यासह सनातनच्या अन्य पुरोहितांनी केले. या यज्ञाच्या वेळी प.पू. दास महाराज यांच्यासह सनातनचे अन्य संत उपस्थित होते.

श्री राजमातंगीदेवी विशुद्धचक्राची अधिदेवता आहे. विशुद्धचक्र हे वाणीशी संबंधित आहे. श्रीविष्णूच्या आकर्षण शक्तीला ‘राजमातंगी’ म्हटले आहे. मुंडकमाला या पौराणिक ग्रंथामध्ये असा उल्लेख आढळतो की, जसे महाविष्णूचे १० अवतार आहेत, तसेच दुर्गादेवीची ‘दशमहाविद्या’, अशी १० रूपे आहेत. विष्णूच्या प्रत्येक अवताराच्या वेळी दशमहाविद्यांपैकी एक देवी अवतारकार्यात साहाय्य करते. असुरांचे वशीकरण करून त्यांचे निर्दालन करणे, हे श्री राजमातंगीदेवीचे कार्य आहे. याच उद्देशाने हिंदु राष्ट्र स्थापनेतील अडथळे दूर करण्याकरता हा यज्ञ करण्यात आला.