‘व्हिडिओ गेम’ खेळल्यावर आध्यात्मिक त्रास असलेले आणि आध्यात्मिक त्रास नसलेले साधक यांच्यावर झालेला हानीकारक परिणाम

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘यू.टी.एस्.
(युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘सध्याच्या विज्ञानयुगात मैदानी खेळांची जागा विविध ‘व्हिडिओ गेम्स’नी घेतल्याचे सर्वत्र दिसून येते. विदेशात अगदी ५ – ६ वर्षांची मुलेही हे खेळ दिवसभरातील पुष्कळ वेळ खेळतांना दिसतात, इतके या खेळांचे आकर्षण वाढले आहे. गेल्या ५ – १० वर्षांत भारतात बहुतांश व्यक्तींच्या आणि लहान मुलांच्याही हातात भ्रमणभाष दिसू लागल्यानंतर ‘व्हिडिओ गेम’चे लोण भारतातही पसरलेले दिसून येते. व्हिडिओ गेम खेळल्यामुळे शारीरिक, मानसिक, बौद्धिक अशा विविध स्तरांवर हानी होते, हेही सर्वांना ज्ञात आहे. ‘व्हिडिओ गेम खेळल्यामुळे व्यक्तीला आध्यात्मिक स्तरावर काय हानी होते ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी २०.८.२०१८ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीचे स्वरूप, केलेल्या मोजण्यांच्या नोंदी आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

 

१. चाचणीचे स्वरूप

या चाचणीत आध्यात्मिक त्रास (टीप) असलेले २ साधक आणि आध्यात्मिक त्रास नसलेले २ साधक, असे एकूण ४ साधक सहभागी झाले होते. या साधकांना प्रत्येकी १ घंटा (तास) व्हिडिओ गेम खेळण्यास सांगण्यात आले. त्यांनी व्हिडिओे गेम खेळण्यापूर्वी आणि तो खेळल्यानंतर त्यांच्या ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या. या केलेल्या सर्व मोजण्यांच्या नोंदींचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

टीप – आध्यात्मिक त्रास : आध्यात्मिक त्रास असणे, म्हणजे व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

वाचकांना सूचना : जागेअभावी या लेखातील ‘यू.टी.एस्’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

 

२. केलेल्या मोजणीच्या नोंदी आणि त्यांचे विवेचन

२ अ. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन

‘व्हिडिओ गेम’ खेळतांना साधक
२ अ १. आध्यात्मिक त्रास असलेले साधक
२ अ १ अ. व्हिडिओ गेम खेळल्यानंतर आध्यात्मिक त्रास असलेल्या पहिल्या साधकातील ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही नकारात्मक ऊर्जांमध्ये वाढ होणे

आध्यात्मिक त्रास असलेल्या पहिल्या साधकामध्ये आरंभी ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा होत्या. त्यांची प्रभावळ अनुक्रमे २.१० मीटर आणि १.२१ मीटर होती. व्हिडिओ गेम खेळल्यानंतर त्या साधकाच्या नकारात्मक ऊर्जेत अनुक्रमे ०.५३ मीटर आणि ०.८७ मीटर वाढ झाली.

२ अ १ आ. व्हिडिओ गेम खेळल्यानंतर आध्यात्मिक त्रास असलेल्या दुसर्‍या साधकातील ‘इन्फ्रारेड’ या नकारात्मक ऊर्जेत वाढ होणे

आध्यात्मिक त्रास असलेल्या दुसर्‍या साधकामध्ये ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ या नकारात्मक ऊर्जांपैकी ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा होती; पण तिची प्रभावळ नव्हती. या साधकाच्या संदर्भात ‘यू.टी.’ स्कॅनरच्या भुजांनी ९० अंशाचा कोन केला. (स्कॅनरच्या भुजांनी १८० अंशाचा कोन केला, तरच प्रभावळ मोजता येते.) व्हिडिओ गेम खेळल्यानंतर त्या साधकाच्या नकारात्मक ऊर्जेत वाढ होऊन तिची प्रभावळ १.२४ मीटर आली.

२ अ २. व्हिडिओ गेम खेळल्यानंतर आध्यात्मिक त्रास नसलेल्या दोन्ही साधकांमध्ये ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा निर्माण होणे

आरंभी आध्यात्मिक त्रास नसलेल्या दोन्ही साधकांमध्ये नकारात्मक ऊर्जा नव्हती. व्हिडिओ गेम खेळल्यानंतर त्यांच्यामध्ये ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा आढळली; पण तिची प्रभावळ नव्हती. त्या दोघांच्या संदर्भात ‘यू.टी.’ स्कॅनरच्या भुजांनी अनुक्रमे ९० अंश आणि ४५ अंशाचा कोन केला. याचा अर्थ व्हिडिओ गेम खेळल्यानंतर त्या दोघांमध्ये ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली.

२ आ. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन

२ आ १. आध्यात्मिक त्रास असलेल्या दोन्ही साधकांमध्ये सकारात्मक ऊर्जा आढळली नाही.
२ आ २. व्हिडिओ गेम खेळल्यानंतर आध्यात्मिक त्रास नसलेल्या दोन्ही साधकांमधील सकारात्मक ऊर्जा नाहीशी होणे

आध्यात्मिक त्रास नसलेल्या दोन्ही साधकांमध्ये आरंभी सकारात्मक ऊर्जा होती. पहिल्या साधकाच्या संदर्भात ‘यू.टी.’ स्कॅनरच्या भुजांनी ९० अंशाचा कोन केला. दुसर्‍या साधकाच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ १.१३ मीटर होती. व्हिडिओ गेम खेळल्यानंतर त्या दोघांच्या संदर्भात ‘यू.टी.’ स्कॅनरच्या भुजांनी शून्य अंशाचा कोन केला. याचा अर्थ व्हिडिओ गेम खेळल्यानंतर त्या दोघांमध्ये सकारात्मक ऊर्जा आढळली नाही.

२ इ. एकूण प्रभावळीच्या (टीप) संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन

टीप – एकूण प्रभावळ : व्यक्तीच्या संदर्भात तिची लाळ, तसेच वस्तूच्या संदर्भात तिच्यावरील धुलीकण किंवा तिचा थोडासा भाग यांचा ‘नमुना’ म्हणून उपयोग करून त्या व्यक्तीची वा वस्तूची ‘एकूण प्रभावळ’ मोजतात.

सामान्य व्यक्ती किंवा वस्तू हिची एकूण प्रभावळ साधारण १ मीटर असते.

२ इ १. व्हिडिओ गेम खेळल्यानंतर आध्यात्मिक त्रास असलेल्या पहिल्या साधकाची एकूण प्रभावळ वाढणे, तर आध्यात्मिक त्रास असलेला दुसरा साधक आणि आध्यात्मिक त्रास नसलेले दोन्ही साधक यांच्या एकूण प्रभावळीत घट होणे

वरील सर्व सूत्रांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण ‘सूत्र ३’ मध्ये दिले आहे.

 

३. केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचेे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

३ अ. व्हिडिओ गेम असात्त्विक असल्याने
त्यातून वातावरणात नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे

व्हिडिओ गेम्सचे ‘कम्प्युटर गेम’, ‘कन्सोल गेम’, ‘मोबाईल गेम’ असे माध्यमानुसार (यंत्रानुसार), तर खेळानुसार ‘अ‍ॅक्शन गेम’, ‘ऑर्किड गेम (उदा. ‘रेसिंग’)’, ‘टेरर गेम’ असे विविध प्रकार आहेत. व्हिडिओ गेम्सच्या निर्मितीचा उद्देश वरकरणी मनोरंजनाचा असला, तरी प्रत्यक्षात वस्तूस्थिती निराळी आहे. व्हिडिओ गेम खेळतांना व्यक्ती (विशेषकरून लहान मूल) पूर्णपणे काल्पनिक विश्‍वात (जगात) अनेक घंटे रममाण होते. तिला ते मायावी जग खरे वाटू लागते. व्हिडिओ गेम खेळतांना व्यक्तीमध्ये स्पर्धा, मत्सर, हिंसा आदी दुर्गुण बळावत असल्याने तिचे मन, बुद्धी आणि चित्त यांवर विपरीत परिणाम होतो. ‘व्हिडिओ गेम खेळणे’ हे एक व्यसन बनून जाते आणि व्यक्ती त्यात अडकते. थोडक्यात सांगायचे, तर व्हिडिओ गेम खेळल्याने कोणतेही लाभ न होता, उलट तोटेच होतात. एकंदरीतच व्हिडिओ गेम असात्त्विक असल्याने त्यातून वातावरणात नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होतात.

३ आ. व्हिडिओ गेममधून प्रक्षेपित झालेल्या नकारात्मक स्पंदनांमुळे
चाचणीतील आध्यात्मिक त्रास असलेले साधक आणि आध्यात्मिक त्रास
नसलेले साधक यांच्यावर झालेला हानीकारक परिणाम अन् त्यामागील कारणमीमांसा

१. आध्यात्मिक त्रास असलेल्या पहिल्या साधकाला वाईट शक्तींचा तीव्र त्रास आहे. त्याच्यामध्ये आरंभी ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा आढळल्या. ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा त्रास देणार्‍या वाईट शक्तीने व्यक्तीवर आणलेले त्रासदायक शक्तीचे आवरण दर्शवते आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ ही नकारात्मक ऊर्जा व्यक्तीला त्रास देणार्‍या वाईट शक्तीचे प्रत्यक्ष अस्तित्व दर्शवते. त्या साधकाला त्रास देणारी वाईट शक्ती व्हिडिओ गेममधून प्रक्षेपित झालेली नकारात्मक स्पंदने ग्रहण करण्यासाठी सक्रीय झाली होती. त्यामुळे व्हिडिओ गेम खेळल्यानंतर त्या साधकाच्या ‘इन्फ्रारेड’ अन् ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जांमध्ये वाढ झालेली दिसून आली. साधकाच्या एकूण प्रभावळीत नकारात्मक स्पंदनांची मोठ्या प्रमाणात भर पडल्याने त्याच्या एकूण प्रभावळीत वाढ झाली.

२. आध्यात्मिक त्रास असलेल्या दुसर्‍या साधकाला मध्यम स्वरूपाचा आध्यात्मिक त्रास आहे. त्याच्यामध्ये आरंभी अल्प प्रमाणात ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा आढळली. त्याच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा नव्हती. व्हिडिओ गेममधून प्रक्षेपित झालेल्या नकारात्मक स्पंदनांमुळे त्याच्यातील ‘इन्फ्रारेड’ या नकारात्मक ऊर्जेत वाढ झाली. व्हिडिओ गेममधून प्रक्षेपित झालेल्या नकारात्मक स्पंदनांमुळे त्याच्या एकूण प्रभावळीतील ऊर्जा नष्ट झाल्याने त्याची एकूण प्रभावळ घटली.

३. चाचणीतील आध्यात्मिक त्रास नसलेल्या दोन्ही साधकांना आध्यात्मिक त्रास नाही. त्या दोघांमध्ये सकारात्मक ऊर्जा होती. व्हिडिओ गेममधून प्रक्षेपित झालेल्या नकारात्मक स्पंदनांचा परिणाम झाल्याने त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा नाहिशी झाली आणि त्यांच्यामध्ये थोडी नकारात्मक स्पंदने निर्माण झाली. त्या दोघांच्या एकूण प्रभावळीतील सकारात्मक ऊर्जाही अल्प झाल्याने त्यांची एकूण प्रभावळ घटली.

थोडक्यात सांगायचे, तर व्हिडिओ गेम खेळणे अतिशय हानीकारक आहे, हे या वैज्ञानिक चाचणीतून लक्षात येते.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (२८.८.२०१८)

इ-मेल : mav.research२०१४@gmail.com

 

‘व्हिडिओ गेम’चे दुष्परिणाम जाणा !

‘व्हिडिओ गेम्स’चे ‘कम्प्युटर गेम’, ‘कन्सोल गेम’, ‘मोबाईल गेम’ असे माध्यमानुसार (यंत्रानुसार), तर खेळानुसार अ‍ॅक्शन गेम, ऑर्किड गेम (उदा. ‘रेसिंग’), टेरर गेम असे विविध प्रकार आहेत. हे विध्वंसक खेळ खेळणार्‍या मुलांविषयी अमेरिका आणि युरोपीय देश यांमध्ये पुष्कळ संशोधन झाले आहे. त्या संशोधनात हा खेळ खेळणार्‍या मुलांवर होणारे पुढील काही दुष्परिणाम आढळून आले आहेत.

१. शारीरिक दुष्परिणाम

विध्वंसक खेळ खेळणार्‍या मुलांमध्ये पोटदुखीसारखे विकार उद्भवण्याचे प्रमाण पुष्कळ अधिक असते. एखादा व्यसनी माणूस जेव्हा व्यसन करतो, तेव्हा त्याच्या मेंदूत ‘डोपामिन’ नावाचे रसायन बनते अन् त्यामुळे तो उत्तेजित होतो. विध्वंसक खेळ खेळणार्‍या मुलांच्या मेंदूतही हेच रसायन आढळून आले आहे.

२. मानसिक दुष्परिणाम

विध्वंसक खेळ खेळणारी मुले खेळ खेळून झाल्यावर पुढच्या २४ घंट्यांतही (तासांतही) विध्वंसक वागतात. विध्वंसक खेळ खेळणार्‍या मुलांमध्ये वाईट स्वप्ने पडून भीतीने थरथरत उठण्याचे प्रमाण पुष्कळ अधिक असते.’

– डॉ. स्वप्नील देशमुख, समुपदेशक मानसोपचारतज्ञ (कन्सल्टिंग सायकिअ‍ॅट्रिस्ट), पुणे. (दैनिक ‘लोकमत’, ७.१०.२०११)
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ – ‘टी.व्ही., मोबाईल आणि इंटरनेट यांचे तोटे टाळून लाभ मिळवा !’)