प्रयागराज येथील अतीप्राचीन अक्षयवट ४५० वर्षांनंतर हिंदु भाविकांसाठी खुला !

पवित्र अक्षयवटाची पूजा करतांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (सर्वांत पुढे असलेले)

प्रयागराज – गेल्या ४५० वर्षांपासून येथे बंदिस्त असलेला अतीप्राचीन आणि आध्यात्मिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व असलेला अक्षयवट आणि सरस्वती कुप (सरस्वती नदी जिथे गंगा आणि यमुना यांना जाऊन मिळते, ते ठिकाण) हे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते भाविकांसाठी खुले करण्याची ऐतिहासिक घटना येथे १० जानेवारीला घडली. पत्रकारांसमोर झालेल्या या कार्यक्रमात योगी आदित्यनाथ यांनी अक्षयवट आणि सरस्वती कुप हे दोंन्ही भाविकांसाठी खुले झाल्याचे घोषित केले.

या संदर्भात ‘मिडीया सेंटर’ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत विस्तृत माहिती देतांना योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले की…

१. अक्षयवट आणि सरस्वती कुप हे भाविकांसाठी खुले होणे, ही गौरवास्पद गोष्ट असून याचे संत आणि भाविक यांनी स्वागत केले आहे. भाविकांना या दर्शनातून दिव्य आध्यात्मिक अनुभूतीचा लाभ घेता येईल.

२. प्रयागराज येथील कुंभमेळ्याला सहस्रों वर्षांपासूनचा इतिहास आहे. येथील गंगा, यमुना आणि सरस्वती नदींचा त्रिवेणी संगम पहाण्यासाठी आणि अदृश्य सरस्वतीचे दर्शन घेण्यासाठी लक्षावधी श्रद्धाळू भाविक येतात. सहस्रों वर्षांनंतर प्रयागराज कुंभमेळ्याला वैश्‍विक मान्यता मिळाली आहे.

३. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेमुळे येथील कुंभमेळ्यात राष्ट्रीय ध्वजांची स्थापना करण्यासाठी ७१ देशांतील राजदूतांनी मान्यता दिली आहे. ही सर्वांत अभिमानास्पद गोष्ट आहे.

४. कुंभमेळ्याच्या निमित्ताने येथील द्वादशमाधव आणि भारद्वाजऋषि आश्रम अशा पौराणिक स्थळांचे नूतनीकरण आणि जिर्णोद्वार करणार आहोत.

५. कुंभमेळ्यात १० सहस्र भाविकांसाठी गंगानदीच्या पात्रात पंडाल उभारण्यात आला आहे, तसेच त्यामध्ये २० सहस्र भाविकांच्या रहाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

६. कुंभमेळ्यात ५ किलोमीटरपर्यंत १ सहस्र ३०० हेक्टर भूमीत ९४ वाहनतळाची व्यवस्था, तसेच २० सॅटलाईट आणि १ सहस्र १०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यासह ५५० शटल बससेवा चालू करण्यात आली आहे. रस्त्यांवर ४० सहस्र ७०० दिवे बसवण्यात आले आहेत. यासह १५ फ्लायओवर आणि २६४ रस्ते बांधण्यात आले आहेत. यासह ४ सांस्कृतिक पंडाल, तसेच ५०० पर्यावरण अनुकूल शौचालय उभारण्यात आले आहेत. भाविकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.

७. राष्ट्रपती रामनाथ कोविंद १७ जानेवारीला कुंभमेळ्यात येणार असून त्यांच्या हस्ते महर्षि भारद्वाज यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात येईल.

८. या वेळी त्यांनी अक्षयवट आणि सरस्वती कुप हे भाविकांसाठी खुले करण्यास साहाय्य केल्याविषयी पंतप्रधान आणि रक्षामंत्री यांचे आभार मानले.

पत्रकारांच्या प्रश्‍नांची उत्तर देतांना मुख्यमंत्री आदित्यनाथ म्हणाले की,

१. ‘स्वच्छ आणि सुरक्षित कुंभ’ असा उद्देश ठेवून येथून पुढे ‘भव्य दिव्य कुंभ’कडे वाटचाल करत आहोत. ‘नमामी गंगे’ अशी संकल्पना करून २६ सहस्र कोटी रुपये गंगानदीच्या स्वच्छतेसाठी खर्च करण्याची तरतूद आहे. याचा प्रारंभ प्रयागराज येथून करणार आहोत. गंगानदीच्या स्वच्छतेसाठी दीड वर्षांची योजना सिद्ध केली आहे.

२. कुंभमेळ्याच्या ठिकाणी शौचालयाचे सांडपाणी गंगा आणि युमना नदीत न मिसळण्यासाठी इकोफ्रेंडली पद्धतीने शौचालयांची व्यवस्था केली आहे. यापूर्वीच्या सरकारने अशी व्यवस्था केली नव्हती. पूर्वी सर्व सांडपाणी नदीच्या पात्रातील वाळूत मिसळत होते. त्यामुळे गंगानदीतील पाणी कायम प्रदूषित रहायचे. प्रयागराज येथील नाल्यांतील सांडपाणी गंगानदीत मिसळण्याचे थांबवण्यात आले आहे.

३. कुंभमेळ्यातील काही आखाड्यांना सुविधा मिळाल्या नसतील, तर त्यांच्यासह सर्वांना सुविधा देण्यासाठी प्रशासन तत्पर असेल. कोणालाही वंचित ठेवणार नाही. कुंभमेळ्यात सर्वांच्या गरजा वाढलेल्या आहेत. तरीही त्या पुरवण्यासाठी व्यवस्था करण्यात येईल.

४. ‘कोणत्याही सुविधा न देता संतांकडून विजेचे देयक का घेतले जाते ?’, असा प्रश्‍न विचारला असता याविषयी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी काहीच माहिती न देता या प्रश्‍नाला बगल दिली.

अक्षयवट आणि सरस्वती कुप यांच्या दर्शनाची अशी असेल व्यवस्था…

१. अक्षयवट आणि सरस्वती कुप यांचे प्रतिदिन २८ सहस्र श्रद्धाळू भाविक दर्शन घेतील.

२. या दोन्हींचे पहाटे ५ वाजल्यापासून ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत भाविकांना दर्शन घेता येईल.

३. प्रतिदिन दुपारी १ घंटा स्वच्छतेसाठी दर्शन बंद राहील. अक्षयवट आणि सरस्वती कुप यांच्या संरक्षणासाठी ४०० पोलीस, सैनिक आणि राज्य राखीव दलाचे पोलीस तैनात असतील. ३ विभागांचे पोलीस, प्रशासन आणि सैनिक विभागातील अधिकारीही तैनात करण्यात येतील.

४. अक्षयवट याचे दर्शन घेण्यासाठी आणि अक्षयवट येथे असलेल्या किल्ल्याच्या डागडुजीसाठी ३ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

५. सुका बदाम, पिस्ता आणि सुका नारळ असा प्रसाद अक्षयवटला चढवला, तरी चालेल; मात्र या व्यतिरिक्त अन्य प्रसाद चालू शकणार नाही.

६. अक्षयवटचे दर्शन घेतांना भ्रमणभाष, कॅमेरा, रिमोट की, बेल्ट, लाईटर आदी  साहित्य नेण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.

अक्षयवटाचे माहात्म्य !

अक्षयवट हा अतीप्राचीन वटवृक्ष असून त्याचा प्रलयानंतरही नाश होत नाही. सृष्टीचा नाश होतांना सप्तऋषि, देवता, सर्व वनस्पतींची बिजे आदींना ६ मासांचा बालमुकुंद स्वरूपातील महाविष्णु धारण करतो आणि तो अक्षयवटाच्या सर्वांत उंच असलेल्या पानांवरती पहुडलेला असतो. त्यानंतर पुन्हा त्यातून नवीन सृष्टीचा प्रारंभ होतो. अशा अक्षयवटाचे दर्शन आणि त्याला प्रदक्षिणा घातल्याने दर्शनार्थींना मुक्ती आणि मोक्ष प्राप्त होतो, अशी आख्यायिका आहे. मोगलांच्या काळात हिंदूंना अक्षयवटाचे दर्शन होऊ नये, यासाठी त्यांच्यांकडून २३ वेळा हा वृक्ष नष्ट करण्यात आला. तरीही त्याला पुनःपुन्हा घुमारे फुटले. हिंदू त्या ठिकाणी येऊ नयेत, यासाठी मोगलांनी तेथे किल्ला बांधला. मोगलानंतर हे क्षेत्र ब्रिटिशांच्या कह्यात गेल्यानंतर त्यांनी तेथे सैन्यदलाचा तळ उभारला आणि तेथे हिंदूंना जाण्यास प्रतिबंध केला. याच ठिकाणी सरस्वती कुपही ही आहे. येथूनच सरस्वती नदी गंगा आणि यमुना यांना जाऊन मिळते. आतापर्यंतच्या सरकारांनीही हे स्थळ दर्शनासाठी खुले केले नाही. त्यामुळे गेली ४५० वर्षे हिंदू या आध्यात्मिक ठेव्यापासून वंचित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात