प.पू. दास महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ५ ‘पंचमुखी हनुमानकवच यज्ञ’ संपन्न !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे,
हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या व्यापक कार्यातील वाईट शक्तींचे सर्व अडथळे
दूर व्हावेत आणि साधकांचे रक्षण व्हावे’, यासाठी करण्यात आले संकल्प !

आश्रमासमोर स्थापन करण्यात आलेली सजीव झालेली शेंदूरलिपीत हनुमानाची मूर्ती
लीन भावाने कृतन्यता व्यक्त करतांना प.पू. दास महाराज
पूर्णाहुती देतांना पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ, त्यांच्यासोबत १. प.पू. दास महाराज, २. पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक, ३. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि पुरोहित

रामनाथी (गोवा) – श्रीरामदूत, पवनसुत, महाबली, महावीर, दास्यभक्तीचा आदर्श, अशा अनेक विशेषणांनी ज्यांचा गुणगौरव केला जातो, अशा चिरंजीव अंजनीपुत्र हनुमानाने श्रीरामचरणांची अखंड सेवा केली. हनुमंत कधी सूक्ष्म रूप धारण करून सीतामातेसमोर गेले, कधी उग्र रूप धारण करून लंका जाळली, तर कधी भीमरूप (विक्राळ रूप) धारण करून असुरांचा संहार करून श्रीरामाची कार्यपूर्ती केली. अनेक ऋषि-मुनी आणि देवता ज्यांच्या गुणांचे वर्णन करतात, अशा श्री हनुमानाची कृपा संपादन करण्यासाठी अन् धर्मकार्यासाठी त्यांच्याकडून आशीर्वाद मिळवण्यासाठी येथील सनातनच्या आश्रमात पानवळ, बांदा, जिल्हा सिंधुदुर्ग येथील संत प.पू. दास महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अन् संतांच्या वंदनीय उपस्थितीत एकूण ५ हनुमानकवचयज्ञ भावपूर्ण आणि चैतन्यमय वातावरणात रामनाथी आश्रमात संपन्न झाले. प.पू. दास महाराज यांनी संकल्प केल्याप्रमाणे येथील सनातनच्या आश्रमात ५ यज्ञांमधील शेवटचा ‘पंचमुखी हनुमानकवच यज्ञ’ २० नोव्हेंबर २०१८ या दिवशी भावपूर्ण आणि चैतन्यमय वातावरणात संपन्न झाला. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे, हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या व्यापक कार्यातील वाईट शक्तींचे सर्व अडथळे दूर व्हावेत आणि साधकांचे रक्षण व्हावे’, यासाठी सनातनच्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी संकल्प केला. प.पू. दास महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत झालेल्या पंचमुखी हनुमानकवच यज्ञांपैकी हा ५१ वा यज्ञ होता. सनातनचे संत पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ यांनी यज्ञाचे यजमानपद भूषवले. कपि, गरुड, वराह, नृसिंह आणि हयग्रीव या पाच मुखांसाठी भावपूर्ण आहुती देत हनुमंताला प्रार्थना करण्यात आली.

शेवटी साधकांच्या रक्षणासाठी सिद्ध असणार्‍या हनुमंताची आर्ततेने आरती आणि त्यानंतर प्रार्थना करून सांगता करण्यात आली. यज्ञाच्या सांगतेनंतर हनुमानाच्या पाच मुखांचे प्रतिकात्मक रूप म्हणून ५ बटूंचे पूजन करण्यात आले. सनातनचे पुरोहित साधक श्री. दामोदर वझेगुरुजी यांच्यासह श्री. सिद्धेश करंदीकर, श्री. ओंकार पाध्ये, श्री. अमर जोशी, श्री. पंकज बर्वे, श्री. ईशान जोशी आणि श्री. चैतन्य दीक्षित यांनी यज्ञविधीत सहभाग घेतला होता.

हिंदु राष्ट्र स्थापनेतील अडथळे दूर होण्यासह साधक आणि हिंदुत्वनिष्ठ यांचेही त्रास दूर होण्यासाठी प्रयत्न करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले, स्वतःच्या देहाची पर्वा न करता हे याग करणारे प.पू. दास महाराज यांच्याप्रती उपस्थित साधकांमध्ये कृतज्ञता भाव निर्माण झाला होता.

संतांची विनम्रता आणि कृतज्ञता भाव !

यज्ञाच्या सांगतेनंतर प.पू. दास महाराज, त्यांच्या पत्नी पू. (सौ.) लक्ष्मी नाईक उपाख्य पू. (सौ.) माई, सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ यांनी बटूंसमोर नतमस्तक होऊन नमस्कार केला अन् आशीर्वाद घेतले. त्यानंतर प.पू. दास महाराज यांचा पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ यांनी सन्मान केला आणि पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक यांची सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी ओटी भरून सन्मान केला. सन्मानाच्या वेळी प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) माई यांनी त्यांना घालण्यात येत असलेला हार अनुक्रमे पू. (डॉ.) गाडगीळकाका आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना घातला. त्यानंतर सर्व संतांनी एकमेकांना वाकून नमस्कार केला. या संतांच्या कृतीतून त्यांच्यातील विनम्रता आणि संतांप्रती असलेला कृतज्ञता भाव व्यक्त होत होता.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या
संकल्पामुळे यज्ञाची सेवा करू शकलो ! – प.पू. दास महाराज

वर्ष २००२ मध्ये पंचमुखी हनुमानकवच यज्ञांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संकल्पाने प्रारंभ झाला. या कार्यात अनेक संतांनी सहभाग घेतला; मात्र हे सर्व पूर्णत्वास जाण्यास गुरुदेवांनीच (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) शक्ती दिली. ५५ यज्ञांचा संकल्प होता; परंतु हे यज्ञ करणे चालू केल्यावर वाईट शक्तींनी मला पुष्कळ त्रास दिला. माझ्या जिवावर बेतण्याचे प्रसंगही उद्भवले. या सर्व प्रसंगांतून विष्णुस्वरूप गुरुमाऊलीनेच वाचवले आणि मला पुनर्जन्म दिला. मला होणारा त्रास पाहून गुरुदेवांनी यज्ञ करण्याचे स्थगित केले. ४६ यज्ञ झाले होते; मात्र ५५ यज्ञांचा संकल्प पूर्ण झाला नव्हता. त्यामुळे ‘यज्ञाचा संकल्प पूर्ण झाला नाही’, हा विचार मनात सारखा येत होता. पानवळ, बांदा येथून रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर एक दिवस परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी माझ्या मनाच्या स्थिती ओळखून सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याद्वारे ‘आश्रमात यज्ञ करायचे आहेत’, असा निरोप पाठवला आणि आश्रमात ५ यज्ञ करूनही घेतले. मला शारीरिक व्याधी असल्यामुळे सलग एक घंटाही बसता येत नाही; मात्र आश्रमात झालेल्या पाचही यज्ञांच्या वेळी ४ – ४ घंटे मी एका जागेवर बसू शकलो, ही केवळ गुरुमाऊलींची कृपा आहे.

प.पू.दास महाराज यांनी परात्पर गुरु डॉ.
आठवले यांच्या चरणी व्यक्त केलेली कृतज्ञता अन् प्रार्थना !

आम्हाला विष्णुरूपी परमात्मास्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले भेटले, हे आमचे भाग्य आहे. हे गुरुदेवा, तुमच्या संकल्पानेच आम्ही यज्ञसेवा करू शकलो. तुम्हीच हिंदु राष्ट्राची स्थापना करवून घ्या. या हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्यात सहभागी साधकांना शक्ती द्या !

साधकांचे त्रास दूर होण्यासाठी प.पू. दास
महाराज यांनी केले ५१ ‘पंचमुखी हनुमानकवच यज्ञ’ !

वर्ष २००२ मध्ये साधकांना होणार्‍या आध्यात्मिक त्रासांच्या निवारणार्थ सुखसागर, फोंडा (गोवा) येथील आश्रमात प.पू. दास महाराज यांनी ११ पंचमुखी हनुमानकवच यज्ञ केले होते. त्यानंतर त्यांनी त्याच वर्षी भारतभर भ्रमण करून सर्वत्रचे सनातनचे आश्रम आणि सेवाकेंद्रे येथे ३५ असे एकूण ४६ पंचमुखी हनुमानकवच यज्ञ केले. आता वाईट शक्तींविरुद्धचे सूक्ष्मातील युद्ध अंतिम टप्प्यात आले असतांना ‘साधकांचे त्रास दूर व्हावेत’ आणि ‘रामराज्याची, म्हणजेच हिंदु राष्ट्राची शीघ्रातिशीघ्र स्थापना व्हावी’, यासाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात पुन्हा ५ यज्ञ करण्यात आले. प.पू. दास महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत ५१ यज्ञ पूर्ण झाले आहेत.

प.पू. दास महाराज यांनी हनुमंताच्या चरणी केलेली आर्त प्रार्थना !

‘हे हनुमंता, आम्हा साधकांमध्ये दास्यभक्ती आणि राष्ट्रभक्ती निर्माण होऊन आमच्याकडून तुमच्यासारखे कार्य होऊ दे. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आपण आम्हाला आशीर्वाद, शक्ती आणि बुद्धी द्या. या यज्ञाचा लाभ परात्पर गुरु डॉ. आठवले, सनातनचे सर्व सद्गुरु, संत, आध्यात्मिक उन्नती केलेले साधक, तसेच देश-विदेशातील सर्व साधक यांना होऊ दे. श्रीरामाने शबरीची उष्टी बोरे खाल्ली. शबरीप्रमाणे आमचा भाव नाही; पण आमच्याकडून काही चुकले असल्यास आम्हाला क्षमा करावी आणि यज्ञाचा हविर्भाग ग्रहण करावा.’

आपल्या सुमधूर आवाजातील प्रार्थनांनी साधकांच्या
भावस्थितीत वृद्धी करणारे पुरोहित श्री. दामोदर वझेगुरुजी !

यज्ञाला संतांची वंदनीय उपस्थिती लाभली होती. त्यामुळे वातावरण चैतन्यदायी बनले होते. परात्पर गुरुदेव आपल्यासाठी करत असलेल्या अनेकविध गोष्टींमुळे साधक भावावस्था अनुभवत होतेच; मात्र यात भर पडली ती यागाचे मुख्य पुरोहित श्री. दामोदर वझेगुरुजी यांनी भावपूर्ण स्वरात केलेल्या प्रार्थनांची ! यज्ञविधी चालू असतांना अधूनमधून श्री. वझेगुरुजी वेगवेगळ्या प्रार्थना करत होते. श्रीराम, हनुमंत यांचा जयघोष असो वा गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त करायची असो, श्री. वझेगुरुजी करत असलेल्या प्रत्येक प्रार्थनेगणिक साधकांना भावस्थिती अनुभवता येत होती. श्री. वझेगुरुजींच्या या वैशिष्ट्याची नोंद घेत परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांचे कौतुक केले.

क्षणचित्रे

१. यज्ञाला आरंभ होण्याच्या आधी, म्हणजे सकाळी १० वाजता आश्रमाच्या बाजूला वानर आले होते.

२. हनुमानाच्या नरसिंह मुखासाठी आहुती दिली जात असतांना यज्ञकुंडातील ज्वाळेत वराह मुख दिसले. (छायाचित्र गोलात दाखवत आहोत.)

३. पंचमुखी हनुमानाच्या मूर्तीच्या दोन्ही बाजूला ठेवण्यात आलेल्या समईतील ज्योतींमधून किरण बाहेर पडत होते आणि वारा नसतांनाही ज्योती हलत होत्या. ज्योतींमध्ये सजीवता जाणवत होती, असे सूक्ष्म-ज्ञान प्राप्तकर्त्या साधिका कु. मधुरा भोसले यांना जाणवले.

४. आतापर्यंत आश्रमात झालेल्या यज्ञांच्या वेळी यज्ञकुंडातून निघणारा धूर यज्ञकुंड परिसरातच पसरत असे; मात्र या वेळी झालेल्या यज्ञाचा धूर आश्रमासमोर असलेल्या फाटकापर्यंत पसरला होता.

५. हयग्रीव मुखासाठी आहुती दिली जात असतांना हलकासा पाऊस पडला, तसेच यज्ञाच्या सांगतेच्या वेळीही विजांचा कडकडाट होऊन थोडा पाऊस पडला.

६. पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक यांनी यज्ञाच्या सांगतेच्या वेळी ‘गजानन द्या मज आशीर्वाद..’, हे गीत गाऊन गुरुचरणी प्रार्थना केली. पू. (सौ.) माई यांनी भावपूर्ण आणि आर्ततेने म्हटलेल्या गीताने सर्वांची भावजागृती झाली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात