प्रयागराज येथील कुंभमेळ्याला आध्यात्मिक स्वरूप देण्याचा उत्तरप्रदेश शासनाचा स्तुत्य प्रयत्न !

प्रयागराज (कुंभनगरी), १० जानेवारी (वार्ता.) – भव्य-दिव्य कुंभमेळ्याची सिद्धता उत्तरप्रदेश शासनाने आध्यात्मिक स्तरावर केली आहे. जागोजागी कुंभमेळा, गंगा, प्रयागराज यांचे आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट करणारे संस्कृतमधील श्‍लोक लावले आहेत; तर बस आणि रेल्वे स्थानक येथून प्रयागराज शहरात प्रवेश केल्यावर बहुतांश भिंती, पूल, यांवर देवता, संत, साधू आणि पौराणिक कथा दर्शवणारी सुंदर चित्रे रेखाटली आहेत. ही चित्रे इतकी बोलकी आहेत की, तेथे ती व्यक्ती जिवंत वाटते. त्यामुळे आपण एका आध्यात्मिक नगरीतच प्रवेश करत आहोत, असा भाव निर्माण होतो.

भारताने निधर्मी शासनव्यवस्था स्वीकारल्यामुळे मुसलमान, ख्रिस्ती आदी पंथ सोडले, तर केवळ हिंदूंनाच त्यांचा धर्म-संस्कृती विसरण्यास भाग पाडले जात आहे; मात्र प्रयागराज येथे प्रवेश केल्यावर महान हिंदु संस्कृती जनमानसावर बिंबवण्याचा प्रयत्न उत्तरप्रदेशातील योगी आदित्यनाथ शासनाने केला आहे. त्यामुळे हिंदु धर्माभिमानी व्यक्तीला प्रयागराज येथे आल्यावर सहज आनंद होतो.

प्रयाग येथील एका भिंतीवर रेखाटलेले साधूंचे सुंदर चित्र 
प्रयाग येथील अग्नीशमन केंद्राला हिंदी आणि संस्कृत शब्दांमध्ये दिलेले नाव

येथील कुंभमेळा गंगामातेच्या कुशीत (वाळवंटात) भरतो. तर येथे विविध मार्ग आणि द्वार यांना हिंदु संस्कृतीत वापरल्या जाणार्‍या विविध शस्त्रांची नावे अथवा रूप देण्यात आले आहे. उदा. त्रिशूलद्वार, धनुष्यद्वार, शंखद्वार, ऐरावतद्वार. काही मार्गांना मुक्तीमार्ग, संगममार्ग, त्रिवेणीमार्ग, कालीमार्ग, शंकराचार्य मार्ग अशा प्रकारे नावे दिल्यामुळे मार्ग अन् द्वार यांची नावे लक्षात ठेवणे सोपे झाले आहे.

‘शंख’ स्वरूपात उभारलेल्या भव्य कमानी 
‘त्रिशूळ’ स्वरूपात उभारलेल्या भव्य कमानी

भिंतींवर देवतांची चित्रे काढतांना ‘भगवान शंकराने गंगेला जटेत घेतले आहे’, ‘समुद्रमंथनाचा प्रसंग’, ‘वामनाने बळीच्या डोक्यावर पाऊल ठेवले आहे’, अशी विविध चित्रे रेखाटलेली आहेत.

कुंभमेळ्याच्या मधोमध वाहनांसाठी ‘शास्त्री पूल’ नावाचा एक मोठा पूल, तर वर्ष १९५४ मध्ये बांधलेला रेल्वेचा पूल आहे. शास्त्री पुलावरून कुंभमेळ्यात प्रवेश करण्यापूर्वी तात्पुरत्या स्वरूपाचे एक पोलीस ठाणे उभे केले आहे. त्याचे नाव ‘थाना शास्त्री सेतु’, असे ठेवले आहे. बर्‍याचदा शासकीय नावे इंग्रजी अथवा परकीय भाषेत दिलेली असतात. मात्र येथे शासनाने स्वभाषाभिमान जपला आहे.

(केवळ कुंभमेळ्यापुरते नव्हे, तर कायमस्वरूपीच भाषाभिमान जोपासून तो कृतीत आणणे आवश्यक आहे. देशातील सर्व स्थळांना अशी नावे दिल्यास सात्त्विक असे हिंदु राष्ट्र येण्यास वेळ लागणार नाही ! – संपादक)

प्रयागराज येथील पोलीस, प्रशासकीय अधिकारी
आणि सामान्य जनता यांच्यामधील धर्माभिमान !

प्रयागराज येथील पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी कपाळावर चंदनाचा टिळा लावलेले आढळले. या तुलनेत अन्य राज्यांत पोलीस कपाळावर टिळा लावत नाहीत अथवा लावलाच, तर लगेच पुसतात. संतांप्रती येथील पोलीस आणि अधिकारी नम्रभावाने वागतात. तुलनेने येथील जनता, पोलीस आणि प्रशासन यांच्यात धर्माप्रती आदरभाव अधिक प्रमाणात आढळतो.

धर्मग्रंथातील संस्कृत श्‍लोकांनी कुंभनगरी सुशोभित !

धर्मग्रंथातील संस्कृत श्‍लोकांनी कुंभनगरी सुशोभित !
प्रयागराज शहरातील मार्गावर आणि कुंभमेळ्याच्या ठिकाणी शासनाने विविध प्रकारचे फलक लावले आहेत. त्यावर संस्कृत श्‍लोक अन् त्यांचा अर्थ दिला आहे. त्यातील काही उदाहरणे येथे देत आहोत.
१. ‘प्रयागस्त प्रवेशेयु पापम् नश्यति तत्क्षणात् ।

अर्थ : प्रयागमध्ये केवळ प्रवेश केल्यानेच पापांपासून मुक्ती मिळते.

२. सितासिते सरिते यत्र संगमे, तत्राप्लुतासौ दिवमुत्पतन्ति । (ऋवेद)

अर्थ : जे लोक ‘सित’ (श्‍वेत-गंगा) आणि ‘असि’ (श्याम-यमुना) या दोन नद्यांच्या संगम स्थळी स्नान करतात, त्यांना स्वर्गाची प्राप्ती होते.

३. गंगे तव दर्शनात् मुक्ति: ।

अर्थ : माता गंगे, आपल्या केवळ दर्शनाने (आम्हाला) मुक्ती मिळून जाते.

४. प्रकृष्टं सर्वयागेभ्य: प्रयागमिती गीयते । (स्कन्दपुराण)

अर्थ : सर्व यज्ञांचे सर्वोत्तम (फळ) मिळाल्यामुळे यास ‘प्रयाग’ म्हटले जाते.

५. दर्शनातस्य तीर्थस्य नाम संकीर्तनादपि । मृत्तिकालम्भनाद्वापि नर: पापात् प्रमुच्यते ॥  (मत्स्यपुराण)

अर्थ : तीर्थराज प्रयागचे दर्शन घेणे, (येथे) नामजप करणे तथा (येथील) मातीला स्पर्श करणे, याने मनुष्य पापांपासून मुक्त होऊन जातो.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात