(म्हणे) ‘सनातन संस्थेने श्रीपाल सबनीस यांना धमकी दिल्यानंतरही मुख्यमंत्री मूग गिळून गप्प होते !’

सनातनद्वेषी काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांचा धादांत खोटा आरोप

अशी कोणतीही धमकी सनातन संस्थेने दिलेली नसतांना वारंवार धादांत खोटे आरोप करून तिची अपकीर्ती करणारे काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्यासाठी सनातन अधिवक्त्यांचा सल्ला घेत आहे !

मुंबई – गेल्या वर्षी ८९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. त्या वेळी संपूर्ण भाजप त्यांच्यावर तुटून पडली होती, तसेच मुख्यमंत्र्यांनी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सबनीस यांचे अध्यक्षीय भाषण संपेपर्यंत थांबण्याचे सौजन्यही दाखवले नव्हते. सनातन संस्थेने सबनीस यांना धमकी दिल्यानंतरही मुख्यमंत्री मूग गिळून गप्प होते (अशी धमकी दिल्याचा एक तरी पुरावा चव्हाण यांनी दाखवावा ! ‘खोटे बोला; पण रेटून बोला’, अशीच घोटाळेबाज काँग्रेसवाल्यांची वृत्ती बनली आहे, हेच यातून पुनःपुन्हा उघड होते ! – संपादक); परंतु आता साहित्य संमेलनाच्या आयोजकांकडून एवढी असहिष्णुता दाखवली जात असतांना मुख्यमंत्र्यांनी चार ओळींचा खुलासा करून सोयीस्करपणे हात वर केले; पण आयोजकांच्या या कृतीच्या विरोधात निषेधाचा साधा सूरही काढला नाही. हा दुटप्पीपणा नाही तर काय आहे ?, अशी विधाने काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहेत. इंग्रजी साहित्यिक नयनतारा सहगल यांना यवतमाळ येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे दिलेले निमंत्रण रहित केल्याच्या प्रकरणी हे प्रसिद्धीपत्रक काढण्यात आले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात