वैष्णवांच्या दिगंबर, निर्वाणी आणि निर्मोही या तिन्ही अनी आखाड्यांची भव्य पेशवाई !

प्रयागराज (कुंभनगरी) – वैष्णवांच्या दिगंबर, निर्वाणी आणि निर्मोही या ३ प्रमुख अनी आखाड्यांची भव्य पेशवाई (शोभायात्रा) वाजत-गाजत काढण्यात आली. यात हत्ती, घोडे आणि उंट यांचा समावेश होता. या वेळी रथात वैष्णव आखाडे आणि खालसे यांचे अनेक महामंडलेश्‍वर अन् महंत विराजमान झाले होते. दुपारी १२.३० वाजता प्रयागराज येथील काली प्रसाद महाविद्यालयापासून प्रारंभ झालेली पेशवाई साडेसहा घंटे चालली. यात दांडपट्टा, तलवार, चक्री आदींची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. जागोजागी संतांवर पुष्पवृष्टी करण्यात येत होती.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून संत-महंत यांचे स्वागत
संत-महंत यांच्या पाठीमागे दिसणारे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीचे स्वागत फलक
संत-महंत यांच्या पाठीमागे दिसणारे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीचे स्वागत फलक

या पेशवाईत सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे संत, साधक अन् कार्यकर्ते हेही सहभागी झाले होते. त्यांनी प्रारंभी आणि शेवटी संत-महंत यांचे स्वागत केले. या वेळी सनातनच्या साधकांनी ‘सनातन संस्था – हार्दिक स्वागत’, ‘सर्व अनी आखाड्यांचे हार्दिक स्वागत’, असे कापडी फलक हातात धरले होते.

या पेशवाईत जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी हंसदेवाचार्य महाराज, श्री पंच दिगंबर अनी आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष महंत श्री कृष्णदासजी महाराज, महंत श्री रामकिशोरदास महाराज, महंत श्री माधवाचार्य महाराज, श्री पंच निर्वाणी अनी आखाड्याचे महंत धर्मदासजी महाराज, श्री पंच निर्मोही अनी आखाड्यांचे प्रमुख महंत आणि अनेक संत-महंत सहभागी झाले होते. प्रारंभी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराज हे काही काळ सहभागी झाले. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस आणि हिंदु जनजागृती समितीचे उत्तर प्रदेश अन् बिहार राज्यांचे समन्वयक श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी हेही या पेशवाईत सहभागी झाले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात