‘सनातन पंचाग २०१९’ या ‘आयओएस् अ‍ॅप’चे अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराज यांच्या शुभहस्ते प्रकाशन !

प्रयागराज (कुंभनगरी) – सनातन संस्थेचे हिंदी भाषेतील ‘सनातन पंचाग २०१९’ या ‘आयओएस् अ‍ॅप’चा (अ‍ॅपेल प्रणाली) अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराज यांच्या शुभहस्ते प्रयागराज कुंभनगरी येथे प्रकाशन करण्यात आले. या वेळी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री तथा श्री पंच दशनाम जुना आखाडाचे मुख्य संरक्षक महंत श्रीहरिगिरीजी महाराज, श्री पंचायती बडा उदासीन आखाडा निर्वाणीचे महंत महेश्‍वरदासजी महाराज, तसेच हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे , हिंदु जनजागृती समितीचे उत्तर अन् पूर्व भारत मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ यांचीही वंदनीय उपस्थिती होती.

‘सनातन पंचाग २०१९’च्या ‘आयओएस् अ‍ॅप’चा शुभारंभ करतांना डावीकडून महंत नरेंद्रगिरी महाराज आणि महंत श्रीहरिगिरीजी महाराज, स्वामी रवींद्र पुरी, सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे आणि पू. नीलेश सिंगबाळ

सनातन संस्था चांगले कार्य करत आहे ! – महंत
नरेंद्रगिरी महाराज आणि महंत श्रीहरिगिरीजी महाराज

या वेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी उपस्थित महंतांना ‘सनातन पंचाग २०१९’ अ‍ॅपविषयी माहिती दिली. हे अ‍ॅप विविध भाषांत उपलब्ध असून त्यात ‘सण-व्रते’, ‘मुहूर्त’, ‘पंचांग’, ‘आयुर्वेद’, ‘उपचारपद्धती’, ‘अध्यात्म’, ‘धर्मशिक्षण’, ‘राष्ट्र-धर्म रक्षण’, ‘धर्मज्ञान देणार्‍या ध्वनीचित्रफिती’, ‘हिंदु राष्ट्र हवे’ आणि ‘सनातनची ग्रंथसंपदा’ आदींविषयी विस्तृत माहिती दिली असल्याचे त्यांना सांगितले. त्यावर महंत नरेंद्रगिरी महाराज आणि महंत श्रीहरिगिरीजी महाराज यांनी ‘सनातन संस्था चांगले कार्य करत आहे’, असे सांगत कौतुक केले. या वेळी सनातन संस्थेच्या वतीने प्रथम महंत नरेंद्रगिरी महाराज आणि महंत महेश्‍वरदासजी महाराज यांचा पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात