भीष्माचार्य शरपंजरी !

शकपूर्व २००९ (इसवी सन पूर्व २०८७) च्या मार्गशीर्ष कृष्ण पक्ष षष्ठी या दिवशी भारतीय युद्धात म्हणजे कौरव आणि पांडव यांच्यातील युद्धात कौरवांकडील विख्यात सेनापती पितामह भीष्माचार्य यांनी शरपंजरी देह ठेवला.

‘९-१० दिवस युद्ध होऊनही पांडवांकडील सैन्याची काही हानी होत नाही’, हे पाहून दुर्योधन जेव्हा कर्णाकडे सेनापतीपद देण्याचा विचार करू लागला, त्या वेळी भीष्म संतप्त होऊन म्हणाले, ‘‘उद्या मी मरेन, नाही तर पांडव तरी मरतील. उद्या मी असे युद्ध करेन की, सहस्रो वर्षे लोक त्याची आठवण काढत रहातील.’’ वीरश्रीच्या आवेशात पितामह भीष्माचार्य कौरव सैन्यास मागे टाकून बरेच पुढे गेले. रक्षक मागे राहिले, ही संधी साधून श्रीकृष्णाच्या सल्ल्यावरून अर्जुनाने शिखंडीचा रथ पुढे केला आणि बाणांचा वर्षाव करण्यास आरंभ केला. शिखंडीवर बाण टाकायचे नाहीत, ही भीष्मांची प्रतिज्ञा होती. शिखंडीला पुढे पाहून भीष्मांनी धनुष्य खाली ठेवले होते. त्या वेळी शेकडो बाण कवच फोडून त्यांच्या अंगात घुसले. ‘यांतील अर्जुनाचे बाण माझी मर्मे तोडीत आहेत’, असे स्वतःशीच म्हणत भीष्मांनी धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला. तोच अर्जुनाने तेही तोडून टाकले. दुसरे उचलले, तेही तोडले. या अवधीत भीष्मांच्या देहात इतके बाण शिरले होते की, दोन बोटेही रिकामी जागा त्यांच्या देहावर शिल्लक राहिली नव्हती. शेवटी प्राण कासावीस होऊन सूर्यास्ताच्या सुमारास भीष्म रथातून पूर्वेकडे डोके होऊन खाली पडले; पण अंगात घुसलेल्या बाणांमुळे ते अक्षरशः ‘शरपंजरी’च राहिले.

दोनही पक्षांकडील वीरश्रेष्ठ भीष्मांभोवती जमले. ‘डोके लोंबकळत आहे’, असे म्हणताच काहींनी मोठमोठ्या उशा आणल्या; पण भीष्मांनी त्या नाकारल्या. तेव्हा अर्जुनाने ३ बाण मारले. त्या बाणांनी भीष्मांचे डोके सावरून धरले. भीष्म क्षीण स्वरात बोलले, ‘‘माझे शव बाणांवरच असू द्या. उत्तरायण होईपर्यंत मी असाच प्राण धरून ठेवणार आहे. पिताजींच्या आशीर्वादाने मी इच्छामरणी आहे.’’ या सर्व व्यवस्थेनंतर भीष्माचार्यांनी दुर्योधनास उपदेश केला की, ‘दुर्योधना, तुझे भांडण भीष्माबरोबरच नाहीसे होऊ दे.’

संदर्भ : दिनविशेष (भारतीय इतिहासाचे तिथीवार दर्शन), (लेखक : प्रल्हाद नरहर जोशी, पुणे. (प्रथम आवृत्ती : वर्ष १९५०))

Leave a Comment