अन्वेषण यंत्रणांचा खोटेपणा उघडा पाडण्यासाठी ‘क्षात्रधर्म साधना’ या ग्रंथाचे पुनर्मुद्रण करणार ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, सनातन संस्था

शिरवळ (जिल्हा सातारा) येथील हिंदु
राष्ट्र-जागृती सभेत दुमदुमली हिंदु राष्ट्राची ललकारी !

शिरवळ (जिल्हा सातारा), २४ डिसेंबर (वार्ता.) – हिंदूंच्या प्रत्येक देवाच्या हातामध्ये शस्त्र आहे. शस्त्रपूजन हा हिंदूंचा अधिकार आहे. आज देश अराजक आणि गृहयुद्ध यांच्या दिशेने चालला आहे. दाभोलकर, लंकेश यांच्या पाठिंब्याने नक्षलवादी सोकावले आहेत. जेव्हा हा देश कोलमडून टाकण्यासाठी नक्षलवादी रस्त्यावर उतरतील आणि देशात अराजक माजेल, तेव्हा देशरक्षणासाठी आम्ही शस्त्र उचलू अन् या देशाला हिंदु राष्ट्र बनवू. शस्त्रापेक्षाही त्यामागचे मनगट आणि कणखर हृदय महत्त्वाचे असते. ते केवळ साधक आणि संन्यासी योद्ध्यांकडेच असू शकते, असे जाज्वल्य प्रतिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी केले. येथील ज्ञानसंवर्धिनी शाळेच्या पटांगणात २३ डिसेंबर या दिवशी आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ते बोलत होते. सनातन संस्थेच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनीही उपस्थितांना संबोधित केले. ४ सहस्रांहून अधिक हिंदुत्वनिष्ठ मावळे या वेळी उपस्थित होते.

अन्वेषण यंत्रणांचा खोटेपणा उघडा पाडण्यासाठी ‘क्षात्रधर्म
साधना’ या ग्रंथाचे पुनर्मुद्रण करणार ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

सनातन संस्थेची मुस्कटदाबी करण्यासाठी अन्वेषण यंत्रणा कथित विचारवंतांच्या हत्यांच्या प्रकरणी नवनवीन मसालेदार कथा रचत आहेत. आता तर सनातन संस्थेचा ‘क्षात्रधर्म साधना’ हा ग्रंथ वाचून गौरी लंकेश यांची हत्या केल्याचा जावईशोध अन्वेषण यंत्रणांनी लावला आहे. या ग्रंथांमध्ये महाभारतातील वचने आणि शिकवण यांचा समावेश आहे. या ग्रंथांचे पुनर्मुद्रण सनातन संस्थेने थांबवले होते; पण अन्वेषण यंत्रणांचा खोटेपणा उघडा पाडण्यासाठी आम्ही या ग्रंथांचे पुनर्मुद्रण करू आणि जाहीररित्या ते प्रकाशित करू, असा घणाघात सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केला. हिंदूंना ठार करणारे जिहादी, सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे नक्षलवादी, ननवर बलात्कार करणारे फादर कोणता ग्रंथ वाचून ही कृत्ये करतात, हेही अन्वेषण यंत्रणांनी स्पष्ट करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

हिंदु धर्मरक्षणासाठी कृतीशील व्हा ! – सुनील घनवट

आज हिंदु धर्मावर वेगवेगळ्या माध्यमातून आघात होत आहेत, तसेच सनातन संस्था आणि श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे पू. भिडे गुरुजी यांना लक्ष्य केले जात आहे. एकेकाळच्या विराट भारताची शकले होऊन अफगाणिस्तान, भूतान, श्रीलंका, नेपाळ, म्यानमार आदी भूभाग भारतापासून विलग झाले आहेत. सध्याही देशाच्या विविध राज्यांमध्ये हिंदू अल्पसंख्य होत आहेत. हिंदूंना जातीपातींत विभागण्याचे षड्यंत्र चालू आहे. मंदिरांचे सरकारीकरण होते; मात्र मशिदी आणि चर्च कह्यात घेण्याचा कुणी विचार करत नाही. अवैध असल्याचे सांगत हिंदूंची मंदिरे भुईसपाट केली जात आहेत; मात्र पोलीस प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेले थडगे उखडत नाहीत. हिंदु धर्मावर होणार्‍या आघातांच्या विरोधात जात-पात-संप्रदाय, गटतट विसरून हिंदूंनी कृतीशील होणे आवश्यक आहे.

अराजकाच्या परिस्थितीत देशरक्षणासाठी शस्त्र उचलू ! – अधिवक्ता संजीव पुनाळेकर

१. राज्यघटना रक्षण करते, हा भ्रम आहे. राज्यघटनेमुळे जर रक्षण होत असेल, तर मुख्यमंत्री, तसेच दाभोलकर आदी पुरोगामी यांना बंदूकधारी अंगरक्षक हवेत कशाला ?

२. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा मोगलांशी झुंज दिली, तेव्हा सर्वत्र इस्लामी राज्य होते; म्हणजे एकप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी राष्ट्रद्रोह केला होता; पण त्यानंतरच हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. हिंदु राष्ट्राचेही तसेच असेल.

३. प्रत्येकाने आपल्या घरात दर्शनी भागात धारदार तलवार ठेवा. त्याचे पूजन करा आणि पोलिसांना सांगा की, हे शस्त्र आम्ही कुणावर आक्रमण करण्यासाठी वापरणार नाही; पण जर कुणी धर्मांधाने आक्रमण केले, तर मात्र आम्ही शांत बसणार नाही.

४. सनातनचा ‘क्षात्रधर्म साधना’ हा भगवद्गीतेवर आधारित ग्रंथ आहे. आम्ही तो घराघरात पोहोचवू. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनी हा ग्रंथ वाचून कार्य केले, तर हिंदु राष्ट्र लवकर येईल.

५. ‘तुम्ही भजन कीर्तन करा; पण अधर्म, दुर्जनता, भ्रष्टाचार यांविषयी काही बोलू नका’, असे एक प्रकारे सरकार सांगते. ‘सरकारी संत व्हा’, असे सरकारचे म्हणणे आहे.

६. लाल किल्ल्यावरून भाषण करतांना, तसेच ‘मन की बात’ करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा कधी उल्लेखही केला नाही. असे लोक राममंदिर काय बांधणार ?

७. जातीपातीचे राजकारण करणारे जाणते राजे आणि जलसिंचन घोटाळे करणारे त्यांचे पुतणे यांना आजचे नेते गुरु मानतात. काँग्रेसच्या काळात महात्मा गांधींच्या वधानंतर ब्राह्मणांची घरे जाळली गेली, वर्ष १९८४ मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर शीखांचे हत्याकांड झाले, काश्मिरी हिंदूंचे विस्थापन झाले, मग काँग्रेसवर बंदी का नको ?

८. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या सुरेश कलमाडी यांना ‘क्लीन चीट’ मिळते तेव्हा कुणी चकार शब्द काढत नाही; पण सोहराबुद्दीन चकमक प्रकरणी आरोपींना ‘क्लीन चीट’ मिळाल्यावर थयथयाट होतो.

९. कुठलाही राजकीय पक्ष सत्तेत असला, तरी हिंदु राष्ट्र येऊ शकत नाही. वर्ष २०२३ मध्ये संत आणि परात्पर गुरु यांच्या आशीर्वादानेच हिंदु राष्ट्र स्थापन होणार आहे.

१०. लिंगायत असूनही येडियुरप्पा यांनी त्यांच्या मुलाचे नाव हिंदू ठेवले म्हणून गौरी लंकेश यांनी त्यांची ‘धर्मद्रोही’ अशी हेटाळणी केली होती, तर दुसरीकडे स्वतःच्या मुलाचे हमीद नाव ठेवणार्‍या डॉ. दाभोलकर यांचे कौतुक केले होते; म्हणजे हिंदु नाव ठेवले, तर ते पाप आणि मुसलमान नाव ठेवले, तर ते पुरोगामित्व अशी गौरी लंकेश यांची भूमिका होती.

धर्माभिमानी श्री. समीर कुलकर्णी आणि अधिवक्ता धर्मराज चंडेल यांचा विशेष सत्कार

श्री. समीर कुलकर्णी यांचा सत्कार
अधिवक्ता धर्मराज चंडेल यांचा सत्कार

मालेगाव स्फोट प्रकरणात जामिनावर सुटलेले श्री. समीर कुलकर्णी हे मालेगाव स्फोट प्रकरणात ८ वर्षे कारागृहात होते. या काळात त्यांची धर्म आणि ईश्‍वर यांच्यावरची श्रद्धा अबाधित राहिली. हिंदुत्वाचे कार्य करतांना त्यांनी संघटनात्मक भेदाभेद ठेवला नाही. कारागृहात असतांनाही त्यांनी २६ वेळा रक्तदान केले. कथित विचारवंतांच्या हत्या प्रकरणात गोवण्यात आलेल्या हिंदुत्वनिष्ठांची न्यायालयात परखडपणे बाजू मांडणारे अधिवक्ता धर्मराज चंडेल हे पूज्यपाद आसाराम बापूंचे शिष्य आहेत. दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी अमोल काळे, अमित डेगवेकर आणि राजेश बंगेरा यांना जामीन मिळवून देण्यात मोठा वाटा होता. 

सनातन संस्थेच्या ‘मुंडू (लुंगीसारखे वस्त्र) यापेक्षा धोतर अधिक श्रेष्ठ’ या ग्रंथाचे प्रकाशन करतांना डावीकडून अधिवक्ता संजीव पुनाळेकर, सद्गुरु (कु.) स्वाती खाडये आणि श्री. सुनील घनवट
क्रांतीकारकांच्या वेशातील बालकार्यकर्ते हिंदु राष्ट्रासाठी जागृत होण्याचे आवाहन करतांना आणि घोषणा देतांना. हा बालकक्ष सभेला येणार्‍या हिंदु धर्माभिमान्यांचे आकर्षण ठरला.
‘दुधाई धाराऊमाता गाडेपाटील सार्वजनिक उत्सव समिती कापूरहोळ पंचक्रोशी बारा’चे हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री बाबू गाडे पाटील, मयुर गाडे पाटील, अविनाश देवगरे, राहुल बाठे, सचिन वीर, महेश पिसाळ या कार्यकर्त्यांच्या वतीने अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांचा सन्मानचिन्ह, श्रीफळ आणि शाल देऊन सत्कार करतांना

घोषणांच्या गजरात मान्यवर वक्त्यांचे सभास्थानी आगमन झाले. त्यानंतर सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तद्नंतर अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी व्यासपिठावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. पुणे येथील श्री. आणि सौ. वझे यांच्या संतसहवास वेदपाठशाळेतील वेदमूर्ती हृषीकेश द्रविड आणि महेश कुलकर्णी यांनी वेदमंत्रपठण केले. शिरवळच्या सौ. निकिता रोकडे यांनी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांचा, तर धर्माभिमानी श्री. रवींद्र परब यांनी अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि सुनील घनवट यांचा सत्कार केला. समारोपप्रसंगी उपस्थितांनी हिंदु राष्ट्रासाठी समर्पित होण्याची शपथ घेतली.

क्षणचित्रे

१. किकवी ग्रामस्थांनी ग्रामदैवत काळभैरवनाथ देवाला, तर वीर येथील पुजारी श्री. दळवी यांनी तेथील जागृत देवस्थान असलेल्या म्हस्कोबा देवाला हिंदु राष्ट्र-जागृती सभा निर्विघ्नपणे पार पडावी; म्हणून साकडे घातले.

२. नसरापूर येथे रविवार हा बाजाराचा दिवस असूनही तेथील व्यापारी महिला दुकाने आणि व्यवसाय लवकर बंद करून हिंदु राष्ट्र-जागृती सभेला उपस्थित झाल्या होत्या.

३. दुधाई धाराऊमाता गाडे पाटील सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने कापूरहोळ पंचक्रोशीतील हिंदुत्वनिष्ठ धर्मज्योत घेऊन दुचाकी फेरी काढून सभास्थळी आले.

४. सभेच्या साधारण २ घंटे आधी व्यासपिठाच्या मागच्या बाजूला असणार्‍या इमारतीवर सुमारे २०-२५ कावळे बसले होते, तसेच सभास्थळी थोडा दाबही जाणवत होता. आध्यात्मिक उपाय केल्यानंतर कावळे उडून गेले, तसेच दाबही उणावला.

५. फेसबूकच्या माध्यमातून सभेचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. त्या माध्यमातून २० सहस्र लोकांनी सभा पाहिली, तर ३४ सहस्र लोकांपर्यंत सभेचा विषय पोहोचला.

६. सभेनंतर झालेल्या आढावा बैठकीमध्ये ८ ठिकाणी हिंदु राष्ट्र-जागृती सभा आयोजित करण्याची धर्माभिमान्यांनी सिद्धता दर्शवली.

७. गावागावांतील युवक भगवा ध्वज हाती घेऊन ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत सभास्थळी येत असल्याने सभेमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

८. हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट यांनी त्यांच्या भाषणाच्या समारोपप्रसंगी हिंदु राष्ट्राला अनुमोदन देण्यासाठी हात उंचावून भ्रमणभाषच्या ‘बॅटरी’चा प्रकाश दाखवण्याचे आवाहन केले होते, तेव्हा दिव्यांचा लखलखाट झाला !

९. भादे गावातील १० महिलांचा एक गट सभा झाल्यानंतर सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांना भेटला. त्या वेळी महिलांची भावजागृती झाली. अनेकांना भावाश्रू आले. त्यांनी सद्गुरु स्वाती खाडये यांना वाकून नमस्कार केला. त्यांच्यासह छायाचित्र काढले. गावामध्ये रणरागिणी शाखेचा प्रत्येक उपक्रम राबविण्याचा त्यांनी निर्धार केला.

सनातनच्या आय.ओ.एस्. पंचांग २०१९ चे प्रकाशन

सनातनच्या आय.ओ.एस्. पंचांग २०१९ चे प्रकाशन करतांना सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

पुणे येथे वास्तव्याला असणारे वास्तुविशारदतज्ञ आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. प्रमोद हिरे हिंदु राष्ट्र-जागृती सभेविषयी कळल्यावर सकाळीच सभास्थळी उपस्थित झाले होते. सभेच्या सिद्धतेच्या सेवांमध्येही त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात