नववर्ष साजरे करण्याच्या नावाखाली होणार्‍या अपप्रकारांना प्रतिबंध घाला ! – सनातन संस्था

सनातन संस्था आणि हिंदु
जनजागृती समितीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन !

यवतमाळ येथे उपपोलीस अधीक्षक अनिल सिंह गौतम यांच्याकडून कार्याचे कौतुक !

उपपोलीस अधीक्षक अनिल सिंह गौतम यांना निवेदन देतांना धर्माभिमानी

यवतमाळ – जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना ३१ डिसेंबरनिमित्त होणार्‍या अपप्रकारांना आळा घालण्यासाठी निर्देश देऊ, तसेच यवतमाळ शहरामध्येसुद्धा पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ करू. तुमच्या कार्याला आमच्या शुभेच्छा आहेत, असे यवतमाळ येथील उपपोलीस अधीक्षक अनिल सिंह गौतम यांनी सांगितले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने त्यांनी ३१ डिसेंबरच्या रात्री होणारे अपप्रकार रोखण्याच्या संदर्भात पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले, त्या वेळी त्यांनी वरीलप्रकारे अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला.

या वेळी बजरंग दलाचे शहर सहसंयोजक श्री. योगीन तिवारी, हिंदुत्वनिष्ठ रुस्तुम चंद्रवंशी, सनातन संस्थेचे रवींद्र देशपांडेे, पांडुरंग पिल्लेवार, हिंदु जनजागृती समितीचे दत्तात्रय फोकमारे आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

निवासी जिल्हाधिकारी कुंभरे यांना निवेदन देतांना धर्माभिमानी

नागपूर – येथेही वरील विषयावर निवासी जिल्हाधिकारी कुंभरे, तसेच विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त आणि निरीक्षक अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. ‘विशेष शाखेतून २९ पोलीस ठाण्यांना निवेदन पाठवू’, असे या वेळी पोलिसांनी सांगितले. शाळा, तसेच महाविद्यालये येथे या विषयावर विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्याची अनुमती या वेळी मागण्यात आली. या वेळी अतुल अर्वेन्ला, श्री. अभिजीत पोलके आणि सनातन संस्थेच्या श्रीमती सुषमा उपस्थित होत्या.

देशभरात सध्या पाश्‍चात्त्य प्रथांच्या वाढत्या अंधानुकरणामुळे नववर्ष गुढीपाडव्याला साजरे न करता ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ वाजता साजरे करण्याची कुप्रथा मोठ्या प्रमाणात वाढीस लागली आहे. या रात्री धूम्रपान, मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन, पूर्ववैमनस्यातून होणारे वाद आदींचे प्रमाण वाढले आहे, तसेच या रात्री मद्यपान करून भरधाव वाहने चालवल्याने अपघातही होत आहेत. गंभीर गोष्ट म्हणजे या रात्रीपासून मद्य पिण्यास आरंभ करणार्‍यांचे प्रमाण लक्षणीय असून यामध्ये अल्पवयीन मुले आणि महिला यांचाही समावेश आहे, त्यामुळे युवा पिढी नैतिकदृष्ट्या उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. अशा युवकांना छत्रपती शिवरायांच्या जीवनाचा आदर्श सांगायला हवा; मात्र दुर्दैव असे की, छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे स्मारक असलेले गडकोट आज अशा मौजमजा, मेजवान्या यांसाठी वापरले जात आहेत. गडाचे पावित्र्य धोक्यात आले आहे. त्यामुळे येत्या ३१ डिसेंबर या दिवशी जिल्ह्यातील किल्ले, पर्यटन स्थळे, ऐतिहासिक वास्तू, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे, धूम्रपान करणे, मेजवान्या करणे यास प्रतिबंध करण्याचा आदेश काढावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने या निवेदनात करण्यात आली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment