हिंदु राष्ट्र स्थापनेच्या वैचारिक लढ्यात प्रसिद्धीचे मोलाचे योगदान ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात
द्वितीय राष्ट्रीय प्रसिद्धी शिबिरास भावपूर्ण तावरणात प्रारंभ

डावीकडून श्री. अरविंद पानसरे, मार्गदर्शन करतांना श्री. चेतन राजहंस आणि श्री. संदीप शिंदे

रामनाथी (गोवा)) – परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांना अपेक्षित असलेल्या हिंदु राष्ट्राच्या कार्यात वैचारिक परिवर्तन हे महत्त्वाचे कार्य प्रसिद्धीच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या वैचारिक लढ्यात प्रसिद्धीचे योगदान मोलाचे आहे. हे योगदान देतांना साधनेच्या स्तरावरही अपेक्षित प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले. ते १८ ते २० डिसेंबर या कालावधीत सनातन आश्रम, रामनाथी येथे होत असलेल्या द्वितीय राष्ट्रीय प्रसिद्धी शिबिरात ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेत प्रभावी प्रसिद्धीची आवश्यकता आणि साधना’, या विषयावर प्रथम सत्रात मार्गदर्शन करतांना बोलत होते. या वेळी व्यासपिठावर हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते श्री. अरविंद पानसरे आणि सनातन अध्ययन केंद्राचे समन्वयक श्री. संदीप शिंदे उपस्थित होते. या शिबिरासाठी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तेलंगण, गुजरात या राज्यांतून ३५ शिबिरार्थी सहभागी झाले आहेत. संगणकीय प्रणालीद्वारे या शिबिराचा लाभ उत्तरभारत, महाराष्ट्र, तसेच केरळ राज्य येथील शिबिरार्थींनी घेतला.

शिबिराच्या प्रारंभी सनातन पुरोहित पाठशाळेतील श्री. अमर जोशी यांनी शंखनाद केला. शिबिराचे सूत्रसंचालन कु. ऋतुजा शिंदे यांनी केले.

श्री. चेतन राजहंस पुढे म्हणाले, ‘‘हिंदु राष्ट्राचा विचार खोडून काढण्यासाठी धर्मविरोधक कार्यरत आहेत. त्यामुळे आपल्याला धर्मविरोधकांच्या या विचारांना खोडून काढत योग्य तो सकारात्मक विचार समाजापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. प्रसिद्धी सेवा म्हणजे गुरूंचे विचार समष्टी स्तरावर पोहोचवण्याची अमूल्य संधी होय. प्रत्येक कार्य हे काळानुसार होत असते. त्यानुसार हिंदु राष्ट्र येणारच असून त्यात प्रसिद्धीच्या सेवेचा वाटा उचलून सेवा आणि कार्य अशा दोन्ही स्तरांवर फलनिष्पत्ती वाढवण्याच्या दृष्टीने शिबिरार्थींनी प्रयत्न करावेत.’’

शिबिरात ‘प्रसिद्धीची सेवा करतांना जिल्ह्यात येणार्‍या अडचणींवर कशा उपाययोजना काढाव्यात’, या संदर्भात श्री. अरविंद पानसरे, श्री. संदीप शिंदे आणि  चेतन राजहंस यांनी शंकानिरसन केले. दुपारच्या सत्रात ‘पत्रकार-संपादक यांना संपर्क कसा करावा ?’, ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’, ‘प्रांतीय हिंदू अधिवेशन’, अशा कार्यक्रमांचे नियोजन करणे, तसेच ‘सनातन संस्थेवर होत असलेल्या खोट्या आरोपांतील वास्तविकता’ आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात