हिंदूंनी धर्माचरण केल्यासच हिंदु राष्ट्राची स्थापना होईल ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्था

कलमाडी (धुळे) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

व्यासपिठावर उपस्थित सद्गुरु नंदकुमार जाधव, तसेच सभेला संबोधतांना कु. रागेश्री देशपांडे

कलमाडी (धुळे) – सध्या हिंदूंना धर्माचरण करण्यास लाज वाटते. पाश्‍चात्त्यांप्रमाणे इंग्रजी दिनांकानुसार मेणबत्या विझवून, केक कापून वाढदिवस साजरा केला जातो. त्याऐवजी हिंदु संस्कृतीनुसार जन्मतिथीला आरती ओवाळून वाढदिवस साजरा करायला हवा. आपल्या पाल्यांना इंग्रजी शाळांऐवजी मराठी माध्यमाच्या शाळेत घालायला हवे. साधना म्हणून कुलदेवतेचा नामजप करायला हवा. हिंदूंनी धर्माचरण केल्यास ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना दूर नाही, असे प्रतिपादन सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले. ते कलमाडी, तालुका शिंदखेडा येथील १० डिसेंबरला झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत मार्गदर्शन करत होते.

सभेच्या प्रारंभी सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या सभेला २३५ धर्माभिमानी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री. चेतन जगताप यांनी केले.

विशेष ! : बजरंग मित्र मंडळाचे श्री. नागेश पवार यांनी पुढाकार घेऊन गावात ध्वनीक्षेपक यंत्रावरून उद्घोषणा करून या सभेचा प्रसार केला. त्यांच्या पुढाकारानेच ही सभा पार पडली.

महिलांना स्वरक्षण प्रशिक्षण देणे काळाची आवश्यकता ! – कु.
रागेश्री देशपांडे, नंदुरबार-धुळे जिल्हा समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

भारताला स्वातंत्र्य मिळून ७१ वर्षे पूर्ण झाली. तरीही आपल्या देशातील महिला सुरक्षित नाहीत. प्रतिदिन महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढतच आहे. कायद्यात पालट झाले मात्र; तरीही ही दुष्कृत्ये थांबलेली नाहीत. महिलांवरील अत्याचार का संपत नाहीत ?  आधुनिकतेच्या नावाखाली हिंदु संस्कृतीचा त्याग करून पाश्‍चिमात्य संस्कृतीला आपलेसे केले जात आहे. मुलींना हवे तेवढे स्वातंत्र्य दिले जात आहे. लव्ह जिहादच्या संकटापासून हिंदु मुलींना वाचवणे आवश्यक आहे; म्हणून युवती आणि महिला यांना धर्मशिक्षण अन् स्वरक्षण प्रशिक्षण द्यायला हवे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात