कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची मूर्ती पालटण्यास श्री अंबाबाई भक्त समितीचा विरोध !

कोल्हापूर – करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीच्या मूर्तीवर ३ वर्षांपूर्वी रासायनिक संवर्धन करण्यात आले आहे. त्यानंतर या मूर्तीला पुढील १०० वर्षे काहीही होणार नाही, अशी खात्री (गॅरंटी) देण्यात आली आहे. त्यामुळे आता मूर्ती पालटू देणार नाही. रासायनिक संवर्धन करण्यापूर्वी त्यावर विचार करावा, असे आवाहन आम्ही त्या वेळी केले होते. तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आम्हाला त्या वेळी अनेक धमक्याही आल्या होत्या; मात्र आम्ही आमच्या मतावर ठाम होतो. प्रशासनाने रासायनिक संवर्धन केलेले आहे. आता किमान पुढील ५० ते ६० वर्षांनंतर मूर्ती कशी रहाते, ते पाहून निर्णय घ्यावा, असे मत श्री अंबाबाई भक्त समितीचे सदस्य आणि बजरंग दलाचे शहरप्रमुख श्री. महेश उरसाल यांनी व्यक्त केले आहे. (धर्मशास्त्रानुसार भंग पावलेल्या मूर्तीची पूजा केल्यास त्याचा भक्तांना आध्यात्मिकदृष्ट्या लाभ होत नाही, तसेच अशा मूर्तीतून चैतन्य प्रक्षेपित होत नाही, असे सांगितले आहे. देशातील अनेक मंदिरांत १५ ते २५ वर्षांनंतर भंग पावलेली मूर्ती पालटून तेथे नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. असे केल्याने याचा सर्व भक्तांना लाभ होतो ! – संपादक)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात