शांत, आनंदी, निरासक्त आणि साधकांवर मातृवत् प्रेम करणार्या सनातनच्या ४९ व्या संतरत्न पू. (श्रीमती) कला प्रभुदेसाईआजी (वय ८२ वर्षे) !

‘सनातनच्या संतांचे अद्वितीयत्व !’

‘पू. (श्रीमती) कला प्रभुदेसाईआजी यांचे कुटुंबीय आणि ठाणे येथील साधक यांनी सांगितलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

१. कुटुंबीय

१ अ. सातत्य

‘पू. आई अगदी लहानपणापासून स्तोत्रे म्हणतात. त्या रुग्णाईत असल्या अथवा गावाला गेल्या असतील, तरी त्यामध्ये खंड पडत नाही. त्या सनातनच्या संपर्कात आल्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांंगितलेली साधना अखंडपणे करत आहेत.

१ आ. स्वावलंबी

त्या म्हणतात, ‘‘आपले काम आपण करू शकतो, तोपर्यंत दुसर्‍याला सांगायचे नाही.’’

१ इ. काटकसरी

त्यांना काही लिहायचे असेल, तर जेवढे लिखाण असेल, त्या प्रमाणातच कागद घेतात. त्या कपडेही आवश्यक असतील, तेवढेेच घेतात.

१ ई. कोणत्याही गोष्टीची तक्रार नसणे

पू. आजींना गुडघ्यांच्या दुखण्यामुळे बाहेर जाणे कठीण होते. दात काढल्यामुळे खाण्यावर बंधने आली, तरीही त्यांनी कधी त्याविषयी तक्रार केली नाही. त्या म्हणतात, ‘‘देवाला अपेक्षित आहे, तसेच होते.’’

१ उ. कर्तेपणा न घेणे

कधी सद्गुरु अनुताईंचा दूरभाष आल्यावर त्या म्हणतात, ‘‘अहो, मला काही येत नाही. सर्व गुरुदेवच करतात. ते म्हणतात म्हणून मी ‘संत’ आहे, नाहीतर मी काय आहे ? सर्व साधक, संत आणि सद्गुरु यांना काही विचारले की, त्यांना उत्तर सांगता येते; पण मला काही सांगता येत नाही.’’

१ ऊ. सतत देवाचे साहाय्य घेणे

१. पू. आईंच्या बोटांना भेगा पडल्या आहेत. त्यामध्ये केस अडकतात आणि केस विंचरतांना बोटांना त्रास होतो. त्या म्हणतात, ‘मी दुर्गादेवीची वेणी घालत आहे’, असा भाव ठेवला की, वेणी घालता येते.

२. काही दिवसांपूर्वी त्यांना गरगरत होते. तेव्हा त्या चालतांना श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांना समवेत घ्यायच्या. त्या अंघोळ करतांना, जेवतांना, झोपतांना सतत देवाला समवेत घेतात.

३. आम्ही कुठे जाणार असू, तर त्या आम्हाला सांगतात, ‘‘तुम्ही जा. माझ्यासमवेत देव आहे.’’

– सौ. भक्ती प्रमोद गैलाड आणि सौ. मेधा मुकुंद देवधर (पू. कला प्रभुदेसाई यांच्या मुली)

१ ए. साधकांना प्रार्थना आणि नामजप यांची आठवण करून देणे

आमच्याकडे नामपट्ट्या मोजण्याची सेवा येत असे. तेव्हा साधकांकडून मोजतांना चूक होऊ नये; म्हणून पू. आजी त्यांना प्रार्थनेची आठवण करतात. ‘नामासह सेवा होत आहे ना ?’, असे त्या विचारतात. त्यामुळे सर्वांना नामासह सेवा करण्याची सवय लागली. त्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे सेवेला बसत नाहीत; पण साधक घरी सेवा करत असतील, तर त्या तेथून एक फेरी घालतात. त्यांच्या एका कटाक्षात प्रेमभाव आणि माया ओथंबलेली दिसते.

१ ऐ. साधकांची काळजी घेणे

पू. आजी सेवेला आलेल्या साधकांना ‘काही हवे – नको’ ते पहातात. ‘घरी कधी जाणार ?’, हेही विचारून घेतात. त्या वेळी घरी जाण्याची आठवणही करतात. ‘घरातील माणसेे रागावू नयेत. प्रतिदिन सेवा करता आल्याने त्यांचा सेवेचा आनंद टिकून रहातो’, असे त्यांचे म्हणणे असते.

१ ओ. सेवा वेळेत पूर्ण करणे

१. एकदा नामपट्ट्यांची मागणी पुष्कळ आली. त्या वेळी पू. आजी अधून मधून येऊन पहात होत्या. ‘सेवा वेळेत पूर्ण झाली पाहिजे’, असे त्यांना वाटत होते. सेवा पूर्ण झाल्यावर त्यांना आनंद झाला.’  – चि. गायत्री आणि चि. कुशल (पू. आजींची नात आणि नातू)

२. ‘त्यांना कोणतीही सेवा मिळाली की, ती त्या तत्परतेने करतात. एखाद्या कार्यक्रमासाठी प्रार्थना असो किंवा नामजप असो, समष्टीसाठी सांगण्यात आलेली सेवा त्या आधी पूर्ण करतात.’ – सौ. भक्ती प्रमोद गैलाड आणि सौ. मेधा मुकुंद देवधर

१ औ. पू. आईंच्या मनात केवळ विचार आल्याने मन एकाग्र होऊन नामजप चांगला होणे

एकदा पू. आईंच्या खोलीत जप करत होते. तेव्हा मन पूर्ण एकाग्र झाले. शरिराचे भानही राहिले नव्हते. २ घंटे जप झाला. तेव्हा मनात अन्य विचारही नव्हता. जप झाल्यावर मी पू. आईंना विचारले, ‘‘तुम्ही माझ्याकडून जप होण्यासाठी काही प्रार्थना केली होती का ?’’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘तू जे करतेस, ते चांगले होऊ दे’, असे नुसते म्हटले होते.’’ ‘संतांच्या मनात येणारा साधा विचारही किती प्रभावी असतो !’, ते पाहून गुरुदेवांच्या चरणी पुष्कळ कृतज्ञता वाटली.

१ अं. मला थकवा येतो किंवा नकारात्मक विचार येतात, तेव्हा पू. आईंच्या खोलीत गेल्यावर मन शांत होते.

१ क. त्यांच्याकडे पाहूनच उत्साह आणि आनंद मिळतो, तसेच मनाची मरगळ निघून जाते.’

– सौ. भक्ती प्रमोद गैलाड

१ ख. पू. आजींनीच साधनेच्या मार्गावर आणले !

‘पू. कला प्रभुदेसाई म्हणजे माझ्या दुसर्‍या आईच आहेत. त्यांनी आम्हाला आयुष्याच्या विविध वळणांवर पुष्कळ साहाय्य केले आहे. पूर्वी मी देवाला फारसा मानत नव्हतो; पण मला त्यांनीच या मार्गावर आणले आणि मला नामजप करायला प्रेरणा दिली. त्या कधी कौतुकाने गोंजारत, तर कधी नाखुशी व्यक्त करत साहाय्य करत. वैचारिक मतभेद असूनही दुसर्‍याला न दुखावता त्यांनी साधनेत साहाय्य केले.’ – श्री. मुकुंद देवधर (जावई)

१ ग. श्रद्धा

साधकांनी गुरुदेवांच्या अमृत महोत्सवी मासात अनेक सत्संग घेतले. मी पू. आईंना म्हणाले, ‘‘सत्संग कुणीही घेतला, तरी सर्वांना आवडतो.’’ तेव्हा पू. आई म्हणाल्या, ‘‘अगं, सहस्रो मुखांनी तेच (गुरुच) तर बोलत असतात.’’ – सौ. भक्ती प्रमोद गैलाड आणि सौ. मेधा मुकुंद देवधर

 

२. साधकांना पू. प्रभुदेसाई आजींविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

२ अ. स्थिर असणे

‘मी वर्ष २००८ मध्ये प्रथमच ठाणे विभागात रहायला आले होते. त्या वेळी श्री. प्रभुदेसाई यांच्याकडे कार्यशाळा होती. त्या वेळी पू. आजींच्या यजमानांचे निधन होऊन काही दिवसच झाले होते. तेव्हाही त्या अगदी सहजावस्थेत होत्या.

२ आ. साधी रहाणी

पू. आजींची रहाणी अगदी साधी आहे. त्या सर्वांशी प्रेमाने बोलतात. त्यांचे हसणे निरागस आहे. त्यांची त्वचा पारदर्शक वाटते.

२ इ. क्षात्रभाव

पू. आजींच्या निवासस्थानाबाहेर संस्थेचा फलक आहे. त्यावर त्या धर्महानीचे विषय लिहीत असत. आम्ही ते लिहायला घाबरत होतो; पण त्यांना त्याचे काहीच वाटत नसे.’ – सौ. वैशाली चंद्रकांत सामंत

२ ई. हसतमुख

‘पू. आजी कुठेही बाहेर जात नाहीत, तरी त्या नेहमी हसतमुख असतात.

२ उ. शांत स्वभाव

त्या नेहमी प्रथम दुसर्‍यांचे ऐकून घेतात. कुणी चिडलेले असेल, तरी त्या आतून शांत असतात.

२ ऊ. अनासक्त

त्यांना कोणत्याच गोष्टीची आसक्ती नाही.’ – सौ. वंदना सुधीर गालिन्दे

२ ए. ‘पू. आजींकडे बघितल्यावर शांत वाटते.

२ ऐ. अखंड अनुसंधान

त्या नेहमी आनंदी असतात. ‘त्या सतत अनुसंधानात आहेत’, असे जाणवते.

२ ओ. प्रेमभाव

पू. आजी सर्व साधकांना ‘जप होत आहे ना ? उपाय नियमित करता ना ?’ असे आवर्जून विचारतात. त्यांना एखाद्याला चूक सांगायची असेल, तर त्या साधकाला न दुखावता सांगतात. त्या कुणाचेही मन दुखावत नाहीत.

२ औ. भाव

एकदा पू. आजींनी आम्हाला शबरीची कविता म्हणून दाखवली. तेव्हा त्यांचा भाव पाहून आमच्या दोघांच्या डोळ्यांत पाणी आले.’ – श्री. नंदकिशोर ठाकूर आणि सौ. नम्रता ठाकूर

२ अं. पू. आजींच्या मार्गदर्शनामुळे प्रार्थनेत वृद्धी होणे

‘एका बैठकीत पू. आजींनी मार्गदर्शनात सांगितले, ‘‘प्रार्थना करतांना शरणागत भावाने करावी. प्रार्थनेची आठवण केली; म्हणून कृतज्ञता व्यक्त करावी आणि ती करत असतांना चूक झाली असेल, तर क्षमा मागावी. हे सूत्र माझ्या मनाला भिडले. यानंतर माझ्या दिवसाला ५० प्रार्थना होऊ लागल्या. ही गुरुकृपाच आहे.

२ क. पू. आजींचे हास्य पाहून दूरदेशी जाण्याचा ताण दूर होणे

पू. आजी फारशा बोलत नाहीत. जे बोलतात, त्यातून सर्वांना आनंद होतो. मी ६ मासांसाठी अमेरिकेला जाणार होते. तेव्हा ‘पू. आजींना भेटून जाऊया’, असे वाटले आणि त्यांच्यासाठी खाऊ घेऊन भेटायला गेले. त्यांना खाऊ दिल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘खाऊ कशासाठी ?’’ मी सांगितले, ‘‘मी ६ मासांसाठी अमेरिकेला मुलीकडे जात आहे.’’ तेव्हा त्या हसत म्हणाल्या, ‘‘हा खाऊ ६ मास पुरणार आहे का ?’’ त्यांचे हसणे पाहून मीही हसू लागले आणि माझा दूरदेशी जाण्याचा ताण दूर झाला. – सौ. वंदना सुधीर गालिन्दे, ठाणे

२ ख. संतांच्या मार्गदर्शनांची कात्रणे करून ठेवणे

पू. आजींनी दैनिक सनातन प्रभातमध्ये आलेली संतांची मार्गदर्शनांची कात्रणे संग्रही ठेवली आहेत. त्या म्हणाल्या, ‘‘दैनिकात पुष्कळ चांगल्या गोष्टी येतात; पण पुन्हा वाचण्यास सहज उपलब्ध व्हावे; म्हणून ही कात्रणे जपून ठेवली आहेत.

२ ग. पू. आजींच्या हसण्यातून आनंदाचे प्रक्षेपण होणे

पू. आजींचे हसणे पुष्कळ आनंददायी आहे. ‘त्या हसत बोलतात, तेव्हा वातावरणात आनंदाचे प्रक्षेपण होते’, असे वाटते. त्यामुळे आपल्यालाही आनंद होतो आणि आपला भगवंताविषयीचा भाव जागृत होतो.’ – सौ. प्रणाली आणि श्री. सतीश कोचरेकर, मुंबई (१९.७.२०१८)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात