सनातन संस्थेचे १० वे संतरत्न पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ (वय ५५ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

१. बालपण

१ अ. शांत स्वभाव

‘आमचा मुलगा मुकुल हा लहानपणापासून शांत स्वभावाचा आहे. त्याने कधीही कोणत्याही गोष्टीविषयी हट्ट केलेला आठवत नाही. त्याचे कुठल्याही मुलाशी भांडण, मारामारी झालेलीही आठवत नाही. त्याचे कोणाविषयी कधीच गार्‍हाणे नसायचे. घरीही भावंडांशी त्याचा वादविवाद झालेला आठवत नाही. तो लहान भावंडांना स्वतःसमवेत शाळेत नेत असे.

१ आ. नम्रता आणि सचोटी या गुणांमुळे मित्रांना हवाहवासा वाटणे

नम्रता आणि सचोटी या गुणांमुळे त्याच्या वयाचे, तसेच मोठेही मित्र त्याला नेहमी त्यांच्यात सामावून घेत असत. खरेतर मुकुलचा स्वभाव फारसा बोलका नव्हता, तरीही त्याच्या मित्रांना तो हवाहवासा वाटे. ते त्याला घरी येऊन बोलावून नेत असत.

१ इ. लहानपणापासूनच साधकत्वाची लक्षणे असणे

मुकुल लहानपणापासून समजूतदारही होता. अभ्यासासाठी त्याच्या मागे कधी लागावे लागले नाही. ‘प्रतिदिन नियमित वेळेवर झोपणे आणि पहाटे ५ वाजता उठून अभ्यास करणे’, हा त्याचा क्रम होता. त्याची कुठल्याही गोष्टीत आवड-नावड नव्हती. स्वच्छता, टापटीप आणि शिस्त हे त्याचे अंगभूत गुण. त्याच्यात लहानपणापासूनच साधकत्व असल्याने त्याची जलद उन्नती झाली.’

– सौ. माधुरी आणि श्री. माधव गाडगीळ (आई-वडील), सनातन आश्रम, देवद, पनवेल.

 

२. साधनेत येण्यापूर्वीपासूनच
गुरुकृपा असल्याच्या आलेल्या काही अनुभूती

२ अ. जन्मतःच केलेल्या पत्रिकेत ‘हा मुलगा मोठा झाल्यावर साधनेसाठी
घर सोडून आईवडिलांपासून दूर जाईल’, असे ज्योतिषाने सांगणे आणि तसेच घडणे

‘वर्ष १९६३ मध्ये माझा जन्म झाल्यावर माझ्या आजोबांनी माझी पत्रिका करायला दिली. ज्योतिषांनी माझी पत्रिका तयार करून सांगितले, ‘हा मुलगा मोठा झाल्यावर साधनेसाठी घर सोडून आईवडिलांपासून दूर जाईल.’ (त्याप्रमाणेच घडले. मी वयाच्या ३६ व्या वर्षी साधनेसाठी मुंबई सोडून आईवडिलांपासून दूर गोव्याला आलो.)

२ आ. साधना आरंभ होण्यापूर्वी १० वर्षे आधीच ज्योतिषाने सांगितल्याप्रमाणे सलग २ वर्षे दत्ताचा
नामजप करणे, तो जाता-येता अखंड होणे आणि ‘तेव्हाच दत्ताची उपासना गुरुकृपेने पूर्ण झाली’, असे वाटणे

वर्ष १९८९ मध्ये माझ्या आईवडिलांना एका ज्योतिषाने सांगितले, ‘तुमच्या घरामध्ये दत्ताची उपासना होत नाही. त्यामुळे तुमच्या मुलाच्या जीवनात काही अडथळे येत आहेत. तुमच्या मुलाला दत्तगुरूंचा नामजप करायला सांगा.’ तेव्हा मी लगेच दत्ताचा नामजप करायला आरंभ केला. आश्‍चर्य म्हणजे आधी कधी नामजपाची सवय नसतांनाही माझ्याकडून दत्ताचा नामजप सहजतेने आणि तोंडात बसल्याप्रमाणे जाता-येता अखंड होत असे. तेव्हा मी सलग २ वर्षे दत्ताचा नामजप केला. मला देवाची आवड असल्याने नामजप करणे कठीण गेले नाही. ‘गुरुकृपेने माझी दत्ताची उपासना साधनेला आरंभ होण्यापूर्वी १० वर्षे आधीच पूर्ण झाली’, असे वाटते.

२ इ. पत्रिकेतील ‘द्विभार्या योगा’मुळे पहिले लग्न मोडण्याचे असलेले संकट लग्न होण्याआधीच गुरुकृपेने टळणे

वर्ष १९९२ मध्ये माझे एका मुलीशी लग्न ठरले होते; पण वाङनिश्‍चयाच्या दिवशीच ती तिच्या घरातून पळून गेली. नंतर पत्रिका पहाणार्‍या गुरुजींनी सांगितले, ‘‘तुमच्या पत्रिकेत ‘द्विभार्या योग’ आहे. त्यामुळे असे घडले. खरेतर या योगानुसार लग्न झाल्यावर ते मोडायला हवे होते; पण तुमच्यावर देवाची कृपा असल्याने लग्न व्हायच्या आधीच हे संकट टळले.’’ खरेतर गुरुकृपेनेच मी या संकटातून वाचलो होतो, हे आता माझ्या लक्षात येते. नाहीतर माझ्यावर लग्न मोडल्याचा कलंक लागला असता. नंतर वर्ष १९९३ मध्ये माझे लग्न सौ. अंजली यांच्याशी झाले. मी साधना आरंभ करण्याच्या आधीपासूनच माझ्यावर गुरुकृपा कार्यरत होती. गुरूंनीच माझ्याकडून गुरुदेव दत्ताचा नामजप दोन वर्षे करून घेतला होता. त्यामुळेही हे संकट टळले.

२ ई. एका शास्त्रज्ञांनी हात बघून ‘तुम्हाला पुढे केवळ ५ – ६ वर्षेच धनलाभ आहे; पण त्यापुढे तुम्हाला धनरेषा नसली, तरीही काही अल्प पडणार नाही’, असे सांगणे, त्यांनी सांगितल्याप्रमाणेच पुढे ६ वर्षे नोकरी केल्यानंतर वर्ष २००० मध्ये नोकरी सोडून साधना करू लागणे आणि तरीही गुरुकृपेने आर्थिकदृष्ट्या काही अल्प न पडणे

मी ‘भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटर’मध्ये (बी.ए.आर्.सी.मध्ये) ‘विद्यावाचस्पती (पीएच्.डी.)’ पदवीच्या अभ्यासासाठी गेलो होतो. तेव्हा अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षी, म्हणजे वर्ष १९९४ मध्ये मला तेथील एक शास्त्रज्ञ (सायंटिफिक ऑफिसर) डॉ. वालावलकर यांनी माझा हात बघून सांगितले, ‘‘तुम्हाला पुढे केवळ ५ – ६ वर्षेच धनलाभ आहे. पुढे तुम्हाला धनरेषा नाही; पण जरी असे असले, तरी तुम्हाला काही अल्प पडणार नाही. तुम्ही काही काळजी करू नका.’’

त्या शास्त्रज्ञांनी सांगितल्याप्रमाणेच माझ्या जीवनात घडले. ‘विद्यावाचस्पती’ पदवी मिळाल्यावर मी पुढे ६ वर्षे, म्हणजे वर्ष २००० पर्यंत नोकरी केली आणि त्यानंतर नोकरी सोडून पूर्ण वेळ साधनेकडे वळलो. जरी मी नोकरी सोडून साधनेकडे वळलो, तरी मला आर्थिकदृष्ट्या काही अल्प पडले नाही. गुरूंनीच माझी काळजी घेतली. गुरुकृपेमुळे मला कसलीच चिंता वाटली नाही.’

(माझ्या आत्याचे पती श्री. बाळासाहेब फडके यांनीही मी लहान असतांना माझा हात बघून माझ्या आईला सांगितले होते, ‘याच्या भविष्यात पुष्कळ शिक्षण आहे; पण याला फार शिकू देऊ नका; कारण जास्त शिकून काही लाभ होणार नाही. याला पुढे पैसे मिळणार नाहीत.)

 

३. सनातन संस्थेची ओळख होणे आणि साधनेकडे वळण्याचा निश्‍चय करणे

३ अ. आईवडिलांमुळे सनातन संस्थेच्या संपर्कात येणे

‘मी सनातन संस्थेच्या संपर्कात आईवडिलांमुळे आलो. ते एप्रिल १९९८ मध्ये सनातनच्या संपर्कात आले. त्यांनी आम्हाला ते करत असलेली साधना सांगितली. त्या वेळी मी, माझी पत्नी आणि २ वर्षांची लहान मुलगी यांच्यासह ठाणे जिल्ह्यातील बोईसर या गावी रहात होतो. आम्ही आईवडिलांपासून १०० कि.मी. दूर होतो. मासातून एकदा आम्ही त्यांच्याकडे मुंबईतील मुलुंड येथे जात होतो. काही कालावधीनंतर आमच्याकडे सत्संग चालू झाला. त्यामुळे आम्हाला मासातून एकदा सत्संगाचा लाभ होऊ लागला. अशा प्रकारे आमचे सत्संगाला येणे आरंभ झाले आणि साधकांशी ओळखही होऊ लागली.’ – (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ

३ आ. सत्संगाला बोलावल्यावर दूर रहात असूनही येणे, त्या दिवशी सेवा करणे आणि नामजपही करू लागणे

‘वर्ष १९९८ मध्ये साधनेत आल्यावर आम्ही आमचा मुलगा मुकुल यालाही नामजपाविषयी सांगितले. तो ठाणे जिल्ह्यातील बोईसर येथे नोकरीला होता. त्याने घरी मुलुंडला दूरभाष केला की, आम्ही त्याला सत्संगात शिकायला मिळालेली सूत्रे सांगायचो. आमच्या घरी कोणी मार्गदर्शक-साधक येणार असतील, तर ‘त्यांच्या सत्संगाचा लाभ व्हावा आणि त्या निमित्ताने सेवा व्हावी’, या दृष्टीकोनातून आम्ही त्याला बोलवून घेत होतो. त्या वेळी तो अगदी जेवण वाढण्यापासून सर्व प्रकारचे साहाय्य करायचा. त्याला नामजपाविषयी विचारल्यावर तो ‘घरी नामजप होत नाही; पण मुलुंडला येतांना आपोआप चालू होतो’, असे सांगायचा.’ – सौ. माधुरी आणि श्री. माधव गाडगीळ

३ इ. पूर्ण वेळ साधना करण्याची ओढ लागण्याची आणि तसा निश्‍चय करण्याची कारणे

३ इ १. प.पू. डॉक्टरांचे छायाचित्र पाहून त्यांना भेटण्याची आणि पूर्ण वेळ साधना करण्याची पुष्कळ ओढ लागणे

‘मला सनातन संस्थेची ओळख झाली, तेव्हा माझी प.पू. डॉक्टरांशी भेट झाली नव्हती. मी केवळ त्यांचे छायाचित्र पाहिले होते. त्यावरूनच मी त्यांच्याकडे आकर्षित झालो आणि मला त्यांना भेटण्याची अन् पूर्ण वेळ साधना करण्याची पुष्कळ ओढ लागली.

३ इ २. सनातन संस्थेच्या ग्रंथांतील राष्ट्र, धर्म आणि साधना यांविषयीच्या कर्तव्यांच्या संदर्भात केलेले मार्गदर्शन आवडणे

‘वर्ष १९९९ च्या आरंभी मला सनातनचे ग्रंथ ‘शिष्य’ आणि ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ वाचायला मिळाले. हे ग्रंथ वाचून मी सनातन संस्थेकडे ओढला गेलो. ग्रंथांमध्ये सांगितले होते, ‘आता भारत देशामध्ये जे काही अराजक माजले आहे, ते दूर करणे हे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे. ते आपण ‘साधना’ म्हणून केले, तर आपली आध्यात्मिक उन्नतीही होईल आणि राष्ट्रकर्तव्यही पार पाडणे होईल. तसेच धर्मावर जे संकट आले आहे, ते दूर करून लोकांना धर्मशिक्षण देऊन आपण सुधारले पाहिजे. याद्वारेही आपली साधना होईल.’ ग्रंथांमध्ये दिलेले हे मार्गदर्शन मला खूप आवडले. तसेच ‘शिष्य’ या ग्रंथामध्ये ‘शिष्य’ बनण्यासाठी कशी साधना करावी ?’, हे दिले होते. ते वाचून मला वाटले, ‘आपणही अशी साधना करावी.’

३ इ ३. मार्गदर्शकांचे मार्गदर्शन ऐकून प्रभावित होणे

मुलुंडला येणारे मार्गदर्शक श्री. विष्णूदादा कदम, पैमावशी इत्यादींकडून मी जे मार्गदर्शन ऐकले, तेव्हा वाटले, ‘खरोखरंच हे लोक चांगली साधना करत आहेत आणि चांगले प्रयत्नही करत आहेत.’ त्यामुळे मी सनातन संस्थेकडे अधिकाधिक आकर्षित होऊ लागलो.

३ इ ४. साधनेसाठी मोठ्या आस्थापनातील नोकरी सोडून देण्याविषयी मनाची सिद्धता होण्याचे कारण

सनातन संस्थेचे ‘ईश्‍वरी राज्याची स्थापना’ हे ध्येय मला आवडले. ‘शिष्य’ या ग्रंथामध्ये ‘साधना कशी करावी ?’, हेही मी वाचले होते. तसेच ‘संत भक्तराज महाराज यांची शिकवण’ या ग्रंथात ‘संत भक्तराज महाराज सगळ्यांना आणि प.पू. डॉक्टरांना कसे शिकवायचे ? त्यांचा जीवनक्रम कसा होता ?’ इत्यादी वाचल्यानंतर मला साधनेची खूप ओढ लागली आणि ‘आपणही साधना करावी’, असे तीव्रतेने वाटले; म्हणून माझी नोकरी सोडण्याविषयी मनाची सिद्धता झाली.’ – (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ

३ ई. पूर्ण वेळ साधना करण्याविषयी मार्गदर्शकांना विचारणे आणि त्यांची अनुमती मिळणे

‘जुलै १९९९ मध्ये त्याने श्री. विष्णुदादा कदम यांच्या सत्संगाने प्रभावित होऊन नोकरी सोडून पूर्ण वेळ साधना करण्याचा निश्‍चय केला. हे त्याने विष्णुदादांना सांगताच ते त्याला ‘६ मास थांब. नीट विचार कर. एवढी घाई करू नकोस’, असे म्हणाले. त्यानंतर सहा मासांनी, म्हणजे जानेवारी २००० मध्ये त्याने विष्णुदादांना पुन्हा विचारले. तेव्हा त्या वेळचे प्रसारसेवक श्री. प्रकाश जोशी मुंबईला आले होते. विष्णुदादांनी त्यांना भेटण्यास सुचवले. त्यानुसार तो पत्नीसह त्यांना भेटला. श्री. प्रकाश जोशी यांनी २ मिनिटे डोळे बंद करून सूक्ष्मातून जाणून घेऊन त्याला पूर्ण वेळ साधना करण्यास अनुमती दिली. त्याचा ठाम निश्‍चय असल्याचे पाहून आम्हीही त्याला होकार दिला आणि त्याच्या जीवनाला एक वेगळीच कलाटणी मिळाली. तो साधनेसाठी नोकरी सोडणार असल्याचे कळल्यावर नातेवाइकांनी आम्हाला नावे ठेवली; पण प.पू. डॉक्टरांनी आम्हाला साधनेत आणून आमच्या मनाची पूर्ण सिद्धता केल्याने कोणी काहीही बोलले, तरी त्याचे दुःख झाले नाही किंवा कधीही पश्‍चात्ताप झाला नाही.

३ उ. पदोन्नतीची संधी झुगारून नोकरीचा राजीनामा
देऊन पूर्ण वेळ साधनेसाठी गोव्याला सनातन संस्थेमध्ये जाणे

नोकरीमध्ये पदोन्नतीची संधी मिळत असूनही त्याने पूर्ण वेळ साधना करण्याकरता नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. नोकरी न सोडण्यासाठी तेथील आस्थापनाने त्याला बरीच आमिषे दाखवली; पण तो आपल्या निर्णयावर ठाम राहिला आणि त्याने नोकरी सोडली. मुख्य गोष्ट म्हणजे त्याच्या पत्नीचेही त्याला पूर्णपणेे सहकार्य लाभलेे. जून २००० मध्ये ते साधनेसाठी गोव्याला स्थायिक झाले. तेव्हा मुकुलचे वय ३६ वर्षे होते.’

– सौ. माधुरी आणि श्री. माधव गाडगीळ

 

४. संत झाल्यावरचे मनोगत

४ अ. परात्पर गुरु डॉक्टरांच्या अद्वितीय मार्गदर्शनामुळे आध्यात्मिक उन्नती झाली असणे

‘प.पू. डॉक्टरांच्या कृपाशीर्वादाने हे भाग्य मला लाभले. प.पू. डॉक्टर साधकांना करत असलेले मार्गदर्शन हे स्थळ आणि काळ यांना अनुसरून असते. ते मार्गदर्शन केवळ तात्त्विक नाही, तर त्यात ‘प्रत्येक प्रसंगानुसार कसा विचार करायचा, कसे वागायचे’, हेही ते शिकवतात. असे ते प्रायोगिकही आहे. त्यामुळे ते नेहमी यथायोग्यच असते. सनातन संस्थेच्या ‘सनातन’ या नावाप्रमाणेच प.पू. डॉक्टर करत असलेले मार्गदर्शन नित्यनूतन असते. त्यामुळे साधकांनाही त्यातून नेहमी आनंद मिळतो. असे मार्गदर्शन जगात कुठेच मिळत नसेल. तसेच योग्य मार्गदर्शनामुळे साधकांची वेगाने आध्यात्मिक उन्नतीही होत आहे. तशी उन्नती इतर कुठेही बघायला मिळत नाही. त्यामुळे तीही अद्वितीयच आहे; म्हणूनच प.पू. डॉक्टरांनी लिहून ठेवले आहे, ‘सनातन संस्थेमध्ये राहून कोणा साधकाची उन्नती झाली नाही, असे होणारच नाही आणि उन्नती होत नसेल, तर तो साधकच नाही !’ या तत्त्वाप्रमाणेच माझीही आध्यात्मिक उन्नती प.पू. डॉक्टरांनी करवून घेतली. त्यामुळे त्यात माझे कर्तृत्व शून्य आहे.

आता संत झाल्यावर ‘स्वतःचे दायित्व आणखी वाढले आहे’, हे लक्षात आले. प.पू. डॉक्टरांनी मार्गदर्शनात सांगितल्याप्रमाणे त्यांना अपेक्षित असे दायित्व म्हणजे ‘कलियुगातील कलीचा प्रभाव न्यून करण्यासाठी पृथ्वीवरील मानवांचे परिवर्तन करून त्यांच्यात सात्त्विकता आणणे आणि त्यांना धर्माचरणी बनवणे’, हे आहे. हे समष्टी कार्य माझ्याकडून आणि सर्व साधकांकडून अविरत होण्यासाठी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो.’

– (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

 

५. डॉ. मुकुल गाडगीळ यांना ‘संत’ घोषित
केल्यावर त्यांच्या आई-वडिलांनी व्यक्त केलेले मनोगत

५ अ. डॉ. मुकुल गाडगीळ हात जोडून उभा असून त्याला
प.पू. डॉक्टर हार घालत असल्याचे दृश्य दिसणे, त्याचे संतपद घोषित करणार
असल्याचे जाणवणे आणि तसेच घडल्यावर त्याच्या जीवनाचे सार्थक झाल्याचे वाटणे

‘मागील वर्षी डॉ. मुकुल याच्यावर सूक्ष्मातील वाईट शक्तींनी जोरदार आक्रमण केल्याचे पाहून ‘संतपद मिळणे ही फारच अवघड गोष्ट आहे आणि त्यासाठी किती त्रास सोसावा लागतो, कष्ट घ्यावे लागतात’, हे समजले. केवळ प.पू. डॉक्टरांच्या कृपेनेच तो त्यातून वाचला. ‘त्याची लवकरात लवकर प्रगती होवो’, अशी प्रार्थना ईश्‍वराला सतत होऊ लागली. अर्थात् ‘प.पू. डॉक्टर त्याला संत बनवणारच’, अशी मनोमन निश्‍चिती होती. कार्तिक शुक्ल पक्ष द्वितीया, कलियुग वर्ष ५११३ (२८.१०.२०११) या दिवशी सकाळी संगणकीय प्रणालीवर कार्यक्रम चालू झाला आणि अचानक ‘मुकुल हात जोडून उभा असून त्याला प.पू. डॉक्टर हार घालत आहेत’, असे मला दिसले. मी मनात खूणगाठ बांधली की, आज नक्कीच त्याला ‘संत’ म्हणून घोषित केले जाईल. थोड्या वेळापूर्वीच कु. अनुताईंनी (कु. अनुराधा वाडेकर यांनी) संतपद प्राप्त केल्यानिमित्त प.पू. पांडे महाराजांच्या हस्ते त्यांच्या सन्मानाचा कार्यक्रम झाला होता. आताही तसेच पहायला मिळाले. मुकुलचे संतपद घोषित केल्यावर मला आनंदाने भरून आले. त्या वेळी ‘आपल्या संपूर्ण कुळाचा, घराण्याचा उद्धार झाला आणि जीवनाचे सार्थक झाले’, असे वाटले. कठोर साधना करून थोड्या कालावधीत ‘शांत स्वभाव, प्रेमळपणा, तळमळ आणि चिकाटी’ या गुणांनी त्याने संतपद मिळवून दाखवले. त्याचे कौतुक करावे, तेवढे थोडेच आहे.’ – श्री. माधव गाडगीळ (वडील), सनातन आश्रम, देवद, पनवेल.

५ आ. डॉ. मुकुल गाडगीळ ‘संत’ झाल्याचे घोषित केल्यावर
अखंड भावाश्रू येणे आणि आपल्या जन्माचे सार्थक झाल्याचे वाटणे

‘मुलगा डॉ. मुकुल ‘संत’ झाल्याबद्दल प.पू. डॉक्टरांकडून होत असलेल्या त्याच्या सन्मानाच्या वेळी माझ्या डोळ्यांत अखंड अश्रू येत होते. कितीही आवरण्याचा प्रयत्न केला, तरी मला ते आवरता येत नव्हते. त्या वेळी प.पू. डॉक्टरांच्या चरणी सतत कृतज्ञता वाटत होती. या प्रसंगावरून पूर्वीचा एक प्रसंग आठवला. आम्ही साधनेत नवीनच होतो. एके ठिकाणी प.पू. डॉक्टरांचे मार्गदर्शन होते. प.पू. डॉक्टरांच्या आईंना आसंदीतून वर आणले. तेव्हा मला ‘त्या कोण आहेत ?’, हे ठाऊक नव्हते. मी कोणालातरी शोधत असतांना आमच्या दोघींची दृष्टादृष्ट (नजरानजर) झाली. त्यांच्याकडे बघून मला आनंद झाला आणि तो व्यक्त झाला. त्यापण माझ्याकडे बघून गोड हसल्या. त्यांचे प.पू. डॉक्टरांशी असलेले नाते कळल्यावर ‘अशा मुलाला जन्म देणारी माऊली किती थोर असेल’, असे वाटले. डॉ. मुकुल ‘संत’ झाल्याचे घोषित केल्यावर मलाही जन्माचे सार्थक झाल्याचे वाटले.’ – सौ. माधुरी गाडगीळ, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

५ इ. डॉ. मुकुल गाडगीळ याने साधनेला आरंभ केल्यापासून ८ वर्षांत
६४ टक्के आध्यात्मिक पातळी आणि पुढे ३ वर्षांत संतपद, असा जलद आध्यात्मिक प्रवास करणे

५ इ १. डॉ. मुकुल गाडगीळ याने चिकाटीने आणि तळमळीने सेवा करून साधनेला आरंभ केल्यापासून ८ वर्षांत ६४ टक्के आध्यात्मिक पातळी गाठणे

‘गोव्याला डॉ. मुकुल याच्या घरापासून सनातनचा फोंडा येथील आश्रम ३ कि.मी. लांब होता. तो, त्याची पत्नी सौ. अंजली आणि ४ वर्षांची मुलगी कु. सायली आश्रमात सेवा करून रात्री घरी पोहोचायचे. सेवेची तळमळ आणि कष्ट यांचे फळ म्हणून त्याने साधनेला आरंभ केल्यापासून ८ वर्षांत ६४ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. यावरून हेच सिद्ध होते, ‘कोणतीही सेवा असो, ती चिकाटीने, तळमळीने आणि पूर्णपणे झोकून देऊन परिपूर्ण केल्यास जलद आध्यात्मिक उन्नती होते.’

५ इ २. डॉ. मुकुल गाडगीळ याने व्यावहारिक किंवा भावनिक स्तरावर न वागता नेहमीच आध्यात्मिक स्तरावर वागल्याने त्याला संतपद लाभणे

‘तो आम्हाला साधनेत मार्गदर्शन करून साहाय्य करतो. कोणत्याही प्रसंगात तो व्यावहारिक किंवा भावनिक स्तरावर न वागता आध्यात्मिक स्तरावर वागतो. त्याचे आदरयुक्त वागणे, सर्वांशी प्रेमाने बोलणे आणि सतत सेवेत रहाणे, याचे फळ म्हणून त्याला संतपद लाभले, याचा आम्हा सर्वांना आनंद होत आहे. डॉ. मुकुल संत होण्यापूर्वी आम्हाला सतत भारद्वाज पक्षी दिसायचा. प.पू. डॉक्टरांनी आम्हाला दिवाळीची ही अपूर्व भेट दिली. त्यामुळे आम्ही श्रीकृष्ण आणि प.पू. डॉक्टर यांच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता व्यक्त करतो.

डॉ. मुकुल याची उत्तरोत्तर झालेली प्रगती पाहून ‘त्याने साधनेचा घेतलेला निर्णय किती योग्य होता’, हे लक्षात आले. त्याने त्याच्या जीवनाचे सार्थक केले. त्याच्या संतत्वाचा आम्हा सर्व कुटुंबियांना लाभ होऊन आमचीही उन्नती व्हावी, हीच श्रीकृष्ण, प.पू. डॉक्टर आणि पू. डॉ. मुकुल यांच्या चरणी प्रार्थना !’

– सौ. माधुरी आणि श्री. माधव गाडगीळ

 

६. डॉ. मुकुल गाडगीळ यांनी संतपद प्राप्त
केल्यावर कुटुंबियांनी सांगितलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये

६ अ. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ (पत्नी)

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

६ अ १. गुणवैशिष्ट्ये

६ अ १ अ. पहिल्यापासूनच संतवृत्ती !

पू. डॉ. मुकुल गाडगीळ पहिल्यापासूनच संतवृत्तीचे आहेत. त्यांचा आहार आणि विचारही सात्त्विक आहेत.

६ अ १ आ. अहं अल्प असणे

त्यांनी माझ्यावर ‘पती’ या नात्याने आणि इतरांवरही कधीच कसलाच अधिकार गाजवला नाही. स्वतः उच्चशिक्षित असूनही त्यांनी विद्येचा कधी अभिमानही बाळगला नाही. ते नेहमीच परेच्छेने वागत आले आहेत.

६ अ १ आ १. डॉ. गाडगीळ यांचा अहं अल्प असल्याविषयी प.पू. डॉक्टरांनी वर्ष २००३ मध्येच सांगणे

‘‘तुमच्यात (सौ. गाडगीळ यांच्यात) ३० टक्के अहं असून स्वयंपाक विभागात सेवा करून तुमचा तोंडवळा डॉ. गाडगीळ यांच्यासारखा झाला पाहिजे. त्यांचा अहं जन्मतःच १० टक्के आहे.’’ असे प.पू. डॉक्टरांनी २००३ या वर्षी सांगितले होते.

६ अ २. प.पू. डॉक्टरांनी डॉ. गाडगीळ यांची सेवेतील फलनिष्पत्ती
अल्प असल्याचे सांगितल्यावर त्यांनी ती वाढवण्यासाठी पहाटे उठून सेवा करणे

२००५ या वर्षी प.पू. डॉक्टरांनी मला सांगितले, ‘‘डॉ. गाडगीळ यांची सेवेतील फलनिष्पत्ती अल्प आहे. त्यांना ती वाढवण्यास सांगा.’’ डॉ. गाडगीळ यांनी सेवेतील फलनिष्पत्ती वाढवण्यासाठी प्रतिदिन पहाटे ४ वाजता उठून सेवा करणे चालू केले आणि अजूनही त्यांनी हा नियम मोडलेला नाही.

६ अ ३. डॉ. मुकुल गाडगीळ यांच्यासंदर्भात आलेल्या अनुभूतींचे स्वरूप आणि त्यांची आध्यात्मिक पातळी

६ आ. कु. सायली गाडगीळ (मुलगी) (आताच्या सौ. सायली करंदीकर)

६ आ १. गुणवैशिष्ट्ये

६ आ १ अ. नीटनेटकेपणा

पू. बाबा प्रत्येक गोष्ट व्यवस्थितच करतात. त्यांच्या पिंडातच शिस्त मुरलेली आहे.

६ आ १ आ. नम्रता

पू. बाबांचा स्वभाव प्रथमपासूनच मनमिळाऊ आणि नम्र आहे.

६ आ १ इ. अनासक्त

पू. बाबांना पूर्वीपासूनच कशाचीच आसक्ती नाही. ‘देवाने जे दिले आहे, त्यातच चांगले कसे रहाता येईल’, असा त्यांचा विचार असतो. ‘साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी’ हे त्यांच्या व्यक्तीमत्त्वातच आहे.

६ आ १ ई. प्रेमभाव

‘प्रत्येक चूक प्रेमाने सांगणे’, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

६ आ १ उ. आध्यात्मिक स्तरावर मार्गदर्शन करणे

व्यष्टी साधनेत मला त्यांच्या शिकवणीचा लाभ होतो. ते मला प्रत्येक गोष्ट अध्यात्माच्या ढंगाने समजावून सांगतात.

६ आ २. पू. बाबांविषयी विविध टप्प्यांवर आलेल्या अनुभूती

६ आ २ अ. संत होण्यापूर्वीच्या अनुभूती
६ आ २ अ १. बाबांमध्ये प.पू. डॉक्टर दिसत असल्याने प.पू. डॉक्टरांप्रती ओढ निर्माण होणे

लहानपणी मला प.पू. डॉक्टरांपेक्षाही संत भक्तराज महाराज अधिक आवडायचे; परंतु बाबा खोलीत आले की, मला त्यांच्यात प.पू. डॉक्टर दिसायचे. ते सतत दिसून दिसून मला प.पू. डॉक्टरच आवडू लागले.

६ आ २ अ २. बाबांच्या अस्तित्वाने खोलीत दैवी सुगंध येणे

प.पू. डॉक्टरांच्या खोलीत जसा सुगंध येतो, तसा सुगंध बाबा खोलीत आल्यावर येत असे.

६ आ २ आ. संत घोषित झाल्यावर आलेल्या अनुभूती
६ आ २ आ १. ‘पू. बाबा साक्षीभावाच्या टप्प्याकडे निघाले आहेत’, असे वाटणे

बाबांना संत घोषित केले. त्या वेळी प.पू. डॉक्टरांकडून सन्मान स्वीकारतांना त्यांच्या तोंडवळ्यावर कोणत्याच भाव-भावना नव्हत्या. यावरून मला वाटले, ‘ते साक्षीभावाच्या टप्प्याकडे निघाले आहेत.’

६ आ २ आ २. साधना करण्यास स्फूर्ती मिळणे

पू. बाबांचे संतपद घोषित झाल्यावर मलाही आतून साधना करण्याची स्फूर्ती मिळाली. माझी ईश्‍वरप्राप्तीची ओढ जागृत झाली. सन्मान सोहळा चालू असतांना ‘पू. बाबा मला आणि आईला समवेत घेऊन एका दैवी मार्गावरून ईश्‍वराकडे निघाले आहेत’, असे दृश्य मला परत परत दिसत होते.

६ आ २ आ ३. सन्मान सोहळ्याच्या वेळी आलेली आनंदाची अनुभूती महत्त्वाची असल्याचे प.पू. डॉक्टरांनी सांगणे

बाबांना संतपद घोषित झाल्याच्या वेळी मी मिरज आश्रमात होते. तेथून मी प.पू. डॉक्टरांना दूरध्वनी केला आणि सांगितले, ‘‘बाबांचा सन्मानसोहळा पाहून मला काही वाटले नाही; परंतु आनंद मात्र झाला.’’ त्या वेळी प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘आनंद हा सुख-दुःखाच्या पलीकडचा असल्याने तुला आलेली ही अनुभूती महत्त्वाची आहे.’’

६ इ. सौ. शैलजा आणि श्री. सदाशिव परांजपे (सासू-सासरे), सांगली

सौ. शैलजा परांजपे

पू. डॉ. मुकुल गाडगीळ यांच्यासारखा सद्गुणी जावई देऊन सर्व कुटुंबियांची साधनेकडे वाटचाल करवून घेणे, हे ईश्‍वरी नियोजनच !

६ इ १. देवाने सौ. अंजलीसाठी साधी आणि प्रेमळ माणसे
मिळवून देऊन मुंबईच्या लोकांविषयी वाटणारी शंका दूर करणे

‘१५ वर्षांपूर्वी पू. डॉ. मुकुल आणि सौ. अंजली यांचा विवाह झाला. गाडगीळ कुटुंबीय मुंबईचे रहाणारे. आम्हाला तेथील काहीच माहिती नाही आणि मुलगा मुंबईचा म्हटल्यावर आम्हाला जरा काळजीच वाटली; कारण ‘तेथील माणसे अती सुधारित असतात’, असे आम्ही ऐकून होतो. परमेश्‍वराने आमचा हा प्रश्‍न सहजतेने सोडवला आणि आम्हाला अगदी साधी, आध्यात्मिक वळण असलेली अन् प्रेमळ माणसे मिळवून दिली. म्हणतात ना, ‘आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना !’

६ इ २. ‘डॉ. मुकुल गाडगीळ यांना अल्प ऐकू येते’, असे कळल्यावर
अतिशय दुःख होणे; परंतु सौ. अंजलीचे प्रगल्भ विचार ऐकून समजूत पटणे

विवाहानंतर सौ. अंजली सासरी गेली. मुलगी सासरी गेल्यानंतर आई-वडिलांना जशी काळजी असते, तशी आम्हालासुद्धा होती. कधी कधी ‘सौ. अंजली तिथे कशी काय रमेल, सगळेच नवीन आहे’, असे वाटायचे. काही दिवसांनी सौ. अंजली प्रथमच माहेरी आल्यावर आम्ही तिच्या सासरची विचारपूस केली. त्या वेळी तिने ‘डॉ. मुकुल यांना कमी ऐकायला येते’, असे आम्हाला सांगितले. हे ऐकून आम्हाला अतिशय दुःख झाले आणि ‘गाडगीळ कुटुंबाकडून आम्ही फसवले गेलो’, असे वाटले; परंतु सौ. अंजली आम्हाला म्हणाली, ‘‘आई, मला त्याविषयी काहीही वाटत नाही. त्यांच्या अंगी इतके गुण आहेत की, हे एखादे न्यून त्यापुढे काहीच नाही !’’ (तेव्हा प्रत्यक्षात ऐकू कमी येण्याचे प्रमाण अगदी अल्प होते की, ते इतरांच्या लक्षातही यायचे नाही. पुढे ते वाढत गेले. – सौ. अंजली)

इतक्या लहान वयात किती प्रगल्भ विचार ! त्या वेळी आम्ही काही भलतासलता विचार केला नाही, ही ईश्‍वराची कृपाच म्हणायची !

६ इ ३. मुळातच अहं अल्प असल्याने पत्नीच्या घरी (सासरी) सहजतेने वागणे

विवाह झाल्यापासून आजपर्यंतची त्यांची वर्तणूक आहे तशीच आहे. ते अत्यंत प्रेमळ आहेत. जावई असूनही ते आमच्या घरी सर्व सेवा करायला सतत सिद्ध असत. कपडे वाळत घालणे, केर काढणे, स्वयंपाकात साहाय्य करणे, दुचाकी स्वच्छ धुणे इत्यादी सेवाही ते आनंदाने करत. आम्हालाच लाज वाटायची की, जावयांना हे सर्व कसे सांगायचे ?

६ इ ४. अनेक गुणांचा सुरेख संगम म्हणजे पू. डॉ. मुकुल गाडगीळ !

पहिल्यापासूनच ते मितभाषी आहेत. खाण्यापिण्यात त्यांची कधीही आवड-नावड नसते. ते लहान मुलांशी अतिशय प्रेमाने वागतात. त्यांची परमेश्‍वरावर नितांत भक्ती आहे. त्यांचे आचार-विचार अत्यंत सात्त्विक असून घरातील मोठ्या माणसांविषयी त्यांच्या मनात अत्यंत आदर आणि प्रेमभाव आहे. त्यांच्या आजेसासूबाईंची सेवाही ते प्रेमाने करत. ते एकटे असले की, त्यांचा आतून नामजप सतत चालू आहे, हे लक्षात येते.

६ इ ५. साधनेविषयी मार्गदर्शन मिळताच सर्वस्वाचा त्याग करून
प.पू. डॉक्टरांच्या छत्राखाली रहायला जाणे आणि आयुष्याचे सार्थक करून घेणे

वर्ष १९९३ मध्ये त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर ६ वर्षांनी ते साधनेत, म्हणजे सनातन संस्थेत आले. साधनेत येण्यापूर्वी ते चांगल्या पदावर चाकरीला होते आणि त्यांना वेतनही भरपूर होते. सौ. अंजलीसुद्धा शिकवण्या घेत असे. दोघे मिळून प्रतीमास २५ सहस्र रुपये मिळवत. पूर्वी आमच्या मनाचा ग्रह असा होता की, शिक्षण, चांगल्या पदावर चाकरी, भरपूर वेतन, बंगला, चारचाकी इत्यादी सर्व मिळाले की, आयुष्याचे सार्थक होते; पण त्यात देवाला काहीही स्थान नव्हते.

एकदा त्यांना सनातनचे साधक श्री. प्रकाश जोशी यांच्याकडून साधनेविषयी मार्गदर्शन मिळाले आणि एका रात्रीत घर सोडण्याचा निश्‍चय करून वर्ष २००० मध्ये ते गोव्याला प.पू. डॉक्टरांच्या छत्राखाली रहायला आले. (मी स्वतः साधना पूर्णवेळ करण्याचा निर्णय गुरुप्राप्तीनंतर ७ वर्षांनी घेतला ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले) आम्हा सर्वांना मात्र ‘मी आता दुसरी चाकरी करत असून इथे मुंबईपेक्षा जास्त वेतन मिळते’, असे त्यांनी सांगितले. हे आम्हाला ५ वर्षांनी कळले; मात्र त्यांच्या आई-वडिलांना त्यांनी तो निर्णय त्याच वेळी सांगितला होता आणि त्यांना तो आवडला होता. सर्वस्वाचा त्याग करून त्यांनी त्यांचे सर्व आयुष्यच साधनेसाठी झोकून दिले. आपण सुतळीचा एक तोडासुद्धा सोडत नाही. लहान वयात तन, मन आणि धन गुरुचरणी अर्पण करणे, फारच अवघड आहे. ते त्यांनी साध्य केले. आरंभी आम्ही त्यांना पुष्कळ विरोध केला; पण नंतर गुरूंनी आम्हाला सद्बुद्धी दिली. ही केवळ गुरुकृपाच, नाहीतर आम्ही त्यांच्या साधनेतील मोठी धोंडच होऊन बसलो असतो. तेव्हा आम्हाला सनातन संस्था आणि साधना यांविषयी काहीच ठाऊक नव्हते.

६ इ ६. जावई ‘संत’ झाल्याची प.पू. डॉक्टरांची ‘अमृत वाणी’ ऐकायला मिळणे

आम्हाला ईश्‍वरी गुण असलेला जावई मिळाला. पू. डॉ. मुकुल गाडगीळ संत झाल्याची प.पू. डॉक्टरांच्या तोंडची ‘अमृत वाणी’ही ऐकायला मिळाली.

६ इ ७ . प्रार्थना

त्यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती होऊन ‘त्यांना अध्यात्मातील पुढील सर्व पदव्या मिळोत’, अशी ईश्‍वरचरणी प्रार्थना ! या मुलांचे लहान वयातील विचार केवढे प्रगल्भ आहेत ! आम्ही नुसते वयानेच मोठे झालो; पण ज्ञानाने शून्यच आहोत ! ‘त्यांच्याप्रमाणे आमच्याकडूनही अशी साधना होऊ दे, त्यांच्यामधील गुण आम्हाला अंगीकारता येऊ देत’, हीच प.पू. डॉक्टरांच्या चरणी प्रार्थना !’

(श्री. आणि सौ. परांजपे यांनी अत्यंत निर्मळपणाने जावयांविषयीचे आपले मनोगत गुरुचरणी अर्पण केले आहे. यासाठी त्यांचे कौतुक करावे, तेवढे थोडेच ! – (परात्पर गुरु डॉ. आठवले)

 

७. डॉ. मुकुल गाडगीळ यांनी संतपद प्राप्त केल्यावर त्यांची संतांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये

७ अ. पू. संदीप आळशी

पू. संदीप आळशी

७ अ १. प.पू. डॉक्टरांच्या, म्हणजे
धर्मसूर्याच्या रथाचे सारथी : पू. डॉ. गाडगीळकाका !

आपल्या दिव्य ज्ञानप्रकाशाने जगतातील अज्ञानरूपी अंधःकार दूर करणारे प.पू. डॉक्टर हे समष्टीसाठी जणू धर्मसूर्यच ! या धर्मसूर्याच्या रथाचे वारू चौफेर उधळणार्‍या रथाचा सारथी होणे किती कठीण असेल नाही ? या धर्मसूर्याच्या रथाचे सारथी आहेत – पू. डॉ. गाडगीळकाका ! या सारथ्याची ही काही निवडक वैशिष्ट्ये…

७ अ १ अ. प.पू. डॉक्टरांचा कार्यभार सांभाळण्यासाठी त्यांचे विश्‍वासपात्र बनलेले पू. डॉ. गाडगीळकाका !

नियतकालिकांना देण्यासाठीचे प्रबोधनपर लिखाण असो कि साधकांच्या आध्यात्मिक उन्नतीचे मोजमापन असो कि असो संतांना लिहायची पत्रे… या सर्व सेवा पू. काका एकटे सांभाळतात ! एकदा ते बाहेरगावी गेले असतांना प.पू. डॉक्टर म्हणाले होते, ‘‘काका नाहीत म्हणून जरा पंचाईत होते. काकांना एकदा एखादी गोष्ट सांगितली की, पुन्हा पहावे लागत नाही.’’ प.पू. डाक्टरांचे मन जिंकणारे पू. डॉ. काका मग त्यांची कृपा संपादन का नाही करू शकणार ?

७ अ १ आ. चुकीची खंत वाटल्याने रात्र रात्र झोप न लागणारे पू. डॉ. काका

एकदा पू. डॉ. काका मला म्हणाले, ‘‘माझ्याकडून जेव्हा एखादी चूक होते, तेव्हा त्या विचारामुळे मला रात्री झोपही लागत नाही !’’ चुकीविषयी अशी तीव्र खंत असल्यामुळेच पू. डॉ. काका सेवा परिपूर्ण करू शकतात.

७ अ १ इ. सूक्ष्मातील उत्तरे देण्याची क्षमता

पू. डॉ. काकांना एखाद्या आध्यात्मिक त्रासाविषयी विचारले, तर पुढच्याच क्षणी ते एखादा नामजप किंवा उपाय सांगतात. याविषयी मी त्यांना विचारले, ‘‘तुम्ही एवढे पटकन कसे सांगू शकता ?’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘मन निर्विचार असले की, उत्तरे सुचतात आणि ती योग्य असतात. माझे मन बर्‍याचदा निर्विचारच असते.’’

(२७ ऑक्टोबर २०११)

८. संतपद प्राप्त केलेले पू. डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या संदर्भात
साधकांना जाणवलेली त्यांची व्यष्टी आणि समष्टी स्तरांवरील गुणवैशिष्ट्ये

८ अ. व्यष्टी स्तरावरील गुणवैशिष्ट्ये

८ अ १. अतिशय साधी राहणी, शांत स्वभाव आणि मितभाषी
८ अ १ अ. मितभाषी असूनही बोलण्यात निरागसता आणि सत्यता जाणवणे

‘जून २००० मध्ये डॉ. गाडगीळकाका, त्यांच्या पत्नी सौ. अंजली गाडगीळ आणि मुलगी चि. सायली गोव्यात आले. तेव्हा श्री. आणि सौ. गाडगीळ यांचे राहणीमान अतिशय साधे होते. दोघेही त्यांना दिलेली सेवा मनापासून आणि परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करत असत. मी आरंभापासूनच सेवेनिमित्त त्यांच्या संपर्कात होते. दोघांचीही सेेवा करण्याची पद्धत अनुकरणीय अशी होती. मला दोघांच्याही सहवासात रहायला जास्त चांगले वाटत असे. डॉ. गाडगीळकाका अतिशय शांत स्वभावाचे; पण उत्साही होते. ते मितभाषी असले, तरी त्यांच्या बोलण्यात निरागसता आणि सत्यता जाणवत असे.’ – सौ. विजयलक्ष्मी आमाती

८ अ १ आ. काहीही विचारल्यावर स्मितहास्याने मोजक्या शब्दांत; पण परिपूर्ण उत्तर देणे

‘पू. डॉ. गाडगीळकाका मितभाषी आहेत. संकलनाची सेवा करतांना किंवा मला आध्यात्मिक त्रास होत असतांना पू. डॉ. काकांना कोणतेही सूत्र विचारले, तरी ते स्मितहास्याने मोजक्या शब्दांत; पण परिपूर्ण उत्तर देतात.’ – श्री. गिरिधर भार्गव वझे

८ अ २. अहं अल्प असणे

‘आमची ओळख झाल्यानंतर साधारण २ – ३ वर्षांनंतर डॉ. गाडगीळकाका हे विद्यावाचस्पती (डॉक्टरेट) असल्याचे समजले.

अ. पूर्ण वेळ साधक झाल्यानंतर थोड्याच मासांच्या कालावधीत सौ. अंजली गाडगीळ या सेवेत (साधनेत) भराभर पुढे जात राहिल्या; परंतु डॉ. गाडगीळकाका मात्र नेहमीप्रमाणे शांत आणि स्थिर होते. त्यांचे हे वेगळेपण मला प्रकर्षाने जाणवले. मला त्याचे जास्त कौतुक वाटत होते.’

– सौ. विजयलक्ष्मी आमाती

८ अ २ अ. ग्रंथसेवेचा पूर्वानुभव असतांनाही स्वतःपेक्षा सर्वच स्तरांवर लहान असणार्‍या साधिकेकडून अनुक्रमणिका शिकून तिचे कौतुक करणारे अहंशून्य असे पू. डॉ. मुकुल गाडगीळ !

‘१२.८.२०१८ या दिवशी पू. डॉ. गाडगीळकाका मला म्हणाले, ‘‘परात्पर गुरु डॉक्टरांनी मला माझ्या लहानपणापासून ते आतापर्यंतच्या साधनाप्रवासाच्या धारिकेची अनुक्रमणिका लावण्यास सांगितली आहे. ती कशी लावायची, हे मला सांगता का ?’’, पू. डॉ. काकांनी असे विचारल्यावर मला क्षणभर काय बोलावे, हेच कळेना; कारण स्वतः पू. डॉ. काकांनी ‘दैवी कणांविषयी ३ ग्रंथ, प.पू. डॉ. आठवले यांच्या नखांत झालेल्या दैवी पालटांचे शास्त्र याचे २ भाग, गोपी भावातील साधिकांविषयीचे ५ ग्रंथ इत्यादी अनेक ग्रंथ केले आहेत. असे असूनही केवळ प्राथमिक टप्प्यातील ग्रंथसेवा करणार्‍या मला ते अत्यंत नम्रतेने ‘अनुक्रमणिका कशी लावायची ?’, हे विचारत होते; पण ‘संतांनी विचारले आहे, तर सांगूया’, असा विचार करून पूर्वी परात्पर गुरु डॉक्टरांनी मला ग्रंथाची अनुक्रमणिका करतांना लक्षात ठेवण्यास सांगितलेली सूत्रे मी त्यांना सांगितली. त्यानुसार त्यांनी संक्षिप्त, मध्यम आणि सविस्तर अनुक्रमणिका केल्या आणि २ – ३ दिवसांनी मला म्हणाले, ‘‘त्या अनुक्रमणिका तुम्ही एकदा पाहून घेता का ?’’ तेव्हा माझ्या मनात ‘त्यांनी केलेली अनुक्रमणिका योग्यच असणार. मी त्यात काय पालट करणार ?’’, असा विचार आला; पण ‘संत विचारत आहेत, तर सांगूया’, असा विचार केला. पूर्वी परात्पर गुरु डॉक्टरांनी मला ग्रंथाची अनुक्रमणिका करतांना सूत्रांचा शिकवलेला क्रम, सूत्रांचे करावयाचे वर्गीकरण इत्यादी शिकवले आहे. त्याप्रमाणे काही पालट करण्यापूर्वी मी पू. डॉ. काकांना ‘‘असे करूया का ?’’, असे विचारत होते. तेव्हा माझ्यापेक्षा वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध आणि तपोवृद्ध अशा पू. डॉ. काकांना पालट सांगायचे, याचे मनावर प्रचंड दडपण आले होते; पण पू. डॉ. काका अत्यंत सहजावस्थेत होते. तेव्हा पू. डॉ. काकांनी एकाही पालटाला नकार न देता संमती दर्शवली आणि त्यानुसार पुन्हा अनुक्रमणिकेत पालट करून मला परत पहायला सांगितली. तेव्हा त्यांनी अत्यंत प्रांजळपणे हेही सांगितले की, तुम्ही एका सूत्राच्या क्रमात सुचवलेला पालट मी केला नाही. ते सूत्र थोड्या वेगळ्या प्रकारे मांडले आहे; पण बाकीचे पालट तुम्ही सांगितल्याप्रमाणे केले आहेत. ही सेवा संपल्यावर पू. डॉ. काका मला म्हणाले, ‘‘तुम्हाला बरेच बारकावे ठाऊक आहेत. मला एवढे काही येत नाही.’’

पू. डॉ. काकांनी अंतीम केलेली अनुक्रमणिका परात्पर गुरु डॉक्टरांनी पडताळल्यावर ती आवडल्याचे पू. डॉ. काकांना कळल्यावर त्यांनी आवर्जून मला ती अनुक्रमणिका परात्पर गुरु डॉक्टरांना आवडल्याचे सांगितले आणि त्यात त्यांनी केलेले ३ – ४ पालटही सांगितले. परात्पर गुरु डॉक्टरांनी मला अनुक्रमणिका शिकवल्याबद्दल त्यांच्या चरणी आणि पू. डॉ. गाडगीळकाकांनी माझ्याकडून ती सेवा करून घेतल्याबद्दल त्यांच्या चरणी कृतज्ञ आहे.’

– एक साधिका, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.८.२०१८)

८ अ ३. अंतर्मुख
८ अ ३ अ. सतत अंतर्मुख असल्याचे जाणवणे

‘पू. डॉ. गाडगीळकाकांकडे कधीही पाहिले, तरी ते सतत अंतर्मुख असल्याचे जाणवते. त्यांना एखादा प्रश्‍न किंवा शंका विचारली, तर ते लगेचच त्या प्रश्‍नाचे उत्तर देऊन परत सेवेत मग्न होतात.’ – कु. सुषमा पेडणेकर

८ अ ३ आ. निरपेक्षपणा अन् अंतर्मुखता यांमुळे मुखावर आनंद पहायला मिळणे

‘एका साधिकेकडून ज्ञानाची सूत्रे टंकलिखित करतांना वारंवार त्याच त्याच चुका होत होत्या. त्यासंबंधी त्या साधिकेला मी कल्पना दिली; पण तिच्यात सुधारणा होत नव्हती. तेव्हा माझी चिडचिड होत असे. यासंदर्भात मी पू. डॉ. गाडगीळकाकांना सांगितले आणि ‘अशा वेळी आपण काय करायला हवे ?’, असे विचारले. त्यावर पू. डॉ. काका म्हणाले, ‘‘तिला चुका सांगितल्या आहेत ना, तर ‘तिच्याकडून सुधारणा होईल’, अशी अपेक्षा ठेवू नका. त्या धारिकेतील चुका स्वतःच सुधारायच्या; कारण आपण दुसर्‍यामध्ये कधी पालट करू शकत नाही.’’ यावरून ‘निरपेक्षपणा आणि अंतर्मुखता यांमुळेच पू. डॉ. काकांच्या मुखावर आनंद पहायला मिळतो’, हे लक्षात आले.’ – श्री. गिरिधर भार्गव वझे

८ अ ४. तातडीची सेवा करतांनाही मनातून स्थिर रहाणे

‘पू. डॉ. गाडगीळकाका प्रत्येक धारिका पहिल्या वाचनातच अंतिम दृष्टीने संकलित करतात. ते सर्वच सेवा तत्परतेने अन् वेगाने करतात, तरीही ते मनातून पूर्णतः स्थिर असल्याचे त्यांच्या मुखाकडे पाहून सहज लक्षात येते. एकदा पू. डॉ. काका तातडीची सेवा करत होते. तेव्हा त्यांची मुलगी कु. सायली ‘बाबा, माझ्यासमवेत खोलीत चला ना’, असा हट्ट करत होती, तरी पू. डॉ. काका तिला सहजतेने ‘हां, येतो’, असे सांगून सेवा करत होते.’ – श्री. गिरिधर भार्गव वझे

८ अ ५. प.पू. डॉक्टरांना अपेक्षित अशी सेवा करण्याची तळमळ लागणे

‘पू. डॉ. गाडगीळकाका सनातन प्रभात नियतकालिकांसाठी मजकूर देतात. एकदा साप्ताहिकासाठी त्यांनी देवतांच्या निर्गुण झालेल्या चित्रांविषयी लेख दिला होता. तो लेख वैशिष्ट्यपूर्ण होता. त्या लेखाची मांडणी व्यवस्थित व्हावी, यासाठी पू. डॉ. काका थोड्या थोड्या वेळाने येऊन ‘पानावर त्या लेखाची संरचना कशी होत आहे ?’, हे बघायचे आणि पालट सुचवायचे. त्यांनी आमच्याकडून प.पू. डॉक्टरांना अपेक्षित अशी संरचना करवून घेतली.’ – सौ. नंदिनी चितळे

८ अ ६. सेवा भावपूर्ण आणि चैतन्यमय करणे अन् त्याचा अनुभवलेला परिणाम

८ अ ६ अ. ‘पू. काकांकडे प्रत्येक धारिकेला शिरोभाग लिहिणे, संतांना प.पू. डॉक्टरांच्या वतीने पत्र लिहिणे किंवा निरोप देणे, प.पू. डॉक्टरांनी सांगितलेली प्रत्येक चौकट किंवा सूचना सिद्ध करणे, संतांचा वाढदिवस असल्यास त्यांची छायाचित्रे आणि त्यांच्याविषयीचे लिखाण आराखड्यात व्यवस्थित बसवणे, ग्रंथांची सूक्ष्म-चित्रे पडताळणे, ग्रंथांची अनुक्रमणिका करणे, ग्रंथ करणे, विदेशी साधक आणि वाचक यांच्या प्रश्‍नांची उत्तरे देणे, अशा विविध प्रकारच्या सेवा आहेत. ते सर्व सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण करतात.’ – कु. सुषमा पेडणेकर

८ अ ६ आ. स्थूल आणि सूक्ष्म या दोन्ही स्तरांवर सेवा करत असल्याने धारिका चैतन्यमय होणे

‘मी संकलन करून पडताळण्यासाठी दिलेली प्रत्येक धारिका पू. डॉ. गाडगीळकाका पडताळून मला अभ्यासासाठी परत देत असत. काही धारिकांमध्ये माझ्या चुका नसतांनाही त्यांच्याकडून आलेली धारिका परिपूर्ण वाटत असे. याचे कारण म्हणजे मी सेवा स्थूल स्तरावर अधिक प्रमाणात करत होते आणि पू. काका ती सेवा स्थुलासमवेत सूक्ष्म स्तरावर, म्हणजे भावपूर्ण करत असल्याने त्या धारिका चैतन्यमय अन् वाचत रहाव्याशा वाटायच्या. मुख्य म्हणजे त्यात कर्तेपण मुळीच जाणवायचे नाही.

८ अ ६ इ. पूर्वी कठीण वाटणारी धारिका पू. डॉ. गाडगीळकाकांनी वाचल्यावर कठीण न वाटणे

काही धारिका भाषांतर आणि संकलन करण्यास मला कठीण वाटायच्या. त्या वेळी मी त्या पू. डॉ. गाडगीळकाकांच्या संचिकेत वाचण्यासाठी ठेवत असे. ते एखादी धारिका वाचून ‘‘ही धारिका सोपी आहे. तुम्ही सेवेला आरंभ तर करा. तुम्हाला सुचेल’’, असे मला सांगायचे. त्यानंतर मला खरोखरंच सुचायचे आणि ती धारिका पूर्ण होत असे.’ – सौ. विजयलक्ष्मी आमाती

८ अ ७. उत्तम स्मरणशक्ती

‘पू. डॉ. गाडगीळकाकांसमवेत आतापर्यंत सेवा करतांना ‘त्यांची स्मरणशक्ती किती उत्तम आहे’, हे लक्षात आले. त्यांना काही लिहून ठेवावे लागत नाही. ते कला, दैनिक, ग्रंथ, उपाय या विभागांतील आणि प.पू. डॉक्टरांनी सांगितलेले लिखाण एवढ्या सेवांचे अंतिम भाग पहातात, तरी काहीच लिहून न ठेवता या सर्व विभागांतील सेवा ते वेळेत पूर्ण करतात आणि साधकांचाही पाठपुरावा घेतात.’ – कु. भाविनी कपाडिया

८ अ ८. जिज्ञासू

‘आश्रमात काही वेगळी घटना घडली असेल, ध्वनीचित्रीकरण विभागात काही प्रयोग चालू असेल किंवा प.पू. डॉक्टरांच्या खोलीत काही वैशिष्ट्यपूर्ण घटना घडली असेल, तर पू. डॉ. गाडगीळकाका तिथे उपस्थित असतात. कुठल्या गोष्टीचे परीक्षण करायचे असेल, तर ते लगेचच करतात.’ – कु. सुषमा पेडणेकर

८ अ ९. सतत शिकण्याच्या स्थितीत रहाणे

‘कला विभागात धारिका पडताळतांना प.पू. डॉक्टरांनी एखाद्या साधकाविषयी काही वेगळे सांगितले आणि त्या वेळी पू. डॉ. गाडगीळकाका सेवा करत असले, तरी त्यांचे ‘प.पू. डॉक्टर काय सांगतात’, याकडे सतत लक्ष असते. प.पू. डॉक्टर कला विभागातून गेल्यावर ते तिथे उपस्थित असलेल्या साधकांना ‘प.पू. डॉक्टर काय बोलले ?’, हे विचारून घेतात.’ – कु. सुषमा पेडणेकर

८ अ १०. दैनिक सनातन प्रभातमध्ये धारिका छापण्यासाठी देण्याविषयी देवाला विचारून निर्णय घेणे

‘पू. डॉ. गाडगीळकाकांकडे पाहिल्यावर त्यांचे देवाशी सतत अनुसंधान असल्याचे जाणवते. एकदा मी पू. डॉ. काकांना विचारले, ‘‘तुम्ही दैनिक सनातन प्रभातमध्ये धारिका छापण्याविषयी कसे ठरवता ?’’ त्या वेळी ते म्हणाले, ‘‘देवाला विचारायचे, जिथे बोट जाते आणि मनात जो पहिला विचार येतो, तो पकडायचा. ती धारिका दैनिकात घ्यायची. कुठली धारिका कधी घ्यायची, तेही देवाला विचारायचे.’’ – कु. सुषमा पेडणेकर

८ अ ११. सगळ्यांच्यात मिसळणे

‘पू. डॉ. गाडगीळकाकांच्या खोलीत त्यांच्या पत्नी सौ. अंजली गाडगीळ यांच्याशी सेवेविषयी बोलण्यासाठी इतर साधक येतात. पू. डॉ. काका त्यांच्याशीही बोलतात. त्यामुळे त्यांच्या खोलीत जातांना कोणालाही संकोच वाटत नाही.’ – कु. सुषमा पेडणेकर

८ अ १२. ‘पू. डॉ. गाडगीळकाका प्रत्येक साधकाशी आदरार्थीच बोलतात.’ – श्री. गिरिधर भार्गव वझे
८ अ १३. प.पू. स्वामी स्वरूपानंद यांनी सांगितलेली सज्जनाची (उत्तम साधकाची) सर्व लक्षणे पू. डॉ. गाडगीळकाकांमध्ये असल्यानेच त्यांना संतपदाची प्राप्ती झाल्याचे लक्षात येणे

‘पावस (जिल्हा रत्नागिरी) येथील प.पू. स्वामी स्वरूपानंद यांनी म्हटले आहे –

‘सुहास्यवदन प्रसन्न दर्शन निर्मल अंतःकरण ।
 मित मधु भाषण शुद्ध मन तथा सदैव सत्याचरण ॥
 एवं षड्विध सज्जन लक्षण अंगी बाणता पूर्ण ।
होतो वश परमेश वहातो जगदंबेची आण ॥’

प.पू. स्वामींनी वर उल्लेखलेली सज्जनाची, म्हणजे उत्तम साधकाची सर्व लक्षणे पू. डॉ. गाडगीळकाकांमध्ये आढळतात. त्यामुळेच त्यांच्यावर प.पू. डॉक्टरांसारख्या अवतारी पुरुषाची पूर्ण कृपा झाली, म्हणजे त्यांना संतपदाची प्राप्ती झाली आहे, असे लक्षात येते.’ – श्री. गिरिधर भार्गव वझे

८ अ १४. ‘डॉ. मुकुल गाडगीळ आणि श्री. संदीप आळशी यांना ‘संत’ म्हणून घोषित करण्याची आवश्यकता नाही; कारण त्यांचे वागणे, बोलणे, चालणे या सर्वांतून त्यांचे संतत्व झिरपते.’

– श्री. चेतन राजहंस (दैनिक सनातन प्रभात, २९.१०.२०११)

८ आ. समष्टी स्तरावरील गुणवैशिष्ट्ये

८ आ १. तळमळ

५ आ १ अ. नवा वैशिष्ट्यपूर्ण मजकूर लवकर वाचकांपर्यंत पोचायला हवा, ही तळमळ  : ‘अनेकदा हिंदी मासिकाची सेवा अंतिम टप्याला असतांना पू. डॉ. गाडगीळकाका नवा मजकूर द्यायचे. सनातनच्या इतिहासात काही वेगळे झाले, तर ते त्याच अंकात यायला हवे, अशी पू. डॉ. काकांची तीव्र तळमळ असते. त्या वेळी ‘हा नवा वैशिष्ट्यपूर्ण मजकूर साधकांपर्यंत लवकर पोचायला हवा’, असे ते सांगायचे. पू. डॉ. काका नवीन लेख घेण्याविषयीही अतिशय नम्रपणे सांगत. ते घेण्याची आवश्यकता सांगतांना त्यांच्या तोंडवळ्यावर कुठेही आग्रहीपणा नसायचा.’

– सौ. नंदिनी चितळे

८ आ १ आ. आश्रमात आलेल्या साधकाचा मजकूर त्याचे कौतुक म्हणून लगेच दैनिकात लागावा, ही तळमळ

‘पू. डॉ. गाडगीळकाका सकाळ-संध्याकाळच्या अल्पाहाराच्या वेळी आणि दुपारी-रात्री जेवतांना भोजनकक्षातील कुठला साधक आश्रमात नवीन आलेला आहे आणि त्याचा कुठला लेख दैनिक सनातन प्रभातमध्ये छापायचा आहे, हे टिपून ठेवतात आणि तो लेख दैनिकात देतात.’ – कु. सुषमा पेडणेकर

८ आ २. पू. डॉ. गाडगीळकाकांनी शिरोभाग लिहायला शिकवणे आणि ‘शिरोभाग लिखाणाच्या सेवेवर स्वतःची मक्तेदारी (मोनोपॉली) नाही; कारण देवाला प्रार्थना करताच तो कोणाकडूनही शिरोभाग लिहून घेतो’, असे सांगून कर्तेपण देवाला देणे

‘दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये आजपर्यंत प्रसिद्ध झालेल्या बहुतांश लेखांना पू. डॉ. गाडगीळकाकांनीच वाचक अन् साधक यांना साधनेविषयी दिशादर्शन करणारे उद्बोधक असे शिरोभाग लिहिले आहेत. त्यांनी लिहिलेले शिरोभाग प.पू. डॉक्टरांनाही आवडतात.

एकदा शिरोभाग लिहायला शिकवतांना पू. डॉ. काकांनी एका ताईला सांगितले, ‘‘शिरोभाग लिखाणासाठी गिरिधर यांना एका लेखाची धारिका द्या.’’ नंतर मी पू. डॉ. काकांनी सांगितल्यानुसार देवाला प्रार्थना करताच मला आपोआप सूत्रे सुचली अन् त्या लेखासाठी शिरोभाग लिहिला गेला. नंतर मी ती धारिका पू. डॉ. काकांना पडताळायला दिली. तेव्हा पू. डॉ. काका म्हणाले, ‘‘शिरोभाग चांगला झाला आहे. शिरोभाग लिखाणाच्या सेवेवर माझी मक्तेदारी (मोनोपॉली) नाही; कारण देवाला प्रार्थना केल्यावर तो कोणाकडूनही शिरोभाग लिहून घेतो.’’ – श्री. गिरिधर भार्गव वझे

८ आ ३. प्रेमभाव
८ आ ३ अ. आईप्रमाणे प्रेमळ

‘एकदा माझ्याकडून झालेल्या एका चुकीची जाणीव पू. डॉ. गाडगीळकाकांनी मला करून दिली आणि प्रायश्‍चित्त घ्यायला सांगितले. तेव्हा मला वाटले, ‘माझी चूक झाली; म्हणून पू. डॉ. काका माझ्यावर रागवले असतील.’ काही वेळाने मी त्यांना चूक लिहून त्यावर ठरवलेले प्रायश्‍चित्त दाखवले. तेव्हा त्यांनी मला विचारले, ‘‘हे प्रायश्‍चित्त तुम्हाला जमणार का ? तुम्हाला त्रास होणार नाही, असे बघा.’’ तेव्हा पू. डॉ. काका आईप्रमाणेच प्रेमळ आहेत, हे माझ्या लक्षात आले.

८ आ ३ आ. ‘रात्री उशिरापर्यंत झोप लागत नाही’, असे एकदा सहज पू. डॉ. गाडगीळकाकांना सांगितल्यावर त्यांनी योगतज्ञ प.पू. दादाजींनी सांगितलेल्या उपायांसाठी नाव देणे आणि नंतर प्रतिदिन झोपेविषयी विचारपूस करणे

मला मध्यंतरी रात्री उशिरापर्यंत झोप लागत नव्हती. याविषयी मी एकदा सहज पू. डॉ. गाडगीळकाकांना सांगितले. १५ दिवसांनी ‘ज्या साधकांना आध्यात्मिक त्रास आहे आणि ज्यांना झोप लागत नाही’, अशा साधकांची नावे आश्रम व्यवस्थापनाकडे द्यायची होती. त्यांना योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांनी सांगितलेले ८ दिवसांचे उपाय करायला सांगितले होते. आध्यात्मिक त्रास नसल्याने मी माझे नाव दिले नाही. नंतर मला कळले, ‘पू. डॉ. काकांनी माझे नाव त्या सूचीत दिले आहे.’ ८ दिवसांमध्ये ते मला प्रतिदिन ‘झोप लागली का ?’, असे विचारत असत. त्यांचे प्रेम पाहून मला देवाप्रती जास्त कृतज्ञता वाटली की, माझी काही पात्रता नसतांनाही पू. डॉ. काका किती काळजी घेतात.’   – कु. भाविनी कपाडिया

८ आ ३ इ. इतरांचा विचार करणे
८ आ ३ इ १. दैनिकात लिखाण छापून येण्याविषयी साधकांनी इच्छा प्रदर्शित केल्यास त्यांची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे

‘कधी कधी साधकांची इच्छा असते की, माझ्या मुलाचे लिखाण दैनिक सनातन प्रभातमध्ये यावे. ‘अजून माझा लेख छापून का आला नाही ?’, याविषयी प्रसारातील साधक कधी कधी विचारतात. पू. (डॉ.) गाडगीळकाका त्यासंबंधी सेवा करत असल्याने मी त्याविषयी त्यांना विचारल्यावर ते लगेचच होकार देऊन लेख मुद्रित करण्यासाठी देतात. ते प्रत्येक वेळी सांगतात की, साधकांच्या मनात आपल्याविषयी विकल्प यायला नको.’ – कु. सुषमा पेडणेकर

८ आ ३ इ २. अडचण लगेच सोडवणे

अ. ‘पू.(डॉ.) गाडगीळकाकांकडे पुष्कळ सेवा असतात; पण त्यांना एखादी अडचण सांगितली किंवा साहाय्य मागितल्यास ते लगेचच होकार देतात. त्यांना काही विचारले, तर ते हातातली सेवा सोडून साहाय्य करतात.

आ. पू. (डॉ.) काका काही कामानिमित्त सांगलीला गेले होते. त्या वेळी मला माझ्या सेवेविषयी काळजी वाटायची. त्या वेळी पू. (डॉ.) काका लगेचच म्हणाले, ‘‘तुला काही अडचण असेल, तर मला दूरभाष कर.’’

इ. गुरुपौर्णिमेला पू. (डॉ.) काकांना मी सहज गमतीने म्हटले, ‘‘तुम्ही संत झाल्यावर आम्हाला तुमच्याशी जास्त बोलता येणार नाही. तुमची सेवा पालटल्यावर आम्हाला येणार्‍या अडचणी कोणाला विचारणार ?’’ त्या वेळी पू. (डॉ.) काका हसत म्हणाले, ‘‘मी कुठेही जाणार नाही. इथेच असणार.’’

– कु. सुषमा पेडणेकर

८ आ ३ इ ३. दुसर्‍याला तिष्ठत न ठेवता लगेच साहाय्य करणे

‘पू. (डॉ.) गाडगीळकाकांना कोणतेही सूत्र कधीही विचारले, तरी ते त्याचे उत्तर पटकन देतात. ते अन्य कोणती धारिका संकलित करत असल्याने मला थोडा वेळ तिष्ठत थांबावे लागले, असे कधीच झाले नाही. ते नेहमी हातातील सेवा थांबवून तत्परतेने दुसर्‍याला साहाय्य करतात.’ – श्री. गिरिधर भार्गव वझे

८ आ ३ ई. साधकांप्रती प्रेमभाव असल्याने सेवा चांगली करण्यासाठी सातत्याने प्रोत्साहन देणे

‘वर्ष २००६ मध्ये पू. (डॉ.) गाडगीळकाका यांच्या समवेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा करण्याची संधी मला ईश्‍वरकृपेने मिळाली. त्या वेळी माझ्याकडून पुष्कळ चुका होत होत्या. त्याविषयी त्यांनी एकदाही नापसंती व्यक्त केली नाही. उलट ते मला सातत्याने सेवा चांगली करण्यासाठी प्रोत्साहनच देत असत. साधकांप्रती पुष्कळ प्रेमभाव असल्याविना हे घडणे शक्य नाही.’- सौ. विजयलक्ष्मी आमाती

८ आ ३ उ. आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांना साधना चांगली होण्यासाठी साहाय्य करणे

‘पू. (डॉ.) गाडगीळकाका काही साधकांना काही दिवसांनी एक ध्येय ठरवून द्यायचे आणि त्यांना तसे प्रयत्न करायला सांगायचे. ‘‘आज आपण कृतज्ञताभाव ठेवूया किंवा श्रीकृष्णाप्रती शरणागतभाव ठेवूया’’, अशी वेगवेगळी सूत्रे ते त्यांना सांगायचे. एकदा मी काकांना म्हणाले, ‘‘तुम्ही मला ‘भाव कसा ठेवायचा ?’ हे सांगाल का, म्हणजे मीही प्रयत्न करीन.’’ तेव्हा काका म्हणाले, ‘‘त्या साधकांना आध्यात्मिक त्रास असल्यामुळे निराशा येते. साधनेत त्यांचा उत्साह टिकून रहावा, यासाठी मी त्यांना सांगतो.’’ तेव्हा काकांमधील प्रेमभावामुळेच ते बारकाईने साधकांकडे लक्ष देतात, हे शिकायला मिळाले.’

– कु. भाविनी कपाडिया

८ आ ४. आधार वाटणे
८ आ ४ अ. चुका जाणिवेच्या स्तरावर, सहजतेने आणि मोजक्या शब्दांत सांगितल्याने आधार वाटणे

‘ते संकलन शिकवतांना मला चुकांची जाणीव करून देत; पण ‘या चुका फलकावर लिही’ किंवा ‘अशी चूक कशी होते ?’, अशा प्रकारे कधीच कडक शब्दांत चुका सुधारण्याचा हेका धरत नाहीत. ते मोजक्या शब्दांत सहजतेने चुका सांगत. त्यामुळे चुकांसंबंधी स्वतःच्या मनावर ताण येत नाही. खरेतर मला नेहमी पू. (डॉ.) गाडगीळकाकांचा आधारच वाटतो. संकलन सेवेसंबंधीच नव्हे, तर तीव्र आध्यात्मिक त्रासांतून मुक्तता होण्यासाठीही माझ्यासह सर्वच साधकांना काकांचा आधार वाटतो.’ – श्री. गिरिधर वझे

८ आ ४ आ. प्रेमाने चुका सांगणे आणि त्यांवर उपाय सांगून कृतीही करवून घेणे

‘पू. (डॉ.) गाडगीळकाका यांच्याशी माझा सेवेअंतर्गत सतत संपर्क येतो. ते माझ्याकडून झालेल्या चुकांविषयी प्रेमाने जाणीव करून देतात. त्यांवर उपाय सांगून कृतीही करवून घेतात. कधी कधी तेे रागावतात. त्यांच्या रागावण्यातही प्रेम जाणवून मला आनंद मिळतोे. ‘त्यांच्या कुठल्याही वाक्यामुळे मला वाईट वाटले’, असे कधीच झाले नाही.’ – कु. सुषमा पेडणेकर

८ आ ४ इ. संकलन करणार्‍या प्रत्येक साधकाला आधार वाटणे

‘मला एखाद्या धारिकेविषयी शंका असल्यास किंवा आलेल्या लिखाणाचे प्राधान्य विचारल्यास पू. (डॉ.) गाडगीळकाका लगेचच दृष्टीकोन देऊन शंकेचे निरसन करतात. त्यामुळे संकलन करणार्‍या प्रत्येक साधकाला त्यांचा आधार वाटतो.’- कु. सुषमा पेडणेकर

८ आ ४ ई. साधनेसाठी प्रोत्साहन दिल्याने आधारवाटणे

‘पू. (डॉ.) गाडगीळकाकांना ‘मी काय प्रयत्न करू ?’, असे विचारले असता त्यांनी मला ‘समष्टी भाव’ वाढवायला सांगितले. काकांनी सांगितले, ‘‘तुम्हाला जे येते, ते इतरांना शिकवणे आणि त्यांचा सेवेत भाव टिकून रहाण्यासाठी अन् त्यांची तळमळ वाढण्यासाठी प्रयत्न करणे, म्हणजे समष्टी भाव.’’ तसे प्रयत्न चालू केल्यावर काका मला मधे मधे ‘हे चांगले केले. हे चुकले. तुम्हाला हा भाग का सुचला नाही ?’, असे विचारून सारखे प्रोत्साहन देऊन शिकवत होते. त्यामुळे मला त्यांचा आधार वाटायचा.’- कु. भाविनी कपाडिया

८ आ ५. आध्यात्मिक त्रासावर अचूक उपाय सांगणे

‘जेव्हा मला आध्यात्मिक त्रास होत असे, तेव्हा अचानकपणे पू. (डॉ.) गाडगीळकाका यायचे आणि माझे त्रास पाहून त्यावर उपाय सांगायचे. त्यानुसार केल्यावर मी अल्प कालावधीत पूर्ववत होत असे.’ – सौ. विजयलक्ष्मी आमाती

८ आ ६. अध्यात्मातील एखाद्या प्रश्‍नाचे उत्तर मिळवायचे असल्यास पू.(डॉ.) गाडगीळकाका यांचेच नाव सुचणे

‘वर्ष २००६ पासून मला पू.(डॉ.) गाडगीळकाका यांच्यासमवेत सेवा करण्याची संधी मिळाली. ‘एखादे सूत्र परात्पर गुरु डॉक्टरांना विचारल्यास त्यांचा वेळ जाईल; म्हणून त्यांना न विचारता आणखी कोण आपल्याला त्यांच्याइतकेच योग्य उत्तर देऊ शकेल ?’, असा प्रश्‍न मनात आल्यावर पू. (डॉ.) गाडगीळकाका यांचेच नाव सुचते.’- कु. भाविनी कपाडिया

८ आ ७. पू. (डॉ.) गाडगीळकाका म्हणजे परात्पर गुरु डॉक्टरांनी सिद्ध केलेला हिरा आणि हिर्‍याला सिद्ध करणार्‍या परात्पर गुरु डॉक्टरांप्रती अनंत कोटी कृतज्ञता !

‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे आम्हाला सतत संतांचा सहवास लाभतो. पू.(डॉ.) गाडगीळकाका म्हणजे परात्पर गुरु डॉक्टरांनी सिद्ध केलेला हिराच वाटतो ! तो सतत चमकत असतो. आम्हाला त्याच्यातून चैतन्य आणि आनंद मिळतो. अशा या हिर्‍याविषयी आणि हिर्‍याला सिद्ध करणार्‍या परात्पर गुरु डॉक्टरांप्रती आम्ही अनंत कोटी कृतज्ञ आहोत. ‘या हिर्‍याकडून आम्हाला साधनेसाठी प्रेरणा मिळून आमच्याकडून त्यानुसार कृती व्हावी’, हीच ईश्‍वरचरणी प्रार्थना !’ – कु. सुषमा पेडणेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

 

९. संतपदाच्या प्राप्तीनंतर ग्रंथनिर्मिती आणि आध्यात्मिक संशोधनाची सेवा करणे

९ अ. संतपदाच्या प्राप्तीनंतर ग्रंथनिर्मितीची सेवा मिळाल्याने त्यातून
समष्टी सेवेशी संबंधित गुण जोपासता येणे आणि मनाची जडणघडण होणे

‘२८ ऑक्टोबर २०११ या दिवशी मला गुरुकृपेने संतपदाची प्राप्ती झाली. तोपर्यंत मी मराठी भाषेतील लिखाणाच्या संकलनाची आणि सनातन प्रभात नियतकालिकांमध्ये अध्यात्माविषयीचे लिखाण छापण्यासाठी देण्याची सेवा करायचो. संतपदाच्या प्राप्तीनंतर जानेवारी २०१२ मध्ये मला आधीची सेवा न करता ग्रंथांच्या सेवेमध्ये सहभागी होण्यास सांगण्यात आले. ती माझ्यासाठी नवीनच सेवा होती. त्यामध्ये आरंभी मला ग्रंथासाठी निवडलेले लिखाण अंतिमतः पडताळण्यास सांगण्यात आले. ते ग्रंथ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयीचे असल्याने मजकूर अगदी काटेकोरपणे पडताळावा लागे; कारण ‘ते ग्रंथ म्हणजे एक प्रकारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे चरित्रच होते आणि ते समाजासमोर योग्य रितीनेच जायला हवे’, हा दृष्टीकोन होता. या सेवेमुळे मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संदर्भातील ग्रंथ करण्याची संधी मिळाली. त्यानंतर नाविन्यपूर्ण असे दैवी कण परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या त्वचेवर, तसेच साधक, संत इत्यादींच्या त्वचेवर आणि त्यांच्या वस्तू, घर इत्यादी ठिकाणी मिळू लागल्यावर दैवी कणांच्या संदर्भातील ग्रंथ करण्याची संधी मला मिळाली. त्यापूर्वी माझी सेवा समष्टीशी फारशी संबंधित नसल्याने मला साधकांशी संपर्क करून माहिती गोळा करणे, साधकांशी मोकळेपणाने बोलणे, नियोजन करणे, साधकांना सेवेत सहभागी करून घेणे, माहिती प्रस्तुत करणे इत्यादी समष्टीच्या संदर्भातील गुण माझ्यात जोपासता आले नव्हते. दैवी कणांच्या ग्रंथांच्या सेवेमुळे मला साधकांकडून बरीच माहिती गोळा करावी लागली, तसेच दैवी कणांविषयी संशोधन करण्याकरता ते रासायनिक पृथक्करणासाठी प्रयोगशाळांमध्ये पाठवावे लागले. त्यासाठी मला बर्‍याच जणांना संपर्क करावा लागला. यातून माझ्या मनाची समष्टीशी एकरूप होण्याची सिद्धता झाली आणि माझ्यामध्ये थोडेफार धाडसही निर्माण झाले. हे सर्व परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी माझ्याकडून करवून घेतले. त्यामुळे प्रथमच ग्रंथनिर्मितीचे पूर्ण दायित्व गुरुकृपेने पार पाडता आले.

९ आ. अध्यात्माशी संबंधित संशोधन परिपूर्ण करण्याचा ध्यास, जिज्ञासू
वृत्ती आणि विचारण्याची वृत्ती अल्प झाल्यामुळे जुलै २०१४ मध्ये साधनेत घसरण होणे

त्याच कालावधीत आध्यात्मिक संशोधनासाठी काही उपकरणे घेण्यात आली होती. त्या उपकरणांद्वारे वेगवेगळ्या चाचण्या घेणे नवीनच होते. मी चाचण्यांतील मोजणीच्या नोंदींनुसार संशोधनपर लेख लिहायचो. हे सर्व नवीन असल्याने ‘उपकरणांद्वारे मिळालेल्या नोंदींचे मी केलेले विवेचन योग्य आहे ना ?’ हे पडताळून पहायला हवे होते. त्यासंबंधी तज्ञांना विचारायला हवे होते. तसेच प्रयोगांतून मिळालेल्या अनुभवातून शिकून प्रयोगासंबंधीची माहिती सतत अद्ययावत करावी लागते, हे मला ध्यानी आले नाही. त्यामुळे मी संशोधनाच्या लेखांमध्ये केलेले विवेचन चुकल्याने लिहिलेले सर्व व्यर्थ गेले. संशोधनाचा वेळही फुकट गेला. माझ्यातील संशोधन परिपूर्ण करण्याचा ध्यास, जिज्ञासू वृत्ती आणि विचारण्याची वृत्ती अल्प झाली होती. यामुळे जुलै २०१४ मध्ये माझी साधनेत घसरण झाली.

९ आ १. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दोनच वाक्ये सांगून मार्गदर्शन करणे आणि त्यामुळे उभारी येणे

त्यानंतर मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना भेटून ‘कसे प्रयत्न करू ?’, असे विचारले. ते म्हणाले, ‘‘प्रगतीच्या टप्प्यातून तुम्ही यापूर्वी गेलेला आहात. त्यामुळे ‘काय करायचे ?’, हे तुम्हाला ठाऊक आहे. तसेच प्रयत्न आता यापुढे करा.’’ त्यांच्या या २ वाक्यांनी मला उभारी आली. त्यांनी केलेल्या या अमूल्य मार्गदर्शनाबद्दल मी कृतज्ञता व्यक्त केली.

९ इ. मनाचे निरीक्षण करून स्वतःचे दोष जाणून घेणे आणि ते दूर
करण्यासाठी प्रयत्न केल्यावर दोन-अडीच मासांमध्ये स्वतःत पालट जाणवू लागणे

त्यानंतर मला आध्यात्मिक संशोधनाशी संबंधित सेवा न करता पुन्हा ग्रंथसेवा करण्यास सांगण्यात आले. मी माझ्या मनाचे निरीक्षण केले, तेव्हा असे लक्षात आले की, मला ‘मी केलेले योग्यच आहे’, असे वाटते, संबंधित साधकांना विचारून घेणे माझ्याकडून होत नाही आणि त्यामुळे सेवा परिपूर्ण होत नाही. एखाद्या सूत्रासंबंधी थोडीजरी शंका असली, तरी मी तिचे निराकरण करून घेत नाही. माझ्याकडून गृहित धरणे होत होते. त्यामुळे सेवेत चुका होत होत्या. त्यासाठी मी मनाला स्वयंसूचना देणे आरंभ केले, तसेच शिकण्याच्या स्थितीत आणि ईश्‍वराच्या अनुसंधानात रहाण्याचा प्रयत्न करू लागलो. त्यानंतर दोन-अडीच मासांमध्ये माझ्यात पालट झालेला जाणवू लागला. मी प्रत्येक गोष्ट विचारून करू लागलो. यामुळे ‘मी केलेला विचार योग्य आहे का ?’, हे मला कळू लागले. मला गेले ३ – ४ मास ईश्‍वराकडून विचार मिळणे बंद झाले होते. त्यालाही पुन्हा आरंभ झाला. सेवेविषयी नवीन सुचू लागले. त्यामुळे आनंद मिळू लागला.

९ ई. गोपीभाव असणार्‍या साधिकांविषयीच्या ग्रंथांच्या निर्मितीची सेवा
मिळाल्याने अधिकाधिक भावावस्थेत रहाता येणे, ते ग्रंथ पुन्हा लवकर उन्नतीच्या पथावर चढायला पूरक
ठरणे आणि त्या ग्रंथांचा आवाका मोठा असूनही त्यांच्या संदर्भातील बरीचशी सेवा तीन मासांमध्ये पूर्ण होणे

सप्टेंबर २०१४ मध्ये मला गोपीभाव असणार्‍या साधिकांविषयी ग्रंथ तयार करण्यास सांगण्यात आले. विषय मोठा होता, तरीही मनाची स्थिती सुधारल्याने मजकूर निवडणे लवकर साध्य झाले. विषयानुसार लिखाणाचे वर्गीकरणही सहजतेने झाले. गोपींचे ४ ग्रंथ होणार होते. ग्रंथांचा तो विषयच असा होता की, मला आपोआपच अधिकाधिक भावावस्थेत रहाता आले. भावामुळे ईश्‍वराने स्फुरण दिल्यामुळे ग्रंथांतील छायाचित्रांना कधी नव्हे ते काव्यात्मक मथळे सुचले. हे ग्रंथ साधनेत घसरण झालेल्या मला पुन्हा लवकर उन्नतीच्या पथावर चढायला पूरक ठरले. ही माझ्यावरील गुरुकृपाच होती. यातून ‘गुरु आपल्या उन्नतीला पोषक अशीच सेवा आपल्याला देतात’, हे लक्षात येते. आवाका बराच मोठा असलेल्या या ग्रंथांच्या संदर्भातील बरीचशी सेवा तीन मासांमध्ये पूर्ण झाली. यावरून देवाची कृपा असेल, तर अध्यात्मातील सर्व गोष्टी कशा पटापट होतात, याची मी अनुभूती घेतली.

९ उ. संयम ठेवायला आणि परेच्छेने वागायला शिकणे

गोपीभावाविषयीचे ग्रंथ करतांना माझा आणखी एक स्वभावदोष दूर झाला आणि तो म्हणजे ‘मी एखादी गोष्ट सांगितली की, ती दुसर्‍याकडून लगेच व्हायला हवी’, असे मला वाटे; पण समष्टीमध्ये, म्हणजे एखाद्या सेवेशी जेव्हा अनेक साधक जोडलेले असतात, तेव्हा ते शक्य नसते. प्रत्येक गोष्टीला थोडा वेळ द्यावा लागतो. माझ्यामध्ये संयम नसायचा. ही सेवा करतांना मी संयम ठेवायला शिकलो, तसेच परेच्छेने वागायलाही शिकलो.

९ ऊ. ग्रंथसेवा करतांना ‘त्या सेवेच्या संदर्भात ईश्‍वरच
कसे सुचवतो’, याची अनुभूती घेता येणे आणि त्यातून आनंद मिळणे

ईश्‍वराशी अनुसंधान आणि सेवेची तळमळ असली की, त्या सेवेच्या संदर्भात ईश्‍वरच कसे सुचवतो, याचीही मी अनुभूती घेतली. ईश्‍वराने सुचवणे, म्हणजे त्या सेवेच्या संदर्भात ईश्‍वराने परिपूर्ण साधना करवून घेणे. आपण करत असलेल्या सेवेविषयी सतत चिंतन करणे आणि ती परिपूर्ण करण्याचा ध्यास लागणे म्हणजे तळमळ. ईश्‍वरचरणी प्रार्थना करून शरणागतभावाने ही तळमळ जोपासली की, ती फलद्रूप होते. ग्रंथांच्या निर्मितीची सेवा करतांना असे लक्षात आले की, ईश्‍वर संबंधित विषयावर किंवा आलेल्या अनुभवावर लिहायला सुचवतो, तेव्हा तो लिखाणाचा विषय बीजरूपात सांगतो. (ईश्‍वर काटकसरी आहे.) काही वेळा ईश्‍वरच मनात प्रश्‍न निर्माण करतो आणि तोच उत्तरही देतो. त्यामुळे त्या विषयाचे आकलन होते. त्याने सुचवल्याप्रमाणे सर्व केले की, परिस्थिती अनुकूल होऊन त्यात यश मिळते. ईश्‍वराची ही अनुभूती आनंददायी आहे. ईश्‍वराची कृपा झाल्यावर काहीच अशक्य नाही. तोच आपल्याला चालवत असल्याने काळजी उरत नाही. यासाठी केवळ त्याच्या अनुसंधानात रहाणे आवश्यक आहे.

९ ए. सुचलेले विचार बुद्धीने पडताळून पहाणेही आवश्यक असल्याचे समजणे

कधी कधी मी असेही अनुभवले की, मी करत असलेल्या एखाद्या विषयाच्या लिखाणाच्या संदर्भात काही विचार सुचले आणि त्याप्रमाणे लिखाण केले, तरी ते पू. संदीप आळशी पालटायचे. तेव्हा माझ्या मनात विचार यायचा, ‘ईश्‍वराने विचार सुचवल्याप्रमाणे लिखाण करूनही ते चुकले कसे ?’ हा प्रश्‍न मी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना विचारला. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘आपल्याला एखादे विचार सुचले, तरी ते डोळसपणे, म्हणजे बुद्धीने पडताळून पहावे लागतात; कारण विचार सुचणे म्हणजे ‘ज्ञान’ नव्हे. परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांना मिळणारे ज्ञानही पडताळतात आणि कधी कधी ते चुकीचे असल्याचेही दाखवून देतात.’’

९ ऐ. आध्यात्मिक त्रास होत असणार्‍या साधकांना उपाय सांगण्यातून
ईश्‍वराने साधकांशी जवळीक करण्याची आणि प्रेमभाव वाढवण्याची संधी देणे अन् त्या
उपायांचा  साधकांना लाभ होत असल्याने त्यांची सेवा आपल्याकडून घडत असल्याविषयी कृतज्ञता वाटणे

मी ३ – ४ वर्षे आध्यात्मिक त्रास होत असणार्‍या साधकांना नामजप, मुद्रा आणि न्यास यांचे उपाय सांगत होतो. त्यामुळे साधकांशी जवळीक करण्याची आणि प्रेमभाव वाढवण्याची संधी मला मिळत होती. मला आध्यात्मिक उपाय गुरुकृपेनेच सुचत असल्याने त्या उपायांचा साधकांना लाभ होत होता. उपाय सांगितल्यानंतर काही कालावधीने त्यांची विचारपूस करणे, त्रास दूर झाला नसल्यास त्यांना पुन्हा नामजप शोधून देणे, काही वेळा त्यांच्यावर प्रत्यक्ष उपाय करणे, तसेच एखाद्या साधकाला त्रास होत असल्याचे त्याच्या तोंडवळ्यावरून लक्षात आल्यास त्याला स्वतःहून त्रासाविषयी विचारणे, असे मी करत होतो. याचा लाभ असा झाला की, साधक स्वतःहून माझ्याकडे उपाय विचारण्यासाठी येऊ लागले, तसेच उपायांनी बरे वाटत असल्यास आपणहून येऊन सांगू लागले. त्यानंतर ईश्‍वराने मला आणखी पुढच्या स्तरावर नेले. ईश्‍वर मला त्रास होत असणार्‍या एखाद्या साधकाविषयी विचार मनात घालू लागला आणि चौकशी केल्यावर त्या साधकाला तेव्हाच त्रास होत असल्याचे समजायचे. त्यामुळे मनात साधकांची सेवा घडत असल्याविषयी कृतज्ञता वाटायची.

९ ओ. साधकांच्या आढाव्याविषयीच्या चिंतनामुळे ईश्‍वराने
साधनेविषयीचे विविध लिखाण करवून घेणे, त्यामुळे साधकांना
साधना करणे सोपे जाणे आणि पूर्वी तसे लिखाण कधी सुचलेले नसणे

मध्यंतरी मला ६ मास ग्रंथ-विभागातील साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेण्याची संधी मिळाली. तेव्हा माझ्या मनामध्ये होत असलेल्या चिंतनामध्ये ‘साधकांना कशा प्रकारे सांगितले की, त्यांना विषय भावपूर्णपणे आकलन होईल, त्यांना साधना सहजतेने कृतीत आणता येईल आणि त्यांच्यात सातत्य येईल’, असा विषय असे. त्या कालावधीत साधकांचे दायित्व निभावता येण्यासाठी ईश्‍वरच मार्ग सुचवू लागला आणि त्याने माझ्याकडून साधनेच्या विविध विषयांवर लिखाणही करवून घेतले, उदा. अष्टांग साधना कशी केली की, ती सोपी होईल, भाव, शरणागतभाव, तळमळ, ईश्‍वरेच्छा इत्यादी. पूर्वी कधी माझ्या मनात तसे लिखाण करण्याचा विचारही आला नव्हता. समष्टी दायित्वाच्या चिंतनामुळे माझ्यात ती कुवत ईश्‍वराने निर्माण केली. या विषयांच्या आधाराने मी साधकांचा आढावा घेत असे आणि साधकांनाही काहीतरी ध्येय ठेवायला सोपे जात असे. तसेच प्रत्येक आठवड्याला त्यांच्यात साधनेचा उत्साह टिकून रहात असे.

९ औ. पुन्हा आध्यात्मिक संशोधन विभागात सेवा करण्याची संधी मिळणे

सप्टेंबर २०१७ पासून मला पुन्हा आध्यात्मिक संशोधन विभागात सामावून घेण्यात आले. मला ही माझ्या आवडीच्या विषयाची सेवा मिळाली. मला पुन्हा संशोधन विभागात सेवा करण्याची संधी मिळणार असल्याविषयी १ मास पूर्वीच पूर्वसूचना मिळाली होती. मी त्या विभागात आल्याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना समजल्यावर माझ्यापेक्षा त्यांनाच अधिक आनंद झाला होता. ते मला म्हणाले, ‘‘साधकांना आध्यात्मिक उपाय सांगण्याची समष्टी सेवा तुम्ही करत होता. आता त्यापेक्षाही अधिक महत्त्वाची आध्यात्मिक संशोधन करण्याची सेवा करा. आध्यात्मिक उपायांचा लाभ केवळ साधकांपुरताच मर्यादित आहे, तर आध्यात्मिक संशोधन हे अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी आहे आणि ते चिरंतन टिकणारे आहे. त्यामुळे ते पुष्कळ अधिक समष्टी स्तराचे आहे.’’ यावरून लक्षात येते की, साधकांच्या आध्यात्मिक उन्नतीची काळजी गुरूंनाच असते. ते त्यांना योग्य ती सेवा देऊन त्यांची उन्नती करवून घेतात.

९ औ १. संशोधनात्मक लेख लिहितांना प्रत्येक प्रयोगातून नवीन काहीतरी शिकायला मिळून आनंद मिळणे

आध्यात्मिक संशोधनाशी संबंधित सेवा करतांना मागे झालेल्या चुका पुन्हा माझ्याकडून होऊ नयेत; म्हणून मी पुनःपुन्हा प्रार्थना करत होतो. ‘माझ्यात जिज्ञासा टिकून राहू दे. पूर्ण तळमळीने आणि शरणागतभावाने ही सेवा माझ्याकडून होऊ दे’ इत्यादी प्रार्थना माझ्याकडून होत होत्या. या सेवेतून मला आनंदही मिळू लागला. संशोधनात्मक लेख लिहितांना प्रत्येक प्रयोगातून नवीन काहीतरी शिकायला मिळायचे. तो प्रत्येक लेख नाविन्यपूर्ण होण्यासाठी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्या लेखामध्ये काही शंका उपस्थित केल्यास तिचे पूर्णतः अन् तत्परतेने निरसन करण्यासाठी मी प्रयत्न करायचो. त्यांनी लेखामध्ये विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर देतांना पुन्हा काहीतरी नवीन गवसायचे आणि त्यातून अधिक आनंद मिळायचा, तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अपेक्षित असे केल्याचे समाधानही मिळायचे. गुरूंचे समाधान करू शकण्यासारखा दुसरा आनंद साधकाच्या जीवनात दुसरा नाही !

९ औ २. आध्यात्मिक संशोधनाचे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेले महत्त्व

परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणतात, ‘‘लोकांना अध्यात्माकडे आकर्षित करायला ज्ञानशक्तीच हवी. आध्यात्मिक संशोधनातून, म्हणजे ज्ञानशक्तीतून आपल्याला अध्यात्माचा प्रसार जगभर करायचा आहे आणि लोकांना अध्यात्माकडे वळवायचे आहे.’’ याचा अर्थ ईश्‍वरी राज्य येण्यासाठी हे आध्यात्मिक संशोधन अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवायला हवे.

९ अं. अजूनही गुरुभक्ती करता येत नसल्याविषयी खंत वाटणे

अजूनही माझ्यात गुरूंप्रती उत्कट भाव नाही. मला त्यांची भक्ती करणे जमत नाही. त्यांना आळवता येत नाही. संत आणि साधक यांचे लिखाण वाचले की वाटते, ‘आपल्यात असा भाव केव्हा येणार ? आपल्याला तसे लिखाणातून व्यक्त करायला कधी जमणार ? बोलतांना शब्दाशब्दातून भाव कधी व्यक्त होणार ? पदोपदी गुरूंप्रती कृतज्ञता कधी व्यक्त करू शकणार ?’ मला गुरूंची मानसपूजा करणेही जमत नाही.

‘माझ्यात व्यापकत्व आणि समष्टीगुण येण्यासाठी श्री गुरु मला सेवेच्या अधिकाधिक संधी देवोत आणि त्याप्रमाणे कृती करवून घेवोत, तसेच माझ्यात भक्तीचा पाझर फुटो’, अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो अन् कृतज्ञताही व्यक्त करतो.’

– (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.७.२०१८)

 

गुरुचरणी कृतज्ञता !

‘आतापर्यंत झालेला हा साधनेतील प्रवास गुरुकृपेने इतका सहजतेने झाला की, मला काहीच कष्ट घ्यावे लागले नाहीत. सर्वकाही स्वप्नवतच झाले. आई, वडील, भाऊ, बहीण, पत्नी, मुलगी, सासू, सासरे हे सर्व जण साधना करणारे असल्याने साधनेला कुठूनच विरोध झाला नाही. त्यामुळे साधनेत खडतर असे काही अनुभवलेच नाही. ही माझ्यावर केवढी मोठी गुरुकृपा आहे ! गुरूंनी माझे प्रारब्धही सुकर केले. त्यामुळे साधनेत आध्यात्मिक उन्नतीही जलद होऊ शकली. याकरता गुरूंप्रती कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. त्यांच्याप्रती खरी कृतज्ञता व्यक्त करणे, म्हणजे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी त्यांना अपेक्षित असे प्रयत्न सातत्याने करणे. ‘असे प्रयत्न माझ्याकडून आणि सर्वच साधकांकडून होऊ देत’, अशी गुरूंच्या चरणी प्रार्थना करतो.’

– (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.८.२०१८)


साधनेच्या आरंभीच्या प्रवासात पू. (डॉ.)
मुकुल गाडगीळ यांना प.पू. डॉक्टरांनी शिकवणे

१. प.पू. डॉक्टरांनी विविध सेवा शिकवणे

१ अ. दृष्टीकोनात्मक चौकटी तयार करायला दिल्यावर ‘ईश्‍वराचे विचार कसे ग्रहण करायचे’, हे शिकवणे

‘जून २००० मध्ये सेवा आरंभ केल्यावर आरंभी प.पू. डॉक्टर एखादा दृष्टीकोन सांगायचे आणि त्यावरून साधकांसाठी किंवा समाजासाठी चौकट करायला सांगायचे. तेव्हा त्या सूत्राच्या अनुषंगाने काय लिहायचे, हे प.पू. डॉक्टरांच्या कृपेने आपोआपच सुचायचे आणि मला चौकट बनवल्याचे समाधान मिळायचे. काही वेळा तसे समाधान मिळायचे नाही. तेव्हा त्या चौकटीमध्ये प.पू. डॉक्टरांनी केलेल्या सुधारणा वाचल्यावर लक्षात यायचे की, त्यातील दृष्टीकोनाचा विचाररूपी धागा माझ्या मनात अस्पष्टसा आला होता; पण मी तो ग्रहण करायला अल्प पडलो. त्या वेळी आणखी एक गोष्ट लक्षात आली की, अशा वेळी तो पूर्ण विचार ग्रहण करता न आल्याने त्यातील केवळ एखाद-दुसरा शब्दच मनात यायचा. तेव्हा तो तसाच जाऊ न देता लिहून ठेवला, तर ईश्‍वर पुढील आपोआप सुचवतो. पुढे तसे प्रयत्न करू लागलो.

१ आ. पत्रलेखन शिकवणे आणि तेव्हा ‘ईश्‍वराने सुचवलेले लगेच आमलात आणायचे’, हे लक्षात येणे

प.पू. डॉक्टर त्यांना साधक, हितचिंतक, मान्यवर, साधू-संत इत्यादींकडून येणार्‍या पत्रांना उत्तरे पाठवायला मला सांगू लागले. खरेतर मी पूर्वी कधी पत्रलेखन केलेले नव्हते. प्रथम काही पत्रे लिहिल्यावर प.पू. डॉक्टरांनी प्रत्येक वेळी ‘चांगले लिहिले’, असे म्हणून मला प्रोत्साहन दिले. ते त्या पत्रात सुधारणाही करून द्यायचे. अशा रितीने ‘कोणाला काय लिहायचे’, हे लक्षात येऊ लागले. वर्षभरात माझी साधारण १०० पत्रे लिहून व्हायची. पत्रलेखनाच्या वेळी एक गोष्ट लक्षात आली की, पत्रातील एखादे वाक्य लिहितांना ‘हे लिहू नये’, असे वाटत असते. तरीही आपण ते लिहितो आणि बरोबर तेच वाक्य प.पू. डॉक्टर गाळतात. तेव्हा ‘ईश्‍वराने सुचवलेले लगेच आमलात आणायचे’, हे समजले.

१ इ. शिरोभाग लिहायला शिकवणे आणि तेव्हा ‘काय लिहायचे’, हे लक्षात येत नसले, तरी लगेच आरंभ करणे मात्र आवश्यक असल्याचे कळणे

काही लेखांना शिरोभाग देणे आवश्यक असते. ते प.पू. डॉक्टर लिहायला सांगतात. मला लेखन करायची सवय नाही. तसेच भाषाप्रभुत्वही नसल्याने ‘नेमके काय लिहायचे ?’, हा प्रश्‍न पडतो. त्यामुळे ‘लिहून लिहून मी किती ओळी लिहिणार’, असे वाटते; पण शिरोभाग लिहायला आरंभ केल्यावर काही क्षणांपूर्वी मनात नसलेले विचार आपोआपच सुचू लागतात आणि चांगलासा शिरोभाग सिद्ध होतो. तेव्हा समजले की, प.पू. डॉक्टरांनी लिहायला सांगितल्यावर त्यांनीच त्यासाठी शक्ती दिलेली असते. आपण ‘आधी केलेच पाहिजे’, या उक्तीनुसार लगेच आरंभ मात्र केला पाहिजे.

२. प.पू. डॉक्टरांनी शिकवलेले दृष्टीकोन

२ अ. सेवा ठरलेल्या वेळेत करायचा दृष्टीकोन देणे

‘माझ्याकडून सेवा एकाग्र चित्ताने आणि परिपूर्ण करण्याचा प्रयत्न होत असे; पण माझी वृत्ती सर्व गोष्टी हळू हळू करण्याची असल्याने मला प्रत्येक सेवा करायला वेळ लागत असे. तेव्हा प.पू. डॉक्टरांनी दृष्टीकोन दिला, ‘एखाद्याने अगदी मन लावून छान स्वयंपाक बनवला; पण तो जेवणाच्या वेळेत न बनवता पुढे दोन घंट्यांनी बनवला, तर त्या स्वयंपाकाचा काय उपयोग ?’ त्यामुळे सर्व चांगले करायचेच आहे; पण ते वेळेतही झाले पाहिजे, हे समजले.

२ आ. वेळेचा पूर्ण उपयोग करण्यास सांगणे

प.पू. डॉक्टरांनी ‘दैनंदिनी लिहितांना प्रत्येक मिनिटा-मिनिटाचा वापर सेवेसाठी होतो ना’, हे बघण्यास सांगितले. ते म्हणाले, ‘‘आताच पुरेपूर सेवा करून घेतली नाही, तर पुढे आपत्काळात सेवा करू न शकल्याने ईश्‍वराची कृपा रहाणार नाही. तेव्हा वाईट शक्तींच्या आक्रमणांतून कोण सोडवणार ?’’ तेव्हापासून कधी काही कारणाने सेवा अल्प प्रमाणात झाल्यास मला पुष्कळ अपराधी वाटायचे.

२ इ. भावपूर्ण सेवा केलेली ईश्‍वराला अधिक आवडते, हे लक्षात येणे

साप्ताहिकाच्या सेवेत असलेल्या एका साधिकेच्या सेवा करतांना चुका व्हायच्या, तरीही इतर सेवांमध्ये प.पू. डॉक्टरांनी तिचे कौतुक केलेले मी ऐकायचो. त्याबद्दल पत्नी सौ. अंजलीला विचारल्यावर तिने सांगितले, ‘‘तिच्यात भाव आहे. चुकांविरहित सेवा केलेली ईश्‍वराला आवडतेच; पण भावपूर्ण सेवा केलेली ईश्‍वराला आणखी जास्त आवडते.’’ प.पू. डॉक्टरांकडून भावपूर्ण सेवा करण्याचा दृष्टीकोन अपरोक्षपणे मिळाल्याने मग तसे प्रयत्न माझ्याकडून होऊ लागले. मी श्री दुर्गादेवीला सांगायचो, ‘माते, माझ्यात भाव नाही गं. काय करू ते सांग.’ तिच्यासमोर मी अगदी डोळ्यांत अश्रू येऊन काकूळतीने प्रार्थना करायचो. त्यानंतर एकदा प.पू. डॉक्टरांनीच माझी आणि सौ. अंजलीची भाव असलेल्या साधक-जोडप्यांमधे गणना केल्याने कृतज्ञता वाटली.

२ ई. देवाला विचारून कृती करण्याचा दृष्टीकोन मिळणे

एकदा सनातन प्रभातच्या पानांची संरचना नीट झाली नव्हती. तेव्हा प.पू. डॉक्टरांनी सांगितले, ‘‘देवाला विचारून संरचना तयार करा.’’ त्याप्रमाणे मी देवाने सुचवल्याप्रमाणे कोणत्या पानावर कोणता मजकूर घ्यायचा, हे निश्‍चित केले. तेव्हा संरचना चांगल्या प्रकारे सिद्ध झाली. तेव्हापासून तो दृष्टीकोन मिळाला. पुढे देवाला न विचारताही तो चुका आणि पुढचे लक्षात आणून देऊ लागला.

२ उ. पुढचे पुढचे प्रयत्न करणे थांबवू नयेत, हे लक्षात येणे

एकदा मी ‘दिवसभरात अमुक इतक्याच मजकुराचे संकलन करू शकतो, त्यापेक्षा अधिक नाही’, असा ग्रह करून घेतला होता. हे प.पू. डॉक्टरांना कळल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘ही अल्पसंतुष्टता झाली. पुढचे पुढचे प्रयत्न करणे आणि शिकणे सोडले, तर आपली तळमळ अल्प होते आणि आपली अध्यात्मात घसरगुंडी व्हायला आरंभ होतो. तसेच सेवेतील आनंद मिळणेही संपते.’’ त्यानंतर मी तो ग्रह मनातून काढून टाकला.

२ ऊ. ‘खरा कृतज्ञताभाव कसा हवा’, याची जाणीव होणे

एकदा एका साधकाच्या संदर्भातील लेख मी संकलित केला होता. दुसर्‍या दिवशी पुष्कळ जणांनी तो लेख चांगला संकलित केल्याचे सांगितले. तेव्हा कर्तेपण स्वतःकडे येऊ नये म्हणून मी ती सेवा गुरुचरणी अर्पण करून त्यांना प्रार्थना करू लागलो. तेव्हा जवळ जवळ अर्धा तास माझा कृतज्ञताभाव टिकून राहिला. त्या वेळी खरोखरीच ‘कर्तेपण ईश्‍वराला अर्पण करणे म्हणजे काय ?’, याची मला गुरुकृपेने जाणीव झाली. वरील सर्व भाग वाचून लक्षात येते की, सर्व प.पू. डॉक्टरांनीच शिकवले आणि दृष्टीकोन दिले. त्यामध्ये माझे स्वतःचे असे प्रयत्न काहीच नाहीत आणि ठरवून असे काही प्रयत्नही झाले नाहीत. प.पू. डॉक्टरांनीच मुक्त हस्ते सर्वकाही दिले. साधना करतांना काही कष्ट पडले नाहीत, साधनेत कुणाचा विरोध नाही. आतापर्यंतची सर्व साधना सहज घडली. ही सर्व प.पू. डॉक्टरांची कृपाच आहे. यापुढेही माझ्याकडून सर्व साधना परिपूर्णपणे घडो, ही त्यांच्या चरणी प्रार्थना.’

– (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात