नालासोपारा प्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्राविषयी सनातन संस्थेची भूमिका !

‘क्षात्रधर्म साधना’ या ग्रंथात ‘हिंदु राष्ट्र’ या शब्दाचा उल्लेखही नाही; ‘एटीएस’चे आरोप बिनबुडाचे !

नालासोपारा स्फोटके प्रकरणी काल मुंबई दहशतवाद विरोधी पथकाने (‘एटीएस’ने) आरोपपत्र दाखल केल्याचे प्रसिद्धीस दिलेले प्रसिद्धीपत्रक अत्यंत हास्यास्पद, सदोष आणि निषेधार्ह आहे. जर प्रसिद्धीपत्रक इतके सदोष आहे, तर प्रत्यक्षात आरोपपत्र किती सदोष असेल, याची कल्पना करता येईल. या आरोपपत्रातील प्रमुख आरोपांविषयी आम्ही आमची भूमिका येथे देत आहोत, असे सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी म्हटले आहे.

1. आरोप : तपासादरम्यान सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती व काही अन्य तत्सम संघटनांचे सदस्य या प्रकरणी अटक करण्यात आले आहेत.

वस्तूस्थिती : आम्ही या प्रकरणी 26 ऑगस्ट 2018 या दिवशी पत्रकार परिषद घेऊन तसेच त्याआधीही 4 प्रसिद्धीपत्रकांद्वारे अटक केलेल्या आरोपींपैकी कोणीही सनातन संस्थेचे साधक नाहीत, हे स्पष्ट केले होते. यातील सर्वश्री वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर, श्रीकांत पांगारकर आणि अविनाश पवार यांच्या स्वतंत्र संघटना असून ते संस्थेच्या हिंदूसंघटनपर कार्यक्रमांत किंवा आंदोलनांत कधी कधी सहभागी झाले होते; मात्र ते कधीही सनातन संस्थेचे साधक म्हणजेच सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करणारे नाहीत. उर्वरित 5 जणांची नावे तर त्यांना अटक झाल्यानंतर आम्ही प्रथमच ऐकली. तपासयंत्रणांना यामध्ये काही अन्य संघटनांचे सदस्य आहेत, हे माहिती आहे. असे असूनही जाणीवपूर्वक त्या संघटनांची नावे न घेता केवळ ‘हिंदु धर्माचा प्रचार आणि हिंदु राष्ट्र जागृती यांसाठी कार्य करतो’, म्हणून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांची नावे जाहीर केली जातात ! यातूनच सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना सूडबुद्धीने लक्ष्य करण्याचा प्रयत्न स्पष्ट दिसून येतो. यापूर्वीच्या प्रकरणांत जे जे सनातन संस्थेचे साधक होते, त्यांना आम्ही कधीही नाकारले नाही. कारण ते आमचेच होते; मात्र या प्रकरणात जे आमचे साधक नाहीत, त्यांचे नाव घेऊन सनातन संस्थेला लक्ष्य करण्याचा प्रयत्न निषेधार्ह आहे.

2. आरोप : या सदस्यांनी सनातन संस्थेच्या ‘क्षात्रधर्म साधना’ या पुस्तकात नमूद केल्यानुसार हिंदु राष्ट्राच्या उद्देशाने प्रेरित होऊन आपांपसात संगनमत करून समविचारी युवकांची दहशतवादी टोळी निर्माण केली.

वस्तूस्थिती : सनातन संस्थेच्या ‘क्षात्रधर्म साधना’ या ग्रंथात मुळात ‘हिंदु राष्ट्र’ हा शब्दच नाही. त्यामुळे हा ग्रंथ वाचून हिंदु राष्ट्राच्या उद्देशाने प्रेरित होणे, असे म्हणणे हे धादांत खोटे आहे. यातूनच आरोपपत्र किती सदोष आहे, हेच लक्षात येते. ‘क्षात्रधर्म साधना’ या ग्रंथात हिंदु धर्मातील श्रीमद्भगवद्गीता, महाभारत, रामायण आदी अनेक महान धर्मग्रंथांतील वचने, श्‍लोक आदींचे संदर्भ दिले आहेत. तसेच हा ग्रंथ साधारण 20वर्षांपूर्वी प्रकाशित केला असून गेली 10 वर्षे मागणीअभावी पुनर्मुद्रित केला गेला नाही; मात्र तपासयंत्रणांचा खोटारडेपणा सिद्ध करण्यासाठी आम्ही या ग्रंथाचे पुनर्मुद्रण करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच तो सर्वांसाठी उपलब्ध करून दिला जाईल.

     ‘क्षात्रधर्म साधना’ हा ग्रंथ वाचून जर कोणी हत्या वा आतंकवादी कृत्य करत होते, असे ‘एटीएस’ म्हणते, तर लाखो हत्या आणि शेकडो बॉम्बस्फोट करणारे जिहादी आतंकवादी आणि सहस्रोंची निघृण हत्या करणारे नक्षलवादी कोणते ग्रंथ वाचून ही कृत्ये करतात, हे सांगण्याचे धाडस ‘एटीएस’ दाखवील का ?

3. आरोप : पुणे येथे डिसेंबर 2017 मध्ये झालेल्या ‘सनबर्न फेस्टीव्हल’ला विरोध करण्यासाठी गावठी बॉम्ब, पेट्रोल बॉम्ब, अग्निशस्त्रे,दगडफेक आदींद्वारे घातपात घडवायचा होता.

वस्तूस्थिती : या प्रकरणी काही हिंदुत्ववाद्यांना ऑगस्ट 2018 मध्ये अटक केली. ‘सनबर्न फेस्टीव्हल’ डिसेंबर 2017 मध्ये झाले. प्रत्यक्षात या फेस्टीव्हलला आम्ही गेली 3 वर्षे वैध मार्गाने विरोध करत आलो आहोत. यामध्ये सनबर्नच्या आयोजकांनी कायदा धाब्यावर कसा बसवला, शासनाचा किती कोटी कर बुडवला, बेकायदेशीरपणे किती वनसंपदा नष्ट केली, दारूबंदी असलेल्या गावात कशी दारू रिचवली गेली, अमली पदार्थांच्या सेवनामुळे किती युवक मृत्यूमुखी पडले, ध्वनीमर्यादा असूनही किती डेसिबल आवाज केला गेला आदींविषयी मोठ्या प्रमाणात जनप्रबोधन केले. यांसह सांस्कृतिक र्‍हास झाला, तो वेगळाच ! या आंदोलनात ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. या 3 वर्षांच्या सनदशीर आंदोलनांत कुठेही घातपात सोडा, गैरकृत्यही घडले नाही. असे असतांना थेट बॉम्बस्फोटाचा कट रचण्याचा आरोप करणे, हा धादांत खोटारडेपणा आहे.कट रचल्याचा आरोप करणारे, प्रत्यक्षात काही घडले का, याबद्दल काही बोलतील का ?

4. मराठी प्रसिद्धीपत्रकात आरंभी 12 पैकी 9 जणांना अटक आणि 3 जण फरार असे म्हटले आहे; पण शेवटी 12 जणांची नावे दिली असून त्यांना अटक केली असल्याचे म्हटले आहे. सदोष प्रसिद्धीपत्रक, सदोष आरोपपत्र आणि सदोष तपास कसा असतो, याचे हे उदाहरण आहे.

या प्रकरणी आरोपपत्र दाखल झाले आहे, असे प्रसिद्धीपत्रक केवळ मिळाले आहे. अद्याप प्रत्यक्षात आरोपपत्र आम्हाला मिळालेले नाही. त्यामध्ये काय आहे, हे पाहून पुढील तपशीलवार भूमिका नंतर मांडू. पण या आरोपांतून काँग्रेस शासनाने मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निमित्ताने ‘भगव्या आतंकवादा’चे षड्यंत्र रचले; मात्र ते असफल झाल्याचे चित्र आता दिसत आहे. आता पुन्हा एकदा ‘भगवा आतंकवाद’ सिद्ध करण्यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना बळीचा बकरा बनवले जात आहे आणि ‘मालेगाव भाग 2’ हे कथानक रचले जात आहे.कर्नाटकातील काँग्रेस शासन कर्नाटक एस्.आय.टी.ला हाताशी धरून आगामी निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा ‘भगव्या दहशतवादा’च्या मुद्द्यावर वातारवरण कलुषित करण्याचा प्रयत्न करत आहे आणि कर्नाटक एस्.आय.टी.च्या सूचनांवरूनच महाराष्ट्र ‘एटीएस’ने ही कारवाई केल्याचे सर्वज्ञात आहे. तरी आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्‍वास असून न्यायालयात खटला चालवण्याचे धैर्य तपासयंत्रणांनी दाखवावे, आम्ही आमचे निर्दोषत्व न्यायालयात लवकरच सिद्ध करू, असेही श्री. राजहंस यांनी म्हटले आहे.

         आपला नम्र,
      श्री. चेतन राजहंस,

राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था.