आनंदी जीवनासाठी गुरुकृपायोगानुसार साधना करणे आवश्यक ! – सद्गुरु नंदकुमार जाधव

नगर आणि संभाजीनगर येथे वाचक साधना शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद !

शिबिरात उपस्थित धर्माभिमानी

नगर – गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने आपली आध्यात्मिक उन्नती लवकर होते. नामजपाला कलियुगात अनन्य महत्त्व आहे. कुलदेवतेचा, दत्ताचा नामजप करून आपण नामाची शक्ती अनुभवू शकतो, हा काळाचा महिमा आहे. कलियुगात नामच आपल्याला तारून नेऊ शकते, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी येथील दादा चौधरी विद्यालय, कोर्टगल्ली येथे पार पडलेल्या वाचक साधना शिबिरात केले.

ते पुढे म्हणाले, ‘‘हिंदु राष्ट्र ही विश्‍वकल्याणासाठीची राष्ट्रनिष्ठ आणि धर्माधिष्ठित जीवन जगण्याची प्रगल्भ पद्धती आहे. गुरुकृपायोगानुसार हिंदु राष्ट्राची स्थापना करणे ही काळाची आवश्यकता आहे.’’

शिबिराचे सूत्रसंचालन सौ. कावरे यांनी केले. या शिबिराला ५३ वाचक उपस्थित होते. या वेळी वाईट शक्तींचे त्रास आणि त्यांवरील उपायांचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. कु. श्‍वेता पट्टणशेट्टी यांनी जीवनातील स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे महत्त्व विशद केले.

मनुष्यजन्म हा साधना करून ईश्‍वराकडे
जाण्यासाठीच झाला आहे ! – सौ. संजीवनी कोळेश्‍वर, सनातन संस्था

संभाजीनगर – मनुष्यजन्म हा साधना करून ईश्‍वराकडे जाण्यासाठीच झाला आहे. गुरुकृपायोगानुसार साधना केल्यास आपण संसारात राहूनही आपली आध्यात्मिक आणि व्यावहारिक उन्नती करू शकतो. आपल्याला गुरु शोधावे लागत नाहीत, तर गुरूच आपल्या जीवनात येऊन आपली उन्नती करून घेतात, हे गुरुकृपायोगानुसार साधनेचे महत्त्व आहे, असे मार्गदर्शन सौ. संजीवनी कोळेश्‍वर यांनी केले. येथील जयविश्‍वभारती कॉलनीत सनातन संस्थेच्या वतीने २ डिसेंबरला वाचक साधना शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा ३५ वाचकांनी लाभ घेतला. सूत्रसंचालन श्रीमती राजश्री जोशी यांनी केले.

या वेळी सौ. आनंदी वानखडे यांनी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे महत्त्व सांगितले. यावर उपस्थित वाचकांनी स्वत:हून स्वत:कडून होणार्‍या चुका आणि स्वत:मधील स्वभावदोष सांगितले. ‘अशा चुका सतत होतात. यावर उपाय शोधायला पाहिजे’, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया उपस्थितांनी दिली. प्रत्येकाने हा विषय नीट समजून घेतला, तसेच आपापल्या भागात हा विषय घेण्याची मागणी केली. सौ. छाया देशपांडे यांनी ‘वाईट शक्तींचे त्रास आणि त्यावर करावयाचे उपाय’ याविषयी माहिती सांगितली.

क्षणचित्रे

१. शिबिरासाठी काही वाचकांनी मित्रांनाही समवेत आणले होते.

२. वाचकांनी सनातनच्या स्वभावदोष निर्मूलनाविषयीचे ३ ग्रंथ असलेल्या संचांची मागणी केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात