भावाचे मूर्तीमंत उदाहरण असलेले आणि समाजातील लोकांनाही आदरयुक्त वाटणारे सनातनचे ७४ वे संत पू. प्रदीप खेमका !

‘मी नोव्हेंबर २००८ ते मार्च २०१३ या कालावधीत झारखंड, बंगाल आणि ओरिसा या राज्यांत अध्यात्मप्रसाराची सेवा करत होतो. त्या वेळी देवाच्या कृपेने मला पू. प्रदीप खेमका यांच्यासमवेत सेवा करण्याची आणि त्यांच्या घरी रहाण्याची संधी मिळाली. त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि समाजातील व्यक्तींना त्यांच्यात जाणवलेले पालट पुढे देत आहे.

पू. प्रदीप खेमका

 

१. शिकायला मिळालेली सूत्रे

१ अ. सकारात्मकता

पू. खेमकाभैय्या नेहमी सकारात्मक असतात. ‘ते स्वतः सकारात्मक रहातात आणि समवेतच्या सर्वांना सकारात्मक ठेवतात’, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. सेवा करतांना अनेक प्रसंगांत मला ताण येत असे. तेव्हा ते विविध उदाहरणे सांगून ‘त्यांतून काय शिकायचे’, हे सांगून मला सकारात्मक करत.

१ आ. देवाला आवडेल, अशी परिपूर्ण सेवा करणे

‘सेवा परिपूर्ण करणे’, हे पू. खेमकाभैय्यांचे वैशिष्ट्य आहे. गुरुपौर्णिमा स्मरणिका आणि हस्तपत्रके यांचे वाटप किंवा सनातन प्रभातचे वितरण करायचे असले, तरी ते ‘ती सेवा देवाला कशी आवडेल ?’, असा विचार करून त्याप्रमाणे करतात.

१ इ. सेवा परिपूर्ण होण्यासाठी कार्यपद्धत घालणे

१ इ १. स्मरणिका किंवा सनातन प्रभात यांचे विज्ञापनदात्यांना वितरण करतांना त्यांची स्वाक्षरी घेणे

‘कतरास पेठेतील (बाजारातील) विज्ञापनदात्यांना स्मरणिका किंवा सनातन प्रभात देतांना प्रत्येक वितरकाने त्यांची स्वाक्षरी घ्यायची’, अशी कार्यपद्धत त्यांनी आरंभापासूनच घातली आहे. त्यामुळे ‘सनातन संस्थेचे कार्य परिपूर्ण आणि पारदर्शक असते’, हे गावातील सर्वांनाच ठाऊक झाले आहे.

१ इ २. पू. खेमकाभैय्यांनी सनातनची सात्त्विक उत्पादने स्वतः विकत घेऊन त्यांचे वितरण करण्यास आरंभ करणे आणि नंतर संस्थास्तरावर तशीच वितरण प्रणाली अस्तित्वात येणे

पूर्वी प्रत्येक जिल्ह्यात सनातनची सात्त्विक उत्पादने पाठवून त्या त्या जिल्ह्याने त्यांच्या वितरणाचा अहवाल पाठवण्याची पद्धत होती. तेव्हा पू. भैय्यांनी सर्वांत प्रथम विचारले, ‘मी स्वतः सर्व उत्पादने खरेदी करून नंतर त्यांचे वितरण करू शकतो का ?’ अन् त्याप्रमाणे त्यांनी उत्पादनांच्या वितरणास आरंभ केला. कालांतराने संस्थास्तरावर तशाच पद्धतीची वितरण प्रणाली अस्तित्वात आली. तेव्हा मला त्यांच्याकडून ‘योग्य कार्यपद्धत घालून कार्य कसे करावे ? आणि श्री गुरूंना अपेक्षित अशी विचारप्रक्रिया अन् कृती करणे कसे आवश्यक आहे’, हे शिकायला मिळाले.

१ इ ३. साहित्याची मागणी अभ्यासपूर्ण करणे आणि जिज्ञासूंना संपर्क करून त्यांचा अभिप्राय विचारणे, या कार्यपद्धतींमुळे प्रसार परिणामकारक होणे

एकदा एका केंद्राने प्रसाराची काही पत्रके आणि सनातन प्रभात यांची मागणी अधिक केल्याने ते शिल्लक राहिले. हे पू. खेमकाभैय्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी मागणी करतांना ‘ते साहित्य ज्यांना वितरण करणार, त्यांची नावे लिहून त्याप्रमाणे मागणी करावी’, अशी कार्यपद्धत घातली. त्याचप्रमाणे साहित्याचे वितरण करतांना जिज्ञासूंची नावे आणि संपर्क क्रमांक लिहून घेऊन त्यांना अभिप्राय विचारण्यास सांगितले. त्यामुळे जिज्ञासूंना संपर्क करण्याचे प्रमाण वाढले. त्यांनी अशा पद्धतीने कार्य करण्यास आरंभ केल्यापासून प्रसाराची अपेक्षित फलनिष्पत्ती मिळू लागली आणि अनावश्यक खर्चही वाचला आहे. ‘काटकसर करण्यासमवेत देवाला अपेक्षित अशी कृती करून प्रसाराची परिणामकरता वाढवणे’, हेही मला त्यांच्याकडून शिकायला मिळाले.

१ ई. श्री गुरूंप्रती असलेला अपार भाव !

१ ई १. ‘साधक, म्हणजे श्री गुरूंचे सगुण रूप आहेत’, असा भाव असल्याने साधकांना सतत साहाय्य करणे

प्रसारातील साधकांना सेवा करतांना स्थानिक परिस्थितीमुळे पुष्कळ अडचणी येतात. त्या वेळी पू. खेमकाभैय्या त्यांना साहित्य आणि वाहन उपलब्ध करून देणे, अशा प्रकारचे साहाय्य सतत करत असत. तेव्हा पू. भैय्या सांगायचे, ‘साधक, म्हणजे श्री गुरूंचे सगुण रूप आहेत’, असा माझा भाव असतो. त्यामुळे मला सतत साधकांसाठी काहीतरी करायला हवे असे वाटते.’

१ ई २. साधकाला सेवा करतांना ताण आला असतांना साधकांचा हात गुरूंनी पकडलेला असल्यामुळे कठीण प्रसंगात निश्‍चिंत रहाण्यासंदर्भात पू. भैय्यांनी सांगितलेली गोष्ट !
श्री. वैभव आफळे

एकदा मला काही प्रसंगांचा पुष्कळ ताण आला होता. तेव्हा त्यांनी मला एक गोष्ट सांगितली, ‘एकदा एका गावात पुष्कळ पाऊस पडल्यामुळे नदीला पूर आला होता. गावातून बाहेर जाण्यासाठी एकच पूल होता आणि त्यावरूनही पाणी वाहू लागले होते. तेव्हा एक वडील आपल्या एकुलत्या एका मुलीला घेऊन जात होते. पूल पार करतांना वडील मुलीला त्यांचा हात धरण्यास सांगतात; पण मुलगी आपल्या वडिलांना तिचा हात धरण्यास सांगत असते. पूल पार केल्यावर वडील मुलीला त्याविषयी विचारतात. तेव्हा ती म्हणते, ‘‘बाबा, मी तुमचा धरलेला हात सुटू शकतो; परंतु ‘तुम्ही माझा हात धरला, तर कधीही सुटणार नाही’, याची मला खात्री आहे.’’ पू. खेमकाभैय्या यांनी मला, ‘आपल्या साधकांचा हात श्री गुरूंनीच घट्ट धरून ठेवला आहे. त्यामुळे तुम्ही निश्‍चिंत रहा’, असे सांगितले.

१ ई ३. ‘व्यवसाय माझा नाही, तर ईश्‍वराचा आहे’, असा भाव ठेवून प्रत्येक कृती करणे

एकदा एका व्यावसायिकांनी पू. खेमकाभैय्यांना विचारले, ‘‘तुम्ही इतक्या व्यस्ततेतही साधना कशी करता ?’’ तेव्हा पू. भैय्या म्हणाले, ‘‘मी व्यष्टी साधना (नामजप इत्यादी) माझ्यासाठी करतो आणि व्यवसाय ईश्‍वरासाठी करतो.’’ ‘व्यवसाय माझा नाही, तर ईश्‍वराचा आहे’, असा भाव ठेवून ते प्रत्येक कृती करतात. यातून त्यांच्यातील श्री गुरूंप्रतीचा अत्युच्च भाव लक्षात येतो.

१ ई ४. पू. खेमकाभैय्या यांच्यातील भावामुळे साधकाला पू. खेमकाभैय्या, म्हणजे भावाचे मूर्तीमंत उदाहरण असलेले ‘रामकृष्ण परमहंस’ वाटणे

त्यांचा श्री गुरूंप्रती अतीव भाव आहे. परात्पर गुरु डॉक्टरांच्या संदर्भात बोलतांना त्यांची भावजागृती होते. मी झारखंड येथे असतांना ते मला सकारात्मक रहाण्यासाठी विविध गोष्टी आणि प्रसंग किंवा एखाद्या गीताच्या पंक्ती म्हणून त्यांचा अर्थ सांगायचे. त्यांच्या समवेतचा प्रत्येक क्षण, म्हणजे एक सत्संगच असायचा. त्यांची होणारी भावजागृती आणि त्यांच्या बोलण्यातून इतरांची होणारी भावजागृती यांमुळे ‘पू. खेमकाभैय्या, म्हणजे भावाचे मूर्तीमंत उदाहरण असलेले ‘रामकृष्ण परमहंस’च आहेत !’, असे मला वाटते.

 

२. पू. खेमका यांच्यात झालेल्या पालटांविषयी
समाजातील व्यक्तींनी काढलेले आदरयुक्त उद्गार !

२ अ. राग न्यून होणे

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यानिमित्त मला अनेक हिंदुत्वनिष्ठ भेटतात. तेव्हा ते सांगतात, ‘‘पूर्वी पू. खेमकाभैय्या इतके रागवायचे की, आम्ही त्यांच्या कार्यालयात येणे टाळायचो. सनातनमुळे त्यांच्यात इतका पालट झाला आहे की, आता ते आम्हा सर्वांना हवेहवेसे वाटतात.’’

२ आ. पू. खेमकाभैय्या यांच्या एका मित्राने ‘ते सांगत असलेली साधना
वेगळी असून त्यामुळे आमच्या जीवनात परिवर्तन होईल’, असे लक्षात आल्याचे सांगणे

पू. खेमकाभैय्या यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली, त्या वेळी त्यांचे एक जवळचे मित्र म्हणाले, ‘‘प्रदीप, आम्हाला नेहमी साधनेविषयी सांगायचा; परंतु आम्ही ते समजून घेतले नाही. आता लक्षात येत आहे, ‘तो जे काही सांगत आहे, ते वेगळे असून त्यामुळे आमच्या जीवनात परिवर्तन होणार आहे !’’

२ इ. पू. खेमका यांच्या कुटुंबाशी जवळचे संबंध असणार्‍या एका व्यक्तीने
‘सनातनमुळे प्रदीप (पू. प्रदीप खेमका) यांच्यात पालट झाला असून ते ‘संत’ झाले आहेत’, असे सांगणे

जिज्ञासूंना संपर्क करतांना माझी समाजातील अनेक लोकांशी भेट व्हायची. धनबाद येथील एका दुकानाच्या वयोवृद्ध मालकाचे पू. खेमका यांच्या कुटुंबाशी जवळचे सबंध आहेत. ते मला प्रत्येक वेळी म्हणायचे, ‘‘प्रदीपला (पू. प्रदीप खेमका यांना) सनातनने पालटले आहे. पूर्वी तो इथे यायचा, तेव्हा ‘वादळासारखा यायचा.’ त्यामुळे दुकानातील कामगार घाबरायचे; पण आता सनातनच्या संपर्कात आल्यापासून तो ‘संत’ झाला आहे.’’ वर्ष २०११ – २०१२ मधील त्यांचे हे बोल आज सत्य झाले आहेत.

२ ई. अनेक लोक पू. खेमकाभैय्यांविषयी असेही म्हणतात, ‘‘सनातनमध्ये
आल्यामुळे पू. खेमका यांच्यात इतका पालट झाला आहे, तर आम्हीही सनातनमध्ये येऊ इच्छितो.’’

देवाच्या कृपेने मला पू. खेमकाभैय्या यांच्यातील भाव आणि ईश्‍वरी गुण आत्मसात करण्याची संधी मिळाली; म्हणून मी ईश्‍वराच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो आणि ‘त्यांच्याप्रमाणे आम्हा साधकांचीही आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी प्रयत्न करवून घ्यावेत’, अशी ईश्‍वराच्या चरणी प्रार्थना करतो.’

– श्री. वैभव आफळे, नांदेड (१३.७.२०१८)

 

३. पू. प्रदीप खेमका यांच्याविषयी संत आणि साधक यांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये

३.अ. सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

‘पू. खेमका यांना प्रत्येक क्षणी गुरुकार्याचा ध्यास असतो. त्यांनी सांगून ठेवले आहे की, सनातनच्या धर्मकार्यासाठी कोणत्याही साहाय्याची आवश्यकता असल्यास पहिल्यांदा मला सांगा. त्यांना कोणतीही सेवा सांगितली की, ती पूर्ण होतेच.

३.आ. पू. नीलेश सिंगबाळ

‘पू. प्रदीप खेमका मोठे उद्योगपती असूनही त्यांच्यात अहंकाराचा लवलेशही नाही. ते रुग्णालयात असतांनाही ‘कुंभमेळ्यात सनातन संस्थेसाठी जागा मिळाली का ? काही साहित्य हवे आहे का ?’, याविषयी विचारणा करत.’

३.ई. श्री. चेतन राजहंस

‘पू. प्रदीपभैय्या यांना कोणतीही सेवा सांगितली, तरी ‘हो जाएगा’, असेच त्यांचे उद्गार असतात. ते झारखंड येथे रहातात; पण गोव्यातील ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’त सहभागी होणार्‍या हिंदुत्वनिष्ठांसाठी ते गोव्यातील त्यांच्या परिचितांकडून वाहन उपलब्ध करून देतात. हिंदुत्वनिष्ठ आणि साधक यांच्यासाठी ते प्रत्येक वर्षी प्रसादाचीही व्यवस्था करतात.’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात