डॉ. दाभोलकर, गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी निर्दोष सनातन संस्थेला गोवून मालेगाव-2 चे षडयंत्र !

सनातनला गुंतवण्यासाठी किती कथानके रचणार ?

मुंबई – दाभोलकर आणि गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणात आता तपासयंत्रणा अनेक कथानके मांडत आहेत. गौरी लंकेश हत्येप्रकरणी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या 18 कार्यकर्त्यांच्या विरोधात पुरवणी आरोपपत्र प्रविष्ट केल्याविषयी अत्यंत हास्यास्पद प्रसिद्धीपत्रक कर्नाटकच्या विशेष अन्वेषण पथकाने (एस्.आय.टी.ने) प्रसिद्धीस दिले. तर सीबीआयने हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांवर आरोपपत्र दाखल करण्याच्या आधीच आरोप करायला आरंभ केला आहे. अर्थात् कर्नाटकात काय होत आहे, त्याबाबत आम्ही कर्नाटकात जाऊन बोलूच; परंतु गेल्या दहा वर्षांचा आढावा घेतला, तर काँग्रेस आणि सेक्युलरवाद्यांचे मालेगाव – भाग 1 फसले, तर आता मालेगाव – भाग 2 चालू करण्याचे षड्यंत्र दिसत आहे. यात अटक झालेले कार्यकर्ते विविध संघटनांचे असले, तरी सातत्याने मिडीयापुढे नाव मात्र सनातन संस्थेचे घेऊन सनातन संस्थेला लक्ष्य करण्याचे प्रयत्न स्पष्ट दिसत आहेत, अशी परखड भूमिका सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी मांडली. मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर हेही उपस्थित होते.

सीबीआयने आपल्या आरोपींची कोठडी वाढवण्यासाठीच्या दिलेल्या अर्जात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या संस्थांचा हात असल्याचा दावा केला आहे. अभ्यासहीन अर्ज कसा करायचा, याचे चांगले उदाहरण हा अर्ज आहे; कारण कलबुर्गींची हत्या ऑगस्ट 2015 मध्ये झालेली असतांना या अर्जात मात्र ती 2016 मध्ये झाल्याचे, तर वैद्यकीय अहवालात डॉ. दाभोलकरांच्या छातीत आणि डोक्यात गोळी लागलेली असतांना सचिन अंदुरेने पोटात गोळी मारल्याचे नमूद केले आहे. या अर्जावरून आताच समाजात आम्हाला आरोपी ठरवण्याचा आटापिटा केला जाऊ नये. सीबीआयच्या नंदकुमार नायर यांचे काळे कारभार आम्ही याआधीच उघड केले असल्याने त्याचा राग म्हणून त्यांनी असे कारस्थान केले असल्याचेही या वेळी अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी स्पष्ट केले.

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे म्हणाले की, गौरी लंकेश प्रकरणी मुख्य आरोपी म्हणून ज्या अमोल काळेचे नाव घेतले जात आहे, तो गेली 10 वर्ष समितीच्या कुठल्याही संपर्कात नव्हता. 10 वर्षांपूर्वीही तो समितीचा कोणताही पदाधिकारी नव्हता. तसेच डॉ. वीरेंद्रसिंह तावडे हेही समितीच्या कुठल्याही कार्यात सहभागी नसतांनाही त्यांना सीबीआयने आरोपपत्रात उपाध्यक्ष म्हटलेले आहे. जी पदे समितीच्या कार्यातच नाहीत, ती निर्माण केली जात आहेत आणि सर्वांना समितीचेच कार्यकर्ते असल्याचे भासवले जात आहे. हे दुसरे तिसरे काही नसून आधीची कारस्थाने फसल्यावरचा करण्यात येणारा पुढचा प्रयत्न आहे. याआधीही सनातनने अंनिसचा अर्बन नक्षलवाद आणि आर्थिक घोटाळे काढले, तेव्हा अंनिस कायद्याला विरोध करण्यासाठी ही बदनामीची खोटी मोहीम आहे, असा छद्मी प्रचार करण्यात आला होता.

सनातन संस्था ही लोकांना संमोहित करून भुलवते, असा मोठा प्रचार करण्यात आला; परंतु संमोहनतज्ञांनी यातील फोलपणा जाहीरपणे उघड केल्यावर ती मोहीम थंडावली. मडगाव ब्लास्टमध्ये सनातनचा हात होता, हे म्हणणारे हे कधीच सांगत नाहीत की, त्या प्रकरणी आश्रमाची झडती घेण्यात आली. संस्थेचे ट्रकभर आर्थिक कागदपत्र तपासण्यात आले आणि हे होऊनही न्यायालयाने सनातनला गुंतवण्यासाठी पोलिसांनी हे खोटे कुभांड रचले, असे सांगत सर्वांना निर्दोष सोडले. याबाबत आज कोणीही बोलत नाही.

तपासयंत्रणांनी दबावातूनच 2015 मध्ये समीर गायकवाड यांनी पानसरेंवर गोळी झाडली, म्हणून त्यांना अटक केली. तेव्हाही आम्ही आपल्यासमोर येऊन सांगितले की, तो आमचा साधक आहे आणि तो निर्दोष आहे. आज समीर गायकवाडला न्यायालयाने जामीन दिला आहे. उच्च न्यायालयाने तो रद्द केलेला नाही आणि पोलीस त्याच्याविरोधात खटला चालवत नाहीत. सीबीआय आधी म्हणाली, सारंग अकोलकर आणि विनय पवार यांनी गोळ्या झाडल्या. आता म्हणत आहेत, सचिन अंधुरे आणि शरद कळस्कर यांनी गोळ्या झाडल्या. आता मारेकरी बदलत आहेत, गोळ्यांच्या जागा बदलत आहे, खुनांचे कालावधी बदलत आहेत. वर्ष 2015 मध्ये आम्ही सीबीआयचे अधिकारी कसे खोटे कारस्थान करत आहेत, याचे पुरावे समोर ठेवले होते. तेच आता मागच्या पानावर पुढे चालू आहे. त्यामुळे आज आमच्यावर आरोप होत असले, तरी त्यावर त्यात खरे किती आणि खोटे किती, हे काळच ठरवेल, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले.

आपला नम्र,

श्री. चेतन राजहंस,
राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था.