(म्हणे) ‘दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्येचा सूत्रधार अमोल काळे आहे !’ – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड

जितेंद्र आव्हाडच स्वतः न्यायाधीश असल्याप्रमाणे सर्व काही सांगत असतील, तर खटला चालवून न्यायदानाची प्रक्रिया कशाला राबवायची, असे न्यायालयाला वाटले, तर चूक नव्हे !

मुंबई, ३० नोव्हेंबर (वार्ता.) – सनातन संस्थेचे साधक आणि संशयित आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे पकडले गेले; मात्र त्याचे सूत्रधार सापडले नाहीत. गौरी लंकेश हत्या प्रकरणात कर्नाटक पोलिसांनी अमोल काळे याला पकडले. त्याची कर्नाटक पोलिसांनी चौकशी केल्यानंतर डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, डॉ. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश या चारही जणांच्या हत्येचा सूत्रधार अमोल काळे असल्याचे निष्पन्न्न झाले आहे. सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अटक केल्यानंतर महाराष्ट्र सरकारला कसे कळले नाही की, अमोल काळे हा त्यांचा साथीदार होता. अमोल काळे पकडल्यानंतर अचानक बॉम्बस्फोट झाल्यासारखी महाराष्ट्रात सूत्रे हलली, अशी मुक्ताफळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ३० नोव्हेंबरला विधानसभेत उधळली. विधानसभेतील अंतिम आठवडा प्रस्तावावर ते बोलत होते.

ते म्हणाले की, अमोल काळे सापडल्यानंतर अचानक वसईत वैभव राऊत पकडला गेला; मात्र वैभव राऊत आणि त्याचा साथीदार याच्यावर देशद्रोहाचा खटला लागत नाही. अमोल काळे याच्या नोंदवहीतून आम्हा कोणाला मारायचे आहे, त्याची नावे निघतात. श्रावणाचा मास असल्याने हत्या होता कामा नये, असे त्यात म्हटले आहे. जर कर्नाटक पोलिसांनी अमोल काळे याला पकडले. यामध्ये कर्नाटक पोलिसांनी रस घेतला. त्याच्या नोंदवहीत मुक्ता दाभोलकर, श्याम मानव, श्रीमंत कोकाटे आणि जितेंद्र आव्हाड, अशी ४ नावे आहेत. प्रश्‍न हा आहे की, आपण किती गांभिर्याने या सूत्राकडे पहातो, हे महत्त्वाचे आहे. एकच पिस्तुल, एकच सूत्रधार; मात्र साथीदार वेगवेगळे आहेत. सूत्रधार पकडला जातो; मात्र याविषयी येथील पोलीस कामचुकारपणा करतात, असे कोणी आरोप केला, तर कोणी वाईट वाटून घेऊ नये.