मुंबईतील आझाद मैदानात हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रखर आंदोलनात सनातनचा सहभाग

  • मुंबईतील आझाद मैदानात हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रखर आंदोलनात चेतावणी
  • मुंबईतील डबेवाले संघटनेचाही आंदोलनाला पाठिबा
आंदोलन करणारे हिंदुत्वनिष्ठ आणि बोलतांना शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले (उजवीकडे)

मुंबई – मंदिरात भाविकांनी दिलेल्या दानाचा उपयोग धर्मकार्य, मंदिरातील धार्मिक विधी, मंदिराचे पावित्र्यरक्षण, मंदिरातील भाविकांची व्यवस्था, मंदिरांचे महत्त्व आणि धर्माचा प्रसार आदींसाठी व्हायला हवा; मात्र सरकार मंदिरातील धन शासकीय आणि सामाजिक कामांसाठी वापरत आहे. भाविकांनी भक्तीपोटी केलेल्या अर्पणाची ही लूट असून छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श सांगणार्‍या भाजप सरकारने मंदिरातील धन चारा छावण्यांसाठी लुटणे हे लांच्छनास्पद आहे. याविषयी धर्मादाय आयुक्ताने काढलेले परिपत्रक शासनाने मागे न घेतल्यास सरकारला हिंदूंच्या रोषाला सामोरे जावे लागेल, अशी चेतावणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने शासनाला देण्यात आली. देवनिधीची लूट आणि पुणे येथे संस्कृतीभ्रष्ट सनबर्नला मिळालेल्या अनुमतीच्या विरोधात २८ नोव्हेंबरला आझाद मैदानात हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या वेळी शेकडो हिंदूंनी धर्मभावना पायदळी तुडवणार्‍या सरकारला येत्या निवडणुकीत धडा शिकवण्याचा निर्धार केला.

या आंदोलनाला राष्ट्रीय वारकरी सेनेचे कोकणप्रांत अध्यक्ष ह.भ.प. बापू रावकर महाराज, कारभारीसाहेब आंबोरे महाराज (जालना), ह.भ.प. दिनदास महाराज (गुरुकुल आश्रम, जालना), ह.भ.प. जितेंद्र महाराज निंबोळकर (अकोला), हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर, परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड जिल्हा संघटक श्री. सुनील घनवट यांच्यासह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. मुंबईतील डबेवाले संघटनेनेही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.

 

आझाद मैदान येथील आंदोलनातील मान्यवर वक्त्यांचे परखड विचार !

शिवसेनेची पूर्ण शक्ती हिंदु जनजागृती
समितीच्या पाठीशी ! – आमदार भरतशेठ गोगावले

आजच्या आंदोलनाला शिवसेनेचे ५ आमदार उपस्थित आहेत; मात्र केवळ ५ जणांचेच समर्थन आहे, असे नाही, तर पूर्ण शिवसेनेची शक्ती तुमच्या पाठीशी आहे, असे आश्‍वस्त उद्गार आमदार भरतशेठ गोगावले यांनी काढले. शिवसेनेचे ५ आमदार सर्वश्री भरतशेठ गोगावले, मनोहरशेठ भोईर, अमित घोडा, शांताराम मोरे आणि प्रकाश आबिटकर या आंदोलनाला उपस्थित होते आणि त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.

हिंदूंकडे पाठ फिरवणार्‍या सरकारचा निषेध !

हिंदूंचे राज्य यावे; म्हणून अनेक जणांनी प्रयत्न केले. सरकार आल्यावर मात्र सरकारमधील नापाक लोकांनी डोळे आणि कान यांवर पडदे ओढून घेतले. हिंदु धर्मासाठी हिंदु जनजागृती समिती निःस्वार्थपणे कार्यरत आहे; पण आज समितीवर आरोप केले जात आहेत. सत्तेत आल्यानंतर हिंदूंकडे पाठ फिरवणार्‍या सरकारचा जाहीर निषेध आहे. समितीचे कार्यकर्ते मनापासून आणि हिंदु धर्मासाठी स्वखर्चाने कार्यरत आहेत. आमदार असल्यापासून गेली ९ वर्षे मी हे कार्य पहात आहे. कोणतीही काळजी न करता असेच कार्य चालू ठेवा. तन, मन, धनाने आम्ही सहकार्य करू. ‘देवस्थानांचा पैसा चारा छावण्यांसाठी वापरण्याच्या सरकारच्या निर्णयाच्या संदर्भात सरकारला केवळ हिंदूंचीच मंदिरे का दिसतात ? अन्य धर्मियांची प्रार्थनास्थळे का दिसत नाहीत’, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.

हिंदु संस्कृतीशी संबंधित अनेक कार्यक्रम असतांना सरकारला ‘सनबर्न फेस्टिव्हल’चे काय पडले आहे ? सनबर्न फेस्टिव्हल होऊ नये, यासाठी लागेल ती सर्व ताकद लावू, अशी खंबीर भूमिका शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी घेतली.

हिंदु धर्म अपकीर्त करणार्‍यांमध्ये अंनिस अग्रेसर ! – गणेश हाके, प्रवक्ते, भाजप

हिंदु धर्म ही एक जीवनशैली आहे; पण त्याप्रमाणे जगण्याचा आणि धर्माचरण करण्याचा अधिकार आज हिंदूबहुल भारतात हिंदूंना नाही. हिंदु धर्माला एक न्याय आणि अन्य धर्मांना निराळा न्याय, असे आजचे वातावरण आहे. काही भ्रष्ट संस्थांकडून जाणीवपूर्वक हिंदु धर्म अपकीर्त करण्याचे षड्यंत्र चालू आहे. त्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समिती अग्रेसर आहे. धर्मावर टीका करून समाजात वितुष्ट निर्माण करणार्‍यांना अटकाव व्हायला हवा. आज धर्माच्या रक्षणासाठी पुढे येण्याची आणि धर्माला विरोध करणार्‍यांना धडा शिकवण्याची आवश्यकता आहे.

सनबर्न फेस्टिव्हलसाठी भाजपचे राष्ट्रवादी
काँग्रेसला पडद्याआडून समर्थन ! – अधिवक्ता संजीव पुनाळेकर

ड्रग्स, मद्य यांची विक्री करणार्‍या आणि ज्या कार्यक्रमांमध्ये महिलांवर अत्याचार झाले आहेत, असा सनबर्न फेस्टिव्हल काय आहे, हे ठाऊक नसल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील सांगतात. सनबर्न फेस्टिव्हलशी संबंधित व्यक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्या जवळच्या आहेत. त्यामुळे भाजप सरकारची सनबर्न फेस्टिव्हलच्या संदर्भातील भूमिका म्हणजे बंद पडद्याआड राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देण्याचा प्रयत्न आहे. असा हा विकृत सनबर्न फेस्टिव्हल हिंदू बंद पाडल्याविना रहाणार नाहीत.

मुंब्रा आणि नागपूरचे लोक
एकच आहेत का ? – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

एकीकडे मुंब्याचे आमदार उत्सवात सनी लियोनला नाचवतात, तर भाजप सरकार दुसरीकडे सनबर्न फेस्टिव्हलच्या माध्यमातून पुण्यामध्ये विदेशींना नाचवते. मुंब्रा आणि नागपूरचे लोक एकच आहेत का ?, असे समजायचे का ?, असा प्रश्‍न हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी उपस्थित केला.

देवस्थानांचा निधी चारा छावण्यांना देण्याप्रकरणी राज्यभरात
तीव्र आंदोलन छेडले जाईल ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक

उल्हासनगरसह देशात धर्मांतर करणार्‍यांनी जाळे पसरवले आहे. ८ लाखांहून अधिक हिंदूंचे धर्मांतर केले जात आहे. हिंदूंचे धर्मांतर करण्यास बंदी करणारा कायदा संपूर्ण देशात झाला पाहिजे. सात राज्यांत धर्मांतरबंदी कायदा लागू असतांना महाराष्ट्रासह सर्व देशात तो लागू केला पाहिजे. राज्य सरकार सामाजिक कामासाठी मंदिरांचे पैसे वापरले जात आहेत. सरकार कोणतीही मशीद अथवा चर्चमधून पैसे घेत नाही. सरकारला एवढेच जर वाटत असेल, तर भाजपचा साडेसहा सहस्र कोटी रुपयांचा पक्ष निधी दुष्काळ निवारण आणि चारा छावण्या यांसाठी त्यांनी द्यावा. या संदर्भात संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन छेडले जाणार आहे.

हिंदूसंघटन आवश्यक ! – वैष्णवी शर्मा, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान

हिंदु धर्मावरील आघात परतावून लावण्यासाठी हिंदूसंघटन आवश्यक असल्याचे मत श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या वैष्णवी शर्मा यांनी व्यक्त केले.

हिंदूंचे फसवून धर्मांतर करणार्‍या विकृतीचा
नायनाट करू ! – आमदार मनोहरशेठ भोईर, शिवसेना

उल्हासनगर परिसरातील सिंधी समाजाचे धर्मांतर करण्याच्या घटना घडत आहेत. हिंदूंचे धर्मांतर आणि शोषण रोखण्यासाठी कायदा व्हायला हवा. आम्ही हिंदूंना आश्‍वस्त करतो की, हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या विकृतीचा नायनाट केल्याविना शांत बसणार नाही. हिंदूंचे धर्मांतर होणार नाही, याची काळजी शिवसेना घेईल.

आंदोलनाच्या अन्य मागण्यांचे समर्थन करतांना ते म्हणाले, ‘‘धर्माचे काम करणे चुकीचे असल्याचे चित्र अंनिस निर्माण करत आहे. अंनिसच्या स्वतःच्या संस्थेतच भ्रष्टाचार आहे. अशा भ्रष्टाचारी अंनिसची चौकशी व्हायला हवी. त्याचप्रमाणे मंदिरांचा पैसाही शासकीय कामांसाठी नाही, तर देवस्थानासाठीच वापरला गेला पाहिजे.’’

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन ! – मनोहरशेठ भोईर

हिंदु धर्मावर कळत-नकळत होणारे आघात थांबवण्यासाठी हिंदु जनजागृती समिती निःस्वार्थपणे कार्यरत आहे, त्याविषयी सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन !

समितीच्या प्रश्‍नांना न्याय देऊ ! – आमदार प्रकाश आबिटकर, शिवसेना

हिंदु जनजागृती समितीने आंदोलनाच्या माध्यमातून उपस्थित केलेल्या सर्व प्रश्‍नांना विधीमंडळात न्याय देऊ.

संस्कृतीभ्रष्ट ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला अनुमती नाकारावी ! – आंदोलकांची मागणी

यापूर्वी ‘सनबर्न फेस्टिव्हल’ने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवला आहे. असे असतांना शासनाने पुन्हा पुणे येथे ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला अनुमती दिली आहे. कोट्यवधी रुपयांचा कर बुडवणार्‍या सनबर्नसाठी पायघड्या घालण्याची शासनाची ही भूमिका संशयास्पद आहे. सनबर्नने बुडवलेला महसूल शासनाने प्रथम वसूल करावा आणि संस्कृती भ्रष्ट करणार्‍या अशा कार्यक्रमांना अनुमती देऊ नये, अशा राज्यातील सर्वसामान्यांच्या भावना आहेत.

धर्मांतरबंदी कायदा लागू करावा !

मुंबईसह राज्यात आर्थिक प्रलोभने, बळजोरी आदी विविध मार्गांनी होणार्‍या हिंदूंच्या धर्मांतराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. वर्ष १९४७ मध्ये हिंदूंची ९० टक्के असलेली लोकसंख्या वर्ष २०११ मध्ये ७९ टक्क्यांवर आली आहे. हे असेच चालू राहिल्यास एक दिवस हिंदू नामशेष होण्याची वेळ येईल. याची गंभीर नोंद घेऊन धर्मांतर रोखण्यासाठी केंद्रशासनाने तात्काळ धर्मांतरबंदी कायदा करावा, अशी मागणी या आंदोलनात करण्यात आली.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर भ्रष्टाचाराच्या प्रकरणी कारवाई करावी !

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र असलेल्या ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रा’च्या डिसेंबर २०१२ मध्ये प्रकाशित झालेल्या अंकाचे आणि वर्ष २०१२-१३ या आर्थिक वर्षात प्रसिद्ध झालेल्या अंकांचे लक्षावधी रुपयांचे उत्पन्न आर्थिक ताळेबंदामध्ये न दाखवता ते लपवण्यात आले आहे. नेहमी विवेकाच्या गप्पा मारणार्‍या अंनिसचे वर्तन मात्र त्याच्या विरोधी आहे. या भ्रष्टाचाराच्या प्रकरणी अंनिसची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी या आंदोलनाच्या वेळी करण्यात आली.

शिवप्रभु उत्सव समिती सांताक्रूझचे लतेंद्र सावंत, श्‍वेतांबर मूर्तीपूजक जैन संघाचे अध्यक्ष मोतीलाल जैन, भाजपचे कल्याण उपशहराध्यक्ष डॉ. उपेंद्र डहाके हेही आंदोलनात सहभागी झाले होते.

धर्मरक्षणासाठी प्रसंगी आमरण उपोषण करीन ! – ह.भ.प. अंभोरे महाराज

हिंदूहिताच्या विषयांच्या संदर्भात हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते रक्ताचे पाणी करून कार्य करत आहे. संवेदनशील विषयांमध्ये सरकार जर ऐकत नसेल, तर मी प्रसंगी आमरण उपोषण करीन.

हिंदु धर्माप्रती कट्टर बना ! – क्षत्राणी अमिता चौहान, नारीशक्ती फाऊंडेशन

मोक्षप्राप्ती करवून देणारा हिंदु धर्म हा एकमेव धर्म आहे; मात्र धर्म काय आहे, हेच ठाऊक नसल्याने आणि अन्य पंथांच्या दडपशाहीमुळे हिंदूंकडून धर्मपरिवर्तन केले जाते. हिंदूंनी त्यांच्या धर्माप्रती कट्टर होणे आणि हिंदु धर्म शिकणे आवश्यक आहे.

धर्मांतरामुळे उल्हासनगर येथील परिस्थिती बिकट ! – अधिवक्ता राहुल चतुर्वेदी

उल्हासनगर धर्मांतराने बिकट होत चालले आहे. तेथे धर्मांतराने विक्राळ रूप घेतले आहे. एकूण २८ सहस्र परिवारांचे धर्मांतर झाले आहे. हे धर्मांतर करणारे इंग्रजांच्या रूपातील आहेत. विचारांची लढाई विचारांनी करायची वेळ आली आहे. ज्यांचा देव या देशाचा आहे, तेच आपल्यासाठी लढतील. धर्मांतर करणार्‍यांना येणार्‍या परदेशी निधीवर अटकाव आणला पाहिजे.

हिंदु जनजागृती समितीचे कार्य दैवी ! – वसंत दहिफळे, अध्यक्ष, जनता सेवाभावी संस्था

आपल्या लोकांचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर होत आहे. प्रत्येकाने पुढाकार घेऊन हे धर्मांतर थांबवले पाहिजे. महिलांवरील अत्याचार, भ्रष्टाचार थांबवणे गरजेचे आहे. हिंदु जनजागृती समिती हे कार्य करत आहे. समितीचे कार्य हे दैवी कार्य आहे. अशी कार्य करणारी आज एकही संघटना नाही. सर्वांनी संघटित होऊ हे कार्य केले पाहिजे.

चारही विषयांत लक्ष घालण्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांचे आश्‍वासन !

विधीमंडळात चारही विषयांचे निवेदन गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांना दिले. त्यांनी धर्मांतरबंदी कायदा सविस्तर समजून घेतल्यावर ह.भ.प. बापू महाराज रावकर यांनी या सर्व विषयांसंदर्भात बैठक घ्यावी, आम्ही आपणास सर्व कागदपत्रे देतो, असे सांगितले. त्यावर रणजित पाटील यांनी ‘मी लक्ष घालीन’, असे आश्‍वासन दिले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात