(म्हणे) ‘सनातन’ला वाचवणारे सरकारमधील साधक कोण ?’ – काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण

घोटाळ्यांचा आरोप असणारे आणि त्यामुळे मुख्यमंत्रीपद
गमावण्याची नामुष्की ओढवलेले अशोक चव्हाण यांची बिनबुडाची टीका !

मुंबई, २६ नोव्हेंबर – कर्नाटक सरकारच्या विशेष अन्वेषण पथकाने गौरी लंकेश हत्या प्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात सनातन संस्थेचे नाव आरोपी म्हणून घेतले आहे. (कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार या प्रकरणात एकूण १८ व्यक्तींवर गुन्हे दाखल झाले आहेत. सनातन संस्थेला कोणीही आरोपी केलेले नाही. असे असतांनाही बिनबुडाचे आरोप करणारे चव्हाण ! – संपादक) यातूनच सनातन संस्था ही अत्यंत घातक संस्था असून हिंसक कारवायांमध्ये गुंतलेली आहे, या वस्तूस्थितीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. या अगोदरही या संदर्भातील अनेक पुरावे समोर आले असतांनाही सनातन संस्थेवर कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे सनातन संस्थेला वाचवणारे सरकारमधील साधक कोण ?, असा प्रश्‍न काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. (सी.बी.आय.ने आरोपपत्र प्रविष्ट करण्यासाठी कालावधी वाढवून घेण्यासाठी केलेल्या अर्जात गौरी लंकेश प्रकरणी सनातनचा सहभाग असल्याचा उल्लेख केला. त्यामुळे अर्धवट माहितीवर सनातनची अपकीर्ती करण्यासाठी टपलेल्या अशा काँग्रेसी लोकप्रतिनिधींची निवडणुकांपूर्वीची ही शेवटची फडफड म्हणायची का ? – संपादक)

चव्हाणे पुढे म्हणाले की, गौरी लंकेश प्रकरणात अटकेतील आरोपी सनातन संस्थेशी संबंधित आहेत आणि सनातन संस्थेने इतर कट्टरवादी संघटनांच्या मदतीने ही हत्या घडवून आणली, असा स्पष्ट उल्लेख आरोपपत्रात आहे. (काँग्रेसवाल्यांनी आतापर्यंत केलेले सहस्रो भ्रष्टाचार, हत्या यांचा ७१ वर्षांतील इतिहास पहाता काँग्रेसवर बंदी का घालू नये, याचे उत्तर प्रथम चव्हाण यांनी द्यावे ! – संपादक)  तसेच नरेंद्र दाभोलकर, एम्.एन्. कलबुर्गी आणि डॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्याकांडाशीही सनातन संस्थेचा संबंध आहे. हेही यातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सनातन संस्थेवर बंदी घालावी. (स्वतः न्यायाधिशाच्या भूमिकेत जाऊन बेछूट आरोप करणारे चव्हाण ! सनातन काँग्रेसवाल्यांचे घोटाळे बाहेर काढत आहे. त्यामुळे काँग्रेसवाले सनातनला पाण्यात पहातात. याच कारणामुळे चव्हाण बिनबुडाची टीका करत आहेत ! पुराव्यांशिवाय चव्हाण यांचे हे वक्तव्य म्हणजे ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ अशा स्वरूपाची आहे ! – संपादक) 

चव्हाण यांच्याकडून कथित ‘स्टिंग ऑपरेशन’चा पुनरुच्चार !

हे सूत्र इंडिया टुडे या वृत्तवाहिनीने स्टिंग ऑपरेशन करून समोर आणले. तरीही या प्रकरणी सनातन संस्थेची साधी चौकशी करण्याची तसदीही सरकारने घेतली नाही. (या ‘स्टिंग ऑपरेशन’चा फोलपणा सनातनने त्याच वेळी समोर आणला. तो करणार्‍यांच्या विरोधात तक्रारही प्रविष्ट केली होती. असे असतांनाही ‘स्टिंग ऑपरेशन’चे सूत्र उपस्थित करणारे चव्हाण ! – संपादक)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात