हिंदूंनो हिंदु धर्मावरील आघातांविरोधात संघटित व्हा ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्था

धानोरा येथे हिंदु जनजागृती समितीची १००० वी ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ !

२ सहस्र धर्माभिमान्यांनी घेतली ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेसाठीची प्रतिज्ञा !

धानोरा, २६ नोव्हेंबर (वार्ता.) – हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदु राष्ट्रजागृती सभा रविवार,२५ नोव्हेंबर या दिवशी येथील क्रीडा स्टेडियम मैदान येथे पार पडली. ही समितीची महाराष्ट्रातील १००० वी सभा होती. सभेला सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव, हिंदु जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर आणि रणरागिणी शाखेच्या कु. रागेश्री देशपांडे यांनी संबोधित केले. धानोरा आणि आजूबाजूच्या खेड्यातील सहस्रो धर्माभिमानी महिला आणि पुरुष या सभेला उपस्थित होते. या ऐतिहासिक सभेला शंखनादाने प्रारंभ झाला. त्यानंतर सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो’, या जयघोषात श्री. प्रशांत जुवेकर यांनी व्यासपिठावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर वेदमूर्ती श्री. राहुल पाठक यांनी वेदमंत्राचे पठण केले. हिंदु जनजागृती समितीच्या हिंदु राष्ट्रस्थापनेच्या उल्लेखनीय कार्याचा आढावा श्री. उमेश जोशी यांनी मांडला. सूत्रसंचालन श्री. चेतन जगताप यांनी केले.

‘जयतु जयतु हिन्दु राष्ट्रम्’, ‘हर हर महादेव’, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो’, ‘छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो’, अशा जयघोषांनी उपस्थितांच्या नसानसांत उत्साह संचारला. सभेला उपस्थित धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी सभेच्या शेवटी ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. धर्मजागृती सभेचे ‘फेसबूक’वरून थेट प्रक्षेपण करण्यात आले. सभेच्या प्रवेशद्वाराच्या ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन, सात्त्विक उत्पादनांचा कक्ष, तसेच क्रांतीकारकांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. याला उपस्थित धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

बालसाधकांकडून उद्बोधन !

संस्कृतीरक्षण करण्याचे आवाहन करून धर्मशिक्षण देणार्‍या बालसाधकांचा कक्ष सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरला. ‘हिंदूंनो, नूतन वर्ष १ जानेवारीऐवजी गुढीपाडव्याला साजरे करा’, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा रात्री १२ ऐवजी सुर्योदयाला द्या’, ‘हिंदूंनो पाश्‍चात्य संस्कृतीवर बहिष्कार टाका’, ‘दूरध्वनीवर बोलतांना हॅलो’ ऐवजी ‘नमस्कार म्हणा’, इंग्रजी भाषेऐवजी मराठीतच बोला’, हिंदूंनो एक व्हा’ यांसारख्या विविध प्रबोधनपर घोषणांनी बालसाधकांनी उपस्थितांचे उद्बोधन केले !

हिंदूंनो हिंदु धर्मावरील आघातांविरोधात
संघटित व्हा ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्था

सद्गुरु नंदकुमार जाधव

महाराष्ट्रात कॉ. पानसरे, डॉ. दाभोलकर आणि कर्नाटकातील गौरी लंकेश यांच्या हत्यांमागील खरे गुन्हेगार न सापडल्याने सनातनला नाहक गोवण्याचा प्रयत्न केला गेला. आजपर्यंत सनातनवर राष्ट्रद्रोहाचा एकही गुन्हा नाही. तरीही पुरोगामी, प्रसारमाध्यमे आणि हिंदुद्वेष्टे नेते सनातनची अपकीर्ती करत आहेत. गोहत्या, धर्मांतर, देवस्थान भूमीचे घोटाळे, हिंदूंच्या सण-उत्सवांवर होणारे धर्मांधांचे आक्रमण यांसारखे एक ना अनेक आघात हिंदु धर्मावर होत आहेत. यासाठी एकमेव पर्याय म्हणजे ‘हिंदु राष्ट्र’ ! कालौघाने वर्ष २०२३ ला हिंदु राष्ट्राचा सूर्य उगवणारच आहे, असे प्रतिपादन सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले.

ते पुढे म्हणाले की, मंदिरे ही हिंदु धर्माची आधारशिला आहेत. धर्माचे रक्षण, जतन आणि संवर्धन करण्यात मंदिरांचा मोठा वाटा आहे. म्हणूनच परकीय आक्रमणे होऊनही सहस्रो वर्षांपासून हिंदु धर्म टिकून आहे.

भ्रष्ट आणि शोषित व्यवस्था पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच
हवे ! – प्रशांत जुवेकर, जळगाव जिल्हा समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

पाकिस्तानपेक्षा भारतातील मुसलमानांची संख्या अधिक असतांनाही येथे अल्पसंख्यांकांना मुसलमान राष्ट्रांपेक्षा अधिक सुविधा दिल्या जातात. सर्वधर्मसमभाव आणि धर्मनिरपेक्षता यांच्या गोंडस नावाखाली हिंदूंचा छळ केला जातो. हा भारतातील बहुसंख्याकांवर अन्याय नाही का ? आज प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार आहे. भ्रष्ट आणि शोषित व्यवस्था पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे, असे प्रतिपादन श्री. जुवेकर यांनी केले.

ते पुढे म्हणाले

श्री. प्रशांत जुवेकर

१. श्रीरामनवमी उत्सवाच्या अनुमतीसाठी हेलपाटे खावे लागतात. दुसरीकडे राज्यात अनेक ठिकाणी टिपू सुलतान जयंतीला बिनदिक्कतपणे अनुमती मिळते. हा कुठला सर्वधर्मसमभाव ? धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदुत्व दडपण्याचे हे षड्यंत्र आहे.

२. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन म्हणून धुळ्यासह अनेक ठिकाणी मंदिरे पाडण्यात आली. दुसरीकडे अफझलखानाच्या थडग्याच्या सुशोभिकरणासाठी अनधिकृतरित्या बळकावलेली वन विभागाची भूमी कह्यात घेण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले असतांना त्यावर प्रशासन मूग गिळून गप्प का बसते ?

३. यवतमाळ जिल्ह्यात ‘अवनी’ या नरभक्षक वाघिणीला ठार करण्यावरून मोठा गदारोळ होत आहे. इथे प्रश्‍न असा आहे की, जेवढी सहानुभूती आणि प्रेम एका वाघिणीला मिळत आहे, तेवढे गोमातेला का मिळत नाही ?

४. वर्ष १९७० नंतर शिक्षकांचे वेतन २५० पटीने वाढले. त्या प्रमाणात शेतमालाचे दर वाढले का ? सरकारी नोकरांना ३६५ पैकी जवळपास १२५ दिवस सुट्टी असते. शेतकर्‍याला वर्षाला किती सुट्ट्या असतात ?

हिंदु राष्ट्रात महिलांवरील अत्याचार कधी संपुष्टात येतील !
– रागेश्री देशपांडे, नंदुरबार-धुळे जिल्हा समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

कु. रागेश्री देशपांडे

भारताला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे पूर्ण झाली. तरीही आपल्या देशातील महिला सुरक्षित नाही. प्रतिदिन महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढतच आहे. देहलीतील निर्भया, कोपर्डी येथील बलात्काराच्या घटनांविरोधात मोर्चे निघाले, आंदोलने झाली, कायद्यात पालट झाले मात्र तरीही ही दुष्कृत्ये थांबलेली नाहीत. हिंदु राष्ट्रात महिलांवरील अत्याचार कधी संपुष्टात येतील, असे प्रतिपादन कु. रागेश्री देशपांडे यांनी केले. आधुनिकतेच्या नावाखाली हिंदु संस्कृतीचा त्याग करून पाश्‍चिमात्त्य संस्कृतीला आपलेसे केले जात आहे. मुलींना हवे तेवढे स्वातंत्र्य दिले जात आहे. त्यातच मुसलमान तरुणांकडून हिंदु तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून फसवले जात आहे. आज देशातील लाखो माता भगिनी या ‘लव्ह जिहाद’ ला बळी पडल्या आहेत. या संकटापासून हिंदु मुलींना वाचवणे आवश्यक आहे. म्हणून महिलांना धर्मशिक्षण आणि स्वरक्षण प्रशिक्षण द्यायला हवे.

क्षणचित्रे

१. धानोरा येथून जवळच असलेल्या अडावद येथील १०० हून अधिक धर्माभिमानी सभेला दुचाकी घेऊन आले होते. त्या सर्वांनी सभेनंतर त्यांच्या गावातही अशी सभा घेण्याचा आग्रह धरला. सभेची संपूर्ण सिद्धता करण्याची त्यांनी सिद्धता दर्शवली. त्यानुसार सभा ठरवण्यात आली.

२. एक पालक आपल्या दिव्यांग मुलाला ‘व्हीलचेअर’ वर बसवून सभेला आले होते. हे दिव्यांग बाळ कुतूहलाने सर्व प्रदर्शन पहात होते.

३. जोशपूर्ण घोषणा ऐकून एक ८ वर्षांची बालिका सभेच्या व्यासपिठाच्या मागे आली आणि साधिकेला म्हणाली, ‘‘मलाही घोषणा द्यायची आहे.’’ साधिकेने तिला विचारले, ‘‘तू कोणती घोषणा देणार ?’’ त्यावर ती उत्तरली, ‘‘दूध मांगोगे तो खीर देंगे, और कोई हिंदु लडकी का नाम लेंगे तो चीर देंगे’’!

४. पारगाव (२ कि.मी. अंतरावर असलेले गाव) या गावातून काही महिला सभेसाठी पायी चालत आल्या होत्या.

उपस्थित मान्यवर

अखिल भारतीय वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. मुकेश महाराज पारगावकर, धानोरा येथील सरपंच सौ. कीर्ती पाटील, माजी उपसभापती माणिकचंद महाजन, उपसरपंच अशोक साळुंके, हिंदु महासभेचे प्रदेश उपाध्यक्ष अधिवक्ता गोविंद तिवारी, चोपडा येथील घनश्याम अग्रवाल, दोडे गुजर समाजाचे विश्‍वस्त प्रवीण पाटील, सागर पठार आदी.

 

असे धर्मप्रेमी हीच हिंदु राष्ट्राची खरी शक्ती आहे !

सभेच्या प्रसाराच्या सेवेत झोकून देणारे धर्मशिक्षण
तसेच प्रशिक्षण वर्गात येणार धानोरा आणि मितावली या गावांतील धर्मप्रेमी !

धानोरा गावात सभेचे आयोजन झाल्यावर सभेच्या प्रसारासाठी धानोरा आणि आजूबाजूची १५ ते १६ गावे घेण्याचे नियोजन करण्यात आले. गेल्या २-३ मासापासून धानोरा येथे धर्मशिक्षणवर्ग आणि स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू आहे. तसेच मितावली या गावातही स्वरक्षण प्रक्षिक्षणवर्ग चालू आहे. या वर्गाला येणार्‍या धर्मप्रेमींनी सभेच्या प्रसारासाठी गावांचे दायित्व घेतले. त्यानुसार गावात जाऊन बैठका ठरवणे, हस्तपत्रके वाटणे, भित्तीपत्रके लावणे, अर्पण गोळा करणे आदी सेवा झोकून देऊन केल्या. यात सर्वश्री धीरज पाटील, सतीश इंगळे, पवन सोनावणे, मनोज कोळी, विनोद कोळी, कुणाल पाटील, रवींद्र कोळी, किरण पाटील, अमोल निकम, किशोर पाटील, चेतन साळुंके, ज्ञानेश्‍वर साळुंके, आकाश तायडे, तुषार पाटील, रवींद्र इंगळे, दीपक, विलास पाटील, विशाल महाजन, मुकेश महाजन, अमोल महाजन आदी धर्मप्रेमी सहभागी झाले होते.

विवाहाच्या प्रथम वाढदिवसाच्या दिवशी हातून धर्मकार्य
घडण्याची तळमळ ठेवणारे धानोरा येथील धर्मप्रेमी मनोज पाटील !

धानोरा येथील धर्मप्रेमी श्री. मनोज पाटील यांच्या विवाहाचा प्रथम वाढदिवस २५ नोव्हेंबर २०१८ या दिवशी होता. ते हिंदु जनजागृती समितीच्या कार्याशी मागील ८ मासांपासून जोडले गेले आहेत. समितीच्या धर्मशिक्षण आणि स्वरक्षण प्रशिक्षण वर्गात ते नियमित येतात. गावात धर्मसभा घ्यायची आणि तीसुद्धा २५ नोव्हेंबरलाच घ्यायची, अशी त्यांची मनापासून इच्छा होती. घरची आर्थिक स्थिती बेताची असतांनाही तसेच संपूर्ण घराचे दायित्व त्यांच्या एकट्यावर असतांनाही कसलाही विचार न करता त्यांनी सभेच्या सेवांसाठी १० दिवस झोकून दिले. त्यांच्या धर्मपत्नीनेही सेवांमध्ये सहभाग घेतला. ‘विवाहाच्या वाढदिवसाच्या दिवशी भगवंताने आपल्या हातून धर्मकार्य करवून घ्यावे’, अशी त्यांची तळमळ होती.

कृतज्ञता !

धानोरा येथे या सभेच्या यशस्वितेसाठी स्थानिक अनेक धर्मप्रेमी हिंदूंचे साहाय्य लाभले. येथील हॉटेल प्रशांतचे मालक श्री. प्रशांत शिवदास पाटील यांनी सभेच्या प्रचारासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना निवास व्यवस्था विनामूल्य उपलब्ध करून दिली. सभेच्या प्रचारार्थ रिक्शा उद्घोषणेसाठी एक दिवस चिंचोली येथील धर्मप्रेमी श्री. उदय पाटील यांनी त्यांची रिक्शा विनामूल्य उपलब्ध करून दिली. सभेच्या दिवशी सेवेसाठी आलेल्या साधक आणि कार्यकर्ते यांची अल्पाहाराची व्यवस्था श्री. संजू महाजन यांनी, तर रात्रीच्या भोजनाची व्यवस्था श्री. अश्‍विन महाजन आणि त्यांचे बंधू यांनी विनामूल्य केली. श्री. सचिन सैंदाणे यांनी सभेसाठी आसंद्या (खुर्च्या) विनामूल्य दिल्या, तर श्री. अप्पा रमेश कोळी यांनी वक्त्यांच्या स्वागतासाठी व्यवस्था केली. अशा प्रकारे अनेक स्थानिक धर्मप्रेमी हिंदु बांधव यांच्या साहाय्यामुळे हा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडला. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आम्ही सर्वांचे कृतज्ञ आहोत, असे समितीचे जळगाव समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर यांनी कळवले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात