सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना दोषी ठरवणे अन्यायकारक !

आरोपपत्र प्रत्यक्ष मिळाल्यावरच भूमिका स्पष्ट करू !

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणी नुकतेच पोलिसांनी पुरवणी आरोपपत्र सादर केले आणि काही माध्यमांनी यामध्ये सनातन संस्थेचे नाव असल्याची चर्चा चालू केली. आम्हाला आरोपपत्राची प्रत अद्याप उपलब्ध न झाल्याने, ती न वाचताच त्यावर बोलणे अयोग्य होईल. गौरी लंकेश प्रकरणी अटक झालेल्यांपैकी कोणीही सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे अधिकृत पदाधिकारी नसतांनाही विनाकारण संस्थेला या प्रकरणी गोवण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. अशा प्रकारे सनातन संस्थेचे नाव बदनाम करण्याचा यापूर्वी ही अनेकदा प्रयत्न झाला आणि प्रत्येक वेळी सनातन संस्था निर्दोष असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे राजकीय आरोपपत्रात सनातन संस्थेला अगोदरच दोषी धरणे योग्य होणार नाही, असे मत सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी व्यक्त केले आहे.

कथित विचारवंतांच्या हत्यांच्या प्रकरणांत आम्ही आजवर सर्व तपास यंत्रणांना सहकार्य केले. आजपर्यंत ‘सनातन संस्थेचा या प्रकरणांत सहभाग आहे’, हे सिद्ध होईल, असा एकही पुरावा मिळालेला नाही. तरीही काही तथाकथित पुरोगामी खरा खूनी मिळो न मिळो, ‘सनातन संस्थेने हत्या केली’ असे म्हणत संस्थेची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत.गौरी लंकेश प्रकरणात 10 वर्षांपूर्वीच हिंदु जनजागृती समितीचे कार्य सोडून देणार्‍या कार्यकर्त्याला अटक करून आणि तो समितीचा सक्रीय कार्यकर्ता असल्याचे भासवून हिंदु जनजागृती समितीला दोषी धरले जात आहे, हे षड्यंत्र नाही का ? त्यामुळे तपासयंत्रणांनी आरोपपत्रात नाव घेणे म्हणजे कोणी दोषी असल्याचे सिद्ध होत नाही. तरी आरोपपत्र मिळाल्यावरच याविषयी विस्ताराने भूमिका मांडू, असेही श्री. राजहंस या वेळी म्हणाले.

आपला नम्र,
श्री. चेतन राजहंस,

राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था.