साधनेद्वारे जन्मोजन्मीचे अयोग्य संस्कार नष्ट करून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेत सहभागी व्हा ! – सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात युवा
शिबिराचा उत्साही आणि चैतन्यमय वातावरणात प्रारंभ !

सद्गुरु (कु.) अनुराधाताईंचे मार्गदर्शन ऐकतांना शिबिरार्थी

देवद (पनवेल), १८ नोव्हेंबर (वार्ता.) – वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना होणार आहे. यासाठी तीन पिढ्यांनी परिश्रम करणे आवश्यक असून जन्म ते २० वर्षे वयोगटातील पिढी ही तिसरी पिढी आहे. या पिढीमध्ये जन्मापासूनच हिंदु राष्ट्र स्थापनेचा विचार असतो. पुढे स्थापन होणार्‍या ईश्‍वरी राज्यात हीच पिढी अधिक कार्यरत असणार आहे. तुम्ही युवा साधक या पिढीतील आहात. त्यामुळे साधनेद्वारे आपल्यातील जन्मोजन्मीचे अयोग्य संस्कार नष्ट करून हिंदु राष्ट्राच्या (ईश्‍वरी राज्याच्या) स्थापनेत सहभागी व्हा, असे मार्गदर्शन सनातनच्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी येथील सनातनच्या आश्रमात १६ नोव्हेंबरपासून चालू झालेल्या युवा साधक प्रशिक्षण शिबिरात केले. या चार दिवसीय शिबिराचा आरंभ शंखनाद करून करण्यात आले. या शिबिरात मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यातील आणि गुजरात राज्यातून युवा साधक सहभागी झाले आहेत.

निष्काम साधना केल्याने सुख-दु:खाच्या पलीकडील आनंद मिळतो ! – पू. (सौ.) संगीता जाधव

पू. (सौ.) संगीता जाधव

‘मनुष्यजन्म हा ईश्‍वरप्राप्तीसाठीच झाला आहे. निष्काम साधना केल्याने सुख-दु:खाच्या पलीकडील आनंद मिळतो. पृथ्वीवर संक्रमणकाळ चालू असल्याने साधना करणे आवश्यक आहे’, असे मार्गदर्शन सनातनच्या संत पू. (सौ.) संगीता जाधव यांनी केले.

क्षणचित्रे

१. प्रत्येक सत्रानंतर शिबिरार्थींचा उत्साह वाढत गेला.

२. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेचे सत्र झाल्यावर गटचर्चेत काही शिबिरार्थींनी स्वत:मध्ये असणारे स्वभावदोष आणि अहं यांची सूची बनवली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात