नरकासुर प्रतिमास्पर्धा आणि नरकासुरदहन प्रथेतील अपप्रकार यांच्या विरोधात प्रबोधन

कुडाळ आणि आंदुर्ले येथे श्रीकृष्ण फेरी

सिंधुदुर्ग – सध्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये नरकासुर प्रतिमास्पर्धांचे आयोजन अन् नरकासुरदहन प्रथेतील अपप्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. प्रत्यक्षात सत्प्रवृत्तीचा दुष्प्रवृत्तीवर विजय म्हणून नरकचतुर्दशी साजरी केली जाते. भगवान श्रीकृष्णाने भक्तांचा छळ करणार्‍या नरकासुराचा वध करून भक्तांचे रक्षण केले; परंतु काळाच्या ओघात ज्याचा वध केला, त्याच नरकासुराचा उदोउदो होतांना दिसतो. नरकासुराच्या सान्निध्यात वेळ घालवल्याने युवकांच्या मनावर अयोग्य संस्कार बिंबतात. हे टाळण्यासाठी समाजाने भगवान श्रीकृष्णाचा आदर्श घ्यावा आणि दीपावलीचा अध्यात्मशास्त्रीय लाभ सर्वांना व्हावा, या उदात्त हेतूने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्ह्यातील आंदुर्ले आणि कुडाळ शहर येथे दीपावलीच्या निमित्ताने श्रीकृष्ण प्रतिमाफेरी काढण्यात आली. या फेर्‍यांमध्ये धर्माभिमानी हिंदूंनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.

कुडाळ शहरातून निघालेली श्रीकृष्ण फेरी

कुडाळ

येथील श्री गवळदेव मंदिरात सद्गुरु सत्यवान कदम यांच्या हस्ते श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करून आणि श्रीफळ वाढवून फेरीचा प्रारंभ झाला. कुडाळ शहरात फिरून फेरी कुडाळ टपाल कार्यालयाजवळील सिंधुदुर्ग राजा पटांगण येथे आल्यावर सांगता करण्यात आली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. दैवेश रेडकर यांनी उपस्थितांना फेरी काढण्यामागील उद्देशासह राष्ट्र आणि धर्म यांच्या स्थितीविषयी मार्गदर्शन केले .

या फेरीत गांगोराई वारकरी संप्रदाय, श्री देव भोम प्रासादिक भजन मंडळ, आंदुर्ले; श्री साईहनुमान भजन मंडळ, वालावल; श्री कुलदेवता प्रासादिक भजन मंडळ, नेरुरपार या भजन मंडळांसह ३०० हून अधिक धर्माभिमानी हिंदू या फेरीत सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शिवानी रेडकर यांनी केले.

आंदुर्ले

आंदुर्ले येथे काढण्यात आलेली श्रीकृष्णाच्या प्रतिमेची फेरी

कापडोसवाडी येथून प्रारंभ झालेल्या येथील श्रीकृष्ण प्रतिमाफेरीची सांगता ग्रामदेवता श्री आंदुर्लाई देवी मंदिरात झाली. नरकासुराप्रमाणे समाजातील विकृतींच्या विरोधात समाजाला योग्य दिशा देणार्‍या अशा कार्यक्रमांत सर्वांनी जातपात, पक्ष बाजूला ठेवून मोठ्या संख्येने सहभागी झाले पाहिजे, असे प्रतिपादन आंदुर्ले गावच्या सरपंच सौ. पूजा सर्वेकर यांनी केले.

पंचायत समिती माजी सभापती संजय वेंगुर्लेकर म्हणाले, प्रतिवर्षी नरकचतुर्दशीच्या पूर्वसंध्येला गावात फेरीत काढली जाते. त्या वेळी मार्गात काही ठिकाणी नरकासुरांच्या प्रतिमा बघाव्या लागत असत. या वर्षी मात्र एक दिवस अगोदर (४ नोव्हेंबर या दिवशी) फेरी काढल्यामुळे फेरीच्या मार्गात नरकासुरांच्या प्रतिमा बघाव्या लागल्या नाहीत. त्यामुळे प्रतिवर्षी अशा प्रकारे एक दिवस आधी फेरी काढली, तर ते योग्य होईल.

गावातील ग्रामपंचायत सदस्य, तसेच प्रतिष्ठित यांसह ६५ धर्माभिमानी या फेरीमध्ये सहभागी झाले होते. फेरीची सांगता श्री देवी आंदुर्लाई मंदिरात सद्गुरूंचा श्‍लोक म्हणून करण्यात आली.

क्षणचित्रे

कुडाळ

१. एक पोलीस – तुमच्या कार्यक्रमाला पोलीस बंदोबस्ताची आवश्यकता नाही. तुमचे कार्यक्रम नेहमी शिस्तबद्ध असतात.

२. शहरातील मुख्य बाजारपेठेतून फेरी जात असतांना लोक फेरीचे चित्रीकरण करत होते.

३. कुडाळ येथील नरकासुर प्रतिमादहन कार्यक्रमाचे एक आयोजक – फेरी चांगली आणि शिस्तबद्ध आहे. फेरी पाहून चांगले वाटले.

४. या फेरीत श्रीकृष्णाने करंगळीवर उचलून धरलेल्या गोवर्धन पर्वताला काठ्या लावलेले गोपगोपी अशी वेशभूषा केलेल्या बालसाधकांचा चित्ररथ सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.

आंदुर्ले

१. फेरीच्या वेळी आकाशात ढग जमा झाले होते. पाऊस जवळच्या भागात मोठ्या प्रमाणात पडला; मात्र फेरीत श्रीकृष्णाची प्रतिमा असलेले वाहन असलेल्या ठिकाणी पावसाचा थोडासा शिडकाव झाला.

२. फेरीच्या मार्गात अनेक ग्रामस्थांनी श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन केले अन् ते फेरीत सहभागी झाले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात