सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी केलेल्या सवत्स गोपूजनाचे सूक्ष्म परीक्षण !

हिंदूंच्या विजयाचे, आनंदाचे, नवचैतन्याचे नि नवउत्साहाचे क्षण म्हणजे दिवाळी ! हिंदूंच्या वैभवशाली इतिहासाचे स्मरण करून देणारा हा दिव्यांचा सण केवळ भारतातच नाही, तर जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या मंगल उत्सवाच्या निमित्ताने आज १ नोव्हेंबरपासून ‘दिवाळी : धर्मशास्त्र, आध्यात्मिक संशोधन आणि अन्य वैशिष्ट्यपूर्ण माहिती !’ या विशेष सदरास आरंभ करत आहोत.
प्रभु श्रीरामचंद्र अयोध्येला आल्याचा आनंद म्हणून साजरा करण्यात येणार्‍या नि लक्षावधी वर्षांची परंपरा लाभलेल्या या सणाचे धर्मशास्त्र, दिवाळीतील धार्मिक कृतींमागील विज्ञान प्रतिपादणारे आध्यात्मिक संशोधनाचे प्रयोग अन् अन्य वैशिष्ट्यपूर्ण माहिती या सदराच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ.

‘चेन्नई येथील भृगु जीवनाडीवाचन करणारे श्री. सेल्वमगुरुजी यांच्या आज्ञेनुसार २५.९.२०१८ या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमात सवत्स गायीचे (ज्या गायीने वासराला जन्म देऊन ७ दिवस पूर्ण व्हायचे आहेत, अशा गायीचे) पूजन सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले. अशा गोपूजनाला ‘उभय गोमुखी दान’ असे म्हणतात. गोपूजनाचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण पुढीलप्रमाणे आहे.

कु. मधुरा भोसले

 

१. पूजनाचा उद्देश

सवत्स गोपूजनामुळे कामधेनूचा आशीर्वाद मिळतो, तसेच ग्रहपीडा दूर होऊन समस्त पापे नष्ट होतात. गोपूजन केल्यामुळे साधक आणि हिंदुत्वनिष्ठ यांंना समष्टी स्तरावर होणारे सर्व प्रकारचे त्रास गायी स्वत:कडे घेते अन् तिच्यामध्ये असणार्‍या ३३ कोटी देवतांच्या तत्त्वांनी हे समस्त त्रास दूर होतात.

सवत्स गायीला नमस्कार करतांना डावीकडून सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

 

२. गोपूजनाच्या संदर्भात आलेल्या अनुभूती आणि त्यामागील कार्यकारणभाव

२ अ. देवाने सूक्ष्मातून साहाय्य करून महर्षि भृगूंनी
सांगितल्याप्रमाणे ७ दिवसांच्या आतील वासराला जन्म दिलेली गाय पूजनासाठी मिळणे

देवाच्या कृपेनेच पूजनाच्या आदल्या दिवशी एका साधकाला व्यायलेली गाय रस्त्यावर दिसली. गोपूजन करण्याचा आदेश महर्षि भृगु यांनी दिल्यामुळे हे पूजन संपन्न होण्यासाठी त्यांचा संकल्प कार्यरत होता. त्यामुळे साधकांना विशेष परिश्रम न करता सवत्स गोमाता पूजनासाठी मिळाली.

२ आ. वाईट शक्तींनी गायीवर आक्रमणे केल्यामुळे ती दिवसातून चार
वेळा खाली पडणे; परंतु देवाच्या कृपेने तिला कसल्याही प्रकारची दुखापत न होणे

२५.९.२०१८ या दिवशी गाय चार वेळा खाली पडली. तिच्या दिशेने साधक श्री. दादा कुंभार यांनी विभूती फुंकल्यावर गाय उठून उभी राहिली आणि ती पूजनाच्या ठिकाणी आली. पूजनाला आरंभ करण्यापूर्वी गाय खुंट्याभोवती गोल फिरून पुन्हा खाली पडली. सनातनचे साधक आणि प्राण्यांचे वैद्य श्री. अजय जोशी यांनी गायीला तपासले; तेव्हा ती शारीरिकदृष्ट्या निरोगी असल्याचे आढळले. सूक्ष्मातूनही गायीला आतून त्रास नव्हता, तर तिच्यावर बाहेरून विविध दिशांनी सूक्ष्मातील आक्रमणे होत होती. ‘साधकांना गोपूजनाचा लाभ होऊ नये आणि साधकांना होणारी ग्रहपीडा अन् अन्य प्रकारचे आध्यात्मिक त्रास दूर होऊ नयेत’, यासाठी वाईट शक्तींनी गायीवर सूक्ष्मातून आक्रमणे करून तिला खाली पाडले. वाईट शक्तींनी गायीवर सूक्ष्मातून आक्रमणे करून तिची प्राणशक्ती खेचून घेतल्यामुळे तिला घेरी येऊन ती खाली पडली. प्राणशक्ती न्यून झाल्यामुळे गायीने डोळे वरच्या दिशेने फिरवले होते. तिच्याकडे पाहून ‘ती गतप्राण होते कि काय ?’, असे वाटत होते. देवाच्या कृपेने गोमाता भूमीवर ४ वेळा पडूनही तिला कसल्याही प्रकारची दुखापत किंवा हानी झाली नाही.

२ इ. ‘सद्गुरुद्वयींनी गोपूजन करू नये’, यासाठी वाईट शक्तींनी त्यांच्या
कर्मेंद्रियांवर सूक्ष्मातून आक्रमण केल्यामुळे त्यांच्या तळहाताला आणि बोटांना दुर्गंध येणे

पूजनाला आरंभ करण्यापूर्वी दोन्ही सद्गुरूंच्या तळहाताला आणि बोटांना दुर्गंध येत होता. ‘सद्गुरुद्वयींनी गोपूजन करू नये’, यासाठी वाईट शक्तींनी त्यांच्या कर्मेंद्रियांवर सूक्ष्मातून आक्रमण करून त्यांच्या हातावर त्रासदायक शक्तीचे आवरण निर्माण केले. जेव्हा सद्गुरुद्वयींनी तळहातावर विभूती चोळली, तेव्हा त्यांच्या तळहाताला येणारा दुर्गंध क्षणार्धात नाहीसा झाला.

 

३. गायीच्या वासराची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये

गायीचे वासरू पुष्कळ निरागस आणि सात्त्विक दिसत होते. त्याच्याकडे पहातांना भाव जागृत होऊन चैतन्य आणि आनंद जाणवत होता. गाय खाली पडल्यावर वासरू तिला चाटून तिच्यावर आध्यात्मिक उपाय करत होते. जेव्हा वासरू गायीचे स्तनपान करत होते, तेव्हा त्याला गायीमध्ये असणार्‍या विविध देवतांची तत्त्वे गायीच्या दुधातून मिळत होती. गाय सात्त्विक असल्यामुळे तिचे स्तनपान केल्यामुळे वासराला चांगली शक्ती आणि चैतन्य मिळाले.

 

४. गोपूजनाच्या धार्मिक विधीच्या आधी केलेल्या इतर धार्मिक विधींचे सूक्ष्म परीक्षण

४ अ. सद्गुरुद्वयींनी गणेशाचे स्मरण करणे

पूजनाला आरंभ करण्यापूर्वी सद्गुरुद्वयींनी श्री गणेशाचे स्मरण केले. श्री गणेशाच्या स्मरणामुळे पूजनाच्या ठिकाणी श्री गणेशाचे तत्त्व कार्यरत झाले आणि त्याने पूजनामध्ये येणारे समस्त अडथळे दूर केले. श्री गणेशाच्या आगमनामुळे अष्टदिक्पालांनी अष्टदिशांची दारे उघडली. त्यामुळे अष्टदिशांतून पूजनस्थळी देवतांची तत्त्वे सहजरित्या येऊ लागली.

४ आ. सद्गुरुद्वयींनी पूजेचा संकल्प करणे

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या महामृत्यूयोगाचे निवारण व्हावे आणि त्यांना दीर्घायुष्य लाभावे, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील सर्व प्रकारचे अडथळे दूर होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर व्हावी, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील मिथ्या आरोप दूर होऊन त्यांची अपकीर्ती थांबावी अन् परात्पर गुरु डॉ. आठवले, साधक आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ यांच्यावरील समस्त अरिष्ट दूर व्हावे’, यासाठी सवत्स गोपूजन करत आहोत’, असा संकल्प सद्गुरुद्वयींनी केला.

४ आ १. संकल्प चालू असतांना आलेल्या अनुभूती
४ आ १ अ. गायीने मान हलवून अनुमोदन देणे

संकल्प चालू असतांना गायीला मंत्र समजल्याप्रमाणे तिने मान वर-खाली हलवून मंत्राला अनुमोदन दिले.

४ आ १ आ. संकल्पविधी चालू असतांना सप्तर्षींचे प्रतीक असणारे विमान आकाशातून जाणे

पूजनाचा संकल्प चालू असतांना आकाशातून विमान गेले. गोपूजन करण्याचा आदेश महर्षि भृगु यांनी दिल्यामुळे पूजनाचा संकल्प सिद्ध व्हावा, यासाठी सप्तर्षींची शक्ती कार्यरत झाली होती. सप्तर्षि सूक्ष्मातून पूजनाच्या ठिकाणी विहंगम्, म्हणजे पक्षाच्या गतीप्रमाणे आकाशमार्गाने आले होते. याचे द्योतक म्हणजे आकाशातून विमान गेले.

 

५. गोपूजनाच्या धार्मिक विधीचे सूक्ष्म परीक्षण

५ अ. सद्गुरुद्वयींनी गोमातेचे ध्यान करणे

साधक-पुरोहित श्री. दामोदर वझे यांनी सांगितल्याप्रमाणे सद्गुरुद्वयींनी गोमातेचे ध्यान केले. तेव्हा ब्रह्मांडात सूक्ष्मतर रूपाने कार्यरत असणारे कामधेनूचे तत्त्व पृथ्वीवर पूजन चालू असणार्‍या गोमातेमध्ये आकृष्ट होऊन कार्यरत झाले. तेव्हा आकाशातून पिवळसर पांढर्‍या रंगाचा प्रकाशझोत गोमातेच्या दिशेने येऊन तिच्या अंगावर पडला.

५ आ. सद्गुरुद्वयींनी गोमातेवर अक्षता वाहणे

सद्गुरुद्वयींनी गोमातेवर अक्षता वाहिल्या. तेव्हा तिला बसण्यासाठी पूजनाच्या ठिकाणी सूक्ष्मातून रत्नजडित सुवर्ण आसन सिद्ध झाल्याचे दिसले.

५ इ. सद्गुरुद्वयींनी गोमातेच्या चरणांवर पाणी ओतून तिला अर्घ्य देणे आणि मुखाकडे आचमनासाठी जल देणे

सद्गुरुद्वयींनी गोमातेच्या चरणांवर पाणी ओतून तिला अर्घ्य दिले आणि मुखाकडे आचमनासाठी जल दिले; तेव्हा समस्त नद्यांचे तीर्थ या पाण्यात कार्यरत होऊन गोमातेने ते जल अर्घ्य अन् आचमन यांच्यासाठी स्वीकारून सूक्ष्मातून प्राशन केल्याचे जाणवले.

५ ई. सद्गुरुद्वयींनी गोमातेच्या शरिरावर विविध ठिकाणी जल ओतणे

‘गायीला स्नान घालत आहोत’, असा भाव ठेवून सद्गुरुद्वयींनी तिच्या शरिरावर विविध ठिकाणी जल ओतले; तेव्हा गायीमध्ये लक्ष्मीतत्त्व जागृत होऊन तिच्यामध्ये स्वर्गातील कामधेनूचे रूप कार्यरत झाले. तिच्या शरिरावर विविध ठिकाणी इंद्रियांमध्ये असणार्‍या वरुण, पवन, दिक्पाल, रुद्र, वसू, आदित्य इत्यादी देवतांची तत्त्वे जागृत झाली. पूजन चालू असतांना गोमातेची दृष्टी सद्गुरुद्वयींच्या चरणांकडे होती. यांतून गोमातेमध्ये शरणागत भाव आणि कृतज्ञताभाव जागृत असल्याचे जाणवले.

५ उ. सद्गुरुद्वयींनी गोमातेच्या पाठीवर रेशमी वस्त्र पांघरणे

सद्गुरुद्वयींनी गोमातेच्या पाठीवर रेशमी वस्त्र पांघरले. तेव्हा रेशमातील तेजोमय चैतन्यदायी लहरींचा स्पर्श गायीला झाल्यामुळे तिच्यामध्ये तेजतत्त्वाने युक्त सगुण-निर्गुण स्तरावरील चैतन्य कार्यरत झाले आणि वातावरणात वेगाने प्रक्षेपित झाले. हीच प्रक्रिया वासराला रेशमी वस्त्र पांघरल्यावर झाली.

५ ऊ. सद्गुरुद्वयींनी गायीला चंदन, कस्तुरी, हळद आणि कुंकू वाहणे

सद्गुरुद्वयींनी गायीला चंदन, कस्तुरी, हळद आणि कुंकू वाहिले. तेव्हा भूमीतत्त्वाने युक्त असणार्‍या गंधलहरींचा स्पर्श गायीच्या कपाळाला झाल्यामुळे तिचे आज्ञाचक्र जागृत झाले आणि त्यातून वातावरणात सकारात्मक ऊर्जा अन् चैतन्य यांचे प्रक्षेपण झाले. त्यामुळे वातावरणाची शुद्धी झाली.

५ ए. सद्गुरुद्वयींनी गायीच्या आज्ञाचक्राला हळद आणि कुंकू लावणे

सद्गुरुद्वयींनी गायीच्या आज्ञाचक्राला हळद आणि कुंकू लावले, तेव्हा हळदीमुळे पृथ्वीतत्त्व आणि कुंकवामुळे तेजतत्त्व कार्यरत झाले अन् गायीची चंद्र, सूर्य आणि सुषुम्ना या तिन्ही नाड्यांची शुद्धी होऊन त्या जागृत झाल्या. गायीच्या नाड्यांमधून प्रवाहित होणारे आध्यात्मिक तेज गायीच्या विविध अवयवांतून वातावरणात वेगाने प्रक्षेपित होऊन वातावरणाची शुद्धी झाली.

५ ऐ. सद्गुरुद्वयींनी गायीला अक्षता वाहणे

सद्गुरुद्वयींनी गायीला अक्षता वाहिल्यावर तिच्यामध्ये ईश्‍वराचे सर्वसमावेशक तत्त्व कार्यरत झाले आणि अक्षतांच्या माध्यमातून गायीच्या दिशेने ईश्‍वराची शक्ती अन् चैतन्य प्रक्षेपित झाले.

५ ओ. गायीला कापसाचा हार घालणे

गायीला अलंकार घालण्यासाठी अलंकाराचे प्रतीक असणारा कापसाचा हार घालण्यात आला. तेव्हा कापसाच्या हारातून सोन्याचे दिव्य अलंकार सूक्ष्मातून प्रगट होऊन हे अलंकार गायीने धारण केल्याचे सूक्ष्मातून दिसले.

५ औ. गायीला खाण्यासाठी गुळाचा नैवेद्य दिल्यावर पुढील सूक्ष्म परिणाम

५ औ १. गूळ खातांना गायीने सद्गुरुद्वयींचे तळहात चाटले. तेव्हा तळहातावरील ‘अग्नितीर्थ, ऋषितीर्थ, देवतीर्थ, पितृतीर्थ आणि आत्मतीर्थ’, ही पाच महातीर्थे जागृत झाली. त्यामुळे सद्गुरुद्वयींच्या सूक्ष्म देहांची शुद्धी झाली.

५ औ २. तळहातावरील भाग्यरेषांना गायीच्या जिभेचा स्पर्श झाल्याने साधकांच्या भाग्यातील दु:ख आणि संकटे गायीच्या कृपेने दूर झाल्याचे जाणवले.

५ औ ३. गुळामध्ये सात्त्विकता असल्यामुळे गायीने गुळाचा नैवेद्य ग्रहण केल्यामुळे गायीमध्ये सात्त्विक आणि तारक शक्ती जागृत झाली अन् तिची मारकता न्यून झाली. त्यामुळे गायीकडून साधकांना पुष्कळ आशीर्वाद मिळाले.

५ अं. सद्गुरुद्वयींनी गायीला सात्त्विक वनस्पतींपासून बनवलेल्या उदबत्तीने ओवाळून धूप दाखवला आणि नंतर उडदाच्या वड्यांचा नैवेद्य दाखवला. याचा परिणाम पुढीलप्रमाणे झाला.

५ अं १. गायीला उदबत्तीने ओवाळल्यामुळे गायीभोवती गंधमय वायूचे, म्हणजे पृथ्वी आणि वायू या तत्त्वांच्या चैतन्याचे संरक्षककवच निर्माण झाले आणि तिच्यावर बाहेरून होणार्‍या सूक्ष्मातील वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून तिचे रक्षण झाले.

५ अं २. गायीला तुपाच्या निरांजनाने ओवाळल्यामुळे तिच्या देहात चैतन्यलहरी प्रविष्ट होऊन तिच्या सप्तचक्रांची जागृती झाली.

५ अं ३. गायीला दाखवलेल्या उडदाच्या वड्यांच्या नैवेद्याकडे साधकांची कायिक (स्थूल देहाने केलेली), वाचिक (जिभेने केलेली) आणि मानसिक (मनाने केलेली) पापकर्मे, साधकांना लागलेले ग्रहदोष, नक्षत्रदोष आणि अन्य दोष, तसेच साधकांवरील वाईट शक्तींची आक्रमणे यांची स्पंदने खेचली गेली. गायीने उडदाच्या वड्यांचा नैवेद्य ग्रहण केल्यामुळे साधकांना आध्यात्मिक स्तरावर होणार्‍या विविध प्रकारच्या त्रासांचे आणि दोषांचे निवारण झाले. पाप जड असल्यामुळे पापाच्या लहरींनी भारित झालेले उडदाचे वडे गायीने ग्रहण केल्यामुळे गायीला पापाचे वजन न पेलवल्यामुळे ती भूमीवर झोपली. थोड्या वेळाने गायीमध्ये कार्यरत असणार्‍या देवतांच्या तत्त्वलहरींचा प्रभाव गायीने ग्रहण केलेल्या उडदामधील पापाच्या लहरींवर होऊन साधकांच्या पापाचे क्षालन झाले; तेव्हा गायीने स्थुलातून जोराने उच्छ्वास सोडला.

५ क. सद्गुरुद्वयींनी गायीला विड्याचे पान आणि फळांमध्ये श्रेष्ठ असणारे श्रीफळ (नारळ) अर्पण करणे

सद्गुरुद्वयींनी गायीला विड्याचे पान आणि फळांमध्ये श्रेष्ठ असणारे श्रीफळ (नारळ) अर्पण केला. त्यामुळे साधकांची सात्त्विक कर्मे विड्याच्या पानाकडे आणि पुण्य श्रीफळाकडे आकृष्ट होऊन ते कामधेनूच्या चरणी अर्पण झाले. गोमातेने प्रसन्न होऊन ‘साधकांना जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त व्हाल’, असा कृपाशीर्वाद दिला.

५ ख. सद्गुरुद्वयींनी गायीला कापराच्या आरतीने ओवाळणे

सद्गुरुद्वयींनी गायीला कापराच्या आरतीने ओवाळले; तेव्हा तिच्या आज्ञाचक्रातून वातावरणात तेजोमय चैतन्यलहरींचे प्रक्षेपण चालू झाले. या चैतन्यलहरींचा सूक्ष्म स्पर्श तिच्या वासराला झाल्यामुळे, वासराने स्थुलातून डोळे उघडून गायीकडे पाहिले. (पूजनाला आरंभ झाल्यावर गायीमध्ये प्रकट झालेलेे तेज वासराला सहन न झाल्यामुळे वासरू डोळे मिटून ध्यानस्थ बसले होते.)

५ ग. सद्गुरुद्वयींनी गायीला नमस्कार करणे

सद्गुरुद्वयींनी गायीला नमस्कार अर्पण केला; तेव्हा गायीने तिचे तोंड वरच्या दिशेने करून उघडले. गायीमध्ये स्थित असणारा प्राण, उदान, समान, व्यान आणि अपान हे पाच प्रकारचे सूक्ष्म वायू तिच्या तोंडावाटे उर्ध्वदिशेला प्रक्षेपित झाले अन् वातावरणाची शुद्धी होऊन वातावरण चैतन्यमय झाले. गायीने सद्गुरुद्वयींचा नमस्कार स्वीकारून साधकांच्या कल्याणाचा आशीर्वाद दिला.

५ घ. सद्गुरुद्वयींनी गायीला आणि वासराला तीन प्रदक्षिणा घालणे

सद्गुरुद्वयींनी गायीला आणि वासराला तीन प्रदक्षिणा घातल्या; तेव्हा साधकांचे कायिक (स्थूल देहाने केलेली), वाचिक (जिभेने केलेली) आणि मानसिक (मनाने केलेली) स्थूल अन् सूक्ष्म स्तरावरील कर्मे कामधेनू गोमातेच्या चरणी, धर्मवृषभाचे (बैलाचे) बालरूप असणार्‍या वासराच्या चरणी अन् गायीमध्ये वास करणार्‍या ३३ कोटी देवतांच्या चरणी अर्पण झाली. गायीने प्रसन्न होऊन साधकांना ‘तुम्ही कर्मबंधनातून मुक्त व्हाल’, असा आशीर्वाद दिला.

५ च. मंत्रपुष्पांजली म्हणणे

साधक पुरोहित श्री. दामोदर वझे यांनी मंत्रपुष्पांजली म्हणून ती गायीच्या चरणी अर्पण केली; तेव्हा सूक्ष्मातून देवलोकातील देवतांनी स्वर्गलोकातील दिव्य फुलांचा वर्षाव गायीवर करून तिच्या चरणी मंत्ररूपी फुले वाहिली. तेव्हा गायीमध्ये ‘नंदिनी, कपिला, सुरभी, सबाला आणि नंदा’, ही कामधेनूची पाच रूपे सूक्ष्मातून प्रकट होऊन कार्यरत झाली.

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), (२५.९.२०१८)

५ छ. सद्गुरुद्वयींनी गोमातेला प्रार्थना करणे

‘सद्गुरुद्वयींनी गोमातेला ‘साधकांची कामनापूर्ती होऊ दे’, अशी प्रार्थना केल्यावर तिने जोराने उच्छ्वास सोडला. साधकांच्या कामनापूर्तीमध्ये सूक्ष्मातील वाईट शक्ती आणि दूषित कर्म अडथळे निर्माण करत होते. त्यांचे निवारण करण्यासाठी गायीने जोराने उच्छ्वास सोडून तिची सूर्यनाडी जागृत केली. तिच्या सूर्यनाडीतून वातावरणात प्रक्षेपित होणार्‍या मारक शक्तीच्या प्रभावामुळे सूक्ष्मातील वाईट शक्ती आणि दूषित कर्म यांमुळे निर्माण झालेल्या तमोगुणाच्या लहरींचे उच्चाटन झाले.

५ ज. सद्गुरुद्वयींनी गायीच्या पायावर पादप्रक्षालनासाठी अर्घ्य देणे

सद्गुरुद्वयींनी गायीच्या पायावर पादप्रक्षालनासाठी अर्घ्य दिले, तेव्हा गोमातेच्या पायामध्ये स्थित असणार्‍या धर्मदेवतेचे तत्त्व जागृत होऊन त्याची स्पंदने कार्यरत झाली. गायीला दिलेल्या अर्घ्याचे तीर्थ सद्गुरुद्वयींनी त्यांच्या डोक्यावर प्रोक्षण केले. तेव्हा त्या जलातील चैतन्य लहरींनी सद्गुरुद्वयींच्या सहस्रारचक्रातून त्यांच्या देहात प्रवेश केला आणि त्यांचा देह चैतन्याने भारित झाला.

५ झ. सद्गुरुद्वयींनी गायीच्या संपूर्ण शरिरावर विविध ठिकाणी न्यास करणे

साधक पुरोहित श्री. दामोदर वझे यांनी सांगितल्याप्रमाणे विशिष्ट मंत्र चालू असतांना सद्गुरुद्वयींनी गायीच्या संपूर्ण शरिरावर विविध ठिकाणी न्यास केला. त्यामुळे गायीच्या विशिष्ट अवयवांशी संबंधित असणार्‍या देवतांचे सुप्तावस्थेतील तत्त्व जागृत होऊन कार्यरत झाले. गायीमध्ये ३३ कोटी देवतांचा वास असल्यामुळे तिला ‘सर्वदेवमयी गौ’ म्हटले जाते.

 

६. सद्गुरुद्वयींनी सवत्स गायीचे पूजन करण्याचे आध्यात्मिक महत्त्व

कामधेनूची प्रजनन क्षमता आणि इच्छापूर्ती करण्याची क्षमता सर्वाधिक असते. सवत्स गायीमध्ये सृजनशीलता आणि उत्पत्तीची शक्ती कार्यान्वित झालेली असते. अशा गायीमध्ये कामधेनूचे तत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत झाल्यामुळे सवत्स गायीचे पूजन केले जाते.

सवाष्ण स्त्रियांमध्ये सृजनशीलता, सौभाग्य लक्ष्मीचे तत्त्व आणि उत्पत्तीची शक्ती कार्यान्वित झालेली असते. सद्गुरुद्वयी सवाष्ण असल्यामुळे त्यांच्यामध्ये सौभाग्यलक्ष्मीचे तत्त्व कार्यरत झाले होते. अशा प्रकारे लक्ष्मीतत्त्व प्रबळ असणार्‍या सौभाग्यवती सद्गुरुद्वयींनी सवत्स गायीचे पूजन केल्यामुळे गायीमध्ये सुप्तावस्थेत असणारे देवत्व प्रगट होऊन गायीकडून दैवी तेज आणि चैतन्य वातावरणात अधिकाधिक प्रमाणात प्रक्षेपित झाले. त्याचा लाभ साधकांना झाला.

अ. गायीच्या पावलांवर हळदी-कुंकू आणि फुले वहाणे

आ. तुपाच्या निरांजनाने गायीला ओवाळणे

इ. गायीला केळीच्या पानावर उडदाच्या वड्यांचा नैवेद्य देणे

उडदाच्या वड्यांमध्ये पाप आणि पीडा यांची स्पंदने शोषून घेण्याची क्षमता असल्याने साधकांना लागलेले समष्टी पाप अन् ग्रहपीडा उडदाच्या वड्यांकडे आकृष्ट झाली अन् गायीने उडदाचे वडे खाल्ल्यामुळे साधकांचे समष्टी पाप, ग्रहपीडा आणि समस्त त्रास नष्ट झाले. वरील कृतींमुळे साधकांचे प्रतिनिधित्व करणार्‍या सद्गुरुद्वयींना पुष्कळ पुण्य प्राप्त झाले.

कृतज्ञता !

‘भगवंताच्या कृपेमुळे गोमातेचे पूजन पहाण्याची संधी मिळाली आणि त्याविषयीचे ज्ञान सूक्ष्म परीक्षणातून मिळाले, यासाठी मी भगवंताच्या चरणी कृतज्ञ आहे.’

– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.१०.२०१८)