(म्हणे) ‘सनातन संस्था आणि भिडे(गुरुजी) या नाण्याच्या दोन बाजू !

जितेंद्र आव्हाड यांचा आणखी एक शोध

रामनाथ (अलिबाग), ३१ ऑक्टोबर (वार्ता.) – जो कोणी म्हणत असेल की, सनातन संस्था आणि भिडे(गुरुजी) वेगळे आहे, हे मी मानायला तयार नाही. या नाण्याच्या दोन बाजू आहेत. मिरजेच्या दंगलीत मलगोंडा पाटील आणि भिडेला एकत्र पकडले गेले. मलगोंडा पाटलाच्या गाडीत तलवारी होत्या. तोे दंगलीमध्ये ‘सुपर’ काम करत होता, असे अनेक जावईशोध राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांनी येथे लावले. संभाजी ब्रिगेडच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन नुकतेच येथे पार पडले. त्यामध्ये ते बोलत होते.

आव्हाड पुढे म्हणाले की,

१. गौरी लंकेशच्या हत्येत अमोल काळे नावाचा मुलगा पकडला गेला. कर्नाटक पोलिसांनी अमोल काळेला पकडला नसता, तर माझी ‘विकेट’ श्रावणात किंवा पितृपक्षातच गेली असती. त्यांनी माझ्या घरासह कार्यालयाचीही रेकी केली. आमच्या नशिबाचा भाग म्हणून काळे पकडला गेला.

२. जर कर्नाटक पोलीस एक माणूस मिळाल्यावर आख्खी ‘गँग ओपन’ करतात आणि या चारही खुन्यांचे सूत्रधार एक आहेत, असे जाहीर करतात. तेव्हा तुम्ही भिडे आणि सनातन वेगळे आहे असे कसे मानता ? (पू. भिडेगुरुजी आणि सनातन संस्था एक आहे असे म्हणणार्‍या जितेंद्र आव्हाड यांना दोघांचेही कार्य जराही माहिती नाही, असेच यातून स्पष्ट होते. अशा आव्हाड यांना सनातनवर बंदीची मागणी करण्याचा काय अधिकार ? – संपादक)

३. एखाद्या समुदायात येऊन तिथ बॉम्ब फोडण फार सोप आहे; पण पानसरे आणि दाभोलकरांचा मागोवा घेऊन त्यांना मारायच हे प्रथमच महाराष्ट्रात घडत असून हे आतंकवादाचे बदलते स्वरूप आहे. (हिंदुत्वनिष्ठांवर अनेक जीवघेणी आक्रमणे झाली, सामाजिक कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या, भिवंडी येथे धर्मांधांनी पोलिसांचे लचके तोडून ठार केले असे असतांना त्याविषयी चकार शब्द न काढणारे आव्हाड सोयीस्कर विधाने करत आहेत. – संपादक)

४. कोरेगाव भीमाच्या माध्यमातून सांस्कृतिक दंगली पेटवण्याचा प्रयत्न झाला. यात इतिहासाचे विकृतीकरण करून जे रंगवल त्यामुळे बहुजन समाजाची मुले बळी पडली. (राहुल फटांगडेच्या मृत्यूविषयी आव्हाड का बोलत नाहीत ? – संपादक) आपल्यामध्ये जातीव्यवस्था भक्कम असून ती तोडण्याचे काम संभाजी ब्रिगेड करत असल्याने मी संभाजी ब्रिगेडमध्ये आहे. जातीच्या भिंती तोडणे अवघड असून आपल्यातला मनु, हिंदु कधीना कधी जागा होतो. तो जोपर्यंत आपण मारून टाकत नाही, तोपर्यंत या देशातील आतंकवाद संपू शकत नाही. (संभाजी ब्रिगेड काय ‘तोडण्याचे’ काम करत आहे, हे महाराष्ट्राने पाहिले आहे. तसेच ‘आम्ही म्हणू तो खरा इतिहास’ हा आतंकवाद करणारे कधी राज्यात शांतता ठेवू शकतील का ? – संपादक)

(म्हणे), ‘जो देव स्त्रियांना अपवित्र आणि
तुच्छ समजतो तो देव, धर्म असू शकत नाही !’ – श्रीमंत कोकाटे

मासिक पाळीविना गर्भधारणा होऊ शकत नाही. जे कोणी मासिक पाळीला अपवित्र समजतात, ते मासिक पाळीमुळेच आईच्या उदरातून आले आहेत, हे लक्षात ठेवा. त्यामुळे मासिक पाळी अपवित्र नाही. जो देव स्त्रियांना अपवित्र आणि तुच्छ समजतो देवच असू शकत नाही, तो धर्मच असू शकत नाही. तो अर्धम असू शकतो. सर्वोच्च न्यायालयाने याविषयी निर्णय देऊनही त्याला भाजप आणि संघ विरोध करत आहेत, असे संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते श्रीमंत कोकाटे यांनी सांगितले. (धर्मशास्त्र लक्षात न घेता विरोधासाठी विरोध करणारे कोकाटे यांनी मुसलमान स्त्रियांच्या दु:स्थितीविषयी इस्लामविषयी कधी असे बोलण्याचे धाडस केले असते का ? – संपादक)

ते पुढे म्हणाले की, देशात गोवंश हत्याबंदी कायदा करण्याची कोणत्याही शेतकर्‍यांची मागणी नव्हती, ती संघाची मागणी होती. गाईच्या माध्यमातून हिंदु-मुसलमानांचे ध्रुवीकरण करण्याचा उद्देश होता. आहाराचा संबंध धर्माशी जोडणे चुकीचे आहे. सध्या आपला आहार, पेहराव, सण-समारंभ, भाषण यांवर नियंत्रण आणले जात आहे. कोणते पुस्तक लिहावे, कोणते विचार मांडावे यावरही नियंत्रण आणणे अशा प्रकारे आतंकवादी राजकारण देशात निर्माण झाले आहे. हा संविधानाला धोका आहे. संविधान बदलण्याची भाषा होत आहे. (साहित्याची नासधूस, पुतळे फोडण्याची भाषा करणे आणि विकृत इतिहास जनतेच्या माथी मारू पहाणे हा आतंकवाद नाही का ? – संपादक)

संभाजी ब्रिगेडने तलवारीसह लेखणी हाती घ्यावी ! – खासदार संभाजी राजे

बहुजनांच्या पाठिशी असणार्‍या संभाजी ब्रिगेडचे काम हे छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या विचारधारेवर आधारित आहे. संभाजी ब्रिगेड कार्यकर्त्यांनी तलवारीसह आता लेखणी घेऊन काम करावे, असे आवाहन खासदार संभाजी राजे यांनी केले. (इतिहासाचे विकृतीकरण करून ब्राह्मणांविषयी द्वेष पसरवणार्‍या आणि इतिहासकारांना धमक्या देणार्‍या संभाजी ब्रिगेडचे कार्य छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या विचारधारेप्रमाणे म्हणणे हा महाराजांचा अपमान नव्हे का ? याविषयी खासदार संभाजी राजे संभाजी ब्रिगेडचे प्रबोधन करणार का ? – संपादक)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात