सनातनचे ९ वे समष्टी संत पू. बाबा (सदानंद) नाईक (वय ७६ वर्षे) यांचा साधनाप्रवास ! – भाग २

सेवेची तीव्र तळमळ, गुरूंप्रती भाव
आणि अतूट श्रद्धा असणारे पू. बाबा (सदानंद) नाईक !

गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या सनातनच्या काही संतांचा साधनाप्रवास येथे प्रकाशित करत आहोत. सनातनचे ९ वे समष्टी संत पू. बाबा (सदानंद) नाईक यांचा साधनाप्रवास येथे देत आहोत.

८. अनुभूती

८ अ. शिक्षण घेतलेले नसतांनाही सनातन प्रभात वाचू शकणे

पूर्वी मी आध्यात्मिक ग्रंथ वाचत असे; परंतु मला वाचनाचा कंटाळा यायचा. मी शिक्षण घेतलेले नसल्याने मला वाचनाचा त्रास व्हायचा. मोठे छापील अक्षर वाचणे जमायचे; पण पेनने लिहिलेले मला कळायचे नाही. त्यामुळे मी ते वाचणे बंद करायचो. सनातन संस्थेत आल्यानंतर मला विविध दायित्वे मिळाली. त्या वेळी मी परात्पर गुरुदेवांना सांगितले, ‘‘मला काहीही लिहिता-वाचता येत नाही.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘शिकलेले लोक काय उजेड पाडतात !’’ त्यानंतर मी वाचण्याचा पुष्कळ प्रयत्न केला आणि मला बर्‍यापैकी वाचता येऊ लागले. त्यांच्याच कृपेने मी आता पूर्ण दैनिक, तसेच ग्रंथ वाचू शकतो.

८ आ. वाईट शक्ती दिसणे आणि तेव्हा गुरुदेवांना हाक मारल्यावर त्या निघून जाणे

मला वाईट शक्ती दिसत नाहीत; पण त्यांची सावलीसारखी जाणीव होते. माझ्यासह सतत गुरुदेव असल्याने त्यांना लगेच प्रार्थना करतो किंवा त्यांना हाक मारतो. बर्‍याच वेळा ‘गुरूंना हाक मारल्यावर माझ्यावर आक्रमण करणार्‍या वाईट शक्ती नष्ट होतात’, असा अनुभव मी घेतला आहे. सेवेमध्ये चुका होत असतांना गुरुदेव येऊन त्या मला दाखवायचे. तेव्हा अक्षरशः मी मागे वळून बघायचो. गाडी चालवत असतांना गाडीच्या बाजूने वाईट शक्ती मला पकडायला यायच्या. तेव्हा मी मोठ्याने नामस्मरण करायचो, गुरुरायांना प्रार्थना करायचो आणि त्या वाईट शक्ती नष्ट व्हायच्या.

८ इ. प्राणायाम करतांना त्रासदायक शक्ती बाहेर पडत असल्याचे जाणवणे

पूर्वी मी बसून नामस्मरण करायचो. आता मी १ घंटा बसून प्राणायाम करतो. त्या वेळी माझ्यातून पुष्कळ त्रासदायक शक्ती बाहेर पडते. हे सर्व होत असतांना ‘ते माझ्या बाजूला आहेत’, याची मला सतत जाणीव होत असते. मला काही शंका आल्या, तर मी गुरुदेवांकडे गेल्यावर मला त्याचे उत्तर लगेचच मिळायचे.

८ ई. स्वप्नात देवतांचे दर्शन होणे आणि एकदा कुलदेवीने
स्वप्नात येऊन ‘तुमच्यासाठी मीच रामनाथीला येईन’, असे सांगणे

स्वप्नात मला अनेकदा देवांचे दर्शन झाले आहे. पूर्वी ५ संतांनी मला अमावास्येला कुलदेवीचे दर्शन घ्यायला सांगितले होते. मुलीला (नंदाला) त्रास होत असतांनाही गुरुदेवांनीही कुलदेवीच्या दर्शनाला जाण्यास सांगितले होते. मी प्रती शुक्रवारी दर्शनाला जात होतो. एकदा माझ्या आणि नंदाच्या मनात ‘आता शिरोड्याला कुलदेवी कामाक्षीच्या दर्शनाला जायला नको’, असा विचार आला. त्याच रात्री कामाक्षीदेवीने स्वप्नात येऊन मला सांगितले, ‘तुम्ही आता शिरोड्याला येऊ नका. तुमच्यासाठी मीच रामनाथीला येईन.’ याविषयी मी गुरुदेवांना विचारल्यावर त्यांनी ‘भाव आहे, तिथे देवाला यावेच लागते’, असे सांगितले. तेव्हापासून मी कधीतरीच कुलदेवीच्या दर्शनाला जातो.

८ उ. चामुंडेश्‍वरी देवीने मुलीच्या स्वप्नात येऊन कुलदेवीचे नामस्मरण करण्यास सांगणे

माझी दुसरी मुलगी चामुंडेश्‍वरीचे नामस्मरण करायची. तिला ती देवी फार आवडायची. एके दिवस चामुंडेश्‍वरी तिच्या स्वप्नात आली. ती म्हणाली, ‘तू माझे नाव घेऊ नकोस. तुझ्या कुलदेवीचे नाव घे.’ देवीने सांगितल्यावर माझ्या मुलीने कुलदेवीचे नामस्मरण करण्यास आरंभ केला.

कु. नंदा देवाला प्रदक्षिणा घालायची. तेव्हा अनिष्ट शक्ती तिच्या मागे मागे यायच्या. तेव्हा नामस्मरण करत रागाने ती त्या शक्तीकडे पाहिल्यास ती शक्ती निघून जायची.

 

९. साधनेच्या दृष्टीने केलेले वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न

९ अ. दैनिक सनातन प्रभात वाचून कृती करणे

दैनिक सनातन प्रभातमधून साधनेच्या दृष्टीने सर्वकाही प्रसिद्ध केलेले असते. त्यावर विश्‍वास ठेवून तसे आचरण केले, तर प्रगती निश्‍चितच होत असते. ‘दैनिकामधील प्रत्येक अक्षर गुरुदेव वाचतात. त्यामुळे प्रत्येक शब्दात त्यांची शक्ती उतरलेली असते’, असा भाव असेल, तर निश्‍चित लाभ होतो. हे मी स्वतः अनुभवले आहे.

९ आ. साधकांप्रती भाव वाढवणे

पूर्वी मला साधकांविषयी प्रतिक्रिया यायच्या. त्यांच्याकडे साक्षीभावाने बघणे, त्यांच्या गुणांकडे पहाणे, असे प्रयत्न माझ्याकडून होत होते. त्यानंतर प्रत्येकातील ईश्‍वराला, म्हणजेच त्याच्यातील गुरुदेवांना पाहिल्याने माझ्यात पुष्कळ पालट होत गेला. त्यामुळे माझा प्रत्येक साधकाप्रती भाव वाढू लागला. ‘प्रत्येक साधकाची प्रगती व्हावी’, असे विचार येऊ लागले.

जोपर्यंत आपण साधकाच्या अंतर्मनापर्यंत जात नाही, तोपर्यंत आपल्याला खरा आनंद मिळू शकत नाही. ‘तो साधक कोण आहे ? कसा आहे ?’, याकडे पहायचे नाही’, हे माझ्या लक्षात आले. साधकाप्रती नम्रता आणि भाव ठेवून जर साधना केली, तर निश्‍चितच ईश्‍वर साहाय्य करतो. ‘माझे शिक्षण नाही. माझा विशेष अभ्यास नाही, तरी ईश्‍वर मला हे अनुभवायला देतो’, ही मोठी अनुभूती आहे.

९ इ. शरणागतीने प्रार्थना करणे

मी कोणतीही कृती करत असतांना प्रार्थना करतो, ‘गुरुदेवा, तुम्हीच सर्वकाही करा आणि मला माध्यम बनवा.’ तेव्हा शब्द कुठून आणि कसे येतात, ते मी अनुभवतो; कारण मी असे काहीच बोलू शकत नाही. त्यांच्या बोलण्यातून मला थोडे थोडे लक्षात रहाते आणि मी बोलू शकतो. मी कोणतीही सेवा करण्यापूर्वी ‘या सेवेच्या माध्यमातून माझ्यावर उपाय होऊ देत’, अशी शरणागतीने प्रार्थना करायचो. त्यामुळे मला पुष्कळ लाभ व्हायचा. या वयातही मी कोणतीही सेवा करू शकतो. मला अडचण येते, तेव्हा मी अंतर्मुख होऊन संत भक्तराज महाराज आणि गुरुदेव यांना विचारतो. ‘मला त्यांचे दर्शन होते आणि ते मार्गदर्शन करतात’, असे जाणवते.

९ ई. श्रीकृष्णाला प्रार्थना करून गुर्वाज्ञापालन करणे

गुरुदेव जे सांगतात, त्यावर माझा १०० टक्के विश्‍वास असतो. मी तशीच प्रार्थना करतो आणि मला अनुभूती येतात. साधक गुरुदेवांना प्रार्थना करत असतील, तर मी त्यांना सांगतो, ‘गुरुदेवांनी आपल्याला श्रीकृष्णाकडे जायला सांगितले आहे. त्यामुळे भगवान श्रीकृष्णालाच प्रार्थना करा. तुम्ही मायेत अडकू नका.’ मी मला भेटणार्‍यांना सांगतो, ‘तुम्हाला काही अडचणी असतील, तर त्या भगवान श्रीकृष्णाला तळमळीने प्रार्थना करून सांगा. तोच तुमचे त्रास अल्प करणार.’ हे सांगत असतांना मलाही स्फूर्ती मिळते.

९ उ. नामजप एकाग्रतेने होण्यासाठी प्रयत्न करणे

माझ्याकडून चालता-फिरता चांगला नामजप होतो. सकाळच्या वेळी मी नामजपाचा अनुभव घेतो. पूर्वी मी फोंड्यावरून रामनाथीला चालत यायचो. त्या वेळी चालतांना माझा नामजप अधिक व्हायचा. तेव्हा ‘नाम तिथे ईश्‍वर आहे’, हे मी अनुभवले. माझे मन विचारांत भरकटत असेल वा त्रास होत असेल, तर मी ‘मला ऐकू येईल’, इतक्या आवाजात वैखरीतून नामजप करतो. नंतर माझे मन नामजपावर स्थिर होते.

९ ऊ. कर्तेपणा न वाटणे

‘जे मला येते, ते सर्व ईश्‍वराला अर्पण झाल्याविना आपल्याला पुढचे मिळत नाही’, याची मला जाणीव होऊ लागली. आता मी प्राणायाम करतो, व्यायाम करतो, साधकांना शिकवतो. तरुण जे करतात, ते सगळे मी करतो. ‘मी करतो’, यापेक्षा ईश्‍वर माझ्याकडून करवून घेत असतो; कारण माझ्यात तेवढी शक्ती नाही. मी काही करू शकत नाही. गुरुदेवांचा आशीर्वाद आहे; म्हणून माझ्याकडून हे सर्वकाही होते.

९ ए. कौटुंबिक समस्यांच्या विनाअडथळा सुटणे

कुटुंबात काही समस्या निर्माण झाल्या, तर ईश्‍वर मला आतून सांगायचा, ‘अमुक मार्गाने जा.’ त्यानंतर माझ्या समस्या सुटायच्या. त्यामुळे आतापर्यंत साधनेत मला कधीच अडथळे आले नाहीत.

९ ऐ. सतत सेवेचाच विचार असणे

माझ्या मनात वैयक्तिक गोष्टींच्या संदर्भात कधीच विचार नसतात. माझे सगळे विचार सेवेच्या संदर्भातच असतात. नामस्मरण झाले नाही, तरी कार्याच्या अनुषंगाने माझे विचार असतात.

९ ओ. सतत आनंदी असणे

पूर्वी माझ्याकडून काही कृती प्रतिक्रियात्मक व्हायच्या. आता त्यात पुष्कळ पालट झाला आहे. मला फारच आनंद मिळत आहे. त्या आनंदातच मी भेटणार्‍या सगळ्यांना विचारत असतो, ‘‘नाम चालू आहे का ? प्रार्थना होते का ?’’ हे विचारत असतांना मी आणि समोरचा दोघेही आनंद अनुभवत असतो.

 

१०. शिकवण

१० अ. मनात विकल्प आला, तर साधकांना लाभ होणार नाही. जे मनापासून करतील, ते साधनेत पुढे जातील.

१० आ. अध्यात्मशास्त्र हे कृतीचे शास्त्र आहे. आपण कृती केली, तर ईश्‍वर आपल्याला साहाय्य करतोच. भाव तेथे देव आहे.

१० इ. आपल्यात नेहमी नम्रता असायला हवी.

 

११. सध्याचा दिनक्रम

मी प्रतिदिन पहाटे तीन – साडेतीनला उठतो. त्यानंतर मी झोपत नाही. पूर्वी मी बसून नामजप करायचो. आता मी सकाळी उठल्यावर व्यायाम करतो, केर काढतो, तसेच इतर सेवा करतो. त्यामुळे मला कधीच त्रास जाणवत नाही. कुठलीही सेवा करायला मला उत्साहच वाटत असतो.’

– (पू.) श्री. सदानंद (बाबा) नाईक, रामनाथी, सनातन आश्रम, गोवा. (वर्ष २०१२ मध्ये घेतलेल्या मुलाखतीतील लिखाण)

पू. सदानंद (बाबा) नाईक यांचा २०१२ ते २०१८ या कालावधीतील साधनाप्रवास !

१. पू. बाबांचा ‘गुरुदेवांचा एकसुद्धा आंबा वाया जायला
नको’, असा भाव असल्यामुळे काढलेले आंबे कधी खराब न होणे

‘२०१२ या वर्षी आम्ही तपोधाम (जिल्हा रत्नागिरी) येथे रहात होतो. त्या वेळी आंब्यांच्या हंगामात पू. बाबा सकाळी लवकर उठून आंबे काढायला जायचे. त्यांना ‘गुरुदेवांचा एकसुद्धा आंबा वाया जायला नको’, असे वाटत असे. कुठले आंबे अगोदर संपवायचे आणि कुठले नंतर संपवायचे, याची वर्गवारी करून ते वेगवेगळे ठेवायचे. त्यामुळे काढलेले आंबे कधी खराब होत नसत. आंब्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी कुठली खोली वापरायची, हेही त्यांना ठाऊक होते. तिथे जवळ जवळ पाचशे आंब्यांची झाडे आहेत. पू. बाबा आंबे रामनाथीला पाठवण्याचे नियोजनही व्यवस्थित करायचे.

२. पू. बाबा तपोधामला गेल्यावर तेथील सात्त्विकता
वाढून केळी, चिकू, फणस, पपई या सर्व झाडांना फळे येऊ लागणे

पू. बाबा तपोधामला गेल्यावर तेथील केळी, चिकू, फणस, पपई या सर्व झाडांना फळे येऊ लागली. सर्व साधक सांगायला लागले की, ‘पू. बाबा आल्यामुळे इकडची सात्त्विकता वाढून सर्व झाडांना फळे यायला लागली.’ त्यामुळे तेथील सेवाही वाढू लागल्या. पू. बाबांनी नंतर राणेआजोबांना विचारले, ‘‘आपण इथे कुठले पिक काढू शकतो ?’’ राणेआजोबांनी (आताचे पू. रघुनाथ राणेआजोबा यांनी) सांगितले, ‘‘नाचणीचे पीक काढू शकतो.’’ त्याप्रमाणे नाचणीचे पिक काढले. नंतर लक्षात आले की, नाचणीचे पीक काढल्यामुळे शेतात तीन-चार वर्षे गवत उगवत नाही. प्रत्यक्षातही त्या वर्षी तिथे गवत उगवले नाही. दुसर्‍या वर्षी हा प्रयोग दुसर्‍या शेतात केला. त्या वेळी तिथेही गवत उगवले नाही. त्यावरून ‘संतांची दूरदृष्टी कशी असते ?’, हे लक्षात आले. तपोधामच्या भूमीचा पावसाळ्यानंतर अर्धा भाग गवताने व्यापलेला असतो. आम्ही अगोदर काजू आणि आंबा या झाडांच्या खालचे गवत कापत होतो. आम्हाला या सेवेसाठी बाहेरून साधक मिळायचे नाहीत; म्हणून पू. बाबा स्वयंपाकघरात मी आणि शेट्येकाकू यांना ठेवून सर्व साधकांना सकाळी न्याहारीच्या अगोदर घेऊन जायचे, तरीही काही ठिकाणची गवत कापणी रहायची.

३. सूक्ष्मातील जाणणे

३ अ. ‘आंब्यांच्या झाडाखाली असलेले ऋषिमुनी पू. (सौ.) गाडगीळकाकूंना लगेच जाऊ देणार नाहीत’, हे पू. बाबांना ठाऊक असणे

तपोधामच्या बागेत एक कुटी आहे. तिथे पू. नरेंद्रबुवा हाटे अगोदर कीर्तन करत होते. पू. बाबांना ‘ते आणि त्यांचे गुरु या शेताचे रक्षण करत आहेत’, असे दिसले. तिथे तटस्थ अशी तीन आंब्यांची झाडे आहेत. त्यांच्याखाली पू. बाबांना ३ ऋषिमुनी दिसले. या संदर्भात एक प्रसंग आठवतो. आम्ही एकदा रत्नागिरी शहरात गेलो होतो. तेव्हा तपोधाममध्ये पू. (सौ.) गाडगीळकाकू (आताच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ) आल्या. त्या म्हणाल्या, ‘‘आम्ही १० – १५ मिनिटांनी परत जाणार आहोत.’’ आम्हाला रत्नागिरीहून तपोधाम येथे पोहोचायला किमान तीन घंटे तरी लागणार होते. त्यामुळे बाबांनी त्यांना सांगितले, ‘‘आम्हाला पोहोचायला वेळ लागेल; म्हणून तुम्ही निघा.’’ त्याच वेळी त्यांनी आम्हाला सांगितले, ‘‘त्यांना ते ऋषिमुनी लगेच सोडणार आहेत का ?’’ आम्ही ४ घंट्यांनी तपोधामला पोहोेचलो, तेव्हा पू. (सौ.) गाडगीळकाकू तपोधामच्या बागेतच होत्या. त्या वेळी पू. (सौ.) गाडगीळकाकूंनी आम्हाला सांगितले, ‘‘या ऋषिमुनींनी आम्हाला सोडले नाही.’ बाबांना ‘काकू तिथून लगेच बाहेर पडू शकणार नाहीत’, हे अगोदरच ठाऊक होेते.

३ आ. तिथे पुष्कळ वेळा कोणीतरी करणीचे लिंबू किंवा नारळ आणून ठेवायचे; परंतु ते पू. बाबांना लगेच समजायचे. जेव्हा न्यायालयात केस असायची, तेव्हाही तसेच व्हायचे.

४. महत्त्वाचा न्यायालयीन खटला जिंकणे

पू. बाबा तिथे असतांना एक महत्त्वाचा न्यायालयीन खटला जिंकले होते. त्या वेळी अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी सांगितले, ‘‘हे केवळ पू. बाबांमुळे शक्य झाले.’’

५. तपोधाम अगदी जंगलात आहे. आजूबाजूला घरही नाही. तिथे रात्रीच्या वेळी पू. बाबांना खूप वेळा ‘फाटकाजवळ देव परशुराम येरझार्‍या घालत आहे’, असे दिसायचे.

६. साधकांना मार्गदर्शन करतांना आवश्यक सूत्रे देवाने
आतून सुचवणे, प्रत्यक्षात ती एका ग्रंथातील असल्याचे एका साधिकेने सांगणे

पू. बाबा रत्नागिरीच्या साधकांना मार्गदर्शन करायचे. तेव्हा पू. बाबा म्हणायचे, ‘‘मला ती सूत्रे आपोआप सुचतात.’’ प्रत्यक्षात ती सर्व सूत्रे ‘समष्टी साधना’ या ग्रंथातील असायची; परंतु पू. बाबांना हे ठाऊक नव्हते; कारण ग्रंथ वाचले नव्हते. नंतर एका साधिकेने सांगितले, ‘‘ही सर्व सूत्रे ‘समष्टी साधना’ या ग्रंथातील आहेत.’’ यावरून एक लक्षात येते की, ‘देवच त्यांच्याकडून साधकांना अपेक्षित असे मार्गदर्शन आतून सुचवून करवून घेत होता.’

७. मंगळूरू आश्रम, कोचीन, पानवळ (बांदा) या सर्व ठिकाणी सेवा करणे

पू. बाबा २०१४ या वर्षी मंगळूरू आश्रमात गेले. तिथे त्यांनी बांधकाम संबंधित सेवा परत चालू केली. नंतर ते थोडे दिवस कोचीनमध्ये राहिले. नंतर त्यांनी प.पू. दास महाराज यांच्याकडे म्हणजे पानवळ, बांदा येथे ६ मास (महिने) सेवा केली; पण तिथे त्यांची प्रकृती बिघडत होती; म्हणून प.पू. गुरुदेवांना सांगून ते रामनाथी आश्रमात आले.

८. अभ्यासू वृत्ती, अचूक अन् परिपूर्ण सेवा यांसमवेत सतत स्वतःला गुंतवून ठेवणे

वर्ष २०१५ मध्ये प.पू. गुरुदेवांनी पू. बाबांना समष्टीसाठी नामजप करायला सांगितला. तेव्हापासून आतापर्यंत त्यांची ती साधना चालू आहे. त्यांना प्रकृती अस्वास्थ्य आणि वय यांमुळे इतर काही सेवा करता येत नाही; म्हणून ते तबला वाजवण्याच्या सरावाला जायला लागले. त्यांना आधीपासूनच एक सवय आहे, ‘एखादी सेवा बंद पडली, तर कशात तरी स्वत:ला गुंतून ठेवायचे.’ त्यांनी सुंदर लेखही लिहिले आहेत. त्यांची अगोदरपासूनच अभ्यासू वृत्ती आहे. त्यांची प्रत्येक सेवा अचूक अन् परिपूर्ण असते. एखादी गोष्ट प.पू. गुरुदेवांनी सांगितली, तर तिचे आज्ञापालन ते लगेच करतात. पू. बाबांचे सर्व वागणे त्यांच्या बाबांसारखे, म्हणजे माझ्या आजोबांसारखे आहे.’

– कु. नंदा सदानंद नाईक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.१०.२०१८) (पू. बाबा नाईक यांची मुलगी)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात