हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आध्यात्मिक बळ आवश्यक ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

रत्नागिरी येथे हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण कार्यशाळा

रत्नागिरी – छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले ते आध्यात्मिक बळावरच होय. आई तुळजाभवानीचा आशीर्वाद आणि त्यांची साधना यांमुळे ते हिंदवी स्वराज्य स्थापन करू शकले. त्याप्रमाणे आपलेही धर्मप्रसाराचे कार्य आदर्श होण्यासाठी आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आध्यात्मिक बळ आवश्यक आहे, असे प्रतिपादन सनातनच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले. हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण कार्यशाळेत ‘साधनेचे जीवनातील महत्त्व आणि गुरुकृपायोगानुसार साधना’ या विषयावर हिंदुत्वनिष्ठांना मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या.

२७ ऑक्टोबर या दिवशी येथील अंबर सभागृहात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्ह्यातील हिंदुत्वनिष्ठांना ‘साधना आणि कार्य’ याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी २ दिवशीय हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण कार्यशाळेला प्रारंभ झाला. या कार्यशाळेला सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम यांचीही वंदनीय उपस्थिती लाभली आहे.

या कार्यशाळेत सुराज्य अभियान, प्रार्थनेचे महत्त्व आदी विषयांवरही मार्गदर्शन करण्यात आले.

मार्गदर्शन करतांना सद्गुरु (कु.) स्वाती खाडये म्हणाल्या,

१. प्रत्येक जिवाला जोपर्यंत मोक्ष मिळत नाही, तोपर्यंत पृथ्वीवर पुन:पुन्हा त्याला जन्म घ्यावाच लागतो. जन्म, तसेच मृत्यूही आपल्या हातात नाही. त्यात पृथ्वीवर मनुष्यजन्म मिळणे दुर्लभ आहे.

२. पृथ्वीवर केवळ मनुष्यच साधना करू शकतो. त्यामुळे आपण सर्व भाग्यवान आहोत. मोक्ष मिळवायचा असेल, तर आपल्याला साधना करायला हवी ?

३. साधना म्हणजे ईश्‍वरप्राप्तीसाठी प्रतिदिन करावयाचे प्रयत्न. यामध्ये व्यष्टी आणि समष्टी साधना अंतर्भुत होते. काळानुसार व्यष्टी साधनेला ३० टक्के आणि समष्टी साधनेला ७० टक्के महत्त्व आहे.

४. सध्या वाढत असलेले रज-तमाचे प्रदूषण आणि धर्महानी अन् राष्ट्राची अराजकतेकडे होत असलेली वाटचाल यांमुळे सध्याचा काळ आपत्काळ बनला आहे. आपत्काळात व्यष्टी साधना करून ईश्‍वरप्राप्ती करणे कठीण झाले आहे. यासाठी व्यष्टी साधनेला समष्टी साधनेची जोड देणे आवश्यक आहे.

५. समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण, धर्मजागृती, हिंदूसंघटन ही काळानुसार समष्टी साधना आहे, तर स्वभावदोष निर्मूलन, अहं निर्मूलन, नामजप, सत्संग, सत्सेवा, भावजागृतीचे प्रयत्न, त्याग आणि प्रीती हे व्यष्टी साधनेअंतर्गत येतात. या अष्टांग साधनेमधील स्वभावदोष निर्मूलन आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवणे, अत्यंत महत्त्वाचे आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात