हिंदू संघटनासाठी स्वत:तील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करणे आवश्यक ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्था

धुळे (उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा) येथे प्रांतीय हिंदू अधिवेशन

दीपप्रज्वलन करतांना सद्गुरु नंदकुमार जाधव (डावीकडे), प.पू. सद्गुरु वाल्मिक दादाजी (डावीकडून तिसरे), कु. रागेश्री देशपांडे

धुळे – येथे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील हिंदुत्वनिष्ठांसाठी दोन दिवसीय प्रांतीय हिंदू अधिवेशनास २७ ऑक्टोबरला आरंभ झाला. सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव आणि धुळे येथील प.पू. सद्गुरु वाल्मिक दादाजी यांच्या वंदनीय उपस्थितीत दीपप्रज्वलन झाले.  कु. रागेश्री देशपांडे यांनी प्रांतीय हिंदू अधिवेशनाचा उद्देश स्पष्ट केला.

प.पू. सद्गुरु वाल्मिक दादाजी यांच्या हस्ते ‘सनातन पंचांग – २०१९’ चे विमोचन

सनातन पंचांग २०१९ चे विमोचन करतांना डावीकडून सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव, प.पू. सद्गुरु वाल्मिक दादाजी, कु. रागेश्री देशपांडे

‘लाना होगा, लाना होगा, हिंदु राष्ट्र लाना होगा’, ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’ च्या घोषणांच्या निनादात हिंदु जनजागृती समिती आयोजित  प्रांतीय हिंदू अधिवेशनाची सांगता झाली. २७ आणि २८ ऑक्टोबर असे २ दिवस येथील ‘श्रीकृष्ण लॉन्स’ येथे पार पडलेल्या या अधिवेशनाला उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, अधिवक्ता, कायकर्ते उपस्थित होते.

हिंदू संघटनासाठी स्वत:तील स्वभावदोष आणि अहं यांचे
निर्मूलन करणे आवश्यक ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्था

हिंदू संघटनाचे कार्य करतांना हिंदुत्वनिष्ठांनी आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक आहे. अपशब्दांचा वापर टाळणे, व्यसनापासून दूर रहाणे, वेळेचे अन् शिस्तीचे पालन करणे, प्रसिद्धीच्या झोतापासून दूर रहाणे अशा गोष्टींचे पालन हिंदुत्वनिष्ठांनी केल्यास हिंदू संघटन चांगल्या प्रकारे होऊ शकते. श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे पू. संभाजी भिडेगुरुजी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण युवापिढीत उतरवण्याच्या एकमेव उद्देशाने कार्य करत आहेत. त्यांची राहणी अत्यंत साधी असून ते कधीही प्रसिद्धीसाठी कार्य करत नाहीत. हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे धर्मप्रसाराचे कार्य जगभर पसरले असतांनाही ते प्रसिद्धीपासून दूर आहेत; मात्र काही हिंदुत्वनिष्ठ प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी प्रयत्नरत असतात. हे स्वभावदोष अन् अहंमुळे घडते. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:मधील स्वभावदोष अन् अहं यांचे निर्मूलन करणे आवश्यक आहे. त्यासाठी साधना करून अंतर्मनावरील जन्मोजन्मीचे संस्कार नष्ट करायला हवेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात