कलियुगात आपल्याच स्वभावदोषांशी आपला लढा आहे ! – सौ. सविता लेले, सनातन संस्था

डोंबिवली (पश्‍चिम) येथे साधना शिबीर पार पडले !

 

डोंबिवली, २३ ऑक्टोबर (वार्ता.) – पूर्वी त्रेतायुगात श्रीरामांनी रावणाचा वध करण्यासाठी श्रीलंकेत जाऊन युद्ध केले. द्वापरयुगामध्ये दोन कुटुंबात युद्ध झाले आणि आता कलियुगात आपला आपल्या दोषांशीच लढा चालू आहे. जीवनात स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यासाठी अध्यात्माची जोड देणे आवश्यक आहे. स्वभावदोषांमुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. हा त्रास होऊ नये, यासाठी स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करणे अत्यावश्यक आहे, असे मार्गदर्शन सौ. सविता लेले यांनी सी.एम्.एस् शाळा, आनंदनगर, डोंबिवली (पश्‍चिम) येथे घेण्यात आलेल्या साधना शिबिरात केले. या वेळी वैद्या (सौ.) दिक्षा पेंडभाजे या उपस्थित होत्या. या शिबिराचा लाभ दैनिक सनातन प्रभातच्या २० वाचकांनी घेतला. या वेळी दिवाळीच्या कालावधीत स्वदेशी वस्तूंचा वापर करण्यासंदर्भात तसेच फटाक्यांचा वापर टाळण्यासंदर्भात प्रबोधन करण्यात आले. ‘आध्यात्मिक उपाय कसे करावेत ?’, यासंदर्भात ध्वनीचित्रफीतही दाखवण्यात आली.

ईश्‍वराला प्रार्थना केल्याने आपला अहंभाव
कमी होतो ! – वैद्या (सौ.) दिक्षा पेंडभाजे, सनातन संस्था

‘वसुधैव कुटुम्बकम्’ असणारा हिंदु धर्म हा एकमेव धर्म आहे. आपल्या धर्मावर वेगवेगळ्या माध्यमांतून आक्रमण होत आहे. धर्म नष्ट करण्याचे षड्यंत्र मोठ्या प्रमाणात चालू असून शबरीमला मंदिरातील महिलांचा प्रवेश, हे याचे उदाहरण आहे. हे सर्व रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक आहे. यासाठी साधना करणे आवश्यक आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती या तत्त्वानुसार गुरुकृपायोगानुसार साधना करता येते. आपल्या प्रकृतीनुसार आपण साधना करू शकतो. साधनेच्या सिद्धांतानुसार म्हणजे अनेकातून एकात, स्थुलातून सूक्ष्मात आणि काळानुसार साधनेतून आपण ईश्‍वराशी एकरूप होऊ शकतो. यात व्यष्टी आणि समष्टी साधनाही महत्वाची आहे. ईश्‍वराला आर्ततेने आळवतो, ती म्हणजे प्रार्थना होय. ईश्‍वराला प्रार्थना केल्याने आपला अहंभाव कमी होतो.

वाचकांच्या प्रतिक्रिया

१. आपल्या सर्वांचा हा अध्यात्मिक गृहपाठ आहे. तो आपण सर्वांनी करायला हवा. – श्री. भरत कोकजे

२. अशा प्रकारचे मागदर्शन आम्ही पहिल्यांदाच अनुभवले आहे. अभ्यासपूर्वक विषय मांडला आहे. – श्री. जनार्दन कुलकर्णी

३. आपल्यातील गुरुकुल शिक्षणपद्धती नष्ट झाली. त्यामुळे धर्मशिक्षण मिळत नाही. या मार्गदर्शनामुळे आपल्यातील दोष आणि अहं कसे घालवावे, हे पुन्हा एकदा कळले. – एक वाचक

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात