हिंदुत्वाचा खरा कार्यकर्ता बनण्यासाठी अध्यात्म शिका आणि साधना करा ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

मुजफ्फरपूर (बिहार) येथे हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेचे यशस्वी आयोजन !

मुजफ्फरपूर (बिहार) – सध्या हिंदुत्वाचे कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांना हिंदु धर्मातील अध्यात्माविषयी काहीच ज्ञान नसते. साधना न केल्याने त्यांनी हिंदु धर्माच्या श्रेष्ठत्वाचा अनुभव कधीच घेतलेला नसतो. असा कार्यकर्ता हिंदुत्वाचे कार्य करण्यामध्ये अयशस्वी ठरतो. तसेच साधनेचे बळ नसल्याने समाजही त्याला सनातन धर्माचा प्रतिनिधी मानत नाही. हिंदुत्वाचा खरा कार्यकर्ता किंवा सनातन धर्माचा खरा प्रतिनिधी बनण्यासाठी अध्यात्म शिका आणि साधना करा, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले. मुजफ्फरपूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेत ते बोलत होते. ६ आणि ७ ऑक्टोबर असे दोन दिवस या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत बिहारच्या  पाटलीपुत्र, पूर्व चंपारण, दरभंगा, मुजफ्फरपूर, गोपालगंज, औरंगाबाद, वैशाली, सारण आणि उत्तरप्रदेशच्या गोरखपूर येथून २० धर्मप्रेमी सहभागी झाले होते.

या कार्यशाळेत हिंदु राष्ट्र स्थापनेमागील मूलभूत संकल्पना, साधनेचे आपल्या जीवनातील महत्त्व, स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन अन् अनिष्ट शक्तींच्या त्रासांवरील उपाय इत्यादी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात