विजयादशमीला हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी ‘सीमोल्लंघन’ करण्याचा निर्धार करा ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्था

मितावली (जिल्हा जळगाव) येथे हिंदु धर्मजागृती सभा

जळगाव – नवरात्रोत्सव हा भक्ती आणि शक्ती यांच्या संगमाचा उत्सव आहे. विजयादशमीच्या वेळी धर्मशास्त्रानुसार आपण सीमोल्लंघन करतो. येत्या विजयादशमीला आपण सर्वांनी अन्याय, अधर्म, अंधकार यांपासून मुक्ती देणारे धर्माधिष्ठित, प्रकाशमान असे हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी ‘सीमोल्लंघन’ करण्याचा निर्धार करूया, असे आवाहन सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले. ते जिल्ह्यातील मितावली (तालुका चोपडा) या गावात नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या ‘हिंदु धर्मजागृती सभेत’ बोलत होते. या सभेला समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर यांनीही संबोधित केले. सूत्रसंचालन समितीचे श्री. श्रेयस पिसोळकर यांनी केले.

सभेला शंखनादाने प्रारंभ झाला. त्यानंतर सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी दीपप्रज्वलन केले. श्री. प्रशांत जुवेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला माल्यार्पण केले. गावात अशा प्रकारचा कार्यक्रम पहिल्यांदाच झाला असून तो पुष्कळ चांगला झाला, असे मत सभेनंतर अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केले. केवळ १ सहस्र १०० लोकवस्ती असलेल्या या गावातील २६० लोकांनी या सभेचा लाभ घेतला.

 संदर्भ : दैनिक सनातन प्रभात