समाजातील दुष्प्रवृत्तींचे वैध मार्गाने निर्दालन करा ! – सौ. दीक्षा पेंडभाजे, सनातन संस्था

शिबिरातील विषय ऐकतांना वाचक

डोंबिवली, १८ ऑक्टोबर (वार्ता.) – समाजातील दुष्प्रवृत्तींचे वैध मार्गाने निर्दालन करणे, म्हणजेच क्षात्रधर्म साधना होय. क्षात्रधर्म साधना ही काळानुसार आवश्यक साधना असून या समष्टी साधनेला जोडून आपल्या स्वभावदोष आणि अहंशी लढणे ही व्यष्टी स्तरावरील क्षात्रधर्म साधना आहे. अध्यात्म हे कृतीचे शास्त्र आहे. आध्यात्मिक ज्ञान कृतीत आणले नाही, तर सर्व व्यर्थ आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या सौ. दीक्षा पेंडभाजे यांनी उर्सेकरवाडी परिसरातील भाजप कार्यालयात पार पडलेल्या साधना शिबिराच्या वेळी केले. दैनिक सनातन प्रभातच्या वाचकांसाठी हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला ३० हून अधिक वाचकांची उपस्थिती होती. श्री. महेश मुळीक यांनी शिबिराचे सूत्रसंचालन केले. या वेळी एस्.एस्.आर्.एफ्. निर्मित मिठाच्या पाण्याच्या उपायांची छोटी ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली.

सौ. सविता लेले यांनी ‘आनंदी जीवनासाठी साधनेचा मुख्य पाया असलेली स्वभावदोष आणि अहंनिर्मूलन प्रक्रिया कशी आणि का करावी ?’ याविषयी सांगितले. यामुळे बर्‍याच वाचकांना वैयक्तिक स्तरावर लाभ झाल्याचे त्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेतून लक्षात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात