(म्हणे) ‘राज्यभर अतिरेकी कारवाया करणार्‍या सनातन संस्था आणि त्यांचे प्रमुख यांवर अद्याप कारवाई का नाही ?’ – सचिन सावंत, काँग्रेस

अतिरेक्यांवर नव्हे, तर निर्दोष असणार्‍या सनातन
संस्थेवर बंदीची मागणी करणे, हा सचिन सावंत यांचा हिंदुद्वेषच !

धादांत खोटे आरोप करणारे सचिन सावंत यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्यासाठी सनातन संस्था अधिवक्त्यांचा सल्ला घेत आहे !

मुंबई – ‘इंडिया टुडे’ या इंग्रजी वृत्तवाहिनीने ‘स्टिंग ऑपरेशन’ करून ‘वर्ष २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांत सनातनच्या साधकांचा हात होता’, हे पुढे आणले आहे. असे असतांनाही राज्य सरकारकडून या संस्थेला पायबंद घालण्यासाठी पुढाकार घेतला जात नाही. उलट संस्थेशी संबंधित लोकांनी ‘इंडिया टुडे’च्या पत्रकारांची छायाचित्रे सामाजिक माध्यमांवर टाकून त्यांना अतिरेकी घोषित करण्याचा प्रयत्न चालवला आहे. हा संपूर्ण प्रकार घृणास्पद आणि निषेधार्ह आहे. मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादामुळेच कट्टरतावादी ‘बेफाम’ झाले आहेत. राज्यभरामध्ये अतिरेकी कारवाया करणार्‍या सनातन संस्थेशी संबंधित अनेकजणांना रंगेहात पकडले असतांनाही सनातन संस्था आणि त्यांचे प्रमुख यांंवर अद्याप कोणतीही कारवाई का केली गेली नाही ? असा प्रश्‍न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस तथा प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. (सनातन ही आध्यात्मिक संस्था असून आतापर्यंत कोणत्याही प्रकरणात न्यायालयाने सनातनला दोषी ठरवले नाही. ‘इंडिया टुडे’ या वृत्तवाहिनीने कथित ‘स्टिंग ऑपरेशन’च्या नावाखाली सनातनच्या साधकांच्या वक्तव्यांची मोडतोड करून खोटे वृत्त प्रसारित करण्याचा घृणास्पद प्रकार केला आहे. असे असतांना निवळ मतांसाठी ‘खोटे बोल; पण रेटून बोल’ अशी मानसिकता असलेल्या सचिन सावंत यांचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे !  संपादक)

सचिन सावंत पुढे म्हणाले की,

१. नालासोपारा येथे सनातनच्या साधकाकडे जिवंत बॉम्ब आणि बॉम्ब सिद्ध करण्यासाठी लागणार्‍या साहित्याचा मोठा साठा सापडला. या प्रकरणी सनातनच्या काही साधकांना अटकही करण्यात आली. (नालासोपारा येथील कथित स्फोटके प्रकरणात सनातनच्या कोणत्याही साधकाचा सहभाग नाही. आतंकवादविरोधी पथकानेही यासंदर्भात स्पष्टीकरण केले असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. असे असतांना सनातन संस्थेची नाहक अपकीर्ती करण्याचा प्रयत्न हा सनातनद्वेषच होय ! – संपादक)

२. एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटके सापडल्याने आरोपींचा मोठ्या प्रमाणात घातपात करण्याचा कट होता, हे स्पष्ट आहे. याचे धागेदोरे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्‍व हिंदु परिषद यांच्या मोठ्या नेत्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. सखोल अन्वेषण झाल्यास अनेक बड्या लोकांवर कारवाई होऊ शकते. असे झाल्यास ‘भाजप सरकार हिंदूविरोधी आहे’, असा संदेश जाईल, यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी या अन्वेषणावर लक्ष ठेवून आहेत. (सचिन सावंत यांचा जावईशोध ! न्यायप्रविष्ट प्रकरणांविषयी कपोलकल्पित गोष्टी रचून सचिन सावंत न्यायालय आणि राज्यघटना यांचाच अवमान करत आहेत !  संपादक)

३. पंतप्रधानांच्या सांगण्यावरूनच मुख्यमंत्र्यांनी जाणीवपूर्वक अन्वेषण संथगतीने करण्याचा आदेश आतंकवादविरोधी दिला आहे, असे वृत्त ‘इंडिया स्कूप’ या संकेतस्थळावर दिले आहे. त्यामुळेच इतके पुरावे हातात असतांनाही सनातन संस्थेवर बंदी घालण्यासाठी सरकारने कोणतेही पाऊल उचललेले नाही. उलट संस्थेच्या विरोधात आवाज उठवणार्‍या व्यक्तींना धमक्या आणि कायदेशीर कारवाईची भीती दाखवली जात आहे. (सचिन सावंत यांच्यासारख्या सनातनद्वेष्ट्यांनी धादांत खोटे आरोप केल्यानंतर सनातन कायदेशीर मार्ग अवलंबते. याविषयी सावंत यांना पोटशूळ कशाला ? – संपादक) 

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात