परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आरोग्यासाठी एका व्यक्तीने सांगितल्यानुसार चैत्र नवरात्रात केलेल्या अनुष्ठानाचा वेदमूर्ती ओंकार पाध्ये यांच्यावर झालेला परिणाम

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘यू.टी.एस्.
(युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

यू.टी.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

‘१८ ते २५ मार्च २०१८ या कालावधीत चैत्र नवरात्रीनिमित्त एका व्यक्तीने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आरोग्यासाठी अनुष्ठान करण्यास सांगितले होते. त्यानुसार परात्पर गुरु डॉ. आठवले यांंच्या निवासकक्षात (खोलीत) चौरंगावर देवीचे चित्र ठेवून तिचे पूजन करून ‘श्री दुर्गासप्तशती’ या ग्रंथाचे पठण करण्यात आले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वतीने सनातन पुरोहित पाठशाळेचे वेदमूर्ती ओंकार पाध्ये यांनी हे अनुष्ठान केले. या अनुष्ठानाचा त्यांच्यावर होणारा परिणाम वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीचे स्वरूप, केलेल्या मोजणीच्या नोंदी आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे. (अनुष्ठानाचा ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर झालेला परिणाम’ आणि ‘देवीच्या चित्रावर झालेला परिणाम’ यांविषयी केलेले संशोधन निराळ्या लेखांत दिले आहे.)

 

१. चाचणीचे स्वरूप

वेदमूर्ती ओंकार पाध्ये

या चाचणीत १८ ते २५ मार्च २०१८ या कालावधीत देवीच्या चित्राचे प्रतिदिन पूजन करण्यापूर्वी आणि पूजन केल्यानंतर (टीप) वेदमूर्ती ओंकार पाध्ये यांच्या ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजणीच्या नोंदी करण्यात आल्या. या केलेल्या मोजणीच्या नोंदींचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

टीप – पूजन केल्यानंतर, म्हणजे वेदमूर्ती ओंकार पाध्ये यांनी देवीच्या चित्राचे पूजन करून ‘श्री दुर्गासप्तशती’ या ग्रंथाचे पठण केल्यानंतर त्यांची ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे मोजणी करण्यात आली. असे आठही दिवस करण्यात आले.

वाचकांना सूचना

जागेअभावी या लेखातील ‘यू.टी.एस्’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे दैनिक सनातन प्रभातच्या संकेतस्थळाच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

 

२. केलेल्या मोजणीच्या नोंदी आणि त्यांचे विवेचन

२ अ. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजणीच्या नोंदींचे विवेचन – वेदमूर्ती ओंकार पाध्ये यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा मुळीच नसणे

अनुष्ठानातील आठही दिवस देवीच्या चित्राचे पूजन करण्यापूर्वी आणि नंतर वेदमूर्ती ओंकार पाध्ये यांच्यामध्ये ‘इन्फ्रारेड’ अन् ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही नकारात्मक ऊर्जा आढळल्या नाहीत.

२ आ. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजणीच्या नोंदींचे विवेचन

२ आ १. वेदमूर्ती ओंकार पाध्ये यांच्यामध्ये अनुष्ठानातील तिसर्‍या दिवशीच्या पूजनानंतर सकारात्मक ऊर्जा थोड्या प्रमाणात निर्माण होणे आणि त्यापुढील प्रत्येक दिवशी तिच्यात उत्तरोत्तर वाढ होणे

अ. सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही. अनुष्ठानाच्या आरंभी वेदमूर्ती ओंकार पाध्ये यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा मुळीच नव्हती.

आ. अनुष्ठानातील १ ल्या आणि २ र्‍या दिवशीच्या पूजनानंतरही त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली नाही.

इ. ३ र्‍या आणि ४ थ्या दिवशीच्या पूजनानंतर त्यांच्यामध्ये थोड्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली.

ई. ५ व्या, ६ व्या, ७ व्या आणि ८ व्या दिवशी पूजनापूर्वीच त्यांच्यामध्ये थोड्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा होती अन् पूजनानंतर त्यांच्यामधील सकारात्मक ऊर्जेत आणखी थोडी वाढ झाली.

उ. ७ व्या आणि ८ व्या दिवशीच्या पूजनानंतर त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा पूर्णपणे निर्माण झाली, हे त्यांच्या संदर्भात ‘यू.टी.’ स्कॅनरने केलेल्या १८० अंशाच्या कोनावरून लक्षात आले. त्यामुळे त्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळही मोजता आली. ती अनुक्रमे ०.७५ मीटर आणि १.२५ मीटर होती.

थोडक्यात सांगायचे, तर वेदमूर्ती ओंकार पाध्ये यांच्यामध्ये अनुष्ठान पूर्ण होईपर्यंत सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली.

२ इ. एकूण प्रभावळीच्या संदर्भात केलेल्या मोजणीच्या नोंदींचे विवेचन

२ इ १. अनुष्ठानातील प्रत्येक दिवशीच्या पूजनानंतर वेदमूर्ती ओंकार पाध्ये यांच्या एकूण प्रभावळीत उत्तरोत्तर वाढ होत जाणे : सामान्य व्यक्ती किंवा वस्तू हिची एकूण प्रभावळ साधारण १ मीटर असते. अनुष्ठानाच्या पहिल्या दिवशीच्या पूजनापूर्वी वेदमूर्ती ओंकार पाध्ये यांची एकूण प्रभावळ १.८२ मीटर होती. अनुष्ठानातील पुढील प्रत्येक दिवशीच्या पूजनानंतर त्यांच्या एकूण प्रभावळीत उत्तरोत्तर वाढ होत गेली, हे पुढे दिलेल्या सारणीतून स्पष्ट होते.

अ. वेदमूर्ती ओंकार पाध्ये यांच्या एकूण प्रभावळीत झालेल्या वाढीच्या सारणीतील शेवटच्या स्तंभामध्ये पूजनाच्या पहिल्या दिवशी प्रभावळीमधील वाढीचे प्रमाण अधिक असून त्यानंतर ते न्यून होत गेलेले दिसते. अनुष्ठानातील शेवटच्या २ दिवशी प्रभावळीमधील वाढीचे प्रमाण पुन्हा अधिक होऊन त्या २ दिवसांत वाढ अधिकाधिक होत गेली. या अनुष्ठानामध्ये पूजन केलेल्या देवीच्या चित्रावर झालेला परिणाम अभ्यासला असता तेव्हाही प्रभावळीमध्ये झालेल्या वाढीचा एकंदर कल (ट्रेंड) तसाच दिसून आला. त्या चित्राच्या प्रभावळीत झालेली वाढही शेवटचे २ दिवस पुन्हा अधिकाधिक होत गेली. (याविषयी सविस्तर माहिती निराळ्या लेखात दिली आहे.)

आ. प्रभावळीमध्ये झालेल्या वाढीच्या शेवटच्या स्तंभामध्ये असेही दिसून आले की, अनुष्ठानाच्या २ र्‍या दिवशी आणि ६ व्या दिवशी वेदमूर्ती ओंकार पाध्ये यांच्या प्रभावळीत झालेली वाढ अन्य दिवसांच्या तुलनेत पुष्कळ न्यून होती. तसेच दुसर्‍या दिवशी पूजनानंतरची त्यांची प्रभावळ पहिल्या दिवशी पूजनानंतर असलेल्या त्यांच्या प्रभावळीपेक्षा न्यून होती.

वरील सर्व सूत्रांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण ‘सूत्र ३’ मध्ये दिले आहे.

 

३. केलेल्या मोजणीच्या नोंदींचे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

३ अ. श्री दुर्गासप्तशती पाठाचे महत्त्व

‘मार्कंडेयपुराणात श्री चंडीदेवीचे (श्री चंडीदेवी हे श्री दुर्गादेवीचे एक नाव आहे) माहात्म्य सांगितले असून, त्यात तिच्या अवतारांचे आणि पराक्रमांचे विस्ताराने वर्णन केले आहे. त्यातील अनुमाने सातशे श्‍लोक एकत्र घेऊन ‘श्री सप्तशती’ नावाचा एक निराळा ग्रंथ देवीच्या उपासनेसाठी काढलेला आहे. ‘सुख, लाभ, जय इत्यादी अनेक कामनांच्या पूर्तीसाठी या सप्तशतीचा पाठ करावा’, असे सांगितले आहे.’

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘शक्ति’)

३ आ. अनुष्ठानाच्या प्रत्येक दिनी देवीच्या चित्राचे पूजन केल्यावर देवीच्या चित्रातील सकारात्मक ऊर्जेमध्ये (चैतन्यामध्ये) वाढ होणे

‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, हा अध्यात्मातील एक सिद्धांत आहे. त्यानुसार जिथे देवीचे ‘रूप’ (चित्र) आहे, तिथे तिच्याशी संबंधित शक्ती, म्हणजेच स्पंदनेही असतात. त्यामुळे अनुष्ठानाच्या प्रत्येक दिनी देवीच्या चित्राचे पूजन केल्यावर त्या देवीची स्पंदने तिच्या चित्रामध्ये आकृष्ट झाली. ‘श्री दुर्गासप्तशती पाठा’च्या अनुष्ठानामुळे देवीच्या चित्रातील सकारात्मक ऊर्जा (चैतन्य) ८ दिवसांत अनुमाने दुपटीने वाढले होते. (याविषयी सविस्तर माहिती निराळ्या लेखात दिली आहे.)

३ इ. वेदमूर्ती ओंकार पाध्ये यांनी अनुष्ठानाची सेवा भावपूर्ण केल्यामुळे त्यांना ‘त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होणे आणि त्यांच्या एकूण प्रभावळीत वाढ होणे’, असे आध्यात्मिक स्तरावरील लाभ होणे

एका व्यक्तीने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आरोग्यासाठी ‘श्री दुर्गासप्तशती पाठा’चे अनुष्ठान करण्यास सांगितले होते. वेदमूर्ती ओंकार पाध्ये यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव आहे. त्यांनी हे अनुष्ठान अत्यंत भावपूर्णरित्या केले. त्यामुळे त्यांना या धार्मिक विधीमुळे निर्माण झालेल्या चैतन्याचा लाभ झाला. हा लाभ ‘अनुष्ठानानंतर त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होणे आणि त्यांची प्रभावळ वाढणे’, अशा रूपांत दिसून आला.

३ ई. अनुष्ठानाच्या २ र्‍या आणि ६ व्या दिवशी अन्य दिवसांच्या तुलनेत वेदमूर्ती ओंकार पाध्ये यांच्या प्रभावळीत अल्प प्रमाणात वाढ होण्याचे कारण

अनुष्ठानाच्या २ र्‍या आणि ६ व्या दिवशी वेदमूर्ती ओंकार पाध्ये यांच्या प्रभावळीत झालेली वाढ अन्य दिवसांच्या तुलनेत पुष्कळ न्यून होती. तसेच दुसर्‍या दिवशी पूजनानंतरची त्यांची प्रभावळ पहिल्या दिवशी पूजनानंतर असलेल्या त्यांच्या प्रभावळीपेक्षा न्यून होती. याचे कारण पुढीलप्रमाणे आहे.

हे अनुष्ठान परात्पर गुरु डॉ. आठवले यांना चांगले आरोग्य लाभावे म्हणून केले होते. परात्पर गुरु डॉ. आठवले हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्यरत आहेत. तसेच ते सध्या विस्कटलेली हिंदु धर्माची घडी नीट बसवण्यासाठी, म्हणजे धर्मसंस्थापनेसाठीही कार्य करत आहेत. अशा प्रकारे समष्टीसाठी कार्यरत असलेल्या संतांवर त्यांच्या कार्याला विरोध म्हणून सूक्ष्मातील अनिष्ट शक्तींची आक्रमणे वारंवार होत असतात. त्यामुळे अशा संतांच्या आरोग्यासाठी अनुष्ठान करत असतांना अनिष्ट शक्तींची आक्रमणे होणे स्वाभाविक आहे. वेदमूर्ती ओकार पाध्ये यांनी हे अनुष्ठान केल्यामुळे ज्या दिवशी त्यांच्यावर अनिष्ट शक्तींची आक्रमणे झाली, त्या दिवशी त्यांच्या प्रभावळीत अनुष्ठानातील अन्य दिवसांच्या तुलनेत अल्प प्रमाणात वाढ झाली.

या चाचणीतून हिंदु धर्मातील धार्मिक विधींचे महत्त्व लक्षात येते. तसेच पुरोहितांनी धार्मिक विधी भावपूर्ण केल्यास त्यांना आध्यात्मिक स्तरावर कसा लाभ होतो, हेही लक्षात येते.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१४.३.२०१८)

ई-मेल : mav.research२०१४@gmail.com