(म्हणे) ‘स्टिंग ऑपरेशन’ प्रकरणात सनातन संस्था एक पाऊल मागे !’

‘इंडिया टुडे’कडून पुन्हा एकदा सनातनची अपकीर्ती करणारे वृत्त प्रसारित !

धादांत खोटे वृत्त प्रसारित करणारी ‘इंडिया टुडे’ वृत्तवाहिनी म्हणजे पत्रकारितेला लागलेला कलंक !

फोंडा – सनातनच्या साधकांचे कथित ‘स्टिंग ऑपरेशन’ केल्याच्या प्रकरणात ‘इंडिया टुडे’ने पुन्हा एकदा धादांत खोटे वृत्त प्रसारित करून सनातन संस्थेची अपकीर्ती करण्याचा प्रयत्न केला. ‘या प्रकरणात प्रतिक्रिया हवी असल्यास सनातनचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांच्याशी संपर्क करा’, असे सांगूनही ‘इंडिया टुडे’ या वृत्तवाहिनीने १० ऑक्टोबर या दिवशी पत्रकार मयुरेश गणपत्ये यांचे सनातनचे साधक श्री. संदीप शिंदे यांच्याशी संभाषण झालेली ध्वनीचित्रफीत प्रसारित केली. ती दाखवतांना ‘सनातनच्या साधकांकडून प्रतिक्रिया देण्यास नकार’, ‘या प्रकरणात सनातन संस्था ‘बॅकफूट’वर (एक पाऊल मागे) गेली आहे’, असे धादांत खोटे वृत्त प्रसारित केले. (या कथित ‘स्टिंग ऑपरेशन’च्या प्रकरणात सनातन ‘इंडिया टुडे’वर कायदेशीर कारवाई करण्याच्या सिद्धतेत असतांना ‘ती बॅकफूट’वर गेली’, असे म्हणणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा होय ! – संपादक)

गणपत्ये यांनी ‘सनातनच्या आश्रमात वास्तव्य करणार्‍या साधकांची प्रतिक्रिया हवी. त्यामुळे आश्रमात यायचे आहे’, अशी ९ ऑक्टोबरच्या रात्री मागणी केली. ‘प्रतिक्रिया हवी असल्यास सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांना संपर्क करा. अधिकृत भूमिका प्रवक्तेच मांडतात’, असे सनातनचे साधक श्री. संदीप शिंदे यांनी सांगूनही गणपत्ये १० ऑक्टोबरला सकाळी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाच्या प्रवेशद्वारावर येऊन ‘बाईट’ची मागणी करू लागले. त्या वेळी श्री. शिंदे यांनी पुन्हा त्यांच्याशी भ्रमणभाषवर संपर्क केला आणि त्यांना ‘प्रतिक्रिया हवी असल्यास श्री. राजहंस यांच्याशी संपर्क साधावा’, असे पुन्हा एकदा सांगितले. असे सामान्य पातळीवर संभाषण झाले असतांनाही ‘इंडिया टुडे’ या वृत्तवाहिनीने वृत्त प्रसारित करतांना मात्र वरील प्रमाणे विपर्यस्त वृत्त प्रसारित करून सनातनची अपकीर्ती करण्याचा प्रयत्न केला. (सनातनवर आतापर्यंत अनेक संकटे आली. त्यातून तावून सुलाखून ती उजळून निघाली. त्यामुळे अशा टुकार ‘स्टिंग ऑपरेशन’ला सनातनचे साधक घाबरत नाहीत. इंडिया टुडे आणि अन्य वृत्तवाहिन्या यांनी मात्र हिंदुत्वनिष्ठ संस्थांची अशी अपकीर्ती करणे चालू ठेवल्यास त्यांना हिंदूंच्या रोषाला सामोरे जावे लागेल, हे निश्‍चित ! – संपादक)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात