‘इंडिया टुडे’ या वृत्तवाहिनीला सरकारी गुप्त माहिती पुरवल्याविषयी गोव्यातील पोलीस निरीक्षक सी.एल्. पाटील यांच्याविरुद्ध पोलीस महासंचालकांकडे तक्रार

फोंडा (गोवा), १० ऑक्टोबर (वार्ता.) – गोव्यातील हणजुणे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चेतन एल्. पाटील (सी.एल्. पाटील) यांनी गुन्ह्यातील अन्वेषणाविषयीची गुप्त आणि संवेदनशील माहिती ‘इंडिया टुडे’ या वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात उघड केल्याविषयी हिंदु विधीज्ञ परिषदेचे गोवा राज्य सचिव अधिवक्ता नागेश जोशी (ताकभाते) यांनी गोव्याच्या पोलीस महासंचालकांकडे तक्रार प्रविष्ट केली आहे. ‘इंडिया टुडे’ या वृत्तवाहिनीचा कार्यक्रम दर्शवणारी ध्वनिचित्रचकती (डीव्हीडी) या तक्रारीसमवेत अधिवक्ता नागेश जोशी (ताकभाते) यांनी जोडली आहे.

या तक्रारीत अधिवक्ता जोशी (ताकभाते) यांनी म्हटले आहे की, ८ ऑक्टोबर २०१८ या दिवशी सायंकाळी ६ वाजता ‘इंडिया टुडे’ या वृत्तवाहिनीच्या वतीने ‘सनातन टेरर संस्था’ या नावाने एक कार्यक्रम देशभरात प्रसारित करण्यात आला. या कार्यक्रमात गोव्यातील हणजुणे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चेतन एल्. पाटील यांनी उघडपणे या वृत्तवाहिनीवर मुलाखत देऊन गुन्ह्यांच्या संदर्भात पोलीस खात्याच्या वतीने करण्यात आलेला व्यवहार या वृत्तवाहिनीकडे उघड केला.

ही माहिती केवळ पोलीस खात्याकडेच उपलब्ध असून संबंधित पोलीस अधिकार्‍यांनाच त्याविषयी ठाऊक असते. नोकरीमध्ये असतांना अशी संवेदनशील आणि गुप्त माहिती देण्याची अनुमती नसतांना पाटील यांनी अंतस्थ हेतूने ही माहिती वृत्तवाहिनीला दिली. अशी माहिती उघड करणे, हे ‘ऑफिशियल अ‍ॅक्ट’ आणि इतर अनेक कायदे भंग करणारे आहे. याच कार्यक्रमात ‘गुप्त माहिती मिळवण्यासाठी पैसे दिले जातात’, याविषयीही चर्चा झाली होती. गोवा राज्याची सुरक्षितता लक्षात घेता ही गंभीर गोष्ट आहे. त्यामुळे पैशांच्या मोबदल्यात पोलीस निरीक्षक चेतन पाटील (सी.एल्. पाटील) यांनी ही माहिती दिली असल्याचा संशय येतो.

मडगाव स्फोट प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एन्.आय.ए.) काही आरोपींचा शोध घेत असतांना सी.एल्. पाटील यांनी पोलीस खात्याकडे असलेली गुप्त माहिती उघड केली. यामुळे त्यांनी ‘ऑफिशियल सिक्रेट अ‍ॅक्ट १९२३’, ‘पोलीस अ‍ॅक्ट १९२२’ आणि ‘पोलीस अ‍ॅक्ट १८६१’ यांनुसार गुन्हा केला आहे. तसेच ही माहिती उघड करून त्यांनी ‘भारतीय दंड विधान १२४ अ’नुसार शासनाविरुद्ध असंतोष निर्माण करण्याची कृती करून शासनाचा अवमान केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना ‘पोलिसांनी संवेदनक्षम  अशी माहिती प्रसारमाध्यमांसमोर उघड करू नये’, अशी ताकीद दिली आहे. तरीही सी.एल्. पाटील यांनी प्रसारमाध्यमांसमोर ही माहिती उघड केली आहे.

या प्रकरणाविषयी पोलीस निरीक्षक सी.एल्. पाटील यांना त्वरित सेवेतून निलंबित करावे, तसेच त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करून कायद्यानुसार त्यांना अटक करण्यात यावी आणि पुढील अन्वेषण करावे, अशी मागणीही अधिवक्ता नागेश जोशी (ताकभाते) यांनी या तक्रारीद्वारे केली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात