‘इंडिया टुडे’ने सनातनच्या साधकांच्या केलेल्या कथित ‘स्टिंग ऑपरेशन’ची न्यायालयीन पडताळणी होणे आवश्यक !- अधिवक्ता विष्णु शंकर जैन, हिंदु विधीज्ञ परिषद

‘इंडिया टुडे’च्या चर्चासत्रात हिंदु विधीज्ञ
परिषदेचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांचा सडेतोड प्रतिवाद

फोंडा – ‘इंडिया टुडे’ या वृत्तवाहिनीने सनातनच्या साधकांचे ‘स्टिंग ऑपरेशन’ केले आहे. या घटनेचा व्यापक अंगाने विचार करता त्याची न्यायालयीन पडताळणी होणे आवश्यक आहे. यात सनातनचे साधक दोषी आढळले, तर त्यांच्यावर कठोर कारवाई करा; मात्र आता या ‘स्टिंग ऑपरेशन’द्वारे त्यांची जी अपकीर्ती करण्यात येत आहे, ती अत्यंत चुकीची आहे, असे परखड प्रतिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी केले. ते ‘इंडिया टुडे’, या वाहिनीने आयोजित केलेल्या चर्चासत्रात बोलत होते. चर्चासत्राचे सूत्रसंचालन पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी केले. यात सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता संजय हेगडे, महाराष्ट्राचे माजी पोलीस महानिरीक्षक जयंत उमराणीकर आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सहभागी झाले होते.

८ ऑक्टोबर या दिवशी ‘इंडिया टुडे’ने हे कथित ‘स्टिंग ऑपरेशन’ प्रसारित केले. यात स्फोटाच्या प्रकरणात निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांनी गुन्हा केल्याची कथित स्वीकृती देत असल्याचे दाखवण्यात आले आहे.

‘इंडिया टुडे’चे चित्रीकरण न्यायालयात प्रमाणित होऊ शकते का ?
– जयंत उमराणीकर, माजी पोलीस महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग

तुमच्या पत्रकारांनी जे काही चित्रीकरण केले आहे, ती स्वीकृती म्हणून न्यायालयात चालणार आहे का ? न्यायालय विचारील, ‘ही गुन्ह्याची स्वीकृती आहे’, असे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला ?’ न्यायालय असेही विचारील की, ‘या लोकांचा सनातनशी संबंध आहे का ? त्याचा पुरावा आहे का ? ही जी काही त्यांनी गुन्ह्याची स्वीकृती दिली आहे, त्याविषयी लिखित किंवा काही प्रमाणित पुरावा आहे का ?’ याविषयी तुमच्याकडे उत्तरे असतील आणि न्यायालयाने ती स्वीकारली, तरच हे (‘स्टिंग ऑपरेशन’मध्ये साधकांनी दिलेली कथित स्वीकृती) न्यायालयात पुरावे म्हणून सादर होऊ शकते. अन्यथा आता जे तुमच्या पत्रकारांनी ‘स्टिंग ऑपरेशन’ केले आहे, त्याद्वारे केवळ या प्रकरण पुन्हा अन्वेषणासाठी उघडले जाऊ शकते. हे प्रकरणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तत्कालीन केंद्र सरकारला १ सहस्र पानांचे ‘डोसीयर’ पाठवले होते. तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम् हे प्रत्येक कागदपत्र स्वतः पडताळत असत. त्यांना संस्थेवर बंदी घालण्याइतपत जर पुरेसे पुरावे सापडले नसतील, तर ते योग्यच असणार.

विष्णु शंकर जैन यांनी सडेतोड प्रतिवादामुळे राजदीप सरदेसाई यांची बोलती बंद

चर्चासत्राच्या वेळी सरदेसाई यांनी अधिवक्ता जैन यांना ‘तुमचा हिंदु जनजागृती समितीशी संबंध आहे का, ते प्रथम सांगा’, असा प्रश्‍न विचारला. ‘सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती यांचा एकमेकांशी संबंध जोडून त्यांचा स्फोटाशी संबंध आहे’, हे दाखवण्याचा सरदेसाई यांचा प्रयत्न होता. सरदेसाई यांच्या प्रश्‍नावर अधिवक्ता जैन यांनी तात्काळ ‘मी कायदेशीर सल्लागार आहे. जर एम्आयएम्चे प्रमुख ओवैसी ‘मी अधिवक्ता असल्याने आतंकवाद्यांची पाठराखण करू शकतो’, असे म्हणू शकतात, तर  कायदेशीरदृष्ट्या मी सनातनची येथे बाजू मांडू शकतो. हीच माझी त्यांच्याशी असलेली ‘लिंक’ आहे’, असे सडेतोडपणे उत्तर दिले. यामुळे सरदेसाई यांची बोलती बंद झाली.

पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्याकडून सनातनच्या साधकांची हाफीज सईदशी तुलना !

गौरी लंकेश हत्येच्या प्रकरणात हिंदु जनजागृती समितीचे नाव समोर येत आहे, नालासोपारा प्रकरणात समितीचे नाव पुढे आले आहे. वर्ष २००८ मध्ये झालेल्या स्फोटात सनातन संस्थेचे नाव पुढे आले आहे. या प्रकरणात सनातन संस्थेचे पदाधिकारी हात झटकत आहेत. ‘आम्ही काहीही करत नाही. आम्ही आध्यात्मिक आहोत’, असे ते सांगत आहेत; मात्र तुमचे कार्यकर्ते हिंसाचार करत आहेत. हे इतर संघटनांपेक्षा वेगळे कसे ? आज हाफीज सईद सांगतो की, मी आध्यात्मिक नेता आहे; मात्र त्याची संघटना आतंकवादी कारवाया करत आहे. हे आणखी कधीपर्यंत चालणार ?, असा प्रश्‍न सरदेसाई यांनी उपस्थित केला. (राष्ट्र आणि धर्म कार्य करणार्‍या आध्यात्मिक संस्थेची तुलना आतंकवादी संघटनेशी करून स्वतःची बौद्धिक दिवाळखोरी उघड करणारे राजदीप सरदेसाई ! यातून त्यांचा हिंदुद्वेष दिसून येतो ! – संपादक)

‘स्टिंग ऑपरेशन’च्या न्यायालयीन पडताळणीसाठी सनातन संस्था सिद्ध !

या प्रकरणाचे गांभीर्य पहाता या पूर्ण ‘स्टिंग ऑपरेशन’ची न्यायालयीन पडताळणी होणे आवश्यक आहे. आम्ही यासाठी सिद्ध आहोत. त्या वेळी सरदेसाई यांनीही ‘आम्ही यासाठी सिद्ध आहोत’, असे सांगितले. न्यायालय याविषयी योग्य तो निर्णय घेईल, असे अधिवक्ता जैन यांनी सांगितले. या कार्यक्रमात नेहमीप्रमाणे काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी संस्थेवर बंदी आणण्यासाठी काय प्रयत्न केले, याविषयी पालुपद लावले.

 

हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते रमेश शिंदे यांच्याशी हातवारे करून
असभ्यपणे बोलणारे राहुल कंवल यांच्यासारखे पत्रकार हे पत्रकारितेला लागलेला कलंक !

८ ऑक्टोबरला ‘इंडिया टुडे’ ने कथित ‘स्टिंग ऑपरेशन’ प्रसारित करतांना हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांना बोलावले होते. त्या वेळी सूत्रसंचालक राहुल कंवल हे श्री. रमेश शिंदे यांच्याशी शिष्टाचाराच्या मर्यादा ओलांडून त्यांच्या अंगावर धावून जात दमदाटी करत होते आणि त्यांना बोलूही देत नव्हते. त्याची झलक वाचकांना कळावी, यासाठी कार्यक्रमाच्या वेळीचे हे छायाचित्र येथे प्रसिद्ध करत आहोत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात