सनातन संस्थेने तिची बाजू प्रसारमाध्यमांमधून लोकांसमोर मांडावी ! – डॉ. प्रमोद सावंत, सभापती, गोवा विधानसभा

सनातन संस्थेवरील संभाव्य बंदीच्या विरोधात
गोवा विधानसभेचे सभापती डॉ. प्रमोद सावंत यांना निवेदन

डॉ. प्रमोद सावंत यांना निवेदन देतांना श्री. दिलिप पेटकर आणि इतर

पणजी – सनातन संस्थेने तिची बाजू प्रसारमाध्यमांमधून लोकांसमोर मांडावी, असे आवाहन गोवा विधानसभेचे सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. सनातन संस्थेवरील संभाव्य बंदीच्या विरोधात गोवा विधानसभेचे सभापती डॉ. प्रमोद सावंत यांना सनातन संस्थेच्या वतीने नुकतेच निवेदन देण्यात आले. या वेळी सभापती डॉ. सावंत बोलत होते. हे निवेदन श्री. दिलिप पेटकर यांनी दिले.

या निवेदनात म्हटले आहे की, सनातन संस्था आणि तिचे साधक गेल्या दोन दशकांहून अधिक काळ निःस्पृहपणे हिंदु धर्म आणि संस्कृती यांचा प्रचार करून समाजाला अध्यात्म, साधना, संस्कृती आणि राष्ट्र यांविषयी जागृत करत आहेत. तसेच भ्रष्टाचार, जनतेची लुटालूट, अन्याय यांविरोधात वैध मार्गाने लढा देत आहेत. तरीही नालासोपारा प्रकरणी अटक करण्यात आलेले कुणीही सनातन संस्थेचे साधक नसतांना सनातन संस्थेवर बंदी घाला, अशी बिनबुडाची आणि उथळ मागणी काही राजकीय पक्ष, संघटना, मुसलमान नेते आदींकडून केली जात आहे. सनातन संस्थेवर बंदीची मागणी करणे, हे चुकीचे आहे.

लव्ह जिहादच्या विरोधात सनातन संस्थेने जागृती करावी

भारतभर चर्चिला जाणारा लव्ह जिहाद आता साखळीपर्यंत पोहोचला आहे. सनातन संस्थेने लव्ह जिहादच्या विरोधात जागृती करणे आवश्यक आहे, असे मत सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी या वेळी व्यक्त केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात