सनातन संस्थेने विरोधकांकडे दुर्लक्ष करून कार्य करत रहावे ! – केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक

सनातन संस्थेवरील संभाव्य बंदीच्या
विरोधात केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांना निवेदन

केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक (डावीकडे) यांना निवेदन देतांना सनातन संस्थेचे साधक श्री. प्रमोद नाणोस्कर आणि श्री. राज बोरकर

पणजी – सनातनने विरोधकांच्या कृतीकडे दुर्लक्ष करून कार्य करत रहावे. विरोधक सनातनचे काही बिघडवू शकत नाहीत. स्वत: काहीच चांगले करायचे नाही आणि इतरांनाही चांगले करू द्यायचे नाही, अशी या विरोधकांची वृत्ती आहे, असे मत केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केले. सनातनच्या साधकांनी नुकतीच सनातन संस्थेवरील बंदीच्या विरोधात केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची त्यांच्या गोव्यातील निवासस्थानी भेट घेऊन त्यांना याविषयावरील निवेदन दिले. या वेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी वरील मत व्यक्त केले. सनातन संस्थेच्या वतीने सर्वश्री प्रमोद नाणोस्कार आणि राज बोरकर यांनी हे निवेदन दिले.

या निवेदनात म्हटले आहे की,

सनातन संस्था आणि तिचे साधक गेल्या २ दशकांहून अधिक काळ निःस्पृहपणे हिंदु धर्म आणि संस्कृती यांचा प्रचार करून समाजाला अध्यात्म, साधना, संस्कृती आणि राष्ट्र यांविषयी जागृत करत आहेत. तसेच भ्रष्टाचार, जनतेची लुटालूट, अन्याय यांविरोधात वैध मार्गाने लढा देत आहे. त्यामुळे समाज नैतिकता आणि धर्माचरण यांकडे वळून सुखशांतीच्या आणि समृद्ध जीवनाच्या मार्गाकडे जात आहे. नालासोपारा येथील गोरक्षक श्री. वैभव राऊत यांना ९ ऑगस्टच्या रात्री आतंकवादविरोधी पथकाच्या पोलिसांनी अटक करून त्यांच्या निवासस्थानी काही स्फोटके सापडल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेले कुणीही सनातन संस्थेचे साधक नसतांना सनातन संस्थेवर बंदी घाला, अशी बिनबुडाची आणि उथळ मागणी काही राजकीय पक्ष, संघटना, मुसलमान नेते आदींकडून केली जात आहे. काही माध्यमांकडून सनसनाटी आणि दिशाभूल करणार्‍या बातम्या प्रसारित करून हिंदु आतंकवादाचा ढोल बडवला जात आहे. मुळात ठाणे वा मडगाव (गोवा) यांपैकी कुठल्याही बॉम्बस्फोटातील आरोपपत्रात सनातन संस्थेचे नाव आलेले नाही. संस्था कायदा आणि राज्यघटना यांच्या चौकटीत कार्य करणारी असल्याने तिने अवैध कृत्यांचा वेळोवेळी जाहीर निषेध केला आहे. केंद्र सरकारमधील केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजीजू यांनीही सनातन बंदीविषयी माहिती देतांना सांगितले होते की, केंद्र सरकारद्वारे सनातन संस्थेला कायदाद्रोही संघटना असे कोणत्याही प्रकारे घोषित केलेले नाही, तसेच आताच्या स्थितीत केंद्रशासनाकडे सनातन संस्थेवर बंदीचा कोणताही प्रस्ताव आणि विचार नाही. असे असतांना सनातन संस्थेवर बंदीची मागणी करणे, हे चुकीचे आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात