‘देव तारी त्याला कोण मारी’ या उक्तीप्रमाणे परात्पर गुरु डॉक्टरांनी पदोपदी रक्षण केल्याची सनातनचे ४० वे संतरत्न पू. गुरुनाथ दाभोळकरकाका (वय ७८ वर्षे) यांनी घेतलेली अनुभूती !

‘सनातनच्या संतांचे अद्वितीयत्व !’

१. बालपण आणि शिक्षण

१ अ. सर्वांचा लाडका असूनही हट्ट न करणे

‘माझा जन्म एका निर्धन शेतकरी कुटुंबात झाला. दोन बहिणींच्या जन्मानंतर माझा जन्म झाल्याने मी सर्वांचा लाडका होतो. मला समजू लागल्यापासून मी कधी कुणाकडे हट्ट केला नाही.

१ आ. सातवीपर्यंत शिक्षण झाल्यावर शाळेचे शुल्क भरण्यास पैसे नसल्याने पुढील शिक्षण न घेता गुरे राखणे

मला सहाव्या वर्षी शाळेत घातले. अभ्यासातील माझी प्रगती उत्तम नसली, तरी बरी होती. मी इयत्ता सातवीपर्यंत शाळेतील परीक्षेत उत्तीर्ण होत होतो; पण बोर्डाच्या परीक्षेत मी अनुत्तीर्ण झालो. त्या वेळी पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ‘हायस्कूल’मध्ये प्रवेश मिळत असे. त्याप्रमाणे मलाही प्रवेश मिळाला. तेव्हा शाळेचे ७ रुपये शुल्क भरायचे होते. वर्गशिक्षक प्रतिदिन मला ‘शाळेचे शुल्क भरले का ?’, असे विचारत आणि मी ‘उद्या, उद्या’, असे सांगत असेे. एक दिवस शिक्षकांनी मला ‘उद्या पैसे आणले नाहीस, तर वर्गात यायचे नाही’, असे सांगितले. हे मी वडिलांना सांगितल्यावर त्यांनी नाईलाजाने मला ‘शाळेत जाऊ नकोस’, असे सांगितले. त्यामुळे वर्ष १९५३ मध्ये माझ्या ‘हायस्कूल’च्या शिक्षणाचा विषय संपला. त्यानंतर तीन वर्षे मी गुरे राखत होतो.

१ इ. शेजारी रहाणार्‍या मुलाला आणि त्याच्या मित्रांना त्यांच्या अभ्यासात साहाय्य करणे, त्या मुलांनी परीक्षेला बसण्याचा आग्रह करून परीक्षेचे शुल्कही भरणे अन् परीक्षेत उत्तीर्णही झाल्याने हा प्रसंग आयुष्याला कलाटणी देणारा ठरणे

आमच्या शेजारी एक ख्रिस्ती मुलगा रहात होता. तो आणि त्याचे दोन मित्र एकत्र बसून अभ्यास करत. मीही कधी कधी त्यांच्या जवळ जाऊन बसत असे. त्यांना अभ्यासात काही अडचण असल्यास मी माझ्या बुद्धीप्रमाणे त्यांना सांगत असे. असे ८ ते १० मास गेले. पूर्वपरीक्षा जवळ आली होती. त्यासाठी ३.५० रुपये परीक्षा शुल्क भरायचे होते. ती मुले मला म्हणाली, ‘‘गुरु, तूही परीक्षेला बस. आम्ही तुझे पैसे भरतो.’’ मी म्हटले, ‘‘मला शाळा सोडून तीन वर्षे झाली. या काळात मी कधी हातात पुस्तकही घेतले नाही.’’ त्यांच्या आग्रहामुळे मी परीक्षेला बसलो आणि माझ्या सुदैवाने मी त्या परीक्षेत उत्तीर्णही झालो. दुर्दैवाने ज्या मुलांनी माझ्या परीक्षेचे शुल्क भरले होते, ती तीनही मुले अनुत्तीर्ण झाली. हा प्रसंग माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला.

नंतर मी पुन्हा ‘हायस्कूल’मध्ये जाऊ लागलो. तेव्हा ३ वर्षांपूर्वी माझ्या समवेत असलेली मुले अकरावीत शिकत होती. मी मात्र आठवीत शिकत होतो; मात्र याची मला खंत वाटली नाही.

१ ई. लहानपणापासून देवाधर्माची आवड असणे

माझे वडील शिवभक्त होते. त्यामुळे आम्ही सारे कुटुंबीयही शिवभक्त बनलो होतो. मी प्रतिदिन ‘शिवलीलामृता’चा अकरावा अध्याय वाचत असे. मी शनिमाहात्म्याचे पठणही करत असे. मला लहानपणापासूनच देवाधर्माची आवड होती.

१ उ. रुग्णाईत स्थिती
१ उ १. शरीर थंड पडणे आणि ‘वेगाने वर जात आहे’, असे जाणवणे

वर्ष १९५३ मध्ये मी रुग्णाईत होतो. माझ्या लघवीतून खर (लघवीवाटे जाणारे मूतखड्यासारखे; पण आकाराने अगदी लहान कण) जात होती. माझ्या पायाचा घोटा, गुडघे आणि कोपर यांवर सूज आली होती. मला उठवून बसवायला दोन व्यक्ती लागायच्या. एक दिवस माझे हात-पाय आणि सर्व शरीर थंड पडत चालले होते. माझे आई-बाबा आणि काका माझ्या उशाजवळच बसून होते. तेव्हा मला जाणवले की, मी पुष्कळ वेगाने वरवर जात आहे. मला माझ्या डाव्या आणि उजव्या बाजूला समान उंचीची झाडे दिसत होती. मी ‘शिवलीलामृता’च्या अकराव्या अध्यायात वाचल्याप्रमाणे मला सर्व दृश्य दिसत होते.

१ उ २. वरच्या दिशेने जाणे थांबून खाली येणे अन् शरिरात ऊब जाणवून श्‍वास चालू होणे

माझा वरच्या दिशेने जाण्याचा वेग प्रचंड होता आणि एकाएकी मी खाली आलो. माझ्या शरिरात ऊब येऊन माझा श्‍वास चालू झाला. या काळात माझ्या वडिलांमध्ये स्थळदेवतेचा संचार झाला. (आमच्या स्थळदेवतेला ‘हेळेकर’ म्हणतात.) त्यांनी मला शिवाकडून खाली आणले.

१ उ ३. दुसर्‍या दिवसापासून प्रकृतीत सुधारणा होऊन भिंतीला धरून ४ पावले चालू शकणे

दुसर्‍या दिवसापासून माझ्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली. मी भिंतीला धरून ४ पावले चालू लागलो. आमची स्थळदेवता ‘हेळेकर’ हिने आमच्या कुटुंबातील २ – ३ जणांचे प्राण परत आणले होते. माझ्या वडिलांमध्ये स्थळदेवतेचा संचार होत असल्याने बरेच जण त्यांच्याकडे प्रश्‍न घेऊन येत. वडिलांकडून त्यांच्या प्रश्‍नांचे निरसन होऊन लोकांना गुण येत असे.

१ उ ४. शिवाने जीवदान देणे

एका सोमवारी गावाचे पौरोहित्य करणारे श्री. अप्पा भटजी घरी आले होते. त्यांनी माझ्या हडकुळ्या शरिराकडे पाहून देवाला विचारले, ‘देवा, याची स्थिती अशी का झाली आहे ?’ तेव्हा देव म्हणाला, ‘हा गेलेला जीव असून शिवाच्या पायावरून परत आणला आहे.’

२. नोकरीच्या शोधात मुंबईत येणे

२ अ. ‘एस्.एस्.सी. उत्तीर्ण’ एवढेच प्रमाणपत्र असून अन्य कौशल्य नसणे

मी मे १९६१ मध्ये ‘एस्.एस्.सी.’ उत्तीर्ण झालो आणि जून १९६१ मध्ये मुंबईत आलो. एकत्र कुटुंब असल्याने मुंबईत आल्यावर मी माझ्या काकांकडे राहू लागलो. माझ्यासाठी मुंबई कमनशीबी ठरली. माझ्याकडे केवळ ‘एस्.एस्.सी. उत्तीर्ण’ एवढेच प्रमाणपत्र होते आणि अन्य कोणतेही कौशल्य नव्हते. वर्ष १९६१ ते १९६३ ही तीन वर्षे अशीच गेली.

२ आ. चेंबूर येथील एका ‘केमिकल फॅक्टरी’त कारकून म्हणून काम करणे, तेथील वेतनश्रेणी गिरणी कामगारांच्या वेतनश्रेणीप्रमाणे असल्याने युनियनने न्यायालयात दावा दाखल करणे आणि काही वर्षांनी कारखाना बंद होणे

वर्ष १९६४ मध्ये मी चेंबूर येथील एका ‘केमिकल फॅक्टरी’त कारकून म्हणून रुजू झालो. ही ‘हेवी केमिकल्स कंपनी’ असूनही तेथील वेतनश्रेणी मात्र गिरणी कामगारांच्या वेतन श्रेणीप्रमाणे होती. यासाठी ‘युनियन’ने न्यायालयात दावा प्रविष्ट केला होता. वर्ष १९७० मध्ये प्रविष्ट केलेला दावा वर्ष १९८१ पर्यंत खालच्या न्यायालयातून वरच्या न्यायालयात आणि तेथून पुन्हा खालच्या न्यायालयात अशा प्रकारे  प्रकरण चालू होते. शेवटी वर्ष १९८१ मध्ये ती ‘फॅक्टरी’ बंद झाली आणि मी पुन्हा निरुद्योगी झालो. माझे ‘कधी मुंबईत, तर कधी गावी’, असे जाणे-येणे चालू होते.

३. सनातन संस्थेशी संपर्क

३ अ. गुरांना घेऊन घरी जात असतांना वाडीतील प्रतिष्ठित व्यक्तीने रात्री मंदिरात येण्यास सांगणे, मंदिरात सनातनच्या साधकांचा परिचय होऊन ‘आतापर्यर्ंत जे शोधत होतो, तेच येथे गवसले आहे’, असे वाटणे

वर्ष १९९१ मध्ये मी मुंबई सोडली आणि १९९४ पर्यंत मी आमच्या गावी राहिलो. वर्ष १९९५ मध्ये एका गुरुवारी मी गुरांना घेऊन घरी येत असतांना आमच्या वाडीतील एक प्रतिष्ठित श्री. बाळा आडारकर मला भेटले आणि म्हणाले, ‘‘रात्री ९ वाजता ‘श्री हेळेकर मंदिरा’त ये.’’ मी रात्री मंदिरात गेलो. तेथे ७ – ८ लोक आले होते. रात्री ९ वाजता श्री. आठलेकर, श्री. देसाई, डॉ. सामंत आणि श्री. मालोंडकर अशी ४ – ५ मंडळी आली. त्यापैकी कोणाशीच आमची ओळख नव्हती. आठलेकरकाकांनी आम्हाला सनातन संस्थेच्या कार्याविषयी थोडक्यात ओळख करून दिली. ते माहिती सांगत असतांना मन आतून म्हणाले, ‘मी आतापर्यर्ंत जे शोधत होतो, तेच मला येथे गवसले आहे.’

३ आ. सत्संगाची ओढ वाटणे

सत्संगात ‘एक घंटा कसा गेला ?’, ते मला कळलेच नाही. पुढच्या गुरुवारी पुन्हा सर्वांनी एकत्र येण्याचे ठरले. माझ्या बाबतीत ‘ते आले, त्यांनी पाहिले, ते बोलले आणि ते जिंकून गेले’, असे सनातनच्या साधकांसंदर्भात घडले !’ मी त्या क्षणापासून सनातनशी जोडला गेलो. मला ‘गुरुवार कधी येतो आणि मी कधी देवळात जातो’, असे होत असे. मला सनातनची ओढ लागली.

३ इ. सेवेला आरंभ

मी मुंबई, रत्नागिरी, बेळगाव, गोवा, कुडाळ इत्यादी ठिकाणी प्रसारासाठी गेलो होतो.

३ इ १. कुडाळ येथील श्री. रंजन देसाई यांच्या कारखान्यात ‘स्टोअर क्लार्क’ म्हणून नोकरी करणे

श्री. रंजन देसाई यांच्या कारखान्यात कुडाळ सेवाकेंद्र चालू झाले. त्यांचा अ‍ॅल्युमिनियम भांड्यांचा कारखाना आहे. एक दिवस त्यांनी माझी मुलाखत घेतली. ‘मी मुंबईत एका कंपनीत कारकून होतो’, हे समजल्यावर ते म्हणाले, ‘‘मला एका ‘स्टोअर क्लार्क’ची आवश्यकता आहे. तुम्ही याल का ?’’ मी लगेच ‘हो’ म्हटले आणि दुसर्‍या दिवसापासून कामावर रुजू झालो. तेथे मी ७ – ८ मास नोकरी केली.

३ इ २. सिंधुदुर्गातील पहिला पूर्णवेळ साधक होणे आणि श्री. देसाईकाकांच्या कारखान्यातील एका लहानशा खोलीत सनातन संस्थेचे कार्यालय चालू होऊन तिथे राहू लागणे

वर्ष १९९७ मध्ये मी सिंधुदुर्गातील पहिला पूर्णवेळ साधक झालो. श्री. देसाईकाकांच्या कारखान्यात भट्टीला लागून असलेल्या एका ८ x ८ च्या लहानशा खोलीत आमचे कार्यालय चालू झाले. त्या खोलीला एकच दार होते आणि खिडकीही नव्हती. खोली भट्टीला लागून असल्याने उष्णतेचा थोडा त्रास व्हायचा; पण गुरुकृपेने मला त्याचे काही वाटत नव्हते. याच खोलीत माझे अंथरूण, पटल, आसंदी, तसेच २ x ७ फुटाची एक लाकडी पेटी होती. त्यात फलक इत्यादी प्रसारसाहित्य होते. मला अंघोळ आणि भांडी घासणे, हे नळाखाली उघड्यावरच करावे लागे.

३ इ ३. कुडाळ सेवाकेंद्रातील स्वागतकक्षात सेवा करणे

नंतर देसाईकाकांनी त्यांची ३ खोल्यांची चाळवजा जागा संस्थेला दिली. काही कालावधीनंतर पूर्णवेळ साधकांची संख्या आणि संस्थेचा व्याप वाढला. त्या वेळी मला स्वागतकक्षात सेवा मिळाली.

३ इ ४. परात्पर गुरु डॉ. आठवले कुडाळ सेवाकेंद्रात आले असतांना त्यांनी ‘तुम्ही तरुण मुलांशी जमवून घेण्यास चांगले साधले आहे’, असे सांगणे

मी कुडाळ सेवाकेंद्रात असतांना माझा मानेच्या मणक्यांचा त्रास वाढल्याने मी गळपट्टा लावत असे. एक दिवस परात्पर गुरु डॉ. आठवले कुडाळ सेवाकेंद्रात आले होते. ते गाडीतून उतरले आणि स्वागतकक्षात माझ्या समोर आले. माझ्या गळ्याला लावलेला पट्टा बघून ते म्हणाले, ‘‘तुम्हालाही पट्टा लागला का ? मीही रात्रीचा लावतो. वय झाले ना की, एकेक जण भेटायला येतात. आपण ते स्वीकारायचे.’’  दुसर्‍या दिवशी ते मला म्हणाले, ‘‘तुम्हाला कसे छान जमले आहे ना; कारण आतापर्यंत तुम्ही त्यांच्यातच (मी वय वर्षे २० ते २५ या वयोगटातील मुलांमध्ये वावरत असे) वागलात आणि राहिलात.’’

मला व्हॉलीबॉल खेळण्याचा छंद होता. माझा वयाच्या ३६ व्या वर्षांपर्यंत माझा व्हॉलीबॉल या खेळाशी संपर्क होता. व्हॉलीबॉलची एक पिढी १० वर्षांची. अशा ४ पिढ्यांशी माझा संबंध आला असल्याने आश्रमातील २२ ते २५ वषेर्र् वयोगटातील १५ ते २० मुलांशी जवळीक साधणे मला सुलभ झाले.

यानंतर लवकरच माझे मानेला गळपट्टा लावणे बंद झाले.’

४. साधनेच्या आरंभीच्या काळात
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी झालेली भेट !

४ अ. दादर येथील कार्यक्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांची झालेली भेट !

४ अ १. ‘दादर येथील ‘वनमाळी हॉल’ येथे संस्थेचा कार्यक्रम आहे’, असे समजल्यावर तेथे जाऊन फलकावर लिहिलेला कार्यक्रमाचा तपशील वाचणे

मी वर्ष १९९१ मध्ये मुंबई सोडली; पण माझे अधूनमधून केव्हातरी ८ – १० दिवसांसाठी मुंबईला जाणे-येणे होत होते. मी मुंबईत आल्यानंतर न चुकता आमचे ‘फॅमिली डॉक्टर’ श्री. सुनील बांदेकर यांना जाऊन भेटत असे. एकदा मुंबईत गेल्यावर डॉ. बांदेकर मला म्हणाले, ‘‘तुम्ही तुमच्या गावी काय करता ?’’ तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘‘सनातन संस्था’ नावाची एक धार्मिक संस्था गावोगावी जाऊन अध्यात्मप्रसाराचे कार्य करत आहे. त्यांचे कार्य आवडल्याने मी संस्थेकडे आकर्षित झालो. आता मी गावोगावी जाऊन लोकांना धर्मशिक्षणाचा विषय सांगतो.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘या संस्थेचा उद्या दादर येथील ‘वनमाळी हॉल’ येथे काहीतरी कार्यक्रम आहे.’’ हे ऐकल्यावर मी डॉ. बांदेकर यांचा निरोप घेतला आणि थेट दादर येथे ‘हॉल’वर गेलो. तेथे ३१ डिसेंबर या दिवशी होणार्‍या कार्यक्रमाचा फलक लावला होता आणि त्यावर कार्यक्रमाचा पूर्ण तपशील लिहिलेला होता.

४ अ २. परात्पर गुरु डॉ. आठवले कार्यक्रमाची पूर्वसिद्धता करतांना दिसल्यावर आश्‍चर्य वाटणे आणि ‘कदाचित् हे परात्पर गुरु डॉक्टर नसून दुसरे कुणीतरी असतील’, असे वाटणे

दुसर्‍या दिवशी सकाळी १० वाजता मी ‘वनमाळी हॉल’मध्ये पोहोचलो. तेव्हा सभागृह तुडुंब भरलेले होते. कार्यक्रमाला एकूण ३०० ते ३५० साधक होते. काही साधकांची धावपळ चालली होती. त्यात माझे कोणी परिचयाचे नसल्याने मी एका कोपर्‍यात शांतपणे बसून होतो. नंतर मी सभागृहात फेरी मारण्यासाठी उठलो, तर परात्पर गुरु डॉक्टर आणि एक साधक तेथे फलक बांधत होते. ‘एवढे साधक असतांना परात्पर गुरु डॉक्टर फलक बांधत आहेत’, याचे मला आश्‍चर्य वाटले. मला वाटले, ‘कदाचित् हे परात्पर गुरु डॉक्टर नसून दुसरे कुणीतरी असेल !’ या आधी मी त्यांना एकदाच पाहिले होते. माझे मन मात्र ‘हे परात्पर गुरु डॉक्टरच आहेत’, असे सांगत होते. मला वाटले, ‘हे परात्पर गुरु डॉक्टर आहेत, तरी लोक येथून जातांना त्यांना धक्का मारून का जात आहेत ? त्यांना काहीच कसे वाटत नाही ?’

४ अ ३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सूत्रसंचालन करतांना ‘व्यासपिठावर ३ संत उपस्थित आहेत’, असे सांगितल्यावर ‘व्यासपिठावर त्यांच्यासह ४ संत उपस्थित आहेत’, असे वाटणे

सकाळी १०.३० वाजता कार्यक्रम चालू झाला. व्यासपिठावर प.पू. रामजीदादा, घाटकोपरचे संत प.पू. गुलाबराव जोशी आणि उत्तर भारतातील एक संत प.पू. शर्माजी यांची उपस्थिती होती. परात्पर गुरु डॉक्टर व्यासपिठावरून सूत्रसंचालन करत होते. त्यांनी स्वतःचे नाव सांगून सूत्रसंचालनास आरंभ केला. तेव्हा कुणीतरी म्हणाले, ‘‘हे परात्पर गुरु डॉक्टर. हे तर सकाळपासून बॅनर्स इत्यादी बांधत होते.’’

ते व्यासपिठावरील उपस्थित विभूतींची ओळख करून देतांना म्हणाले, ‘‘आज आपले भाग्य आहे. एकाच वेळी व्यासपिठावर ३ संत उपस्थित आहेत.’’ तेव्हा मी मनात म्हणालो, ‘आपणासह चार संत आहेत.’ त्या वेळी ‘परात्पर गुरु डॉक्टर स्वतःला ‘संत’ न समजता ‘एक साधक’, असेच मानत होते.

४ अ ४. कार्यक्रम संपल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांना भेटणे आणि त्यांनी विचारपूस करणे

कार्यक्रम संपल्यावर माझी दृष्टी परात्पर गुरु डॉक्टरांना शोधत होती. ते लांब एका कोपर्‍यात एका शीख जोडप्याशी बोलत होते. मी लगेच त्यांच्यापासून ८ – १० पावलांवर जाऊन उभा राहिलो. ते शीख जोडपे बाजूला होताच मी लगेच परात्पर गुरु डॉक्टरांसमोर उभा राहून त्यांना नमस्कार केला आणि माझे नाव सांगितले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला विचारले, ‘‘कुठून आलात ?’’ मी सगळी ओळख दिली. ते म्हणाले, ‘‘तिकडे (सिंधुदुर्गात) आता कोण जिल्हासेवक आहे.’’ मी त्यांना ‘डॉ. संजय सामंत (डोळ्यांचे तज्ञ डॉक्टर) आहेत’, असे सांगितले. ते म्हणाले, ‘‘डॉ. सामंत ?’’ आपल्याकडे मालवण येथे रहाणारे एकच सामंत आहेत.’’ तेव्हा तेथे असलेले श्री. वटकरकाका म्हणाले, ‘‘हो. आपल्याला डॉ. संजय सामंत हे नवीन साधक मिळाले आहेत.’’ नंतर मी म्हणालो, ‘‘उद्या मी गावी जाणार आहे. उद्या सागरेश्‍वर मंदिरात रात्री ८ वाजता सनातनचा मेळावा आहे. त्यासाठी आपला काही संदेश मिळावा.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘येथे जे पाहिले, तेच तेथे सांगा.’’

४ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची मुंबई येथील सेवाकेंद्रात झालेली भेट !

४ आ १. मुंबई येथील सेवाकेंद्रात प्रथमच गेल्यावर साधकाकडे सेवा मागणे, त्याने ‘फलकावर ‘ट्रेसिंग’ करण्याची सेवा करू शकता का ?’, असे विचारल्यावर त्याला होकार देणे आणि होकार दिल्याविषयी आश्‍चर्य वाटणे

मी वर्ष १९९७ मध्ये प्रथमच मुंबई येथील सेवाकेंद्रात गेलो होतो. तेथे श्री. सत्यवानदादा (आताचे सद्गुरु सत्यवान कदम) यांच्याशी माझी भेट झाली. त्यांनी श्री. दिनेश शिंदे यांच्याशी माझी ओळख करून दिली. मी त्यांना म्हटले, ‘‘मी संध्याकाळपर्यंत येथे आहे. मला काहीतरी सेवा द्या.’’ त्या वेळी तेथे गुरुपौर्णिमेच्या २२ फुटी फलकासंबंधी सेवा चालू होती. फलक लांब पसरून त्यावर ‘ट्रेसिंग’ केले जात होते. त्यांनी मला विचारले, ‘‘तुम्ही ही सेवा करू शकता का ?’’ मी मागचा पुढचा विचार न करता ‘हो’ म्हणालो. मला पेन्सिलने साधी सरळ ओळही कधी आखता येत नव्हती आणि मी त्यांना ‘हो’ कसे म्हणालो ?’, याचे मला आश्‍चर्य वाटले.

४ आ २. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सेवा थांबवून त्यांच्या समवेत जेवायला बोलावणे

माझी २ – ३ अक्षरे ट्रेसिंग करून झाली आणि ‘माझ्या मागे परात्पर गुरु डॉक्टर कधी येऊन उभे राहिले ?’, ते मला समजलेच नाही. ते मला म्हणाले, ‘‘वा. छान करता ‘ट्रेसिंग’. दुपारच्या जेवणाची वेळ झाल्यावर ते मला म्हणाले, ‘‘चला, आता बस करा. आपण जेवायला जाऊया.’’ मी साधक जिकडे जात होते, तिकडे जाऊ लागलो; पण ते म्हणाले, ‘‘माझ्या समवेत या.’’ मी त्यांच्या समवेत गेलो.

४ आ ३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वतः ताटात जेवण वाढून न लाजता जेवण्यास सांगणे, जेवण झाल्यानंतर हस्तप्रक्षालनपात्र दाखवणे आणि हात धुवून झाल्यानंतर आराम करायला सांगणे

एका लहानशा खोलीत १ पटल आणि समोरासमोर दोन आसंद्या होत्या. पटलावर २ ताटे मांडली होती. गुरुदेवांनी दोन्ही ताटांत जेवण वाढले आणि म्हणाले, ‘‘आता जेवूया. लाजायचे नाही. जो परका असतो, तो लाजतो. आपण तर साधक आहोत.’’ ताटात दोन भाज्या होत्या. त्यापैकी एक गुजराती पद्धतीची होती. त्यांनी मला भाजीची माहिती दिली. त्यांचे जेवण पूर्ण झाल्यावर ते माझ्यासाठी थांबले. माझे जेवण झाल्यावर ते मला हस्तप्रक्षालन पात्राजवळ (बेसिनजवळ) घेऊन गेले. त्यांनी स्वतः नळाचे पाणी चालू केले आणि म्हणाले, ‘‘येथे हात धुवा.’’ दाराच्या मागे असलेल्या टॉवेलकडे हात दाखवून ते म्हणाले, ‘‘याला हात पुसा. तुम्ही आता आराम करा. मीही आराम करायला जातो.’’

४ आ ४. परात्पर गुरु डॉक्टरांनी श्री. दिनेश शिंदे यांना मुंबईतील सत्संगाचे पत्ते देण्यास सांगणे आणि मुंबईतील वास्तव्यात सकाळी सेवाकेंद्रात सेवा अन् संध्याकाळी सत्संगांत जाणे, असा दिनक्रम चालू होणे

विश्रांती झाल्यावर मी दुपारी ३ वाजता सेवा चालू केली. नंतर सेवेच्या ठिकाणी गुरुदेव आले. त्यांच्याशी माझे पुढील संभाषण झाले.

परात्पर गुरु डॉक्टर : संध्याकाळी तुम्ही काय करणार आहात ?

मी : संध्याकाळी सेवा झाल्यावर आज जेथे सत्संग असेल, तेथे मी जाईन.

परात्पर गुरु डॉक्टर : ‘कुठे जायचे ?’, ते तुम्हाला कसे कळणार ?

मी : मला पत्ता दिल्यास मी जाऊ शकतो. मी २३ वर्षे मुंबईत काढली आहेत. मी चेंबूर येथे एका ‘केमिकल कंपनी’त कामाला होतो.

नंतर त्यांनी दिनेशदादांना बोलावून मुंबईतील सत्संगांचे पत्ते देण्यास सांगितले. मी मुंबईत ८ – १० दिवस राहिलो होतो. त्या वेळी सकाळी सेवाकेंद्रात सेवा करणे आणि संध्याकाळी मुंबईतील सत्संगांत जाणे, असा माझा दिनक्रम होता.

५. अनुभूती

५ अ. सायकलने बाजारात जातांना बाजूने जाणार्‍या दुचाकीच्या ‘फूटबोर्डा’मध्ये सायकलचे ‘पॅडल’ अडकून सायकल ३० ते ३५ फूट लांब फरफटत जाणे; मात्र दुचाकीस्वाराने गाडी न थांबवणे, अकस्मात् दुचाकीच्या ‘फूटबोर्ड’चा तुकडा तुटून ‘पॅडल’ मोकळे होणे; पण दुचाकीस्वार गाडीसह गटारात पडणे

वर्ष १९९६ मध्ये मी श्री. रंजन देसाई यांच्या कारखान्यात ‘स्टोअर क्लार्क’ म्हणून नोकरी करत असतांना मला बाजारात जाऊन सामान आणण्याची सेवा होती. एक दिवस मी सायकलने बाजारात जातांना रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या दुकानांचे फलक वाचत चाललो होतो. माझी सायकल रस्त्याच्या मध्यावर आल्यावर एक स्कूटरवाला माझ्या उजव्या बाजूला इतक्या जवळ आला की, माझ्या सायकलचे ‘पॅडल’ त्याच्या ‘फूटबोर्ड’मध्ये अडकले. स्कूटरवाला गाडी थांबवत नव्हता आणि माझ्यावर सारखा ओरडत होता. सायकलचे ‘पॅडल’ अडकल्यामुळे गाडी जवळ जवळ ३० ते ३५ फूट फरफटत गेली. माझी सायकल त्या स्कूटरला समांतर अशी चालली होती; पण तो वाहन थांबवत नव्हता. दुचाकीच्या ‘फूटबोर्ड’चा ३ × ४ इंचाचा तुकडा तुटून पडला आणि मी मोकळा झालो; मात्र दुचाकी चालवणारा गाडीसह गटारात जाऊन पडला. मी लगेच सायकल एका निमुळत्या बोळात घातली; कारण ती व्यक्ती फारच संतापली होती. तो मला ‘अपशब्द बोलेल कि काय ?’, असे मला वाटत होते; पण गुरूंनी काळजी घेतली. ‘गुरु आपल्याला क्षणोक्षणी कसे वाचवतात’, हे माझ्या लक्षात आले.

५ आ. देवपूजेसाठी फुले तोडत असतांना ‘झाड फांद्या हलवून स्वागत करत आहे’, असे जाणवणे, वारा नसतांनाही फुलझाडे हलणे आणि उंचावर असणारी फुले आपोआप हातात येणे

मी कुडाळ सेवाकेंद्रात असतांना देवपूजेची सेवा माझ्याकडे होती. मी तेथील उद्यानातून फुले तोडून आणत असे. एक दिवस चमत्कार घडला. ‘मी ज्या फुलझाडाच्या जवळ जात असे, ते झाड फांद्या हालवून माझे स्वागत करत आहे’, असे मला वाटले. उंचावर असणारी फुले आपोआप माझ्या हातात येत होती. एका गुलाबाच्या सरळ वर गेलेल्या फांदीवरील फूलही मला सहजतेने काढता आले. वारा नसतांनाही फुलझाडे हलत होती. याचे मला आश्‍चर्य वाटले. वाटेत २ – ३ रुईची झाडे होती. मी त्यांच्या जवळ गेल्यावर ती झाडेही हलत होती. मी पूजेसाठी त्यांचीही पाने तोडून घेतली.

६. परात्पर गुरु डॉक्टरांनी वेळोवेळी केलेले रक्षण !

६ अ. कुडाळ सेवाकेंद्रात आलेल्या एका महाराजांमुळे झालेला त्रास !

६ अ १. वर्ष २००२ मध्ये कुडाळ सेवाकेंद्रात एक महाराज आले होते. त्या वेळी मी कणकवली येथे सेवेला होतो. तेथून कुडाळ येथे येऊन मी त्या महाराजांना भेटलो. ते प्रत्येकाला सांगत, ‘तुमच्याकडे अन्य कुठल्या महाराजांनी दिलेली वस्तू (ताईत, धागा इत्यादी) असल्यास ती वस्तू काढून टाका. तुम्हाला मी प्रसाद देतो.’ मी त्यांना सांगितले, ‘माझ्याकडे घाटकोपरचे संत प.पू. जोशीबाबा यांनी दिलेला ताईत आहे. मला असणार्‍या तीव्र आम्लपित्तावर उपाय म्हणून तो दिला आहे. ताईत मिळाल्यापासून आता मला त्रास होत नाही.’’ माझे बोलणे ऐकल्यावर ते थोडेसे रागावून म्हणाले, ‘‘मीही तुमचा त्रास घालवू शकतो.’’ मी ताईत काढला. ते मला म्हणाले, ‘‘आता तू जा आणि उद्या ये.’’ मी दुसर्‍या दिवशी गेलो. तेव्हाही त्यांनी मला परत पाठवून दुसर्‍या दिवशी येण्यास सांगितले. मी विचारांत पडलो, ‘हे महाराज असे का करत आहेत ? मी गेले ३ दिवस यांच्याकडे येत आहे आणि ते मला परत परत पाठवत आहेत.’ कणकवलीतील माझी सेवा थांबली होती. त्यामुळे ‘काय करावे ?’, हे मला कळत नव्हते; मात्र ३ र्‍या दिवशी त्यांनी ताईत दिला.

६ अ २. महाराजांनी साधकाला ‘तुझा नामजप मी बंद केला आहे’, असे सांगणे आणि त्या वेळी ‘३ दिवस प्रयत्न करूनसुद्धा नामजप का होत नव्हता ?’, हे साधकाच्या लक्षात येणे

त्या वेळी श्री. केसरकरकाका कुडाळला होते. त्यांना भेटायला म्हणून मी त्यांच्या खोलीत गेलोे. आम्ही बोलत असतांना तेथे महाराज आले आणि म्हणाले, ‘‘एकट्या केसरकर साहेबांना सोडून मी इथल्या सर्वांना शाप देणार आहे.’’ माझ्याकडे निर्देश करून ते म्हणाले, ‘‘हा तुमच्यासमोर उभा आहे. याला विचारा, ‘तुझे नाम होते का ?’, मी त्याचा नामजप बंद केला आहे.’’ तेव्हा ‘गेले ३ दिवस प्रयत्न करूनसुद्धा माझा नामजप का होत नाही ?’, हे माझ्या लक्षात आले आणि मी रडकुंडीला आलो.

६ अ ३. नामजप होत नसल्याने डोळ्यांतून घळाघळा अश्रू येणे, साधकाने विचारल्यावर त्याला सर्व वृत्तांत सांगणे आणि त्याने परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सर्व वृत्तांत कळवून त्यांचा आश्‍वस्त करणारा निरोप साधकाला देणे

कुडाळ सेवाकेंद्रात यज्ञ झालेल्या ठिकाणी सर्व साधक नामजप करत बसायचे. तेथे जाऊन मीही नामजप करू लागलो; पण माझा नामजप काही होत नव्हता. माझ्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वहायला लागले. एक साधक माझ्यामागे कधी येऊन उभे राहिले, ते मला कळलेच नाही. त्यांनी मला ‘‘काका, काय झाले ?’’, असे विचारल्यावर मी त्यांना घडलेली हकीकत सांगितली. त्यांनी लगेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांना भ्रमणभाष करून याविषयी विचारले आणि मला म्हणाले, ‘‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी तुम्हाला सांगितले आहेे, ‘‘तुमचा नामजप जसा होतो, तसा करा. मी तुमच्यासाठी जप करतो. काही काळजी करू नका.’’ नंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सर्वांना सांगितले, ‘ज्या साधकांजवळ महाराजांनी दिलेल्या वस्तू असतील, त्यांनी त्या त्वरित पाण्यात विसर्जन कराव्यात !’’

६ आ. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने मरणाच्या दारातून बाहेर आल्याची अनुभूती

वर्ष २००८ मध्ये देवद आश्रमात मला थकवा येऊन ताप आला. मला १०४ डिग्री ताप होता. दुसर्‍या दिवशीही मला ताप होता. तिसर्‍या दिवशी मी परात्पर गुरु डॉक्टरांना हे सर्व सांगितले. ते मला म्हणाले, ‘‘तुम्ही चिंता करू नका.’’ माझ्या तापात चढ-उतार होत होता. त्या वेळी श्री. अतुल पवार माझी सतत काळजी घेत होता. परात्पर गुरु पांडे महाराज माझ्यासाठी प्रतिदिन अनेक घंटे नामजपादी उपाय करत होते. मी अंथरुणातून उठूही शकत नव्हतो. एका रात्री माझी प्रकृती पुष्कळच बिघडली. माझ्या तोंडून आवाजच फुटत नव्हता. मी मरणाच्या दारात उभा होतो. अतुलदादा माझ्याजवळच बसून होता. रात्री १ वाजता त्याने परात्पर गुरु डॉक्टरांना भ्रमणभाष करून माझ्या प्रकृतीविषयी कळवले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘घाबरू नकोस. उद्या सकाळी मला भ्रमणभाष कर.’’

दुसर्‍या दिवशी अतुलदादाने परात्पर गुरु डॉक्टरांना भ्रमणभाष केल्यावर त्यांनी अतुलदादाला माझ्याकडे भ्रमणभाष देण्यास सांगितले. परात्पर गुरुदेव मला म्हणाले, ‘‘दाभोळकर, तुम्ही जिंकलात. हा ‘महामृत्यूयोग’ होता. पाताळातील मोठ्या वाईट शक्ती तुमची प्राणशक्ती २८ टक्क्यांवर आणण्याचा प्रयत्न करत होत्या. देवाने तुमची प्राणशक्ती ३१ टक्के ठेवली आणि तुमचे वाईट शक्तींच्या आक्रमणापासून रक्षण केले.’’ या काळात परात्पर गुरु पांडे महाराज यांनीही माझी पुष्कळ काळजी घेतली. ते दिवसातून २ – ३ वेळा माझ्याजवळ येऊन नामजपादी उपाय करत. नंतर माझी प्रकृती हळूहळू सुधारू लागली. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने मी मरणाच्या दारातून बाहेर आलो.’

– (पू.) गुरुनाथ शंकर दाभोळकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मुंबई येथील साधकांना
‘सिंधुदुर्गात केवळ दाभोलकर काकांसाठी गेलो होतो’ असे सांगणे

एकदा मी देवद आश्रमात स्वागतकक्षात सेवा करत असतांना एकदा कु. वत्सलाताईंनी (कु. वत्सला रेवणकर यांनी) दूरभाष करून मला सांगितले, ‘‘काका, एकदा मुंबईत या ना.’’ तेव्हा मी म्हणालो, ‘‘मला मुंबईत कुणीच ओळखत नाही.’’ तेव्हा ताई म्हणाल्या, ‘‘काका, असे काय बोलता ? मुंबईत परात्पर गुरु डॉक्टरांनी जेथे जेथे मार्गदर्शन केले, तेथे सांगितले, ‘‘मी सिंधुदुर्गात केवळ दाभोळकर काकांसाठी गेलो होतो.’’ ते ऐकल्यावर माझा कंठ दाटून आला.

– (पू.) गुरुनाथ शंकर दाभोळकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.