(म्हणे) ‘२१ व्या शतकात असे निर्णय घेणे आणि चर्चा होणे चुकीचे’ – खासदार सुप्रिया सुळे

देवस्थान समितीने मंदिरात तोकडे कपडे घालून येण्यास मज्जाव केल्याचे प्रकरण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी कधी मौलवींकडून काढल्या जाणार्‍या ‘फतव्यां’विषयी भाष्य केल्याचे ऐकिवात आहे का ?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मूक आंदोलनातील फलक

पुणे – स्वातंत्र्य, लोकशाही आणि संवैधानिक सार्वभौमत्व धोक्यात आणत असल्याच्या आरोपावरून भाजप सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने २ ऑक्टोबर या दिवशी येथील रेल्वेस्थानकावर गांधींच्या पुतळ्याला हार घालून मूक आंदोलन करण्यात आले.

या वेळी आंदोलनात उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप सरकारवर टीका केली. पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या निर्णयावर प्रतिक्रिया देतांना सुळे म्हणाल्या, ‘‘आपण २१ व्या शतकात असतांना कोल्हापूरच्या देवीच्या दर्शनासाठी तोकडे कपडे घालणार्‍यांना प्रवेश नसल्याची चर्चा चालू आहे. अशा प्रकारची चर्चा होणे आणि निर्णय घेणे चुकीची गोष्ट आहे. अशा गोष्टींवर चर्चा होण्यापेक्षा कुपोषण, महिलांवरील अत्याचार आणि सुरक्षितता यांवर लक्ष देण्याची आवश्यकता आहे. विचारवंतांना नजरकैदेत ठेवले जाते, कारागृहामध्ये टाकले जाते. दंगल घडवणार्‍यांवरील गुन्हे मागे घेतले जातात.’’(एकीकडे संविधानाचे पाईक असल्याचे दर्शवायचे आणि दुसरीकडे न्यायप्रविष्ट प्रकरणांवर बेछूटपणे बोलायचे, तसेच माओवाद्यांशी संबंध असल्याचे आरोप असणार्‍यांविषयी पाठीशी घालायचे, हा राष्ट्रवादी काँग्रेसचा दुटप्पीपणा जनता ओळखून आहे ! – संपादक)

मूक आंदोलनातील फलकावर सनातन संस्थेवर बंदीची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मूक आंदोलनातील फलकावर ‘हिंसा’ या मथळ्याखाली सनातन संस्थेच्या बंदीची मागणी करण्यात आली होती. विचारवंतांच्या हत्येस सनातन संस्था जबाबदार असल्याचे लिखाणही फलकावर लिहिण्यात आले होता. (आतापर्यंत कोणत्याही प्रकरणात सनातन संस्थेचा हात असल्याचे एकाही अन्वेषण यंत्रणेने किंवा न्यायालयाने म्हटलेले नाही, उलट मडगाव स्फोट प्रकरणात सनातन संस्थेला जाणीवपूर्वक गोवण्यात आल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तरीही ‘खोटे बोल; पण रेटून बोल’ ही कूटनीती अवलंबून राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाणीवपूर्वक सनातन संस्थेची अपकीर्ती केली जात आहे. याविषयी सनातन संस्था अधिवक्त्यांचा सल्ला घेत आहे ! – संपादक)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात